Yogesh Khalkar

Inspirational

3  

Yogesh Khalkar

Inspirational

संकटातील आधारवड

संकटातील आधारवड

2 mins
340


कठीण समय येता कोण कामास येतो.. खरोखर ही काव्यपंक्ती खोटी ठरवणारे आणि माझ्या आयुष्यात आलेल्या संकटात माझी खंबीर साथ देणारे आमचे नाना बाबा. यशवंत पुंडलिक पाठक असे त्यांचे पूर्ण नाव. पण सारा गाव त्यांना नाना बाबा नावाने ओळखतो. गावात असलेल्या चौकात त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. गावात कोणताही सण समारंभ असो नाना बाबा तिथे हजर असले पाहिजे. अशा या नाना बाबांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. 


आमच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. निसर्गाने दगा दिला आणि शेतातलं पीक हातचं गेलं. मला चांगलं आठवतंय मी त्या काळामध्ये बारावीची परीक्षा देणार होतो. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा काळ होता. शेतातले पीक हातचे गेल्याने घरात खूप हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच कॉलेजमध्ये नोटीस आली, बारावी बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरायचे आहे. बोर्ड परीक्षेच्या फॉर्मची फी अडीचशे-तीनशे रुपयाच्या आसपास होती. पण घरातली परिस्थिती पाहून पैसे मागण्याचे धाडस होत नव्हते. परीक्षा फॉर्म भरायचा की नाही या विचारात काही दिवस निघून गेले.


बघता-बघता परीक्षा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला. आज जर फॉर्म भरला नाही तर बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही यामुळे काय करावे हेच सुचत नव्हते. शेवटी नाना बाबांकडे जायचे ठरवले. मनाचा हिय्या करून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी माझी परिस्थिती शांतपणे ऐकून घेतल्यावर मी तुझी परीक्षा फी भरतो असे सांगितले आणि त्याच मिनिटाला ते माझ्याबरोबर कॉलेजमध्ये यायला निघाले. कॉलेजमध्ये जाऊन आमच्या प्राचार्यांना भेटले आणि मला माझ्या बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरता आला.


खरोखर त्यांनी परीक्षा फॉर्म फी भरण्याची मदत वेळेवर केली नसती तर माझ्या शिक्षणाची दारे कदाचित बंद झाली असती आणि शेतावर मोलमजुरी करण्यासाठी जावे लागले असते. पण त्यांच्या या मदतीमुळे मला माझे शिक्षण चालू ठेवता आले. त्यामुळे नाना बाबांना थॅंक्स म्हणावे तेवढे थोडे आहे.


Rate this content
Log in