तेरे बिना जिंदगी से कोई...
तेरे बिना जिंदगी से कोई...
"तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही, शिकवा नही... तेरे बिना जिंदगी भी लेकिन, जिंदगी नही, जिंदगी नही..."
हे मनाला ठाऊक असूनही करुणा आज रितेश पासून वेगळं होण्याचा निर्णय घेत होती. सुरुवातीला तिला कठीण वाटलं होतं...पण आता तिचा मधल्या काळात डळमळलेला आत्मविश्वास तिने पुन्हा मिळवला होता, जसा IT चा सोडलेला जॉबही!
CFO सारख्या मोठ्या पदावर राहून जमवलेली आजवरची सगळी मिळकत रितेशला मुंबईत फ्लॅट घेताना दिल्यावर करुणाकडे तिचे स्वत:चे असे खूप कमी पैसे उरले होते. लग्नानंतर सहा वर्षांनी लेक झाली ती प्री-मॅच्योर! तिला नीट वेळ देता यावा यासाठी करुणाने नोकरी सोडली आणि हळूहळू नंतर तिच्यात गुंतत गेली. तिने घरातील तिच्या बाकीच्या भूमिकाही सोडल्या! नाही म्हटले तरी लेकीच्या काळजीत तिचे मधल्या काळात रितेशकडेही लक्ष कमीच झाले होते.
तो घरी बराच उशीरा येत असल्याने मुलीची आणि घराची पूर्ण जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आणि मग तो घरी आला तरी जास्तच फोनवर गुंतत गेला. तिने तिच्या परीने सगळे प्रयत्न करुन सुद्धा तो तिच्या पासून मनाने बराच दूर निघून गेला आहे हे तिला जाणवत होतं. तिला त्यांचे जुने दिवस आठवले....
एकमेकात पूर्ण मिसळून गेलेल्या करुणा आणि रितेशनी लग्न ठरल्यावर बेंगलुरुहून खास मुंबईला बदली मागून घेत नवे आयुष्य भरभरून जगण्यासाठी त्यांचा मोर्चा तेव्हा स्वप्नांच्या नगरीकडे वळवला होता.
दोघेही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात खूप गुंतलेले असले तरी सुरुवातीचा बराचसा काळ त्यांनी एकत्र छान घालवला होता. वडिलांपासून विभक्त झाल्यानंतर रितेश, त्याच्या आई सोबतच लहानपणी वाढलेला असल्याने त्याची त्याच्या आई सोबतची बॉंडींग घट्ट होती. करुणानेही ते स्थान लवकरच त्याच्या आयुष्यात मिळवले होते.पण यातलं जणू काही त्याला आता काहीच नको असल्यासारखे किंवा त्याला करुणा कधी आवडत होती हे विसरल्यासारखे त्याच्यात बदल होत होते.
अचानक त्याला तिचा रंग, किंवा आताचे तिचे वाढलेले वजन,अंगावर खूप आधीपासून असलेले छोटे व्रण आत्ता जास्तच नजरेला खटकत होते.
एक ना अनेक अशी कितीही खोटी कारणं त्याने दिली तरी करुणाने त्यामागचे खरे कारण शोधून काढले ज्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. रितेशला आता दूसरं कोणीतरी आवडत असलं तरी तिने यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी रितेशने जेव्हा प्रेम दिले तेव्हा प्रेमाचं बीज त्याच्या मनात होतं. पण आता त्याने वेगळं बीज पेरण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीचे रितेशचे प्रेम पाहून त्याच्यासाठी करुणाने तिची संपूर्ण मिळकतही त्याला
विश्वासाने दिली होती.त्याच्या भरवशावर लेकीच्या वाढीवर काळजीने लक्ष देण्यासाठी नोकरी सोडली होती.आज अचानक त्याच्या मनात वेगळे स्वार्थाचे विचार त्याने पेरून घेतले होते त्यामुळे जे उगवेल त्यासाठी रितेशला समोरे जावेच लागणार होते.
सर्वात आधी तर करुणाने तिचा गेलेला आत्मविश्वास एका महिन्यात कमवत, तिची गेलेली नोकरीसुद्धा पुन्हा मिळवली.
करुणाने स्वत: अनेक प्रयत्न करून पाहिले पण शेवटी रितेशचा निर्णय बदलणार नाही आणि त्याला या लग्नात आणि नात्यात आता राहायचे नाही हे तिच्या लक्षात आलं. करुणाने मग या गोष्टीला स्वीकारत यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
तिची आई तिच्यासोबत येऊन काही काळ तिच्या मुलीला सांभाळण्यात तिची मदत करत होती कारण रितेशने पूर्ण तयारी करुन सहा महिने त्याच्या आईसोबत तिच्यापासून दूर राहत घटस्फोटाची तयारी आधीच सुरु केलेली होती...
ओढून ताणून नात्यात नसलेले प्रेम शोधण्यापेक्षा करुणा.... "तेरा बिना जिंदगी से कोई शिकवा नही" म्हणत तिच्या जीवनातील पुढचे पाऊल उचलत बाहेर पडली.....शेवटी जे पेराल ते उगवते. नाते टिकवण्याचा मनापासून प्रयत्न करुनही रितेश फक्त मतलबापोटी सोबत होता समजल्यावर करुणाने मुलीच्या भवितव्याचा विचार करत वेगळे होणे मान्य केले. ज्या मुलीसाठी रितेशने करुणाला सोडले होते तिला रितेशचे खरे रुप समजताच ती त्याच्या जगातून दूर निघून गेली. या सगळ्यात रितेश त्याची नोकरी ही गमावून बसला...त्याने पेरलेले बीज आज त्यालाच नकोसे झाले होते.
(कथा सत्य घटनेवर आधारीत)

