Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Pandit Warade

Tragedy Fantasy


3.4  

Pandit Warade

Tragedy Fantasy


सरिता - भाग २

सरिता - भाग २

5 mins 202 5 mins 202

    सरपंच दामू अण्णा, माणिकराव, बाजीराव, बाबुराव, अशोक शेठ आणि गणपतराव असे एकत्र बसून विचार विनिमय करत होते. डीजेच्या तालावर बेभान झालेले बोरगावचे तरुण आणि नवरदेव जेव्हा मांडवात यायला तयार होईना तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता पसरलेली होती. वधुपित्याच्या घरात तर रडारडही सुरू झाली होती. सरपंच दामू अण्णा मध्यस्थी करायला जाऊन आले, परंतु अपमानित होऊन परत आले होते. मोजक्या काही लोकांना घेऊन अण्णा स्वतःच्या बैठकीत बसून नियोजन करत होते.

    "हे बघा गणपतराव, शेजारच्या बाभूळगावच्या शंकररावांचा मुलगा संजू कसा वाटतो तुम्हाला? चांगला शिकलेला आहे. घरी तेव्हढ्यास तेवढं बरं आहे. शिवाय नात्याचा प्रश्नच नाही. भाचाच तर आहे तुमचा." अण्णा बोलले तसे इतरांचे चेहरे उजळले. गणपत रावांची चुलत बहीण सखू शेजारच्या गावातच दिलेली होती. तिला एकुलता एक मुलगा संजू. खूप शिकला पण नोकरी नाही मिळाली म्हणून घरी शेती करतो. परिस्थिती जेमतेम असली तरी स्वभावानं अगदी मनमिळाऊ होता. त्यामुळं सर्वांनाच हा विचार पटला.

   "पर त्यो तयार व्हईल का आसं ऐन येळला?" गणपत रावांची शंका.

    "ते माझ्या वर सोडा. तुमची तयारी असेल तर शंकर रावांना मी तयार करतो." अशोक शेठने हमी भरली.

 

   झालं! ठरलं सारं. सरपंच दामू अण्णांच्या गाडीत बसून सर्वजण शेजारच्या बाभुळगावला गेले. तिथे शंकरराव आणि संजूला घेऊन एका निवांत खोलीत बसून चर्चा केली. सरिता सुंदर आणि सोज्वळ तरुणी होती, त्यामुळे नाही म्हणायचं काहीच कारण नव्हतं. शिवाय संजूच्या शिक्षणा साठी दामू अण्णांनी खूप मदत केलेली होती. अशा अडचणीच्या वेळी त्यांचा शब्द डावलणे योग्य नव्हते. त्यांनी होकार दिला. दोघेही तयार झाले. ऐनवेळी संजूला लग्नमंडपात स्टेज वर नवरदेव म्हणून चढवायचं. कुणालाच काही कळू द्यायचं नाही. असं ठरवून ते सर्वजण आपल्या गाडीतून परत आले. मांडवात येऊन, 'अजून नवरदेव कसा येईना' म्हणून ते सर्वांच्या सारखी चर्चाही करायला लागले.

   थोड्याच वेळाने शेजारच्या गावातील तीन चारचाकी आल्या. त्यापैकी एकीमध्ये फक्त महिलाच होत्या. आणि दुसऱ्या दोनमध्ये पुरुष मंडळी होती. ते सर्वजण सरपंचाच्या बैठकीत गेले, आणि पुढील कामासाठी तयार व्हायला लागली.

   इकडे लग्न मंडपात बसलेले लोकं अस्वस्थ झालेले होते, चुळबुळ करत होते. माईक वरून वधू वराच्या मामांच्या नावाने ओरड सुरू होती.

   "वधूचे मामा, वधूला घेऊन लवकरात लवकर मांडवात येणे. तसेच नवरदेवाच्या मामांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी नवरदेवाला लग्नमंडपात घेऊन येणे."

    "आज आपण एक नवीन पद्धत सुरुवात करणार आहोत. आधीच वेळ झालेली आहे. या ठिकाणी आलेले सर्वच पाहुणे आमचे मान्यवर आहेत. सर्वांचे केवळ शब्द सुमनांनी स्वागत होईल. कुणाचाही सत्कार होणार नाही. चला भटजी बुवा, माईक हाती घ्या आणि मंगलाष्टकांना सुरुवात करा. चला अंतरपाट धरणारे स्टेजवर व्हा. वधूवरांच्या मध्ये अंतरपाट धरा." असं म्हणत माईक देवबाप्पांच्या हातात सोपवला गेला. सर्वजण अचंबित झाले होते, नवरदेवाची वरात अजून बरीच लांब होती. डीजे जोरात वाजत होता. त्यांच्या नाच गाण्यावरून ते अजून दोन तास तरी मांडवात येत नाहीत, असे सर्वांना वाटत होते. आणि तेवढ्यात .....

    एक बुरख्याची दमनी पाच सहा तरुण ओढत घेऊन आले. स्टेजच्या अगदी पायरी जवळ दमनी उभी केली. गाडीतून चेहरा पूर्णपणे झाकलेले वधू आणि वर उतरले आणि स्टेजवर चढले. वधुप्रमाणेच वराच्याही चेहऱ्यावर उपरण्याचा बुरखा होता. तालुक्यातून एक पोलीस गाडीही तिथे आली. दोन तीन हवालदार मांडवात वेगवेगळ्या ठिकाणी बसले. दोघेजण स्टेजवर सुद्धा उभे राहिले. त्यांना पाहून बोरगावची मंडळी चुळबुळ करू लागली. 'डीजे वाजतोय, नवरदेवाची वरात अजून दूर आहे. कदाचित डीजे समोर नाचणाऱ्यांना तसेच नाचत ठेऊन नवरदेव आणला असावा.' असा विचार काही जण एकमेकांना बोलून दाखवत होते.

    "काही तरी गडबड नक्कीच आहे. पोलीस कशासाठी आले असतील इथे?" एक पाहूणा दुसऱ्याच्या कानात कुजबुजला.

  "अहो, पाहुणा असल एखादा कुणी. चालले असतील या बाजूला तर आले असतील लग्नाला." दुसरा म्हणाला. अशीच कुजबुज बोरगावच्या मंडळींमध्ये सुरू झालेली होती. स्टेजवरून लक्ष ठेवणाऱ्या तरुणांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी लगेच माईक वरून पुन्हा एक धमकी वजा सूचना दिली, ....

   "कुणीही जागा सोडून उठायचा प्रयत्न करू नये. आपण येथे लग्न सोहळ्यासाठी आलेलो आहोत. लग्न लावल्या शिवाय आपण कुणीही इथून उठून जाऊ नये. बंदोबस्ता साठी आमची तरुण मंडळी सर्वांना घेरून उभी आहे. तसा प्रयत्न केल्यास त्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात येईल. गडबड करणाऱ्यांसाठी योग्य त्या पाहुणचाराची व्यवस्था केली जाईल. सर्वांना अक्षता आल्या असतीलच सर्वांनी मोकळ्या मनाने वधूवरांना आशीर्वाद द्यायचा आहे. गुरुजी करा सुरुवात."

   "साssवssधाssन" गुरुजींच्या आरोळीने सर्वजण आपापल्या जागेवर सावध बसले. स्टेजवर वधूवरांसोबत गावातीलच तरुण उभे केलेले होते. त्या गर्दीत वधू वरांच्या पाठीमागे उभे असलेल्या मामांचे चेहरेही कुणाला दिसत नव्हते. मंगलाष्टकांना सुरुवात झाली. आणि एकदाचे शुभमंगल सावधान झालं. फटाके फुटले. फटाके फोडणारे तरुण गावातीलच होते. एकमेकांना हार घालतांना वधूवरांचे चेहरे बघून बोरगावाहून आलेल्या वरा कडील मंडळींचे चेहरे बघण्या सारखे झाले होते. फटाक्यांच्या आवाजाने वरातीपुढे नाचणारे तरुण आणि नवरदेव अचानक झोपेतून जागे झाल्या सारखे लग्न मंडपा कडे धावले आणि आरडा ओरडा करायला लागले.

 

   "हा आमचा अपमान आहे. आम्हाला बोलावून दुसरा नवरदेव उभा केला हा आमचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही."

   "आमच्या सोबत दगाबाजी झालीय. आम्ही हे चालू देणार नाही. आम्ही आमची वधू घेऊन जाऊ."

  अशा प्रकारची आरडा ओरड सुरू झाली. धिंगाणा करू पाहणाऱ्या बोरगावच्या तरुणांना गावातील तरुणांनी चांगलाच चोप दिला. हे तेच तरुण होते, जे नवरदेवाला मांडवात आणायला विरोध करत होते. गावातल्या तरुणांचा त्यांच्यावर राग होताच, ही संधी साधून त्यांनी आपले हात मोकळे करून घेतले. गणवेश धारी पोलिसांनी बोरगावच्या त्या चारपाच तरुणांना पकडून गाडीत टाकले. मात्र दामुण्णांनी मध्यस्थी केली. पोलिसांना समजावून सांगितले.

   "झाला एवढा प्रसाद त्यांच्या साठी खूप झाला. आता त्यांना सोडून द्यावे ते आज आमचे अतिथी आहेत. अजून ते जेवायचे राहिलेले आहेत. त्यांना जेवू घालू द्या. चला सोयरे हो, जेवून घ्या. आणा रे पत्रावळ्या आणि वाढायचे साधन घेऊन या. द्या यांना वाढून." गावातल्या तरुणांना सूचना देत त्यांनी या सर्वांना सोडले. मिळालेल्या मारामुळे आणि शब्दांच्या मारामुळे अपमानित झालेले ते तरुण गीपचुप आपल्या गाडीमध्ये जाऊन बसले.

   दामू अण्णांनी माईक हाती घेतला आणि . ....

  "सोयरे हो, झालेल्या प्रकारा बद्दल आम्ही खरोखर दिलगीर आहोत. असा प्रकार घडायला नको होता. लांबलांबून आलेल्या पाहुण्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्या बद्दल आम्हाल माफ करा. परंतु आम्ही काहीच चुकीचे केलेले नाही. दुपारी साडेबाराचा लग्न मुहूर्त असतांना संध्याकाळी सात वाजेपर्यंतही तुमची मिरवणूक चालते. तुमच्यापैकी कुणी वडीलधारी मंडळी त्यांना समजावत नाही. आणि समजवण्या साठी गेलेल्या आमच्या वडीलधाऱ्या माणसांचा अपमान केला जातोय. आपण दुसऱ्या गावात आहोत, तेथील मंडळींना अपमानित केल्याचे परिणाम काय होतील याची थोडी तरी कल्पना करायला हवी. आलेल्या अतिथींचा सन्मान करण्याची संस्कृती अजून आमचे तरुण विसरले नाहीत याचा आम्हाला अभिमान वाटतो. नाहीतर गावच्या प्रथम नागरिकांचा अपमान करणाऱ्या तरुणांचे काय हाल केले असते याची कल्पनाच न केलेली बरी. अशा चूका पुन्हा होणार नाही याची काळजी बोरगावच्याच नाही तर प्रत्येक गावच्या वडीलधाऱ्या मंडळींनी घेणे आवश्यक आहे. आपण नवरदेवा कडील म्हणून कसेही वागायचे, आम्ही म्हणू तसेच व्हावे. ही प्रवृत्ती कितपत योग्य आहे? समोरच्यांच्या संयमाची परीक्षा किती घ्यायची? संयमाचीही काही मर्यादा असते. ज्या मुलाला वेळ, प्रसंग कळत नसेल,आपल्या मित्रांचा सल्ला किती पाळायचा याची मर्यादा लक्षात येत नसेल अशा मुलाने लग्न करून एखाद्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळं तरी करू नये. असे आमचे, आमच्या गावकऱ्यांचे मत झाले. आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला हा सारा खटाटोप करावा लागला. बोरगावचे कुणी पाहुणे जेवायचे राहिले असल्यास जेवून जावे, तसे जाऊ नये. ही नम्र विनंती. गावातील तरुण मंडळींनाही माझी नम्रतेची विनंती आहे की बोरगावची मंडळी आरामात गावाच्या शिवाबाहेर जातील याची काळजी घ्यावी. ते आज अतिथी आहेत, त्यांना त्यांच्या गावाच्या सीमे पर्यंत पोहचवून यावे." मांडवातील मंडळी उठून आपापल्या गाड्यांमध्ये बसली. डीजे आणि वराची गाडी त्या गाड्यांसोबत घेतली. आणि वधूला सोबत न घेताच परत निघाली. गावातील तरुण आणि पोलीस गाडी त्या सर्वांना त्यांच्या गावाच्या सीमेपर्यंत सोडवायला गेले.

*****


Rate this content
Log in

More marathi story from Pandit Warade

Similar marathi story from Tragedy