नासा येवतीकर

Inspirational


4.3  

नासा येवतीकर

Inspirational


सुंदर

सुंदर

4 mins 1.1K 4 mins 1.1K

सुंदर


त्‍याचं नाव सुंदर, तसं त्‍याचं कामही सुंदर त्‍याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं. परंतु सारेच जण त्‍याला बंदर म्‍हणायचे. कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा अश्मयुगीन काळातील आदिमानवासारखा किंवा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गाल खोल गेल्‍यासारखे, केस कधी ही पहा उभेच असलेले. त्‍याला पाहताक्षणीच वाटायचे हा बंदर म्‍हणजे अशमयुगीन काळातील आदिमानव किंवा माकडच आहे. त्‍यामूळे गावातील सर्व पोरं सोरं त्‍याला बंदर... बंदर म्‍हणून डिवचायचे. याप्रकारामूळे त्‍याचं मन त्‍याला रोज खात असे आणि देवाने मला असे रूप का दिले म्‍हणून देवाच्‍या नावाने बोटे मोडायचा. त्‍याच्‍या त्‍या कुरूपामूळे कोणी त्‍याला जवळ येऊ देत नव्‍हते, मैत्री करीत नव्‍हते, ना त्‍याला खेळू देत होते. त्‍यामूळे त्‍याला कोणी मित्र, सखा वा दोस्‍त नव्‍हताच मुळी. घर-परिवारात आणि नातलगात सुद्धा त्‍याला चिडवले जायचे त्‍यामूळे तो जीवनाला पुरता कंटाळला होता. मात्र त्‍याची आई त्‍या कुरूप सुंदर मुलांवर जिवापाड प्रेम करायची. त्‍याच्‍या मनात न्‍यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी सदैव ती त्‍याला चांगल्‍या गोष्‍टी सांगून त्‍याच्‍यात विश्‍वास निर्माण करीत असे. आपणाला मिळालेले रूप हे निसर्गाची देणगी आहे, त्‍यावर आपण काही करू शकत नाही. निसर्गाने कोकिळेला काळा रंग दिला म्‍हणून लोकं त्‍या पक्ष्‍याला हिणवत नाहीत परंतु त्‍याच्‍या मंजूळ आवाजाने वेडेपीसे होतात. रूपाने सुंदर दिसण्‍यापेक्षा मनाने आणि आपल्‍या कर्माने सुंदर होण्‍याचा प्रयत्‍न करावा. त्‍यासाठी चांगली कामे करीत जा, मोठ्यांच्‍या आज्ञा पाळत जा, दीनदलित, दुबळ्या, अपंग लोकांना मदत करीत राहा, खूप अभ्‍यास करून जीवनात यशस्‍वी हो आणि आपली कीर्ती दुरवर पसरवून टाक, मग बघ एके दिवशी हे सारेच लोक तुला खरोखरच सुंदर म्‍हणतील, की नाही अशी समजूत ती रोजच काढीत असे. हे सर्व सांगताना आईने त्याला एका रोबोटची कहाणी देखील सांगितली म्हणाली की, रोबोट बघ दिसायला कसा दिसतो पण सांगितलेले काम अचूक आणि वेळेत पूर्ण करतो. तुला त्या रोबोट सारखे अचूक आणि वेळेत काम पूर्ण करणारा प्रामाणिक बनायचे आहे. 

आईच्‍या या शिकवणीमूळे लोकांचे बोलणे तो निमूटपणे ऐकायचा. नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे वाहे वारेप्रमाणे मित्रांचे आणि लोकांचे चिडवणे ऐकायचा आणि सोडून द्यायचा. लहानांपासून मोठ्यांचे सगळयाचे काम तो निस्‍वार्थ भावाने करीत असे त्‍यामूळे प्रत्‍येकांच्‍या  -हदयात तो स्‍थान मिळविला होता. आईसोबत त्‍याचे जीवन मस्‍त आनंदात, मजेत जात होते. गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्‍यावर माध्‍यमिक शिक्षण घेण्‍यासाठी त्‍याला जवळच्‍या शहरात जाणे भाग होते. गावापासून चार कोसावर असलेल्‍या शाळेत प्रवेश घेतला आणि शहरातच एक खोली घेऊन आईविना राहण्‍याचा निर्धार केला. आज त्‍याच्‍यासोबत प्रेमळ आई नव्‍हती परंतु तिची शिकवण मात्र मनात साठवून होती.

शहरातही त्‍याला गावांप्रमाणेच अनुभव येत होता. पांढरपेशांची ती गोरी गोमटी मुलं सुंदरला जास्‍तच त्रास देवू लागली. शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी सुद्धा विद्यार्थ्‍यांसह शिक्षक मंडळी सुद्धा त्‍याची टर उडविली. परंतु तो न डगमगता आईची शिकवण मनात ठेवून तेथे राहू लागला. हळूहळू सुंदरचे नाव सर्व शाळेत गाजू लागले ते त्‍याच्‍या सुसंस्‍कारित वागण्‍यामूळे व सुंदर रेखीव अक्षरामूळे. अभ्‍यासातही तो हुशार होता त्‍यामूळे लवकरच सर्व शिक्षकांचा लाडका शिष्‍य बनला. जो तो त्‍याच्‍याशी मैत्री करण्‍यासाठी हात पुढे करीत होता. तो सर्वांचाच चांगला मित्र बनला. गल्‍लीमध्‍ये सुद्धा आपल्‍या वर्तनाने तो सा-याचेच मन जिंकला होता. कोणतेही लहान-सहान कामे जसे भाजीपाला आणणे, दुध आणणे, वृत्‍तपत्र आणणे, कपडे इस्‍त्री करून आणणे, धान्‍य दळून आणणे इ.कामे करून गल्‍लीतल्‍या सगळ्याच लोकांच्‍या गळ्यातील ताईत बनला होता. आपली कामं करून घेण्‍यासाठी सारेच लोक त्‍याला प्रेमाणे “सुंदर....सुंदर” म्‍हणत होती. लोकं आपणाला असेच बोलावावे म्‍हणून तो सगळ्यांची कामे आवडीने करायचा.

दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण यशस्‍वी रित्‍या पूर्ण करून त्‍याने पत्रकारिता हे क्षेत्र निवडले. शालेय जीवनापासून मातृभाषा मराठीवर त्‍याचे विलक्षण प्रेम होते. कविता लिहिण्‍याचा त्‍याचा छंदच मुळी त्‍याला या क्षेत्राकडे नेले. आपले शिक्षण पूर्ण करून तो एका दैनिकांत वृत्‍तसंकलनाच्‍या कामाला लागला. पाच-सात वर्षात त्‍याने अनेक कविता रचल्‍या आणि विविध दैनिक, साप्‍ताहिक, मासिकांतून प्रकाशित झाले. अनुभवावर रचलेल्‍या कविता त्‍याच्‍या नावाप्रमाणे खुपच सुंदर होते. जिल्ह्यात त्‍याचे नाव सर्वदूर पसरले. काही वाचकांनी त्‍याला अभिनंदन पर पत्र पाठविले तेव्‍हा त्‍याला अजून हुरूप आला. आपल्‍या कल्‍पक बुद्धमत्‍तेतून त्‍याने अनेक कविता तयार केल्‍या. दैनिकांत काम करीत असल्‍यामूळे प्रकाशकांशी त्‍याचा जवळचा संबंध येऊ लागला. एका प्रकाशकाने त्‍याच्‍या कविता पुस्‍तक रूपात तयार करण्‍याचा मनोदय व्‍यक्‍त केला आणि लागलीच त्‍याने त्‍यास होकार दिला.

“सुंदर आई” नावाचा जीवनातला पहिला कविता संग्रह‍ प्रकाशित झाला तसे त्‍याचे नाव संपूर्ण राज्‍यात पसरले. त्‍यानंतर त्‍याने अनेक कविता संग्रहाचे पुस्‍तक प्रकाशित करीत खूप मोठा व्‍यक्‍ती झाला. परंतु त्‍या दैनिकांतील नौकरी सोडली नाही. दैनिकांच्‍या मालकाने सुंदरवर विश्‍वास दाखवित त्‍यास उपसंपादक व त्‍यानंतर संपादकाची जबाबदारी दिली. आईची शिकवण उराशी बाळगून तो रोज मोठा होत होता परंतु तो सामान्‍यांसारखाच राहून आपलं अस्तित्‍व टिकवीत होता. आज त्‍याची कीर्ती सर्वदूर पसरली होती आणि अर्थातच एवढा कुरूप आदिमानवासारखा दिसत असूनही रोबोटप्रमाणे अचूक आणि वेळेत काम करत राहिल्यामुळे त्‍यास सर्वच जण “सुंदर...सुंदर” असेच म्‍हणत होती.


Rate this content
Log in

More marathi story from नासा येवतीकर

Similar marathi story from Inspirational