"स्वप्नातील भारत"
"स्वप्नातील भारत"
स्वप्नातील भारत कसा असावा याविषयी अनेक दिवस विचार करून मन निराश झाले होते. हजारो वर्षे या देशात साधू, संत, देवदेवता, जात-धर्म परंपरा, चालीरीती अशा विविधेतेत एकता मानणारा हा देश. प्रथम शिक्षण नव्हते म्हणून अडाणी आणि आता शिकून सुशिक्षित अडाणी अशा दुहेरी कात्रीत सापडलेला हा देश आहे. मग आता स्वप्नातला भारत कसा असावा बरे....
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर एक वर्षे झाली आहेत. आपला देश दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. अनेक देशभक्तांना स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. तेव्हा कुठे आजचा दिवस आपल्याला दिसला हे जरी खरे असले तरी, आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा जेवढ्या सुधारणा झाल्या त्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुधारणा याची तुलना जरी केली तर आजही वयोवृद्ध म्हणतात इंग्रजांचेच राज्य बरे होते. याबाबत माझे स्वतःचे काही विचार आहेत. ते कोणाला पटतील, कोणाला पटणार नाहीत सर्वांचे समाधान करायचे म्हटले तर माझे लिखाण पूर्ण होणार नाही. असो.
१) स्वातंत्र्य मिळवत असताना सर्वधर्मीय लोक एकजुटीने लढले. जे एकजुटीने लढले ते आणि त्यांचे आताचे वंशज आपला देश स्वतंत्र झाल्यावर तो एकसंघ राहावा म्हणून किंवा एक राहण्यासाठी सर्वधर्मसमभाव म्हणणारे एकजुटीने राहतात असे आपणास वाटते का?
२) परकीय शक्तीने आपल्यात भेदभाव निर्माण व्हावा या उद्देशाने एका देशाची दोन शक्कले केली. हे माहीत असूनही आपण आजही जात आणि धर्माच्या नावाने आपापले जथ्थे निर्माण करणे आवश्यक होते का?
३) जर आपल्याला जातीभेदच पाळायचा होता तर स्वातंत्र्याची आपल्या देशाला गरज होती का?
४) आपला देश परकीय गुलामीतून मुक्त झाला हे आपल्या देशातल्या किती टक्के लोकांना माहीत झाले होते आणि किती टक्के लोकांना माहीत नव्हते काही अंदाज सांगता येईल का?
५) ज्यांना आपला देश आणि आपण स्वतंत्र झालो हे कळण्यासाठी काही उपाययोजना केल्या असतील त्या कोणत्या होत्या?
६) खेडोपाडी, वाड्या-वस्त्यातून आणि गाव पातळीवर स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हे समजण्यासाठी काय प्रयत्न झाले?
७) स्वातंत्र्य नेमके कोणाला हवे होते, गरीब जनतेला की मूठभर नेतागिरी करणाऱ्यांना. जर जनतेला स्वातंत्र्य हवे होते तर स्वातंत्र्यानंतर समाज एकजूट का राहिला नाही? जो स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एकजूट होता?
८) स्वातंत्र्य मिळाले. देश प्रजासत्ताक झाला. या देशाचे स्वतंत्र असे संविधान तयार झाले. कायदे हे सर्व जनहित लक्षात घेऊन तयार केले होते. त्याची आचारसंहिता तयार झाली. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आली, देश प्रजासत्ताक झाला. मग आज देशाची अवस्था स्वातंत्र्यासारखी आहे, असे आपणास वय वर्षे ६७ झाली तरी खरे वाटते काय? हो एक आहे. काळाच्या ओघात काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील, पण मी त्यात समाधान मनात नाही. मुळात ज्यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवले ते तर आजही दृष्टीस येत नाही. सर्व ठिकाणी जाती-धर्माचे साम्राज्य दिसत आहे. आपण ६७ वर्षात या देशातली जाती-धर्मातली दरी कमी करू शकलो का? आपण आपल्याच मनाला विचारा. हे कोणामुळे झाले असेल असे वाटते? आपण आजही पूर्वीच्याच मनुवादी, जाती-धर्मात अडकून पडलो आहोत. माणसाला कोणतीही जात नाही हे माहीत असूनही ज्या रूढी परंपरा पुरातन काळात होत्या त्या तश्याच आहेत, नव्हे तर अधिक घट्ट होत चालल्या आहेत. गरीब - श्रीमंत भेद थोडा वेळ बाजूला ठेवू या आणि एक जात-धर्म विरहित समाज आपण का निर्माण करू शकत नाही तर, याचे खरे गमक जात आणि धर्माच्या मुळात आहे. आपण वरवर फक्त म्हणतो की, आम्ही जात-धर्म पाळीत नाही, पण जात आणि धर्म हे नाव घेतल्याशिवाय राजकारणी लोकांचा दिवस मावळणारच नाही. कोणत्या वेळी कोणत्या जातीचा वापर करायचा हे त्या त्या जातीचे समाजसुधारक आणि प्रवर्तक असतात त्यांनी हे मनापासून ठरवलेले असते. या लोकांनी जर खरोखर मनावर घेतले तर माणसात माणूसपण येण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज भासणार नाही. मुळात कोणत्याच धर्मातील नेत्याला जात आणि धर्माचा वाद मिटवायचा नाही हेच यातून सिद्ध होते.
मी म्हणतो आपणास सर्वाना असे वाटते का की, जात आणि धर्माची रचना प्रत्येक्ष देवाने केली असेल? असे किती लोक वाटते? ज्यांना हे सर्व देवाने केले आहे असे वाटते. असे जर आपण मानले तर, माणूस जन्माला येतानाच त्याच्या अंगाखांद्यावर तशा प्रकारची काही तरी खूण आढळून आली असती. तसे कोणत्याही धर्मातल्या माणसांच्या अंगावर दिसत नाही. मुलं जन्माला येताना त्याच्या जवळ कोणत्याच जात-धर्माची खूण नसते. हे तर जगजाहीर आहे. मग हा उपद्व्याप कोणीतरी अनेक वर्षांपूर्वी जाणूनबुजून केला असेल असे वाटावे इतपत आपण आज लिहिता वाचता येऊ लागल्याने ज
्ञात झाले आहे, पण मन मानायला तयार नाही हा खरा भाग आहे. एखादा विचार का मनात नाही, तर बालपणापासून आपल्या मनावर आपलेच आई-वडील, नातेवाईक आणि समाजाने तसे विचार बिंबवले आहेत म्हणून मन मनात नाही. कारण बालवयात झालेले संस्कार कोणीच सहजसहजी विसरत नाही. असो तर मुद्दा असा की, यापुढे तरी कोणी कोणाला किती छळले, काय काय बिरुदावली लावली, हे विसरून सर्व मानव जात म्हणजेच एक जात आणि माणुसकी हाच धर्म जर मानला तर, प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. आज काय होत आहे. प्रत्येक जण माझा धर्म आणि जात कशी श्रेष्ठ आहे, याच एका विचाराने ग्रासला आहे. या प्रयत्नात आजतागायत हजारोनी वर्षे गेली आणि या हजारो वर्षात प्रत्येक जाती-धर्मातील लाखो सुफी, संत, धर्म उपदेशकांनी, महात्म्यांनी खूप सांगून आणि लिहून झाले, प्रचार आणि प्रसार करून झाला, पण जात-धर्माच्या बाजूने असणाऱ्या काही मूठभर लोकांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण मानवजातीला एक विकृत स्वरूप प्राप्त करून दिले आहे. कोणताच धर्म इतर धर्मावर अन्याय करा असे सांगत नाही, हे माहीत असूनही दुसऱ्याच्या जात-धर्मावर चिखलफेक केल्याशिवाय यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य पूर्ण होत नाही हेच तर खरे दुःख आहे आणि जोपर्यंत स्वतः समाजातील काही निष्ठावान मंडळी स्वतःहून पुढे येत नाहीत तोवर हे जात-धर्माची दुकाने मांडून बसलेले लोक माणसांना माणूस म्हणून जगू देणारच नाहीत हे प्रकाशाइतके सत्य आहे. आपण असं म्हणू या की, पूर्वी शिक्षण नव्हते म्हणून लिहिता वाचता येत नव्हते म्हणून आकलन झाले नाही, पण आता तर सर्वच जात-धर्मात शिक्षणाचा प्रसार झाला आहे ना ! मग अडचण काय आहे? म्हणजे थोडक्यात काय की, माझ्या सासूने मला त्रास दिला. मग मी माझ्या सुनेला त्रास दिला नाही तर मोठे संकट येईल की काय असा आभास निर्माण केला जातो. तसेच जात आणि धर्माचे आहे. आमच्या अमुक एका जातील कमी लेखले त्रास दिला, मग आता आमची वेळ आली आहे, तमक्याला त्रास देण्याची, आता आमची एकजुट आहे. आम्ही संघर्ष करणार आणि न्याय मिळवणार असे वक्तव्य करून आपल्याच समाजाला वेठीस धरून इतर समाजाच्या लोकांमध्ये आपापसात तेढ वाढवली जाते. हे शास्त्र सध्या अतिशय प्रभावीपणे चालवले आहे. तसे फतवे निघत आहेत. राजकारण तर या देशात संपूर्ण जात-धर्मावर केले जाते आणि त्यात प्रत्येक जाती-धर्मातील गरीब मात्र नाहक भरडला जातो आहे. याचा विचार होताना दिसत नाही. फक्त जात- धर्माचे राजकारण, सत्ता आणि पैसा या गोष्टींभोवती सर्व जगातील मानवजात पिंगा घालताना दिसते आहे, मग स्वातंत्र्य मिळवून ६७ वर्षे झाली काय किंवा हजारी वर्षे झाली काय फरक पडणार आहे? मुळात कोणत्याच जात आणि धर्मातील गरीब सोडून जे जाती-धर्माचे राजकारण आणि समाजसेवक म्हणून मिरवतात किंवा ज्यांनी धर्माच्या नावाने देवधर्म तयार करून मोठमोठाली मंदीर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, विहार, गुहा-गुंफा मठ आणि विद्यापीठे स्थापन केली ते तर कधीच समाज एकरूप होऊ देणार नाहीत. पूर्वीच्या काळात शिक्षण नव्हते असे नाही, त्या त्या जात आणि पंथाची घरोघरी शिकण्याची आणि शिकवण्याची थोडीफार व्यवस्था होती, नाही असे नाही.
अलीकडच्या काळात अनेक बदल झाले. अनेक राजसत्ता येऊन गेल्या अगदी बाबर, हुमायून, शहाजहान, अकबर, औरंगजेब, शिवाजी महाराज, संभाजीराजे, पेशवे आता अलीकडे शाहू, महात्मा फुले, म. गांधी, डॉ.आंबेडकर पर्यंतचा काळ पाहा.
आतापर्यंत अनेक आक्रमणे झाली असली तरी, सर्व जात-धर्मांची लोक एकत्र येऊन एकमेकांविरुद्ध लढले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्या अगोदर आणि नंतर नुसत्या आपापल्या जातीसाठी कोणी लढल्याची इतिहासातसुद्धा नोंद नाही. सर्वांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक लढत होते. शिवाजी महाराजांच्या हजारो मुस्लिम सैन्य होते. तसेच मुघल राज्यांकडून सर्व जातीचे लोक लढत होते. १८५७ पर्यंत एवढ्या राजसत्ता आल्या आणि गेल्या पण जातीय दंगल झाल्याचे उदाहरण नाही, मग आपण स्वातंत्र्यात जन्मलो, म. फुले यांच्या कृपेने चांगले शिक्षण घेतले. काही तर शिक्षण सम्राट झाले. एवढे होऊनही आपण काही बोध घेतला आहे असे थोडेतरी वाटते काय? अनेक शतके चालत आलेल्या गुलामीची लक्त्तरे अजूनही बोकांडी घेऊन आपण आणि आला समाज जगत आहे. याला काय परकीय लोक जबाबदार आहेत असे वाटते काय? माणसाला शिकल्यानंतरही सारासार विचार करता येत नसेल तर स्वातंत्र्य मिळवून सत्तर वर्षे काय अशी हजारो वर्षे गेली तरी स्वातंत्र्याचे सुख आपणच काय, आपल्यानंतर येणाऱ्या लाखो ते म्हणतात ना!! झोपी गेलेल्या माणसाला जागे करता येते, पण ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे त्याला कसे जागे करणार? यांची कुंभकर्णी झोप गेल्याशिवाय स्वप्नातील भारत हा स्वप्नातच राहणार आहे. पिढ्यांना हे उपभोगता येणार नाही, हेच कालातीत सत्य आहे.