स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर
"मारिता मारिता मरेतो झुंजेन!
हिंदू राष्ट्र अभिमानी, हिंदू संघटक, प्रखर राष्ट्रभक्त, धर्मसुधारक, समाज सुधारक, भाषाशुद्धी करणारे कवी, लेखक, राष्ट्राच्या शस्त्रसज्जतेबाबत आग्रही असणारे, असे "स्वातंत्र्यवीर" विनायक दामोदर सावरकर यांनी वरील उद्गगार काढलेले आहेत. एखाद्या माणसात कला तरी किती असाव्यात? त्यांना अष्टपैलूच काय दशपैलू , म्हटले तरी चालेल. रॅण्डचा वध केल्याच्या आरोपाखाली एकाच घरातल्या तीन सख्ख्या भावांना " चाफेकर बंधूंना" इंग्रजांनी फासा वरती चढविले त्यांच्या या बलिदानाने सावरकरांवर मोठाच आघात झाला. ते अस्वस्थ होते त्याच रात्री त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर, देवी "भगवती" मातेसमोर "मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी प्रतिज्ञा केली. जर यशस्वी झालो तर माझ्या मातृभूमीला वंदन करेन! आणि जर स्वातंत्र्य यज्ञात मरण आले तर माझ्या रक्ताचा अभिषेक मी तिच्या चरणावरती करेन! असे त्यांनी शपथ घेतली आणि ती आयुष्यभर पाळली.
त्या घटनेनंतर सावरकरांचे उर्वरित आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. वास्तविक ते घरचे सधन, श्रीमंत, इंग्रजी अत्याचाराचा वारादेखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नव्हता. परंतु स्वातंत्र्यलढ्याची चरित्रे वाचता वाचता त्यांनी आपल्या मनाशी स्वतः कसे जगायचे ते ठरवले आणि पुढचे सर्व आयुष्य थरारानी भरलेले आहे. अभिनव भारत संघटनेची स्थापना, विदेशी कपड्यांची होळी, त्यानंतर उच्च शिक्षणाच्या निमित्ताने कृष्णजी वर्मा यांची शिष्यवृत्ती मिळवून त्यांचे लंडनला जाणे. तिथेदेखील साहेबाच्या देशात राहून, साहेबाच्याच विरुद्ध गुप्त कारवाया करण्याचे धारिष्ट्य एकमेव सावरकरांनी दाखवले. "इंडिया हाऊस"मध्ये बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करून ते तंत्रज्ञान आणि बावीस पिस्तुले अक्षरशः पुस्तके कोरून त्यात भरून आपल्या देशात पाठविणे आणि तेथे ती व्यवस्थित पोहोचतील यासाठी काम करणारी फळी निर्माण करणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. त्यासाठी वाघाचे काळीज पाहिजे.
"कर्झन वायलीचा" वध करणारा मदनलाल धिंग्रा हा स्वातंत्र्ययज्ञातील त्यांचा बळी पडलेला पहिला शिष्य. त्यानंतर कलेक्टर "जॅक्सन"वरती बॉम्ब टाकून त्याचा वध करणारे, अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या अभिनव भारतच्या सदस्यांना फाशी झाली. बाबारावांना तुरुंगवास झाला आणि ब्रिटिशांना इंडिया हाऊस सुगावा लागला. मग त्यांना अटक करून भारतात आणताना मार्सेलिस येथे फ्रान्सच्या किनाऱ्यावर मारलेली ती जगप्रसिद्ध उडी, तेथेदेखील त्यांची वृत्ती पहा! भर समुद्रामध्ये उसळलेल्या लाटांमध्ये संडासच्या खिडकीमधून उडी मारताना लागलेल्या काचांमुळे खरचटलेले असताना, अंगातून रक्त वाहत असताना, इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पळण्याचे धारिष्ट्य दाखवणारे हे एकमेव कैदी. त्यांनी जागतिक राजकारणाचा योग्य विचार करून हे धाडस केले होते. परंतु भारताच्या दुर्दैवाने ते सफल झाले नाही. परंतु यातून सुद्धा "मारिता मारिता मरेतो झुंजेन" ही त्यांची वृत्ती स्पष्ट होते. मरणारच आहोत ना मग सुखासुखी का हाती पडायचं शेवटपर्यंत आपला प्रयत्न चालू ठेवायचा.
त्यांच्यावरती खटला चालविला. त्यांना एकंदरीत दोन जन्मठेपेची शिक्षा म्हणजे पन्नास वर्ष काळ्या पाण्याची अंदमानची शिक्षा सुनावली गेली. सरकारने त्यांना एक प्रकारे मृत्यूच्या जबड्यात लोटले होते. दुसरा एखादा माणूस असता तर कोर्टात बसून ढसा रडला असता. माफी मागितली असती. पण ते सावरकर होते, त्यांनी एकच उद्गगार काढले. पन्नास वर्षे! तोपर्यंत ब्रिटिश सरकार टिकले तर आणि द्रष्टेपणाने केलेली त्यांची ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली.
"मारिता मारिता मरेतो झुंजेन" ही त्यांची आयुष्यभराची वृत्ती होती. जेथे अंदमानच्या कैदेत एकदा काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर भलेभले कैदी ढेपाळले, तिथल्या हालअपेष्टा भोगताना लवकरच स्वर्गवासी झाले किंवा वेडे होऊन त्यांनी आत्महत्या केल्या. या पार्श्वभूमीवर एक किडकिडीत शरीरयष्टीचा माणूस, ज्याने कधीही कष्टाची कामे केली नव्हती, असा शाकाहारी मनुष्य अकरा वर्षे तसल्या वातावरणामध्ये तग धरून राहिला. त्यांना तेथे मुद्दाम अतिशय कष्ट दिले गेल. खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले, काथ्या कुटण्याचे काम दिले, इतकेच काय त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी जिथे क्रांतिकारकांना फाशी दिली जायची त्याच्या समोरची कोठडी त्यांना दिली. हे वर्णन ऐकायला सोपे आहे पण प्रत्यक्षात अंदमानला जाऊन सेल्युलर जेल बघितले तर त्याच्या रचनेवरून लक्षात येते की त्यांच्या कशा हाल-अपेष्टा झाल्या असतील. अक्षरशः बांधलेल्या कोठड्यादेखील एकमेकाला पाठ करून आहेत. एखाद्या चक्राच्या सहा रेषा असाव्यात, अशी बांधणी आहे म्हणजे कैद्यांना एकमेकांशी बोलणे काय, एकमेकांकडे बघणेदेखील शक्य नव्हते. बाबारावदेखील तिथेच असून, सख्ख्या भावांना आपण येथे एका जागी होतो हे माहीत नव्हते.
कोणत्याही वातावरणात गप्प बसतील तर ते सावरकर कसले? प्रत्येक क्षेत्रात त्यांनी "मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी सुरुवात केली. तिथे त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. तेथे कैद्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात होते. भाजी म्हणून आजूबाजूचे गवत कापून आणून शिजवले जाई. त्यामध्ये अळ्या, किडे, साप, काय वाटेल ते निघत असे. सर्व कैद्यांना चांगले अन्न मिळावे म्हणून सावरकरांनी तेथे अन्न सत्याग्रह केला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन सर्वांना चांगले जेवण मिळू लागले.
अंदमानमधील मुस्लिम कैदी, हिंदू कैद्यांना आपले उष्टे अन्न देऊन बाटवीत असत व नंतर इतर हिंदू त्यांना आपल्या धर्मात घेत नसत. तेथे सावरकरांनी धर्मशुद्धीचे कार्य सुरू केले आणि बाटलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात घेण्यास सुरुवात केली. मनात असलेले अनंत विचार, काव्य, लिहिण्यासाठी जेव्हा त्यांना काही साहित्य मिळाले नाही, तेव्हा बाभळीच्या काट्याने दगडांच्या भिंतीवरती काव्य कोरलेले आहे. अंदमानमध्ये यांच्या कोठडीत प्रत्यक्ष डोळ्यांनी अजूनही पाहायला मिळते. काय म्हणावे या चिवट इच्छाशक्तीला! त्यावर एका कवीने सुंदर भाष्य केलेले आहे
आभाळ म्हणाले नाही
भूमीही म्हणाली नाही
मग विनायकाने त्यांची
आळवणी केली नाही
दगडाची पार्थिव भिंत
तो पुढे अकल्पित सरली
मी कागद झाले आहे
चल लिही असे ती वदली
तिथेही त्यांची प्रचंड चिकाटी आणि "मारिता मारिता मरेतो झुंजेन" ही वृत्ती दिसते
सावरकरांच्या जीवनाचे दोन भाग पडतात पहिला भाग म्हणजे अंदमानच्या आधीचे धगधगते क्रांतीसुर्य सावरकर, क्रांतीचे आधारस्तंभ, जहाल, जाज्वल्य, आक्रमक सावरकर आणि अंदमानच्या सुटकेनंतर समाज क्रांतिकारक, हिंदुसंघटक, विज्ञाननिष्ठ, तत्त्वज्ञ, विचारवंत, कवी, समाजातील जातिभेदाविरुद्ध हत्यार उपसणारे, दलितांना मंदिर खुले करून देणारे, त्यांच्यासोबत सहभोजन आयोजित करणारे, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणारे, पतित-पावन मंदिराची बांधणी करणारे, सर्व जातीच्या स्त्रियांचे हळदीकुंकू आयोजित करण्यासाठी आपल्या पत्नीस प्रोत्साहन देणारे, एकंदरीत समाजसुधारक सावरकर होत.
आयुष्याच्या शेवटी त्यांचा मृत्यूदेखील त्यांच्या या वृत्तीला साजेसा होता. तो आला नाही त्यांनी बोलावून घेतला. एका झुंजार लढाऊ वृत्तीने त्यांनी प्रायोपवेषण केले. बिछान्याला खिळून, खंगून, पन्नास दुर्धर आजाराने, शरीरामध्ये पन्नास नळ्या घातलेल्या असताना जीवाचे हाल होऊन मरण्यापेक्षा जगण्यातली कृतकृत्यता समजून त्यांनी आनंदाने हसत मृत्यूला कवटाळले आणि "मारिता मारिता मरेतो झुंजेन" असे म्हणणारे वादळ शांत झाले.
