Ajay Birari

Inspirational

2.9  

Ajay Birari

Inspirational

जीवनात गुरूचे महत्व

जीवनात गुरूचे महत्व

3 mins
61.5K


जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. पण गुरुही योग्य असला पाहिजे. जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तिपासून काही ना काही तरी शिकतच असतो. आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. आणि प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवण देते ती गुरुच असते. उदाहरणार्थ सूर्य, पृथ्वी, वारा, अग्नी, जल, नद्या, झाडे, फुले, पाने, ढग, डोंगर निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही तरी बोध देत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येक पदार्थाविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांची देण्याची, त्यागाची, परोपकारी वृत्ती आपल्यात आली पाहिजे. आणि या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला योग्य गुरूची आवश्यकता असते.

योग्य गुरू? हो योग्यच गुरू आपल्याला लाभायला हवा. कारण हल्ली योग्य गुरू लाभणे दुरापास्त झाले आहे. मूल जेव्हा जेव्हा घरात असते तेव्हा आईवडील त्याच्यावर संस्कार करत असतात. त्याला छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनात कसं वागायचं ते समजावत असतात. आईवडील हेच तर आपले प्राथमिक अवस्थेतले प्रथम आणि महत्वाचे गुरू असतात. पण आजकाल आई वडीलांकडे तरी कुठे वेळ असतो? दोघे नोकरी करीत असल्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. मग ते कसे करू शकतील मुलांवर चांगले संस्कार?

त्यानंतर नंबर लागतो तो शाळेतील शिक्षकांचा. त्यांचीही खूप महत्वपूर्ण भूमिका असते मुलांवर चांगले आणि योग्य संस्कार करण्याची. बालमनाला पैलू पाडण्याचं काम हे प्राथमिक शाळा आणि नंतर हायस्कुलमधे होत असते. आईवडील, आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक यांनी केलेले कोऱ्या पाटीवरील संस्कार हे टिकाऊ असतात. मग ते चांगले असोत किंवा वाईट. त्याचाच प्रभाव त्या मुलांच्या पुढील आयुष्यात कायम राहतो.

पण दुर्दैवाने आजकाल शाळेत चांगले शिक्षक, आदर्श शिक्षक खूप कमी आढळतात. शिक्षकांचेच आचरण चांगले नसेल तर ते विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार? मुलांवर चांगले संस्कार करावयाचे असतील तर आधी शिक्षकाची जीवनपध्दती आदर्श असायला हवी. दारु पिणारा शिक्षक कुठला चांगला आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवणार? काही शाळांमधे तंबाखू खाणारे शिक्षक आहेत. आणि ते विद्यार्थ्यांसमोर तंबाखू खातात. एवढच नाहीतर, तंबाखुपुडी आणायला विद्यार्थ्यालाच पाठवतात. मग कशी घडेल आदर्श पिढी?

पुर्वीची गुरूकुल पध्दत खूप छान आणि आदर्श होती. मुलांना ऋषीमुनींकडे अरण्यात पाठवत. मग ते गुरू त्यांना स्वावलंबनापासून तर सर्व प्रकारच्या कलागुणांमधे पारंगत करीत असत. त्यांच्यावर आद्यात्मिक संस्कार करीत असत. स्वत:च्या आचरणाने त्यांच्यात चांगले गुण परोपकार, त्याग, शोर्य, इतरांशी वागण्याची पध्दत, मोठ्यांविषयी आदर, सर्वांसाठी प्रेमाची भावना इत्यादी रुजवत असत. पालक देखील त्या गुरूंच्या ताब्यात आश्रमात सोडून निघून जात आणि त्या शिष्याला शिक्षा करण्याची मुभा गुरूला असे.

आता तर शिक्षक शिक्षाही करू शकत नाहीत. केलीत तर पालकच जाब विचारायला येतात. त्यामुळे विद्यार्थ्यावरही वचक राहीला नाही.

आदर्श आणि योग्य गुरू कसे असावेत याचे एक उदाहरण देतो.

       संत रामदास स्वामींकडे एक महिला तिच्या एका पाच सात वर्षांच्या मुलास घेऊन गेली. ती स्वामींना म्हणाली, "महाराज, हा मुलगा खूप गूळ खातो. याच्यावर काही उपाय करा." स्वामी रामदासांनी तिला आठ दहा दिवसांनी परत येण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती महिला आठ दहा दिवसांनी पुन्हा आली त्यावेळी स्वामींनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला गूळ न खाण्याविषयी उपदेश केला. त्या महिलेने आश्चर्याने विचारले, "महाराज, हे तुम्ही गेल्या वेळी मी आले होते तेव्हा का नाही केलत?

संत रामदास म्हणाले, "माते, मी स्वत:च गूळ खात होतो मग मी याला गूळ न खाण्याविषयी कसे सांगू शकणार होतो. आता मी गूळ खाणे सोडले आहे म्हणदे मला त्याबद्दल उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त झाला.

तर असे होते पूर्वीचे गुरू. म्हणून जीवनात योग्य गुरू आपणास लाभले तर योग्य संस्कार होऊन आपण आदर्श जीवन जगू शकतो.

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational