सून असावी तर अशी
सून असावी तर अशी


नीला जेमतेम दीड वर्षाची असेल, एका अपघातात तिचे आईवडील दोघेही गेले. म्हणतात ना "देव तारी त्याला कोण मारी" या अपघातात छोटीशी चीमुकली मात्र वाचली. तिला साधी खरचटलं सुद्धा नाही. कुणीतरी अलगद झेलावं तशी ती बाजूच्या फुलांच्या शेतातील ढिगावर पडली होती.
स्मिता आणि सुजल यांची नीला ही मुलगी. या दोघांचा तसा प्रेम विवाह. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन दोघांनीही लग्न केले. दोघेही वेल-settled होते. छान संसार चालला होता दोघाचा. पण नियतीला कदाचित हे मान्य नसावं. आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलं नव्हतं, पुढे कदाचित स्वीकारलंही असतं. पण अचानक असं घडल्यामुळें दोघाचेही आईवडील धावून आले. "दुधापेक्षा दुधावरची साय अतिप्रिय" असंच काहीसं नीलाच्या बाबतीत घडलं. आई-बाबा जिवंत असेपर्यंत ज्या आजी- आजोबा च्या प्रेमाची ती भुकेली होती, ते प्रेम आता तिला भरभरून मिळत होतं.
सुजलचे आई बाबा नागपूरचे तर स्मिताचे आईबाबा मुंबईचे. दोन्ही परिवाराची ती जीव की प्राण हाती. त्यामुळे तिचे लाड-कौतुक भरभरून होत होते. पण विशेष म्हणजे दोन्ही आजीआजोबांचे तिच्यावर उत्तम संस्कार होते. तिने त्यांचा शब्द कधीच मोडला नाही.
सुजलच्या आई बाबाना ती आई बाबा म्हणायची, तर स्मिताच्या आई बाबाना आजी आजोबा म्हणायची. तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण आई बाबाकडे नागपूरला झालं, आता पुढच्या शिक्षणासाठी ती आजी आजोबांकडे मुंबईला गेली. आता ती आयआयटी मुंबईला इंजिनिअरिंग करतेय.
उत्तम संस्कार, परिस्थितीशी तडजोड करणं ,आणि नेहमी आनंदी राहून मदत करन्यास तत्पर असं तिचं व्यकतीमत्व त्यामुळे कॉलेज मध्ये ती सर्वांच्या आवडीची तर होतीच, पण संपूर्ण कुटुंबातसुध्दा ती सर्वांना आवडायची.
याचवर्षी तीच graduation संपलं, चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होऊन तीचं चांगल्या नामांकीत कम्पणीत कॅम्पस selection सुद्धा झालं होतं. दोन महिन्यांतर तिला जॉईन व्हायचं होतं. त्यामुळे ती सुट्टीमध्ये आईवडिलांकडे नागपूरला आली होती. आणि मुख्य म्हणजे त्याचवेळेस तिच्या आत्याकडे तिच्या आतेबहिनीच लग्न होत.
लग्नघर म्हणजे नुसती मज्जा, इनजॉय, धमाल.... आणि त्यात बहिणीचं लग्न. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला... हळद, मेहंदी, संगीत-संध्या... तशी नीला नृत्यकलेत खूप पारंगत, तिची आई स्मितासुद्धा उत्तम नृत्यांगना होती.. जणू तिचीच ती प्रतिकृती.
वयात आलेली मुलगी म्हटल्यावर तिच्यावर सर्वांचं लक्ष असतंच, (आपल्या मुलासाठी उपवर मुलगी म्हणून)
....तिचं शालिनतेचं वागणं, समंजसपणा, आपुलकीने प्रत्येकाची विचारपूस हे सर्वांना मोहित करणारं होतं. तिच्या आत्याच्या दूरच्या नातेवाईकांचा 'परेश' हा मुलगा. तो USA ला एक मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. त्याच्यासाठी त्यांनी नीलाला मागणी घातली. परेशलासुद्धा ती आवडली होती. पण नीलाला मात्र एवढ्यात लग्न करायचे नव्हते. पण तिने विचार केला, आधीच आईबाबा, आजीआजोबा यांनी आपल्यासाठी इतके कष्ट केले, या उतारवयात त्यांना जास्त त्रास नको, म्हणून तीही लग्नाला तयार झाली. परेशला USA ला जायचं असल्या कारणाने, वीस दिवसातच लग्न पार पडलं.
ती नवीन घरात लक्ष्मीच्या पावलाने सून म्हणून आली, सर्व तिचे खूप कौतुक करायचे, परेशच्या लहान बहीनीला तर तिने खूपच माया लावली होती, तिच्या लाघवी स्वभावाने तीने लवकरच सर्वांची मनं जिंकली. पण परेशला मात्र ती लवकर समजू शकली नाही. तसं तो तिच्यावर खूप प्रेम करायचा, तिच्या आवडी-निवडी जपायचा. पण स्वभावाने थोडा हट्टी होता, स्वतःला पटेल तसंच वागायचा.
थोड्या दिवसानी तिलासुध्दा जॉईन व्हायचं होतं. पण परेशची इच्छा मात्र तिने इथे नोकरी न करता त्याच्यासोबत USA ला यावं अशी होती. पण नीलाला मात्र असं वाटायचं निदान एक वर्ष तरी तिने सासुसासरे यांच्यासोबत राहून नोकरी करावी, म्हणजे नोकरीचा अनुभवसुद्धा होईल, आपल्या घरातल्या परंपरा, रीती-रिवाज आणि आईबाबांना सोबत पण...
पण परेश ऐकायला तयारच नव्हता. तीच्या सासू सासऱ्यांनी समजावले, शेवटी ती जायला तयार झाली.
आता पुढच्या आठवड्यात निघायचं म्हणून सर्व तयारी झाली, पण जाण्याअगोदर आपल्या कुलदेवतेच्या
दर्शनाला जाऊन यावं म्हणून सर्व निघाले. छान दर्शन झालं, नीलाने ओटी भरली... पण परत येतांना मात्र परेशच्या बाबांच्या छातीत खूप दुखायला लागलं, त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं, 70 percent blockages... त्यामुळे तातडीने operation ची गरज होती. बाबांचं ओपरेशन झालं, आता ते बरे होते, पण अशक्तपणा खुप आल्यामुळे त्यांना एकटं सोडणं कठीण होतं, बहीण लहान, आणि आईला पण सर्व झेपेलंच असं नव्हत. त्यांना पण शुगर आणि बीपीचा त्रास होता.
नीला ने परत एकदा परेशला समजावलं...
नीला - परेश, बघ... माझीसुद्धा तुझ्यासोबत यायची इच्छा आहे रे.. पण आई, बाबा! या परिस्थितीत त्यांना एकटं सोडून जाणं बरं नाही रे!
तुला काय वाटतं? मी राहु शकेन तुझ्याशिवाय?
नाही रे....
खूप कठीण आहे!
पण .... ज्यांनी आपल्याला जन्म दिला, मोठं केलं, आपल्याला सक्षम बनवलं, त्यासाठी आपलसुद्धा काही कर्तव्य आहे ना!
Please मला समजून घे.
परेश- हो ग! कळतंय मला. तू डोळे उघडले माझे. खूप अभिमान वाटतोय मला तुझा, तू काल या घरात आलीस पण किती लवकर आपलंसं केलंस गं सर्वांना...
आज परेश USA साठी निघालाय, पण खूप आश्वस्त होऊन, आपल्या आईबाबाना सक्षम हातात सोपवून...