Pandit Warade

Tragedy

2.6  

Pandit Warade

Tragedy

सरिता-१

सरिता-१

7 mins
125


सरिता  (भाग-१)


    "आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना कळकळीची विनंती आहे की, जेवणासाठी पंगत बसत आहे. तरी कृपया सर्व पाहुणे मंडळींनी जेऊन घेण्याची कृपा करावी." लग्न मंडपात लावलेल्या लाऊड स्पीकरचा माईक हातात घेऊन संजूमामा जोरजोरात ओरडत होता. लग्न मंडपातला माईक त्याच्या हक्काचं बोलायचं ठिकाण होतं. एरवी घरात त्याचं बोलणं अगदी तितक्या पुरतं तितकंच होतं. घरी तो जास्तीत जास्त ऐकून घेण्याचीच भूमिका बजावत असे. कारण तो बोलला तरी त्याचं ऐकून कोणीच घेत नव्हतं, म्हणूनच अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी तो बोलायची हौस भागवून घ्यायचा. बऱ्याच लोकांची हीच परिस्थिती असते असं म्हणायला काही हरकत नसावी.

   "लग्नाची वेळ होत आलेली आहे, ही शेवटचीच पंगत आहे. या नंतर लग्न लागल्या शिवाय पंगत बसणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. गावात, कान्या कोपऱ्यात, इकडं तिकडं बसलेल्या पाहुण्यांनी लवकरात लवकर मंडपात येऊन जेवून घ्यावे. लाईट गेल्यास गैरसोय होऊ शकते. लवकरात लवकर बसून घ्यावे. ही नम्रतेची सूचना." पुन्हा एकदा जेवणासाठी सूचना. शेवटची म्हणत म्हणत ही पाचवी पंगत बसत होती. शिवाय, 'लग्नाची वेळ होत आली' हे ऐकून सर्वजण हसत होते, कारण लग्न पत्रिकेवरील मुहूर्ताची वेळ केव्हाच उलटून गेली होती. दुपारी १२.३५ चा मुहूर्त होता. आता जवळपास साडे पाच वाजत आलेले होते. गेल्या पाच तासा पासून 'लग्नाची वेळ होत आली' हे वाक्य किमान दहा वेळेस ऐकवून झाले होते. सर्व मंडळी डीजेच्या आवाजाने वैतागली होती. चार दोन जणांनी नवरदेवाला समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु तो अयशस्वी ठरला होता. त्यामुळे अगोदर जेवणाचा कार्यक्रम उरकून घ्यायचे ठरले होते.

    "वाढेकरी मंडळी, आपापले भांडे घेऊन वाढायला लागा. आटपा पटापट. ऐ पोळीवाल्या, अरे त्या पलीकडल्या पंगतीला जा की बाबा. भाजी ss भाजी अरे कुणी भाजीची बकेट घ्या बरं पटकन, भाजी फिरवायची राह्यली. चला, हात उचला. थांबू नका. फिरत रहा." मध्येच कुणी तरी पंगतीत फिरून कुठं काय राहिलं ते सांगत होता, वाढणाऱ्यांवर ओरडत होता.

   "सर्वांना वाढून होऊ द्या. रजा दिल्याशिवाय जेवायला सुरुवात करू नका. झालं का सर्वांना वाढून? बाळू काका, त्या तिकडं कोपऱ्यावर आलं का भात भाजी सगळं? द्यायची का रजा?" इकडं तिकडं पहात सूचना देणं सुरू होतं.

   "थांबा थांबा! अरे मिठाचं आणा बरं, इकडं मीठ राह्यलं वाढायचं. अरे, तिकडं भात राह्यला. आणा लवकर. हांगी आस्सं. हं! द्या आता रजा." पंगतीतून ऑल क्लियरचा निरोप आल्या बरोबर माईकमध्ये 'वदनी केवळ घेता....' चा श्लोक झाला, 'बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल!श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय! घ्या मंडळी, करा सुरुवात' म्हणायच्या आधीच सुरुवात झालेली होती.

   सहा वाजले तशी सर्वांच्याच संयमाची हद्द संपली. 'साडेसहा वाजले तरी नवरदेव मांडवात यायला तयार नाही. आता काय करायचं? लग्न केव्हा लावायचं?' अशी चर्चा आपापसात व्हायला लागली.

    "एवढा कुठं उशीर असतो का राव? मनाला येईल तसं काहीही करावं का?" एक जण दुसऱ्याला म्हणाला.

    "हौ ना राव. तासाभराचा उशीर समजू शकतो. बाकीच्या लोकांना काही काम धंदे आहेत की नाही?"

      तिकडे डीजेच्या तालावर नाचणारे काही जण नाचून दमले होते. त्यांना भूकही लागली होती. त्यांनाही आता बस करावं असं वाटत होतं. परंतु नवरदेवाच्या खास मर्जीतले चारपाच मित्र मात्र ऐकायलाच तयार नव्हते. डीजेला जागेवरून हलू देत नव्हते. कुणी सांगायला गेलेच तर त्यालाच रिंगणात ओढून घेऊन बळेच नाचायला लावायचे. दारूच्या नशेत असलेल्या त्या तरुणांना समजावण्याचा नाद सर्वांनीच सोडून दिला होता.

     इकडे सरिता, नवरी मुलगी चारदा मेकअप करून बसली होती. 'कधीही नवरदेव मांडवदारी येईल तेव्हा आपल्याकडून उशीर व्हायला नको. नाही तर आपल्याच डोईवर खापर फुटायचं.' ती विचार करत होती, होत असलेल्या उशिरा बद्दल चिंतीत होत होती. तिची आई तर रडतच बसली होती. बापही चिंतातुर होऊन डोक्याला हात लावून बसलेला होता.

ही गोष्ट गावातील सरपंच दामू अण्णाच्या कानावर गेली. गावचा मामला. आपण मध्यस्थी करायलाच पाहिजे. आपली जबाबदारीच आहे ती. असा विचार करून ते त्या नवरदेवाला आणि त्याच्या नाचण्यात बेभान झालेल्या कंपूला समजावण्या साठी गेले.

     "सोयरे हो! बस करा आता हे सारं. लांबून लांबून आलेली पाहुणे मंडळी ताटकळून बसलीय. त्यांनाही काही काम धंदे असतीलच की? जाऊ द्या त्यांना सुखासुखी घरी." दामू अण्णा त्यांच्यातल्या एकाला बाजूला घेऊन बोलले.

    "रुपये चाळीस हजार मोजलेत डीजे साठी, ते काय जास्त झाले होते म्हणून दिले काय? अशी वेळ काय पुन्हा पुन्हा येत असते काय? काही हौस मौज असते की नाही?" मित्र कंपूतला एकजण अण्णांना म्हणाला.

     "सोयरे हो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. लग्न आयुष्यात एकदाच होत असतं. हौस मौज करायलाच पाहिजे. परंतु त्यालाही काही लिमिट असते की नाही?  दुपारचा मुहूर्त असतांना सायंकाळच्या मुहूर्ताची वेळ झाली तरी तुम्ही मंडपात येत नाही म्हटल्यावर काय म्हणावं तुम्हाला? बस करा आता." दामू अण्णा.

    "ओ पाव्हणं! नका मूड ऑफ करू आमचा. आता कुठं रंगत चढाया लागलीय. जरा नाचू द्या. ऐ  डीजेवाल्या, डीजे जाग्यावरून हलवायचा नाही. नाही तर पैसे मिळणार नाही तुला.पाव्हणं, व्हा बाजूला." एकजण जरा धावत अण्णांच्या जवळ येऊन म्हणाला. तसा अण्णांनी तिथून काढता पाय घेतला. 'हे तरुण काही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. विनाकारण आपला अपमान करून घेणं बरं नाही.' असा विचार करून ते तिथून सटकले. परंतु मनाशी काहीतरी ठरवूनच.

     "गणपतराव, असं डोक्याला हात लावून बसलात तर भागल का? हात पाय हलवावेच लागतील. काहीतरी करायलाच पाह्यजे आता. या जरा इकडं." दामू अण्णा वधुपित्याला, गणपतरावला त्यांच्या बैठकीच्या खोलीत घेऊन गेले. सध्याच्या परिस्थितीवर काही तरी तोडगा काढलाच पाहिजे. म्हणून आणखी दोघातिघांना बोलावणं पाठवलं. बाबुराव, बाजीराव, माणिकराव, अशोक शेठ, इत्यादी मंडळी तिथे आली. सर्वांना चहा मिळाला. चर्चेला सुरुवात झाली.

    "मंडळी, हे जे काही चाललंय ते बरोबर आहे का? तुम्हाला कसं काय वाटतं?" दामू अण्णांनी चर्चेला तोंड फोडले.

     "ह्यो डीजे कोण्ही काढला काय म्हाईत? ह्या डीजेनं अन् त्या दारूनं पोऱ्हं पार बिघडून गेलीत. वायकरणीचाच खर्च हाय ह्यो." बाबुराव म्हणाले.

      "खर्चाचं सोडा हो. पण येळ किती वाया चाललाय हा. त्याची काही गिणती?" बाजीराव म्हणाले.

     "सर्वांना एकाच मापात तोलून कसं चालंल? डीजे सारेच लावतात पण एवढा उशीर? लोकांना काही काम धंदे आहेत का नाही?" अशोक शेठ आपल्या व्यापारी भाषेत बोलले.

     "अण्णा, या लोकांना चांगला धडाच शिकवला पाहिजे. काहीतरी असं करावं की पुन्हा कुणी असला प्रकार करूच नये. सगळ्या राज्यात बातमी पोहोचली पाहिजे आपल्या गावाची. म्हणजे पुन्हा कुणी असला प्रकार करतांना दहा वेळेस विचार करेल." माणिकराव बरेच तावात आलेले होते.

    "मला बी त्येच वाटतंय. पुन्हा कुणाची हिंमतच व्हायला नाही पाह्यजेल असे काय तरी करायला पाह्यजे." बाबुराव म्हणाले.

     "तेवढ्या साठीच तर बोलावलंय तुम्हा सर्वांना मी इथं. गणपतराव, तुमची तयारी असेल तर आज या लोकांचा कार्यक्रमच लावून टाकू." दामू अण्णा वधुपित्याकडे बघून विचारते झाले.

    "माझं तर काही डोस्कच चालना बघा. जसं तुम्हाला सर्वायला पटंल तसं करा. लेक तुमचीच हाय. माह्या सरुचं ज्येच्यात भलं व्हईल त्ये करा." गणपतराव अगतिक झालेले होते.

    "हे पहा. ज्या मुलाला चार चौघांच्या वेळेचं महत्व कळत नाही. वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान समजत नाही. अशा मुला सोबत आपली सरिता कशी काय सुखात राहील?" दामू अण्णा.

     "पर मंग आता कसं करावं?" गणपतराव रडकुंडीला आले होते. पुढं काय करावं? हे त्यांना सुचत नव्हतं. 'एवढा मोठा खर्च करूनबी कार्य यवस्थित पार पडणार नसंल तर कसं होयाचं? समद्या पंचक्रोशीत बदनामी व्हईल ती येगळीच.' या विचारानं ते भांबावलेले होते.

     "तुमच्या मनाची तयारी असेल तर आपण हे लग्न मोडून टाकू. तसंही आपली मुलगी या मुलांसोबत सुखी होऊच शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघच. तेव्हा माझ्या डोक्यात एक झकास आयडिया आलेली आहे. ती अमलात आणली तर  नक्कीच चांगलं होईल. एक तर अशा बेजबाबदार पणाला धक्का बसेल. आणि आपल्या मुलीचंही कल्याण होईल." अण्णा विचार करत, गणपतरावाच्या आणि इतर मंडळींच्या चेहऱ्यावरचे हाव भाव निरखत बोलत होते.

     "पर अण्णा, आता करायचं तरी काय? मुलीच्या तर अंगाला हळद लागलेली आहे. अशा स्थितीत लग्न मोडलं तर पुढं काय? तिच्या आणि गणपतरावाच्या नावाची किती बदनामी होईल? ती कशी टाळता येईल? त्याच्यावर काही उपाय करता येईल का?" अशोकशेठ पुढचं नियोजन समजून घेण्याच्या हेतूंने विचारते झाले. सर्वांच्या डोक्यात हाच प्रश्न घोळत असावा बहुतेक, कारण अशोक शेठने  विचारलेल्या प्रश्नावर सर्वांचे चेहरे प्रश्नार्थक झालेले होते. 'आता अण्णा काय सांगतात?' असा भाव दिसत होता.

     "अण्णा, असा काही मार्ग काढा की, सापही मेला पाहिजे आणि लाठीही मोडली नाही पाहिजे." माणिकराव म्हणाले.

     "अहो, आण्णा म्हणत्यात म्हणजे नक्की झ्याकच आयडिया आसंल. अशा गोठीत त्यायचा हात धरायची कोण्ही हिंमत तरी करतं का. निवडणूक लागली की निकाल लागूस्तोवर काही कळू देत्यात का?" बाबुराव म्हणाले तसं सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.

    "ते जाऊ द्या बाबुराव. आता तो विषय इथं नको. आता समोर अगदीच बाका प्रसंग उभा असल्यावर सध्या याचाच विचार करायला पाहिजे. नाही का?" अण्णांच्या या वक्तव्यावर सर्वांचे कान त्यांच्या कडेच लागले.

    "चला तर मग, मी सांगतो तसं करा. एक घाव दोन तुकडे करूनच टाकू आज. या मस्तवाल मंडळींची मस्ती जिरलीच पाहिजे आज. फक्त एकच ध्यानात ठेवायचं, आपण जे ठरवू ते पूर्णपणे पार पडे पर्यंत या कानाचे त्या कानाला कळायला नको. काय?" अण्णा

    "व्हय, व्हय, तुम्ही म्हणता तसंच हुईल. तुम्ही फकस्त सांगा." सर्वांचा सकारात्मक होकार बघून अण्णा पुढची योजना सांगायला लागले....

*******


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy