Ajay Birari

Abstract

1.7  

Ajay Birari

Abstract

समाजातील श्रध्दा व अंधश्रध्दा

समाजातील श्रध्दा व अंधश्रध्दा

4 mins
8.0K


 एका मित्राच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांच्या घरी मांजर पाळलेलं होतं. संध्याकाळची वेळ होती. त्यांची आरतीची वेळ झालेली होती. आरती सुरु करण्याआधी त्यांच्या मुलाने मांजर शोधून आणलं आणि खांबाला बांधून ठेवलं. आरती झाली आणि मांजर सोडून देण्यात आलं.

मला आश्चर्य वाटत होतं. की त्या मांजराचा काहीही त्रास नव्हता, ते बाहेर खेळत होतं तरी त्याला घरात आणून त्या खांबाला बांधून का ठेवलं. उत्सुकतेपोटी मी मित्राला मांजराबद्दल विचारले. त्याचं उत्तर ऐकून तर मी उडालोच. म्हणाला, "आमच्याकडे आजोबांपासुून ही प्रथा आहे. आरती सुरु असतांना मांजर बांधून ठेवण्याची." खोलात गेल्यावर जे समजले ते तर अजिबातच बुध्दीला न पटणारे होते. त्याचे आजोबा दररोज सकाळ संध्याकाळ ध्यान साधना करायचे. त्यावेळी त्यांनी मांजर पाळलेले होते. ध्यानसाधनेत, एकाग्रता भंग होऊ नये म्हणून ते मांजर खांबाला बांधून ठेवत होते. तीच प्रथा परंपरा म्हणून त्यांनी पुढे चालू ठेवली. ते मांजर मेल्यावर दुसरं मांजर आणून प्रथा चालू ठेवत होते. मुलगा ध्यानसाधना वगैरे काही करत नव्हता पण आरतीच्या वेळी मांजर बांधून ठेवावं लागतं हे त्याच्या मनावर बिंबलं होतं. 

कुठलाही सारासार विचार न करता विवेकबुध्दी न वापरता अशा प्रथा अंधश्रध्देपोटीच चालू ठेवल्या जातात. अशा प्रकारच्या अंधश्रध्दा पाळणारे लोक समाजात काही कमी नाहीत.

अंधश्रध्दा बोकाळण्याची अनेक कारणं आहेत. त्यातले सर्वात मोठे कारण इंग्रजांच्या काळात घडले. देश स्वातंत्र्यासाठी नुकतीच लोकांमधे जागृती होत होती. त्यावेळी इंग्रजांनी मोठ्या हुशारीने लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काही पंडे लोकांना हाताशी धरुन कर्मकांडाचा जोरदार प्रचार केला. कर्मकांड, पूजा, मंत्रविधी केले म्हणजे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे लोकांना वाटू लागले. आणि लोक कर्मकांडाच्या विळख्यात अडकले. त्या वेळेपासून निरनिराळ्या प्रकारच्या अंधश्रध्दा समाजात पसरल्या. आणि त्या परंपरागत पुढे चालत आल्या. 

उदाहरणादाखल आपण सत्यनारायण पुजा घेऊ. सत्यनारायण पुजा केली तर धनधान्य, संपत्ती, संतती हे सगळं प्राप्त होतं असं पोथीतच लिहीलं आहे. आणि पूजा न केल्याने प्रसाद ग्रहण न केल्यामुळे, नुकसान होते. असेही लिहीले आहे. मग काहीजण फायद्यासाठी तर काही जण भीतीपोटी अशा प्रकारचे कर्मकांड करु लागले. पण सत्यनारायण पूजेचा खरा उद्देश कोणी लोकांना सांगितलाच नाही. आणि अंधश्रध्दाळू लोकांनी तो समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यांना असे वाटते की सत्यनारायण फोटोला हळद, कुंकू, अक्षता, हारफुले, फळे इत्यादी अर्पण केले तर सत्यनारायण प्रसन्न. आता प्रगतीतला अडसर दूर झाला असेच त्यांना वाटू लागते. किती हा अंधश्रध्दांचा पगडा!

सत्यनारायण पूजेचा खरा उद्देश असा आहे की त्या दिवशी यजमानांनी संकल्प घ्यायचा की आजपासून माझ्या पुढील आयुष्यात मी सत्य बोलणे, सत्य वागणे, सत्याचे आचरण करणे हे व्रत धारण करीत आहे. हा संकल्प घेतांना त्या सत्यनारायणावर आपली श्रध्दा हवी  पण हे करतांना कोणी दिसत नाही.

श्रध्दा व अंधश्रध्दा या दोन्ही क्षेत्रांना विभागणारी रेषा थोडी झुलती असते. कधी इकडे तर कधी तिकडे. बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. आपण आपली विवेकबुध्दी वापरुन विज्ञानाची कसोटी लावली तर आपल्याला त्यातला फरक नक्कीच कळेल. 

अंधश्रध्देचं अजून एक ऊदाहरण देता येईल. ते म्हणजे गंगेत आंघोळ केली की पापक्षालन होते. पाप धुतले जाते. ही किती मोठी अंधश्रध्दा आहे यासाठी उदाहरणादाखल मी एक महाभारतातलीच एक गोष्ट सांगतो.

महाभारत युध्द संपल्यावर युधिष्ठीर आपले चारी भाऊ व द्रौपदीसह तीर्थयात्रेला जाण्यास निघाले. श्रीकृष्णालाही बरोबर नेण्याची त्यांची इच्छा होती. म्हणुन ते श्रीकृष्णाकडे आले व त्यास बरोबर चलण्यासाठी आग्रह करु लागले. परंतु श्रीकृष्णाला काही आवश्यक काम असल्यामुळे त्याने सर्वांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि एक मातीचा कमंडलु देऊन तो म्हणाला, "मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. परंतु तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तिर्थक्षेत्री, सरोवर, नदीमधे स्नान कराल त्या प्रत्येक ठिकाणी स्नान करतांना हा कमंडलूही बुडवत जा." धर्मराजाने तो कमंडलु घेतला आणि ते सर्व तीर्थयात्रेस रवाना झाले. काही दिवसांनी परत आल्यावर प्रथम श्रीकृष्णाकडे आले. तो कमंडलू देऊन युधिष्ठीर म्हणाला की आपल्या आज्ञेप्रमाणे हा कमंडलू प्रत्येक तीर्थक्षेत्री बुडवून आणला आहे.

अरे वा, मलाही हेच हवे होते असे म्हणून श्रीकृष्णाने तो कमंडलू जमिनीवर आपटून त्याचे तुकडे तुकडे केले. आणि एक एक तुकडा प्रसाद म्हणून प्रत्येकाला वाटून खाण्यास सांगितले. प्रत्येकाने तो तुकडा जीभेला लावताच कडू लागल्यामुळे थुंकून दिला. ते बघून श्रीकृष्ण म्हणाला, "काय झालं? कडूच आहे का अजून? एवढ्या पवित्र स्थानावर स्नान करुन आणलं तरी कडूच कसा?"

युधिष्ठीर म्हणाला, "काय कृष्णा, असं कसं होईल. फक्त धुतल्याने त्याचा कडूपणा कसा जाईल ?"

श्रीकृष्ण :- असं जर आहे तर मग मला सांगा तीर्थस्नानाचा बाह्योपचार करुन आपल्या अत:करणाची स्वच्छता कशी होईल?"

खरं तर अध्यात्मात  उच्च आदर्श आहेत. त्यात विज्ञानही आहे.  हिंदू धर्मात अध्यात्म हे अंत:करण, आत्म्याच्या स्वच्छतेसाठीचा उपचार आहे. कर्मकांड हे एक फक्त माध्यम आहे. पूजा करतांना एखादी वस्तू कमी असली तरी लोकांना चालत नाही. भीती वाटते काही लोकांना, की एखादी वस्तू कमी पडली तर देव आपलं काही वाईट करेल की काय? जे साहित्य भटजीने लिहून दिले, ते साहित्य तो आवर्जून, कुठूनही उपलब्ध करुन आणण्याचा अट्टाहास करणे म्हणजे अंधश्रध्दाच.

बाह्योपचार, वरवरचं कर्मकांड यामुळे पुण्यलाभ होतो ही अंधश्रध्दा.

पण कर्मकांडाच्या माध्यमातून आत्मशुध्दी करण्याची तयारी म्हणजे श्रध्दा.

या व्यतिरिक्त समाजात कितीतरी अनिष्ट चालीरिती, रुढी, दुष्ट परंपरा या अंधश्रध्देपोटी चालत आल्या आहेत, ज्या समाजासाठी घातक आहेत त्या नष्ट करण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन अशा कार्या साठी हातभार लावला पाहिजे.

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract