STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Romance

3  

Vaishnavi Kulkarni

Romance

स्वप्नांचा निवारा

स्वप्नांचा निवारा

6 mins
352

जुईच्या सख्ख्या मामेभावाचे , आनंदचे नुकतेच लग्न ठरले होते. आनंदची एकुलती एक आत्तेबहीण असणारी जुई ही आजोळी सगळ्यांचीच खूप लाडकी होती. त्यामुळे लग्नाच्या सगळ्या खरेदीपासून तर तुझी वहिनी घरात येईपर्यंत तू माझ्या सोबतच राहायचे आहे या आनंदच्या प्रेमळ हट्टाखातर जुई एकाच शहरात राहूनदेखील मामाकडे मुक्कामालाच आली होती.


    रंगाने थोडी सावळी परंतु सावळ्या रंगावर उठून दिसणारी जुईच्या गालावरची खळी , पाठीपर्यंत रुळणारे रेशमी मऊशार केस , मोठे बोलके डोळे , प्रत्येकाला स्वतःहुन पुढे येऊन मदत करण्याचा स्वभाव आणि समोरच्याच्या सुखात हसणारं आणि वेदनेत कळवळणारं हळवं मन या दैवी देणग्या जुईला मिळाल्या होत्या आणि याच गुणांमुळे ती सगळ्यांमध्ये लोकप्रिय होती आणि सगळ्यांना हवीहवीशी वाटायची.


     एक दिवस सकाळी ९ वाजण्याचा सुमार असेल , एक कार मामाच्या घरापाशी थांबली आणि एक उंचपुरा , गोरापान आणि अतिशय देखणा मुलगा कारमधून उतरला. कारचा दरवाजा लॉक करून तो मामाच्या घरात जायला वळणार तोच त्याची नजर गच्चीवर केस सुकवत उभ्या असलेल्या जुईवर पडली. आपल्याच विश्वात मग्न असलेल्या तिला या अनाहुत पाहुण्याची चाहूल देखील जाणवली नव्हती. गाणे गुणगुणत , मध्येच एखादा नृत्याविष्कार दाखवत जुई आयुष्याचा आनंद घेत होती. एखाद्या मुलीच्या सावळ्या रूपातही इतके लावण्य भरलेले असू शकते ही गोष्ट तो मुलगा प्रथमतःच अनुभवत होता. काही क्षण जुईमध्ये हरवून गेल्यानंतर भानावर येऊन तो स्वतःशीच हसला आणि घरात आला. आनंद सोबत त्याच्या गप्पा गोष्टी सुरू असतानाच जुई तिथे चहा घेऊन आली. तिची आणि त्याची नजरानजर झाली आणि तो तिच्याकडे पहातच राहिला.


   मोकळे सोडलेले काळेभोर केस , ओठांवर हलकेसे स्मित , डोळ्यांत स्वतःबद्दलच्या आत्मविश्वासाची एक निराळीच चमक आणि समोरच्याचा हृदयाचा ठाव घेणारी ते बोलके डोळे त्याने पाहिले आणि पुनश्च एकवार तो हरवून गेला.


आनंद : राज... ए राज....अरे , कुठे हरवला ?


राज : अं ? नाही...काही नाही.....ही...?


आनंद : अरे ही माझी आत्तेबहीण जुई , आपल्याच शहरात असते पण आता लग्नासाठी म्हणून इथे मुक्कामी आली आहे. B.SC झाली आहे आणि जुई , हा माझा मित्र , माझा कॉलेजपासूनचा जिवलग राज , राज देसाई.


जुई : हॅलो... तुला याआधी इथे कधी पाहिलं नाही मी...


राज : मी नेहमीच येतो इथे पण आपली भेट आज होणार होती म्हणून नाही पाहिलंस.


  यावर जुई मनमोकळी हसली आणि राजच्या मनाची तार त्याच्याही नकळत छेडली गेली. जुई आत निघून गेली पण राजच्या मनाच्या गाभाऱ्यात एक निराळीच आस जागवून. हळूहळू आनंदच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तशी घरातल्या मंडळींची लगबग सुरू झाली आणि त्यासोबतच राजच्या आनंदच्या घरच्या फेऱ्या देखील. हो , कारण आनंदने जशी जुईला प्रत्येक क्षणी सोबत राहण्याची गळ घातली होती तशीच ती राजला देखील घातली होती. त्यामुळे राज दर दोन दिवसाआड घरी यायचा. आल्यानंतर दर वेळेस त्याची नजर जुईला शोधत असायची आणि एकदा का ती नजरेस पडली म्हणजे मग त्याच्या अंतरंगात खोलवर दडून बसलेली जुईबद्दलची प्रेमभावना त्याच्या डोळ्यांत उतरायची.


    असेच एकदा लग्नघरी काही सामान द्यायला आलेला राज अंगणात रांगोळी काढण्यात मग्न झालेल्या जुईकडे पाहत उभा राहिला. जुईच्या हे लक्षात आले आणि तिने मान वर करून पाहिले. राजसोबत नजरानजर होताच तिला जाणवली ती त्याची तिच्यावर डोळ्यांतून प्रेमाचा वर्षाव करणारी दृष्टी आणि त्याच्या ओठांवर तिच्यासाठी आलेले कौतुकमिश्रित हसू. हे पाहून जुई कमालीची लाजली आणि काही क्षण दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले. जुई भानावर आली ती मामीने तिला मारलेल्या हाकेने आणि त्यासरशी ती आत पळून गेली आणि राज देखील हसून आत गेला.


     दोन तीन दिवसानंतर आनंदचे लग्न ज्या रिसॉर्टमध्ये होणार होते तिथली सगळी व्यवस्था बघण्याच्या दृष्टीने संध्याकाळच्या सुमारास सगळी मंडळी रिसॉर्टवर पोचली. शहरापासून थोडे लांब असलेले , संथ वाहत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले , चहूबाजूंनी हिरवळीने नटलेले आणि मनाला अत्यंत शांततेची अनुभूती देणारे ते रिसॉर्ट जुईला तर फारच आवडले. तिथे गेल्यानंतर नदीचा तो रम्य किनारा , तिच्याभोवती बांधलेला वळणदार घाट , झाडांवर मंजुळ किलबिलाट करणारे पक्षी आणि नभात पसरलेली संध्याछाया पाहून जुई स्वतःला विसरून गेली. मावळतीचा सूर्य निरखत असताना तिच्याही नकळत तिच्या मुखातून ओळी बाहेर पडल्या :

      मावळतीच्या छटांनी तुझिया गेले सारे आसमंत उजळून ,

      सोनेरी लाली तुझ्या अस्तित्वाची चालली दाही दिशा पाजळून !


      तिच्या मागेच उभ्या असलेल्या राजने या पंक्ती ऐकल्या आणि तो आश्चर्याने थक्क झाला.

      

राज : जुई , क्या बात है ! अगं काय सुंदर कविता करतेस तू , तुझ्यात हा ही गुण लपला आहे हे आजच कळलं बरं का मला....


जुई : मलाही....अरे म्हणजे....आजपर्यंत मी कधी स्वतःच्या आत डोकावून पहिलेच नव्हते. पण आज हा शांत नदी किनारा पहिला , इथली डोळ्यांना आणि मनाला शांतता देणारी हिरवळ पाहिली आणि मला मी सापडले. राज , मला ना शहरातल्या गजबजाटापासून , माणसांच्या कोलाहलापासून दूर असणारी , मनाला शांतता देणारी ठिकाणं खूप आवडतात. इथल्या घाटांवर बसून नदीचं शांत संगीत ऐकत बसावं आणि स्वतःचा शोध घ्यावा. आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्यासाठी कधीकधी अशी शांतता खूप आवश्यक असते. तुला काय वाटतं ?  


राज : खरंय....आपल्याला काय हवं आहे हे शोधण्यासाठी लागणारी शांतता या अशा ठिकाणांवरच मिळते. मग आपल्याला जे हवं आहे , जे प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचा ध्यास लागतो आपल्या मनाला. अशा ठिकाणी जर आपल्या प्रिय व्यक्तीचा हात आपल्या हातात असेल ना तर ह्या शांत नदीच्या संगीताच्या धुंदीत मग आपण स्वप्नांच्या दुनियेत हरवून जातो.


जुई : अरे वा , बरेच रोमँटिक दिसताय तुम्ही राजसाहेब ! कसली सुंदर अलंकारिक भाषा बोलता तुम्ही !


राज : आधी नव्हतो मी असा , अगदी साधारण होतो पण......म्हणजे


जुई: पण काय?


राज : पण या संथ , शांत वाहणाऱ्या नदीसारखी तू.....तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी अमुलाग्र बदलून गेलो.


जुई : ( चमकून ) राज......?


राज : हो जुई , ज्यादिवशी मी तुला आनंदच्या घरी पाहिलं ना , गच्चीत तू केस सुकवत उभी होतीस , कधी गुणगुणत , कधी स्वतःच्या मस्तीत नृत्य करत तर कधी अवखळपणे स्मितहास्य करत , त्याच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण....पण तुला हे सांगण्याची माझी हिम्मत होत नव्हती. वाटलं , तुला आवडेल , न आवडेल...तुझ्या मनात कुणा दुसऱ्याच्या प्रेमाचे निरंजन तेवत असेल तर.....म्हणून मी गप्प होतो. पण आज तूच म्हटल्याप्रमाणे नदीचा हा किनारा , हा रम्य घाट आपल्याला आपली नव्याने ओळख करून देतो आणि मनातलं ओठांवर आणण्यास मदत करतो. जुई , तू......तू मला आयुष्याच्या या प्रवासात साथ देशील , माझी संगिनी बनून ? या संथ वाहणाऱ्या नदीच्या संगीताच्या साक्षीने मी तुला वचन देतो जुई , मी.....मी तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करेन..होशील तू माझी ?


जुई : राज , मी....मी कधी विचारच केला नव्हता रे की.....की माझ्यासारखी इतकं सामान्य रूप मिळालेली साधारण मुलगी तुझ्यासारखा इतक्या देखणा मुलाला आवडू शकते....आणि....


राज : जुई , सौंदर्य हे विचारांमध्ये असतं. जे लोक बाह्य सौंदर्याला भुलतात , त्यांच्याकडे अंतरंगात लपलेल्या लावण्याला बघण्याची दृष्टी नसते. तुझ्या विचारांचं सौंदर्य मला आवडलं , तुझं साधं असणं , छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधणं आणि आनंदी राहणं , सगळ्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणं या गोष्टी मला खूप भावल्या आणि म्हणूनच पत्नीच्या व्याख्येत चपखल बसणाऱ्या तुझी मी निवड केली. आता तुझा निर्णय मी तुझ्यावर सोडतो. या संथ नदीच्या संगीताच्या संगतीत तू तुझ्या अंतर्मनाचा शोध घे. तुझा जो काही निर्णय असेल तो मान्य असेल मला. पती पत्नीच्या नात्यात बांधले नाही गेलो तरी आपण आयुष्यभर चांगले मित्र बनून राहू शकतो.


जुई : राज......तुझ्या दृष्टीने माझे विचार चांगले आहेत तर माझ्या दृष्टीने तुझं मन खूप सुंदर आहे.....समोरच्याला जपणारं , सांभाळणारं , समजून घेणारं....आणि इतक्या सुंदर मनाचा जीवनसाथी जर मला मिळणार असेल तर .....तर मी खूप भाग्यवान ठरेन....तू देखील एक पती म्हणून , एक अनमोल जीवनसाथी म्हणून खरंच योग्य आहेस.....मी तयार आहे तुझ्या आयुष्याच्या प्रवासात तुझी संगिनी बनून सोबत चालण्यासाठी.


आणि मग मनात अलवार उमललेल्या प्रेमभावनेची लाली हळूच जुईच्या गालांवर उमटली. प्रीतस्पर्शाने रोमांचित झालेल्या जुईला मग हलकेच राजने मिठीत घेतले. आज नदीच्या शांत , रम्य किनारी एका प्रेमकहाणीचा उदय झाला होता आणि दोघांच्या स्वप्नांना एक नवा किनारा मिळाला होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance