स्वामी तिन्ही जगाचा
स्वामी तिन्ही जगाचा
८)सुविचार -स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
पारुल वर अगदी कमी वयात नशिबाने घाला घातला. तिचे सौभाग्य हिरावले गेले. लग्नाला जेमतेम चार वर्षेच झालेली. पदरी वर्षाचे बाळ. घर भाड्याचे. नवर्याचं रोंजदारीचे काम म्हणून कोणत्याही प्रकारची बचत नाही. की कुठूनही पैशाचा अोघ नाही.माहेरची परिस्थितीही तशीच.आभाळ फाटलेले ठिगळ कोठून लावणार. काहींनी परत लग्न कर असेही सुचवले.पण माऊलीने आता मुलासाठीच आयुष्य वेचायचे.तोच म्हातारपणीचा आधार. दिवस कार्य होण्याचीही वाट न पाहता कंबर कसून ती कामाला लागली. शिक्षण नसल्याने भांडी धुण्याची कामे स्वीकारली.पण मुलाला बाकी खूप शिकवायचे तिने ठेवले.
बाळू हळूहळू मोठा होत होता.कधी कधी तिला एक वेळेचे खाणे मिळत नसे. मग ती उगाचच टोपावर झाकण ठेवी. बाळूला वाटे आत जेवण आहे. आईने दिलेले जेवणाचे ताट तो चाटूनपुसून खायचा. आईसाठी जेवण उरले नाही .हे त्याला समजतच नसे.कामे अाटोपल्यावर जेवील ती असेच त्याला वाटे.
बाळू अभ्यासात खूप हुशार होता. परिस्थिती गरीब असल्याने त्याला कुणी मित्रही नव्हते.सगळा वेळ त्याचा आईच्या मागे आणी अभ्यासात जाई. घरी टि.व्ही ही नव्हता. भाड्याचे घर असल्याने दर अकरा महिन्याने बदलावे लागे.
मुलाच्या सुखासाठी शिक्षणासाठी तिने भूक तहान कष्ट याची पर्वा केली नाही.वेळेला स्वत: फाटके कपडे घातले .उपाशी राहिली. शेवटी आईच ती.
बाळू खूप शिकला. त्या माऊलीच्या कष्टाला यश आले . एका मोठ्या परदेशी कंपनीत तो मोठ्या हुद्द्यावर अधिकारी पदावर रुजूही झाला. तिथे बस्तान बसले की आईला ही आपण घेऊन जाऊ या विचाराने त्याने जागाही घेतली नाही. सुरुवातीला तो आईची चौकशी करी. तिला पैसे पाठवी. काम सोड म्हणून हि सांगे. पण पारूल ने सवय मोडू नये म्हणून काम सोडले नाही. मुलाने पाठवलेले पैसे साठवून भाड्याचे झोपडे विकत घेतले. पुढेमागे मुलगा आला तर कुठे शोधेल या विचाराने.
बाळू त्या परदेशी दुनियेत रमला. तिथल्याच परदेशी श्रीमंत मुलीशी लग्न केले.खूप खूप श्रीमंत झाला.जन्मदात्या आईची आठवण हळूहळू विरळ ह
ोऊ लागली . पैसे बाकी नियमित जात होते. पण त्या माऊलीचे डोळे त्याच्या वाटेकडे लागले होते. नेले नाहीतरी तरी चालेल पण एकदा तरी दोघांना डोळे भरून पहावे. त्यांच्याबरोबर बसून चार घास खावेत ही एकच इच्छा ती मनी धरून होती.
बाळू एका सभारंभाला गेला होता. तिथे सर्वजण आपले मन मोकळे करत होते. लहानाचे मोठे कसे झालो. बाळूच्या डोळ्यासमोेर आई उभी राहिली. स्वत:उपाशी राहून आपल्याला कसे उभे केले. ते एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोरून गेले.
तितक्यात एकाचे शब्द त्याच्या कानात गुंजले माझ्याकडे किती संपत्ती आहे त्यापेक्षा माझ्याकडे माझी आई आहे. ती खूप सुखी समाधानी आहे.म्हणून जगातील मीच श्रीमंत माणूस आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.त्या माणसाचे शेवटचे वाक्य म्हणजे त्याला कानात कोणीतरी कडकडीत तेल अोतल्या सारखे वाटले. आजपर्यंत तो स्वतःला खूप श्रीमंत समजत होता पण क्षणात तो कंगाल झाला .तो धावतच घरी गेला. जास्तीचे पैसे देऊन दोघांची तिकिटे मागवली. बायकोलाही बरोबर येणार नसेल तर नाते संपले असे जाहीर करून टाकले .तीही घाबरून तयारीला लागली.त्यांच्या डोळ्यांचे धार थांबत नव्हती आईच्या रडवेला चेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता.
आपण जिथून निघालो तिथेच आपली वाट पहात आई नक्कीच असणार. आपल्या वाटेकडे डोळे लावून ह्याची त्याला खात्री होती.मुलांनी नाही समजून घेतले चुकले तरी त्याला माफ करण्याची ताकद फक्त अन् फक्त आईवडिलांकडेच असते.
अधीर मनाने शक्य होईल तेवढी धावपळ करत पैशाचा विचार न करता खर्च करत तो त्याच्या घरापाशी पोहोचला. घराबाहेर खूप गर्दी होती. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. कानावर शब्द पडले. बिचारी पारूल मुलाची वाट पहात देवाघरी गेली. मुलाने पाठवलेले पैसे तसेच ठेवले. त्याच्या पैशात घेतलेले झोपडे देखील त्यालाच ठेवले.
तो मटकन खाली बसला. जगातील सर्वात मोठा भिकारी मीच.माझी खरी संपत्ती माझी आई तिला माझ्या न सुधारता येणार्या चुकीने मी मुकलो.
आणी तो ढसाढसा रडू लागला.माझी माय माझे अश्रू पुसायला येईल या आशेने !