शोध-एक रहस्य (भाग-1)
शोध-एक रहस्य (भाग-1)
कसला तरी आवाज होतो आणि सगळीकडे एकच गोंधळ सुरु होतो.
रात्रीची वेळ... ११:३० वाजलेले असतात...
डॉ. रुद्रा, (डॉ. सी. रामन यांच्या केबीनमध्ये येउन.) “डॉ. वशिष्ठ आपल्या रूममध्ये नाहीये. आम्ही त्याला खूप शोधलं पण तो कुठेच सापडत नाहीये.”
डॉ. रुद्रा धावत पळत येऊन सी. रामनना त्यांचा पेशंट एक २५ वर्षाच्या मुलाबद्दल माहिती देतात. डॉ. रुद्रा हे डॉ. सी. रामन यांचे असिस्टंट असतात. सी. रामन एक मनोचिकीत्सक आणि मनोविश्लेषक असतात. रुद्रा त्यांना असिस्ट करत असतो. पण अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळेच स्तब्ध होतात. गेल्या २५ वर्षांपासून डॉ. सी. रामन हे एका खूप महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असतात. त्यांचे प्रोजेक्ट असत आपल्या विचारांनी आपल्या मनावर होणारे चांगले वाईट परिणाम. सी. रामन गेल्या २५ वर्षांपासून आपली तहान भूक विसरून या विषयावर काम करत असतात आणि यासाठी त्यांनी दोन मुलांची निवड केलेली असते, वशिष्ठ आणि सौरभ.
वशिष्ठ हा एक २५ वर्षाचा मुलगा असतो आणि नुकताच एका साधना सेवाभावी संस्थेतून बरा होऊन आलेला असतो. तर सौरभ हा एक गरीब घरातला होतकरु मुलगा असतो. दोघेही भिन्न विचाराचे भिन्न स्वभावाचे तसेच भिन्न व्यक्तीमत्वाचे असतात म्हणूनच त्यांची या प्रोजेक्टसाठी निवड झालेली असते. पण या घटनेमुळे आज सगळेच विचारात पडलेले असतात. आता प
ुढे काय? प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आता पुढे काय? इतके वर्ष जी मेहनत घेतली ती वाया जाणार. आपले सगळे प्रयत्न आता व्यर्थ होणार हा एकच विचार सगळे करत असतात. डॉ. सी. रामन हताश होउन खुर्चीवर बसतात.
तेवढ्यात डॉ. रुद्रा. त्यांच्याजवळ येऊन काहीतरी सांगणार की, डॉ. सी. रामन डॉ. रुद्रावर चिडू लागतात. (सी. रामन खिडकीकडे बघत) “रुद्रा या लॅबमध्ये येऊन तुला किती वर्ष झाली. तुला माहिती होतं ना आपण आपल्या कामाच्या किती जवळ आलो होतो ते. मग इतकी मोठी चूक तुझ्याकडून कशी झाली, तुझा चांगला परफॉर्मन्स बघून मी तुझी या प्रोजेक्टसाठी निवड केली होती. आणि वशिष्ठची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती मग इतकी मोठी चूक कशी झाली? तुला माहिती आहे न त्याचं काय बॅकग्रांउड आहे ते, उद्या त्याला काही झालं किंवा त्याच्यामुळे लोकांना काही झालं तर याला कोण जबाबदार आहे? आणि आपल्या प्रोजेक्टचा काय विचार केला आहेस, याची तुला जबाबदारी दिली हेच चुकलं माझं. वशिष्ठला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव.“
(डॉ. रुद्रा खाली मान घालून) “वशिष्ठला काही होणार नाही सर आणि आपल्या प्रोजेक्टलाही... माझ्यामुळे वशिष्ठ हरवला आहे तेव्हा त्याला आणीनही मीच, तुम्ही काळजी करु नका त्याला काही होणार नाही. येतो.“ (रुद्रा खोलीतून बाहेर जातो).
क्रमश: