कथा - गोंदण
कथा - गोंदण


माणूस हा असा प्राणी आहे जो चुकूनही मोहातून बाहेर पडत नाही... गावात राहणाऱ्या लोकांचंही काहीसं तसंच आहे.... अनेक गावांतील मुलं शिक्षण शिकून मुंबई मध्ये स्थाईक झाली...पण तरी गावच्या मातीचा सुगंध सतत दरवळत असतो....गावाकडची संस्कृती कधी विसर पडू न्हाय देत.... अशाच एका गावाकडच्या सुबोधची कथा....
सुबोध शिकून सवरून लय मोठा
झाला....मुंबैला येवून तो मोठाल्या आफिसात कामाला लागला...गडी लय होशार...मुंबैला आला, चाकरी करू लागला.... तरी त्याचा सारा ध्यान गावाकडं फिरत राहायचं...माय काय करीत असंल...बा काय करत असंल...त्याचे पाय लय दुखत होतं... अजुनही दुखत असतील काय....आपली कपीला गाय पोटुशी हुती...व्याली असंल काय... आणि आपला बारका बंधु शेठ, तो काय करत असंल...शाळला रोज जात असंल नव्हं.... असे अनेक विचार डोक्यात चालू असायचे....
दिवसामाजी दिस जात व्हुते.... होळी जवळ आली होती....सुबोधलाही गावाकडं जाण्याची ओढ लागून राहिली.... तसं त्याने सायबासनी सांगितलं," सर, मला दोन दिवसांची सुट्टी हवी होती, आता होळी येते आहे आणि घरच्यांची पण खूप आठवण येते". "अरे आताच तर तू जॉईन झाला आणि लगेच सुट्टी कशी मिळेल". सबोधने खूप रिक्वेस्ट केली. तसे त्याच्या साहेबांनी थोडा विचार केला आणि त्याला दोन दिवसांची सुट्टी दिली... सुबोध खूप खुश झाला... संध्याकाळी अॉफीस सुटल्यावर त्याने थोडी खरेदी करायची असं ठरवलं. तसा तो मार्केट मध्ये आला आणि पहिलं आधी मायसाठी कोरं करकरीत लुगडं घेतलं. मग त्याने बा साठी धोतर आणि टोपी घेतली आणि बंधुसाठी हाफ पॅन्ट आणि शर्ट घेतलं आणि थोडी गोष्टींची पुस्तके घेतली...कपीला गायसाठी घंटी घेतली...
सूबोध खूप खुश होता.... रूमवर आला आणि त्याने सगळी आवराआवर केली. अलार्म लावून तो झोपून गेला. पहाटे लवकर उठला, सगळं आवरलं आणि तो एस.टी. मध्ये बसून गावी जाण्यास रवाना झाला. गाडीत बसून सुबोध सगळ्या गोष्टी आठवू लागला.कसं आपण गावी मजा केली...चिंचा बोरं गोळा करायचो....नदीवर पाण्यात डुबकी मारायचो...बा चा तो ओरडा...मायचा गालावरून फिरणारा प्रेमळ हात...हे सगळं त्याला आठवलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.... गाडी गावाकडे धावत होती...आठवणी पिछा करत होत्या.... हळूहळू मातीचा गंध दरवळत, अंगाला ती थंड प्रेमळ मंद हवा स्पर्शून जात होती.... खूप छान वाटत होतं.... संध्याकाळी सात वाजता सुबोध गावी पोहचला. घरी त्याने कळवलं नसल्यामुळे त्याला दारात बघून खूप खुश झाले....मायने लगेच आत जावून भाकर तुकडा आणला आणि ओवाळून फेकून दिला...घरातले सगळे खूप खुश होते...कपीला गायला पण मी आल्याचं समजलं... तिनेही हंबरणं चालू केलं.... मी माय आणि बा च्या पाया पडलो आणि कपीला गायला भेटायला गेलो...मला बघून खुश झाली...मान हलवू लागली.... मी पाठीवरून हात फिरवला आणि तिला चारा खायला घातला.... मी हातपाय धुतले आणि जेवून घेतलं.... खूप दिवसांनी मायच्या हातचं जेवण मी जेवत होतो....मन तृप्त झालं. उद्या होळी होती... सकाळी लवकर उठायचं होतं, म्हणून सगळे लवकर झोपले.
पहाटे मायने मला हाक मारली, सुब्या उठ लेका..दिस उजाडला,...माय आणि गावाकडचे सगळे लोक मला "सुब्या" हाक मारायचे. मी डोक्यावर चादर घेऊन आतुनच," हो माय" असा आवाज दिला... मी उठलो आंघोळ केली...मायने आज पुरणपोळीचा बेत केला होता... मला खूप आवडते पुरणपोळी... मी खूश होतो... देवपूजा आटोपून आम्ही नाश्ता केला....सगळ्यांना भेटवस्तू दिल्या.....भेटवस्तू सर्वांना खूप आवडल्या, नाश्ता करून आम्ही गावच्या होळीच्या पालखीच्या दर्शनासाठी निघालो. रस्त्याने जाताना सर्व विचारपूस करत होते..... पालखी खूप छान सजवली होती, दर्शन घेतले आणि आई-बाबा व घरी गेले. मी माझ्या गावचे बालपणीचे सवंगडी त्यांना भेटायला गेलो. आम्ही छान गप्पा गोष्टी करत मस्ती केली. मग मी थोड्यावेळाने घरी आलो, हातपाय धुवून जेवायला बसलो. जेवणाचा बेत खूप छान होता, कोंबडीचं सुकं, कालवण आणि आंबोळी. मी त्यावर ताव मारत भरपेट जेवलो. जेवून आई-बाबांची नीट चौकशी केली, त्यांनी माझी चौकशी केली, "कसं आहे मुबैला सारं ठिक आहे नव्हं". मी ठिक आहे सांगितलं, साहेब पण चांगले आहेत. समजून घेतात असं सांगितलं. मग थोडी दुपारची वामकुक्षी घेतली. संध्याकाळी चहा घेतला आणि नदीवर गेलो...तिथे थोडावेळ बसलो, झाडी झुडपे न्याहाळत बसलो...पक्ष्यांचा किलबिलाट, खूप छान वाटत होतं. मग मी घरी आलो, उद्या मला मुंबईला परतायचं होतं....दोन दिवस कसे गेले समजलेच नाही... आणि माझी मुंबईला परतण्याची तयारी करू लागलो. आई रडत होती, तिची समजूत काढली आणि सकाळी लवकर उठून सगळं आटपून, निरोप घेतला आणि गावचं गोंदण मनात गोंदवून मी मुंबईला रवाना झालो.