शंकर मामा
शंकर मामा


कठीण समय येता कोण कामास येतो? या प्रश्नाचं माझ्यापुरतं उत्तर तरी शंकर मामा हेच आहे. शंकर मामा म्हणजे परोपकाराचे एक टोक. चंदनाप्रमाणे दुसऱ्याला सुगंध देऊन त्यांनी आपले स्वतःचे आयुष्य परोपकाराने उजळून टाकले आहे. शंकर मामा मला आठवतात ते माझ्या इयत्ता पहिलीपासून.आमच्या घराशी त्यांचे घरगुती संबंध होते. डोक्यावर पांढरी टोपी आणि पांढरा शर्ट असा त्यांचा वर्षानुवर्षाचा पोषाख मी पहात आलो आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या चौकात त्यांचे वैभवलक्ष्मी किराणा मालाचे दुकान लागते. शंकर मामा कितीही व्यापारी असले तरी गावातील कोणीही गरजवंताला मदत करण्यासाठी ते तयार असतात.
आमची घरची परिस्थिती हलाखीची होती मला शिक्षण घेत असताना कामही करावे लागायचे. माझे असे कष्ट करणे शंकर मामांना पाहवत नव्हते. कष्ट करतच मी माझे शिक्षण पूर्ण केले. मला आता M.A. करायचे होते. कसाबसा मी कॉलेजला प्रवेश घेतला. सहा महिन्यापर्यंत विशेष काही घडले नाही. सहा महिन्यांनी परीक्षेचा काळ आला लवकरात लवकर फी भरा अशी नोटीस कॉलेजमध्ये लागली. मी पुरता गांगरुन गेलो होतो. माझ्याकडे फी भरायला पुरेसे पैसे नव्हते. घरच्या परिस्थितीत ते शक्यही नव्हते मला. माझे पुढचे कॉलेजचे शिक्षण बंद होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. दोन दिवस मी तसाच शांत बसून राहिलो. शेवटी शंकर मामांकडे जायचे ठरवले. दोन-चार दिवसात मी शंकर मामांकडे गेलो. त्यांना माझी अडचण सांगितली. माझी अडचण कळल्याबरोबर ते म्हणाले, चिंता करू नको मी येतो उद्या तुझ्याबरोबर आणि खरोखर दुसऱ्या दिवशी ते माझ्याबरोबर कॉलेजला आले. माझ्या कॉलेजच्या प्राचार्यांना भेटले. माझी कॉलेजची फी भरली.
शंकर मामा माझ्या आयुष्यात शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या प्रसंगात देवदूताप्रमाणे धावून आले आणि माझी शिक्षणाची अडलेली वाट पुढे बिनधोक चालू राहिली. कठीण समयी केलेले त्यांचे हे सहकार्य माझ्या नेहमी लक्षात राहिले. आजही गावात गेलो की शंकर मामा मला भेटतात. माझी विचारपूस करतात. अशा या शंकर मामांना थँक्स म्हणण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स दैनिकाने मला ही संधी उपलब्ध करून दिली.