STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Classics

3  

Amruta Shukla-Dohole

Classics

संत कान्होपात्रा

संत कान्होपात्रा

2 mins
209


जन्म: इ.स. 15 वे शतक


जन्मस्थळ: मंगळवेढा


निर्वाण: इ.स. 15 वे शतक पंढरपूर


संत कान्होपात्रा यांचा जन्म पंढरपूर जवळ मंगळवेढा या गावी एका गणिकेच्या पोटी झाला. शामा या नाचगाणं करणाऱ्या गणिकेकडे अनेक प्रतिष्ठीतांचे येणे जाणे होते.

अनेक धनदांडग्यांना मुस्लिम सरदारांना, अमिर उमरावांना खूष करण्याचे काम ही शामा नायकीण करीत असे. तिची ही किर्ती दुरवर पसरल्यामुळे लांबुन लांबुन श्रीमंत धनवान मंगळवेढयास या शामा गणिकेच्या घरी भेटी देत असत.

अश्या या शामा नर्तिकेच्या पोटी सुरेख अशी कन्या जन्माला आली. जणु चिखलात कमळ उमलले. तीचे नाव कान्होपात्रा असे ठेवले. चंद्राच्या कलेप्रमाणे कान्होपात्रा हळुहळु मोठी झाली अप्रतिम लावण्य आणि गोड गळा यामुळे कान्होपात्राने आपल्याप्रमाणे व्यवसाय करून श्रीमंत आणि धनवान मंडळींना खुश ठेवावे अशी तिची आई शामाची इच्छा होती.

पण पूर्वपुण्याईमुळे कान्होपात्रेला लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीची ओढ होती. गावातील वारकऱ्यासमवेत ती पंढरपूरी जात असे. त्यामुळे आईचा व्यवसाय पुढे न्यावा असे विचार तिच्या मनाला कधी शिवले देखील नाहीत.

या वारीत कान्होपात्रेला संतसंग लाभला. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माउलींची भेट झाली आणि त्यांचा सहवास लाभला. या संत संगतीमुळे ती पुरती बदलली आणि तिच्या आयुष्यात सुध्दा आमुलाग्र बदल घडला. सतत हरिनामात दंग राहाणे आणि किर्तन करणे या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी झाल्या.


“योगिया माजी मुगुट मणी। त्रिंबक पाहावा नयनी।।

माझी पुरवावी वासना। तू तो उध्दराच राणा।।

करूनिया गंगा स्नान। घ्यावे ब्रम्हगिरीचे दर्शन।।

कान्होपात्रा म्हणे पंढरीराव। विðल चरणी मागे ठाव।।”

बिदरच्या बादशहापर्यंत कान्होपात्रेच्या सौंदर्याची ख्याती पोहचली. तिला पकडून आणण्याकरता त्याने आपले सरदार मंगळवेढयास पाठविले. स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्याकरता कान्होपात्रा वेष बदलून वारीत सहभागी झाली आणि पंढरपूरी पोहोचली. विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवून आपले रक्षण करण्याची आर्त विनवणी तिने केली


“नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वता जावू पाहे।।

हरिणीचे पाडस। व्याघ्रे धरियेले। मजलागी झाले तैसे देवा।।

मोकलून आस। जाहले उदास। घेई कान्होपात्रेस हृदयात।।”

बादशहाच्या सरदारांनी तिचा पंढरपूराच्या मंदिरापर्यंत पाठलाग केला. मंदिराच्या व्यवस्थापकांना कान्होपात्रेला हवाली करण्यास फर्मावले अन्यथा मंदीर उध्वस्त करण्याची धमकी दिली. आपल्या भगवंताचे आपल्या विठ्ठलाचे मंदिर उध्वस्त होतांना कान्होपात्रा कशी पाहू शकणार होती ? तिने यवनांसोबत जाण्याची तयारी दर्शविली परंतु शेवटचे विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवण्याची विनंती केली.

विठ्ठलाच्या पायाला कडकडुन मिठी मारून तिने आपले प्राण त्याक्षणी त्यागले पण आपल्या आणि पांडुरंगाच्या भक्तित अडसर ठरू पाहणाऱ्या यवनांसोबत गेली नाहीच.

मंदिराच्या दक्षिण दरवाज्याजवळ तिला पुरण्यात आले. त्या ठिकाणी एक तरटी वृक्ष उगवला तो वृक्ष आजही अक्षय हिरवा असुन संत कान्होपात्रेच्या भक्तिची ग्वाही देत उभा आहे…


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics