Gauri Kulkarni

Romance

4.5  

Gauri Kulkarni

Romance

स्वप्नांची खिडकी

स्वप्नांची खिडकी

3 mins
293


"पलभर के लिए कोई हमे प्यार कर ले" असं म्हणत देव आनंद हेमा मालिनीच्या मागे स्क्रीनवर धावू लागला. तशी ऋतुजा हातातलं काम टाकून देत लगबगीनं टीव्हीसमोर येऊन बसली. लहानपणापासून तिला हे गाणं प्रचंड आवडत होतं. तुम्ही समजताय तसं हिरोईन, हिरो किंवा गाण्यामुळे नाही तर त्यातल्या खिडक्यांमुळे. जेंव्हा पहिल्यांदा तिने चित्रपट बघितला तेंव्हा ते कळण्याचं तिचं वयही नव्हतं. पण ते गाणं त्या खूप सगळ्या मोठ्या मोठ्या खिडक्यांमुळे तिच्या मनात घर करून राहिलं कायमचं. त्यांचं घर तसं खूपच छोटं होतं त्यामुळे एकच खिडकी तिच्यातून प्रेक्षणीय असं काय दिसणार ना... असो तर त्या बंगल्याच्या खिडक्या तिला आवडल्या लहान असताना लपाछपी खेळायला किती मज्जा येईल तिथे म्हणून आणि मोठी झाल्यावर आणखी गोष्टी लक्षात आल्यामुळे. घरात सगळेच तिची ह्या वेडामुळे चेष्टा करायचे पण तिला काही फरक पडत नव्हता. पुढे मागे माहेरचं घरही मोठ्ठ झालं हवे तसे बदल घरच्यांनी केले पण ती सासरी जाणार असल्याने तिच्या आवडीनिवडी कुणी फारश्या लक्षात घेतल्या नाही. तिचं मन थोडंसं खट्टू झालं पण तिने स्वतःला समजावलं की इथे नाही पण स्वतःच्या हक्काच्या घरात मात्र एक तरी खिडकी अशी बनवून घेणार. त्या हक्काच्या खिडकीत स्वप्नांची माझी भेट नक्की होणार. 

 काही दिवसांतच तिच्यासाठी तन्मयचं स्थळ तिला सांगून आलं.सगळं काही पटण्यासारखं असल्याने तिनेही होकार दिला. आता ती आणि तन्मय  खरेदीच्या निमित्ताने वारंवार भेटुही लागले. त्यातच तन्मयने लवकरच नवीन घर घेणार असल्याचं तिला सांगितलं. आणि त्याला आवडलेल्या एका साईटवर तिला घेऊनही गेला. घर तसं मस्तच होत रो हाऊस असल्याने मोकळी जागा भरपूर होती. अजून बांधकाम सुरू होतं. हळूहळू घराचं निरीक्षण ऋतुजा करत होती आणि तन्मय तिचं. घर आवडल्याच सांगताना तिच्या आनंदात काहीतरी मिसिंग आहे हे त्याला जाणवलं. पण काय ??? त्याचं उत्तरही त्याला घरी आल्यावर मिळालं. तिच्या भावाने घराचा विषय निघताच तिला खिडकीवरून चिडवण चालू केलं. पण तिने त्याला गप्प करत विषय थांबवला. मग तन्मय हळूच नंतर त्याला नेमकं काय गुपित आहे ते विचारलं. नवीन घरातच नवीन सुनेचा गृहप्रवेश करायच ठरलं होतं. इकडे ऋतुजा आपलं स्वप्न मिटून घेत लग्नाच्या धावपळीत गुंतून गेली होती. पण तन्मय मात्र कसल्यातरी खटपटीत होता त्याचा पत्ता त्याने घरात कुणालाच लागू दिला नाही. घराचं थोडं काम राहील आहे असं सांगत तो कुणालाही तिकडे फिरकू देत नव्हता. हा हा म्हणता धुमधडाक्यात लग्न पार पडलं. वरात नवीन घरी आली. वाजतगाजत ऋतुजाचे नवीन आयुष्यात पहिले पाऊल पडले. सगळे विधी, सोपस्कार पार पडल्यानंतर मात्र सगळ्यांनाच बंद असलेल्या तिसऱ्या मजल्यावर जाण्याची घाई झाली होती. तन्मय स्वतः आर्किटेक्ट असल्याने त्याने स्वतःच्या मित्राच्या मदतीने घराचं डिझाइन थोडंसं बदललं आणि एक छानसा कोपरा ऋतुजा साठी स्पेशल तयार केला होता. म्हणायला तो कोपरा पण प्रत्यक्षात त्याने सगळ्यात वरच्या मजल्याचा पूर्ण कायापालट करून टाकला होता. ऋतुजा सोबत सगळेच जण वरचा मजला बघण्यासाठी निघाले. वर जाण्यासाठी जिथून पायऱ्या होत्या तिथे पहिल्या पायरीपासून सुरेख अशा दिव्यांची सजावट होती. दरवाजा उघडताच ऋतुजाला अगदी आकाश खाली उतरून आलं आहे असं वाटलं. जास्तीत जास्त काम सूर्यप्रकाशावर होईल अशी रचना केलेली होती. त्यामुळे सगळ्याच गोष्टींना एक वेगळा टच मिळाला होता. अर्ध्या भागात सुरेखशी बाग आणि झोपाळा होता तर उरलेल्या भागात छोटीशी लायब्ररी असणारी एक मोठीशी खिडकी होती.  तिथेच लॅपटॉप टेबल आणि इतर गोष्टी मस्तपैकी मांडल्या होत्या. कधीकाळी ऋतुजाने बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी तन्मयने खूपच जास्त प्रयत्न केले होते. त्यांचं प्रतिबिंब तिच्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंमध्ये त्याला दिसत होत. ऋतुजाची स्वप्नांची खिडकी पलभर साठी नाही तर आयुष्यभरासाठी तिच्यावर स्वप्नांची बरसात करायला सजली होती ते ही तिच्या आवडीच्या माणसासोबत.....

आपल्या माणसाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप काही लागत नाही फक्त नातं मनापासून निभावण्याची तयारी हवी असते. तन्मयने त्याच्या ऋतुजाचं स्वप्न पूर्ण केलं तेही इतरांच्या स्पेसला धक्का न देता असंच काही तरी छोटंसं प्रत्येकाने आपापल्या जवळच्या माणसांसाठी करून बघावं नात्याला एक वेगळाच अर्थ मिळतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance