Space
Space
प्रत्येकाला त्याची त्याची space देणं किती महत्वाचं असतं ना! माझी facebook वरची friends list check करत होतो सहज. अनेकांना मी ओळखतही नाही. उगाच, माझ्या एखाद्या मित्राचे ते मित्र, म्हणून facebook ने, ती लोकंही 'friends of friends' असं म्हणत माझ्या गळ्यात मारली होती. तरीही त्यातल्या प्रत्येकाची एक जागा होती, त्या लिस्ट मधे. त्यांना मी ओळखत नसलो तरी त्यांची स्वतःची अशी space अगदी ठाण मांडून बसली होती आपापल्या जागी. दोन जिवाभावाचे शब्द 'सहज' म्हणून इकडून तिकडे पोहोचवायला ही अशी माणसं उपयोगी येतात बऱ्याचदा. त्यांची space मग उपयोगाला येते आपल्याही!
Space वरून आणखीन एक आठवलं. आमच्या बाल्कनीच्या उंब-याशी एक इवलंसं रोप जन्म घेतंय. दिवसभराच्या रामरगाड्यात कोणाला त्याच्याकडे ढुंकूनही पाहायला वेळ नसतो. अनेकदा लोकांचे पाय त्याच्या जवळून बाल्कनीत प्रवेश करत असतील. अनेकदा ते तुडवलंही गेलं असेल या धावपळीत, पण ते पुन्हा उभं राहतं. तग धरून जगत राहण्याची त्याची उर्मी फार विलक्षण आहे हो!
स्वयंपाकघर आणि बाल्कनी यांच्या मधे असणारं ते रोप म्हणजे, संसार आणि मुक्ती यांच्या सीमारेषेवर असल्यासारखंच वाटतं जणू!
पण त्याची space त्याने अगदी जिवापाड जपून ठेवल्ये. कधीतरी मी बघतो त्याच्याकडे.
ते त्याचं त्याचं जगत असतं.
इवलसं रोप. त्याचं नगण्य अस्तित्व. त्याची दुर्लक्षित space.. गंमत वाटते असा घरात आलेला निसर्गाचा अविष्कार पाहिलं की. अचानक चैतन्य पसरतं. त्याचं हिरवेपणही तरूणाई पेरतं आपल्या आत.
खरंच, ज्याला त्याला, ज्याची त्याची space देणं किती महत्वाचं असतं ना!