समिधा
समिधा
समिधा... मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी..... आई समिधा दोन वर्षाची असताना देवाघरी गेलेली. एकुलती एकच होती. तिला सांभाळून काम करणे बाबाला जमेनासे झाले.मग बाबांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. नवी आई थोडे दिवस समिधाची व्यवस्थित काळजी घेतली... काय हवय नको ते पाहिले.... पण तिचं माया करणं हे वरवरचं आहे ....हे समजल्यावर समिधाच्या आजीने समिधाला आपल्यासोबत घेऊन गेली. आजीच तिचा सांभाळ करू लागली. जाईल तिकडे समिधा सोबत असायची. शाळेत सोडायला जायची... आणायला जायची... खूप लाड करायची... पण वयानुसार आजी थकत चालली होती.... कष्ट करून समिधाला सांभाळत होती.... आता ते शक्य नव्हते... समिधाची जबाबदारी कुणीतरी घ्यायला हवी होती. समिधाला एक मामा आणि एक मावशी होत्या. मामाची परिस्थिती पण हलाखीची होती. मावशीची परिस्थिती बरी होती पण जबाबदारी आली की सगळे ऐन मोक्याच्या क्षणी पाठ फिरवतात... याची प्रचिती आली.
तसे समिधाला सगळे जीव लावत होते पण सांभाळण्याची जबाबदारी छोट्या मावशीने घेतली. काका पण खूपच माया करायचे. अगदीच पोटच्या मुलीप्रमाणे दोघेही समिधाला सांभाळत होते....काही काळ गेल्यावर मावशीला पण मुले झाली... पण समिधावरचे त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. कसं असतं बघा ना....ज्या पित्याने जन्माला घातले.... त्याने आईच्या म्रुत्युनंतर लग्न तर केलेच...... पण आपली मुलगी कशी आहे... याची साधी चौकशी पण करावी वाटली नाही त्याला.... त्याची दुसरी बायको आणि मुले याच्यातच गुरफटून गेला होता. अशा बापाची लाज न वाटावी तरच नवल. असो...
जन्मदात्या बापापेक्षा कितीतरी पटींनी अधिक माया करणारे,अधिक जीव लावणारे मावशी,काका समिधाला लाभले होते.... तिच्यावर प्रेम करणारी भावंडे होती...
आणखी काय हवे होते ? जीवनप्रवास एकंदरीत छानच सुरु होता. शाळेत मन रमेना...दिली शाळा सोडून.... मावशी काका नी खूप समजावून सांगितले पण काही उपयोग झाला नाही. दोन वर्षे अशीच घरी बसून राहिली... मुलगी शिक्षण घेत असते तर काही प्रॉब्लेम नाही. पण घरात बसून राहिली की लगेचच लग्नासाठी स्थळे यायला सुरुवात होते.... समिधाचे पण असेच झाले... स्थळे यायला लागली.... समिधाचे वय अवघे सतरा वर्षे होते... एक मुलगा बघायला आला.... त्यांना गरीब, खेड्यात राहणारी मुलगी त्यांना हवी होती. मुलगा आणि घरची परिस्थिती, घरातील मंडळी सगळं छान होते, त्यामुळे समिधाचे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिस्थिती बघता मोजक्याच पाहुण्यांना बोलावून गावदेवी च्या मंदिरात लग्न करण्यात आले. संसार छान सुरू होता. संसाराची वेल बहरलेली. गोंडस मुलंही झाली होती.
राजेश....समिधाचा नवरा. दिवसभर काम करून यायचा. रात्री बायको मुलांसोबत रमून जायचा. एक दिवस अचानक राजेश कामावर गेला होता... तिकडे गाडी लावण्यासाठी वाद झाला... बघता बघता वाद एवढा विकोपाला गेला की या छोट्या वादाने मारामारीचे रूप घेतले आणि या झटापटीत राजेश मात्र गंभीर जखमी झाला. दवाखान्यात नेण्यापूर्वीच रस्त्याने म्रुत्यु झाला. आभाळ कोसळले तिच्यावर.. मुले पदरात टाकून नवरा गेला... एकटी माऊली मुलांना सांभाळत होती. सुरवातीला मोलमजुरी करत होती... नंंतर एका कंपनीत काम मिळाले... मग जरा भार हलका झाला... बघता बघता मुले मोठी झाली... आता ती आईला कामासाठी हातभार लावतात... आईची काळजी घेतात... आपल्या परीने आईला सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
यापेक्षा एका आईला आणि काय हवंय....