तिच्या मनातली सल
तिच्या मनातली सल
राधिकाच नुकतच शिक्षण झालं होत ,आता आईवडिलांची तिच्यासाठी स्थळ पाहण्यासाठी सुरुवात झाली. एक नात्यातील स्थळ तिच्या आईबाबांना आणि राधिकाला आवडलं. त्यांच्या काही अटी नव्हत्या.मुलगा दिसायला एवढा काही खास नव्हतं. शिक्षण ही राधिकापेक्षा कमीच होत .त्यां लोकांना काही मुलीच्या घरच्यांकडून देणं घेणं नको होत. कारण राधिका सर्वगुणसंपन्न, दिसायला सुंदर, कोणीही तिच्याकडे बघतच राहावं अशीच होती.
तसं राधिकाच्या सासरची माणसं माणुसकीला बोलण्यात वाटत होती. देणंघेण्याची अपेक्षा नसलेली होती.
आजच्या स्वार्थी जगात कोणावर विश्वास ठेवायचा. राधिका त्या घरी खुश राहिल म्हणून आईबाबांना ते स्थळ पसंद पडलं.तरीही राधिकाच्या आईबाबांनी त्यांच्या ऐपती प्रमाणे लग्न लावून सोनंनाणं घालून लेकीला पाठवलं. लग्नानंतरचे गुलाबी दिवस राधिकाचे मनात साठवण्यासारखे गेले.
स्वयंपाक घरात तिचा प्रवेश सुरु झाला. राधिका तशी सुगरणच होती. सासूबाईंना बोलायला असा काही चान्स देत नव्हती. नवनवीन पदार्थ बनवून खायला घालत होती.तरीही सासूबाईनचं तोंड वाकडच असे. राधिकाने शिकलेली असून गृहिणी पद आनंदाने स्वीकारलं.
एक दिवस शेजारच्या काकू तिच्या सासूबाईंकडे गप्पा मारायला आल्या. त्यांना राधिकाने चहा ठेवला. राधिकाने चहा दोघींना नेऊन दिला. काकूंना गोड हास्य देत राधिका पुन्हा तिच्या कामावर रुजू झाली.
दोघींच्या चहा घेता घेता गप्पा सुरु झाल्या. तुम्हाला कळालं का...? शेजारच्या अमितच लग्न झालं म्हणे....!मुलगी मोठया घरातील आहे. "कितीतरी तोळे सोने दिले ते बाई , काय मोठा हॉल तो लग्नाचा, जेवनाचा थाटमाट तर पाहून डोळे दीप्त झाले.त्या अमितने सोन्याच अंड देणारीच कोंबडी आणली बघा. त्यांचं बोलणं ऐकून राधिकाच्या सासूबाई हो ना असतं काय काय जणांचं नशीब.... नाहीतर आमचं बघा.असं सासूबाई राधिकाला ऐकवण्यासाठी म्हणाल्या....!
सासूबाई राधिकाला ऐकायला जाईल असं...!"आमच्या मुलींना आम्ही कशाची कमी केली नाही. त्यांचा सगळा थाटमाट करून पाठवलं. सासरी म्हणायला नको फुकटच्या घालवल्या. लग्नानंतरही थोरलीच्या मुलाचं बारस आम्ही केलं. धाकटीच्या ओटीभरणाला एक लाख उचलून दिले. आजकाल मात्र फुकट मुलींना सासरी पाठवलं जात.
त्या दिवशी राधिकाला खूप वाईट वाटलं एवढ चांगलं वागून, सगळ्यांच्या पुढं पुढं करून शेवटी यांनी आपली काय ठेवली. तिच्या वडिलांनी त्यांच्या परिस्थितीनुसार राधिकाला सोनं घातलं होत.
संध्याकाळी राधिकाचा नवरा आला. त्याच्याजवळ तिने विषय काढला. तो ही सरळ म्हणाला, हो आईचं बरोबर आहे. आम्ही केलंच तेवढं मुलींसाठी, जावयांसाठी . जे तुमच्याकडून झालं नाही.
नवऱ्याच्या बोलण्याचा राधिकाला खूप राग आला. ती तडकन म्हणाली तुम्ही पण सांगायचं ना एवढं द्या आम्हाला... आम्हाला झेपलं असतं तर केलं असतं,नाहीतर स्थळाला नकार दिला असता. तेव्हा मागितलं नाही आणि आता माझ्यावर लग्न करून उपकार केल्यासारख वागताय. मला ऐकवण करताय.
राधिकाचा नवरा, आम्ही काही मागितले नाही, पण तुझ्या आईबापाला कळालं पाहिजे ना....??
राधिकाच्या डोक्यात मात्र आता सनक गेली. तुम्ही कसं बोलताय माझ्या आईबाबांचा सरळ उद्धार करताय. त्यांच्या परिस्थितीच्या मानाने त्यांनी माझ्यासाठी खूप केलं. तुम्ही तेव्हा बोलून दाखवायचं ना....? आता कशाला बोलून दाखवताय....!
तिचा नवरा, "बोलून कशाला दाखवायला पाहिजे, नाहीतर तुझ्या घरच्यांनी माझ्यासाठी केलंच काय...?थोडंफार केलं ते पण तुझ्यासाठीच. माझ्यासाठी एक तोळा तरी देणं झालं का जावई म्हणून ....?
चांगली माणसं म्हणता म्हणता खरे चेहरे राधिकाच्या समोर येऊ लागले. लग्न होईपर्यंत गोड बोलले आणि आता लग्न करून उपकार केल्याचं दाखवत होतें.
राधिकाला त्या दिवशी खूप वाईट वाटलं रात्रभर रडली. माणसांची खरे चेहरे बघून त्यात सासूबाई बोलणं आठवून तिचा जीव तीळ तीळ तुटत होता. आज तिने आपलंस मानलेल्या घरात तिला परकेपणा वाटतं होता.
लग्नानंतर संसारात मन रमवणाऱ्या तिला आज तिचं शस्त्र आठवू लागलं ते म्हणजे शिक्षण तिने जॉब करायचा ठरवला. तीने सिविल इंजिनीरमध्ये डिग्री मिळवली होती.
सासूबाईंना तर जॉबच नाव ऐकताच राग आला. कारण तिला घरीच बसवायचं होत. तिने गृहिणी पद तसें आनंदात स्वीकारले. पण आईवडिलांचा केलेला उद्धार तिला सहन होत नव्हता.
तिने बरंचसें इंटरव्ह्यू दिले. त्यात एकात ती सिलेक्ट झाली, तिच्याकडील नॉलेज, आत्मविश्वास बघून.
तो तिच्या मनासारखा जॉब होता. ती खूप खुश झाली. कारण पगारही चांगला देणार होतें.
रोज घरातील काम उरकून ती जॉब करत होती. सासूबाई सकाळी योगाच्या क्लासला जा, देवळात जा, तर कधी मैत्रिणीबरोबर फिरायला. त्यामुळे त्यांचा काही कामाला हातभार लागत नव्हता. तीही काही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत नव्हती. तिची सगळी कर्तव्य पार पाडून ती जॉब करत होती.
आज राधिका आनंदात घरी चालली होती. जाताना तिने पेढे घेतले.कारण तिचा पहिला पगार मिळाला होता. तिच्या नवऱ्याला जेव्हा तिचा पगार समजला.तेव्हा तो खूप खजील झाला. कारण त्याच्यापेक्षा दुपटीने तिचा पगार होता.
काही महिन्यातच तिने एक तोळ्याची चेन नवऱ्यासाठी केली. ती तिने त्याला गिफ्ट म्हणून दिली. सासूबाईंचा चेहरा पडला होता.
राधिका, माझ्या आईबाबांकडून काही गोष्टी करायच्या राहिल्या होत्या, त्या मी पूर्ण केल्या,आणि यापुढेही त्यांनाही माझाकडून होईल तशी मी मदत करणार आहे. कारण सासरी आलं की माहेरच्या लोकांना कसं विसरायच.ज्यांनी हातांच्या फोडासारख मला जपलं, सांभाळ केला, शिक्षण दिले. त्यांचाही मुलीवर तेवढंच अधिकार पाहिजे ना...! जेवढा सासरकडील लोकांचा असतो. दोघांनाही चुकीचं वागण्याचा पच्छाताप झाला होता.
आज तिच्यात दुर्गेच रुपच दोघांना दिसत होत. दोघेही एकमेकांकडे खजील होऊन बघत होतें. राधिका तिच्या रूममध्ये गेली. आईवडिलांचा सासरी राखलेला मान तिला बहुमोलाचा वाटतं होता.
