Nasa Yeotikar

Drama

2.0  

Nasa Yeotikar

Drama

शिक्षणाची ज्योत

शिक्षणाची ज्योत

8 mins
8.5K


सुरेश जेमतेम १४ वर्षाचा पोरगा. घरात कुणी ही शिकलेले नव्हते त्यामुळे शाळेत कुणी पाऊल ठेवले नाही. म्हणून सुरेश देखील शाळेत गेलाच नाही. त्याला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. गावातील चार-पाच गायी-म्हशी घेऊन तो रोज जंगलात जात असे. त्याबदल्यात त्याला महिन्याकाठी काही रुपये मिळत होते आणि तेच रुपये त्यांच्या कुटुंबाला आधार होत असे. त्याच्या घरात आई-बाबा, दोन भाऊ, दोन बहिणी आणि एक म्हातारी आजी असे आठ जणाचा परिवार होता. घरातील सर्वच जण मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करीत होते. घरात फक्त म्हातारी आजी राहायची जिचा सुरेश वर फार जीव होता.
शिक्षण म्हणजे काय असते त्यांच्या घरात कोणाला माहितच नव्हते. घरातील सर्वच्या सर्व अक्षरशत्रू होते. सुरेशला शाळेत पाठवायाची त्याची बहिण मायाची खुप ईच्छा होती. मात्र घरात तिचे कोण ऐकणार ? तिला थोडी फार शिक्षणाची आवड होती कारण तिची एक मैत्रिण शितल शाळेत शिकत होती आणि अधुन मधून तिची रंगबिरंगी पुस्तके पाहून तिला ही शिक्षणाचा मोह जडला होता. पण तिच्या समोर काही पर्याय नव्हता. कारण तिचा बाप, जो की स्वतः अडाणी तर होताच शिवाय रोज सायंकाळी दारू पिऊनच घरी यायचा. घरच्या लेकरांशी तो कधी दोन शब्द बोलून माहित नाही की प्रेमाने जवळ घेऊन माहित नाही. घरात आपल्या बायकोला तेवढा तो बोलायचा. धिप्पाड शरीरयष्टी आणि नेहमी लाल बूंद डोळे त्यामुळे कोणी मुले त्याच्या जवळ फिरकायाची नाहीत. तो सकाळी घरा बाहेर पडला की सायंकाळीच उशिरा घरी परत यायचा. त्यामुळे बापाची आणि लेकरांची भेट व्हायचीच नाही.
सुरेश बापाला खुप भीत होता त्यामुळे खुले आम त्याला बोलताही येत नव्हते. शाळेत जाण्याची गोष्ट त्याने आपल्या रखमा आजी जवळ बोलून दाखविली आणि बापा कडून परवानगी काढण्याची लाडीगोडी लावली. पेरणीचे दिवस चालू होते, पाऊस एकदा पडून दडून बसला होता. सर्वाना शेतातील पेरलेली बी वाया जाते की काय अशी काळजी वाटू लागली होती. तशी काळजी सुरेशच्या बापाला ही होती. त्याच चिंतेत असताना आजीने हळूच सुरेशच्या शाळेत जाण्याचा विषय काढली.
"अरे, बाब्या, आपला सुऱ्या साळत जातु म्हणतु या, कोणा लेकराले साळा शिकू दिलं नाही, निदान याले तरी शिकू दे की ......"
त्याने रागात एक नजर आईकडे फिरविली आणि जवळ जवळ ओरडलाच
" शिकून काय करणार हाय ? कलेक्टर होणार हाय की डॉक्टर ..? आपल्या बाजुचा राम्या किती शिकला, 15 पुस्तक, आणि आज काय करतो गाव भर नुसता फिरतो कान कापल्या कुत्र्यावाणी. तो श्यामराव पाटील त्यांचा मुलगा किशनराव, मोठ्या शहरात शिकला, आत्ता काय करतो माहित हाय ना. शिकायला किती खर्च येतो माहित हाय काय ? म्हणे शिकू द्या .."
आजी थोडा वेळ गप्प झाली आणि पुन्हा म्हणाली, " अरं तसे नव्ह, शिकून नोकरी लागावी असे काही नाही, शिकल्याने माणूस शहाणा होतो असे लोक म्हणत्यात ..."
यावर तो रागात म्हणाला, " मग मला का शिकवल नाही तू सांग ना...."
अर बाबा तेव्हा साळा नव्हतं की काही नव्हतं कुठून तुला शिकवणार ? जाऊ दिलास तर जाऊ दे त्याला. आत्ता तो दहा वर्षाचा झालाय. शाळेत भी घेतेत की नाही काय माहित."
त्याचा राग शांत झाला होता. त्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दया माया नावाची वस्तू शिल्लक होती. म्हणून मानेने होकार देऊन सुरेश ला शाळेत जाण्याची परवानगी देऊन टाकली.
सूर्य उगवला, सूर्या सोबत सुरेश देखील उठला. आपल्या आजीजवळ गेला, लाडी-गोडीने रात्री काय झाले हे विचारू लागला. "आजी, काय झालं ? बाबा जा म्हणले का शाळेला ? " आजीने सुरेश ची थोडी वेळ मजा घेतली. पण शाळेला जाण्याची परवानागी दिली असल्याच सांगितल्या बरोबर टूणकन उडी मारुन ही गोड बातमी सांगायला आपल्या बहिणीजवळ गेला. ही बातमी ऐकून तिला ही खुप आनंद झाला. तिने लगेच त्याला गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली आणि स्वच्छ कपडे घालून त्याला घेऊन शाळेकडे निघाली. शाळेत सर्वत्र पक्ष्याच्या आवाजाप्रमाणे चिवचिवाट चालू होता. शाळेत गेल्याबरोबर सुरेशला मनातून खुप आनंद होत होता. रोज ईथे खेळायला मिळेल याचा त्याला आनंद वाटत होता. दोन वर्गाची शाळा आणि एकच गुरूजी. शाळेचे सर्व काही साठे गुरुजीं बघत असतात. गुरुजीं फारच शिस्तीचे आणि कडक स्वभावाचे. त्यांना अस्वच्छता अजिबात आवडत नसे. सर्वत्र सुंदर आणि टापटिप असलेले त्यांना आवडत असे. शाळेतील मुले देखील अशीच स्वच्छ आणि टापटिपपणे शाळेत यावी असा त्यांचा अट्टाहास.
शितल सुरेशला घेऊन साठे गुरुजींच्या समोर गेली आणि म्हणाली, " गुरुजीं, माझ्या भावाला शाळेत यायचे आहे, त्याचे नाव टाका" साठे गुरुजींनी एक वार सुरेश कडे पाहिल, लठ्ठच्या लठ्ठ आणि चांगली चार फुट उंच वाढलेला, त्याला पाहून गुरुजीं म्हणाले, "किती वय आहे याच ? "
"मला काही माहित नाही असेल सात आठ वर्षाचा"
"मला वाटत नाही तो सात आठ वर्षाचा तो नक्की दहा वर्षाचा असेल"
"असू द्या की मग टाका याचे नाव तुमच्या शाळेत" 
"नाही जमणार, दहा वर्षाच्या पोराला आम्ही पहिलीमध्ये नाव टाकत नाही. तू त्याला घेऊन जा. एवढं मोठा पोरगा तो, कुणाला मारुन काढला तर काय करावे ? नाही जमणार त्याचे नाव टाकायला, घेऊन जा त्याला."
माया ने खुप विनंती केली पण साठे गुरुजीं काही ऐकले नाही. सुरेशला घेऊन नाईलाजने ती घरी परत आली. शाळेत घडलेली कहाणी आजीला सांगितली. ती पण नाराज झाली. सुरेशचे सांत्वन केल. सायंकाळी बाबा घरी आल्या वर आजीने शाळेतील कहाणी सांगितली तेंव्हा बाबा म्हणाले, " जे झाल ते बर झाल, उद्या लक्ष्मण पाटलाकडे पाठवितो त्याला. गुर राखयाला कोणी पाहिजे म्हणाला होता."
दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा सुरेशला लक्ष्मण पाटलाच्या घरी घेऊन गेला आणि सोबत गुराचा ताबा दिला आणि म्हणाला, " जा घेऊन जंगलात आणि सायंकाळी दिस मावळायला तेंव्हा घेऊन ये"
अशी चार वर्षे उलटली तो गुर राखत होता. पण त्याच्या जीवनात वयाच्या १४ व्या वर्षी नशीब घेऊन आली.
शाळेत बोरे गुरुजीं नावाचे शिक्षक नव्याने दाखल झाले होते. साठे गुरुजींना आता थोडा आधार मिळाला होता. जवळच्या भाटे गावाहुन ते ये जा करू लागले होते. भाटेगांव ते शाळा जेमतेम पाच किमी चा रस्ता. तो ही शेता शेता मधून. म्हणून चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच रस्त्यावर सुरेश गुरे चारत असताना रोज भेटायाचा. रोज त्याच्याशी गप्पा चालायाचे. बोरे गुरुजींला त्याचा स्वभाव खुप आवडला. रोजच्या बोलण्या तून गुरुजींनी त्याची पूर्ण माहिती काढली. सुरेशला शिक्षणाची गोडी आहे हे सुद्धा गुरुजींच्या लक्षात आले. एके दिवशी सुरेशची परीक्षा पाहण्यासाठी गुरुजींने रोजच्या ठिकाणी पाच रूपयाची नोट जमीनीवर ठेवून पुढे जाऊ लागले. दुरवर उभे असलेल्या सुरेशची नजर त्या नोट वर गेली. लगेच तो पळत पुढे आला, ती नोट उचलली आणि गुरुजींना मोठ्याने हाक दिली, " गुरुजीं, थांबा, तुमची ही नोट घेऊन जा" गुरुजी आपल्या जागेवर थांबले. सुरेश धावत येऊन त्यांची नोट त्यांना परत केली. गुरुजींना समाधान वाटले. ते म्हणाले, " सुरेश, तू माझ्या परीक्षेत पास झालास, तुझी परीक्षा पाहण्यासाठी मीच ती नोट तिथे ठेवली होती. बोल तुला बक्शीस मध्ये काय पाहिजे ?" यावर सुरेश थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, " गुरुजी, मला शाळा शिकू द्या, बस्स मला एवढंच पाहिजे "
गुरुजीं त्याच्या बोलण्या ने विचारात पडले आणि हे शक्य नाही असे सांगितले. आता दररोज सुरेश गुरुजीना एकच प्रश्न विचारायचा. त्यांना कळेना की काय करावे. गुरुजींच्या या समस्येची सुटका रात्रीच्या शाळेने केली. शासनाने नुकताच एक आदेश काढला की, गावातील निरक्षर लोकांना शिकविण्यासाठी रात्रीच्या वेळी एक तास शिकवणी घेण्यात यावे. या आदेशामुळे बोरे गुरुजींना खुप आनंद झाला. त्यांच्या मनात आले की यामुळे सुरेशची शिक्षणाची ईच्छा पूर्ण होईल. पण गावात मुक्काम करावा लागणार होता. बोरे गुरुजीं समोर मुख्य समस्या म्हणजे त्यांना स्वयंपाक करता येत नव्हता. त्या दिवशी दोघांची भेट झाली. गुरुजींने सुरेशला रात्रीच्या शाळेची बातमी सांगितली तेव्हा त्याला खुप आनंद झाला. गुरुजींनी लगेच दूसरी बातमी सांगितली की, त्यांना गावात रहावे लागणार आणि स्वयंपाक येत नाही. यावर सुरेश म्हणाला, त्यात काय एवढं, मी देतो ना खायला. गुरुजींना बर वाटल. पण किती दिवस खाणार? चला काही तरी होईल? म्हणून गुरुजीं त्या दिवशी आपल्या घरी गेले. दुसऱ्यां दिवशी सर्व सामानासह निघाले. रस्त्यात सुरेशची भेट झाली. आपल्या साथीदारला गुरे पहायला सांगुन सुरेशने गुरुजीं डोक्यावरील सर्व सामान आपल्या डोक्यावर घेतल आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचविल. आजपासून शिकायला मिळणार या खुशीत सुरेश नाचू लागला. सायंकाळी गुरे घेऊन पाटलाच्या घरी आला आणि लगबगीने आपल्या घरी येऊन तोंड, हात, पाय धुवून लगेच गुरुजींच्या घराकडे पळ काढला. गुरुजी आपले सामान लावण्यात व्यस्त होते. सुरेशने देखील सामान लावण्यात मदत केली. यात सायंकाळचे सात वाजले. गुरुजींना सडकुन भूक लागली होती. सुरेशने मनोमन हे ओळखल आणि धावत घरी आला. आईला गोड बोलून तीन भाकरी, भाजी घेऊन पळाला. दोघांनी मिळून जेवण केले. जेवताना गुरुजी अधुन मधून सुरेशच्या चेहऱ्याकडे पाहत होते. विलक्षण आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. बोलत बोलत जेवण उरकले. आज सुरेशच्या अक्षर लेखानाचा श्रीगणेशा करायचा होता. गुरुजींने आपल्या पिशवीतून खापराची पाटी आणि पेंसिल काढली. सुरेशच्या हातात दिली. आणि त्या रात्री पासून सुरेशच्या शाळेला सुरुवात झाली. सुरेश जंगलात जाताना देखील पाटी-पेंसिल सोबत ठेवू लागला. दुपारच्या वेळी हमखास अक्षरे गिरवु लागला. अगदी थोड्याच दिवसात सुरेश सर्व अक्षरे आणि अंक ओळखू लागला. रात्रीच्या शाळेला इतर ही मुले होती मात्र सुरेशची प्रगती वेगात चालू होती कारण त्याच्या मनात शिकण्याची तीव्र ईच्छा होती. सहा महिन्यात सुरेश चांगल्या प्रकारे वाचू आणि लिहू लागला. गणितामध्ये तर तो खुपच हुशार होता. बोटे मोजुन पटापट गणित सोडवू लागला. त्याची ही प्रगती पाहून गुरुजींनी त्याला चौथीच्या बोर्ड परिक्षेला बसविण्याचा निर्णय घेतला. सुरेशने बोर्डाची परीक्षा दिली. त्याला त्याचा खुप आनंद वाटत होता. दोन महिन्यांनी बोर्डाचा निकाल लागला आणि सुरेश त्यात बढती मध्ये का होईना पास झाला. सुरेशला जेवढा आनंद झाला त्या पेक्षा किती तरी जास्त पटीने गुरुजींना आनंद झाला होता. आत्ता पुढील लक्ष होते सातवी बोर्डाची परीक्षा.
सुरेश मेहनत घ्यायला तयार होता आणि गुरुजी शिकवायला. त्यामुळे काही समस्या नव्हती. एका वर्षात तीन वर्षाचे अभ्यास करून परीक्षा द्यायची होती. जरा अवघड होते मात्र सुरेशने मनावर घेतल होत. मिळेल त्या वेळी पुस्तक वाचून, लिहून तो अभ्यास करू लागला. सातवी बोर्डाची परीक्षा देखील तो चांगल्या गुणाने पास झाला. तेंव्हा त्याने संपूर्ण गावात साखर वाटली. सगळ्यांनी सुरेशच्या अभ्यासाचे कौतुक केल. सातवी पास झाल्या मुळे त्याला आठव्या वर्गात प्रवेश मिळाला पण गावा पासून पाच किमी दूर असलेल्या गावात. कुठे रहावे काय खावे हा प्रश्न सतावित होता. त्याची सोडवणुक गुरुजींनी केली. सुरेश आत्ता गुरुजींच्या घरी राहणार होता आणि त्यांच्याच घरी जेवणार होता. बाबाच्या काना वर ही गोष्ट सांगितली तेंव्हा तो भडकला, गुरे कोण राखणार हा प्रश्न होता. मात्र गुरुजींनी समजावून सांगितले की सुरेशची बुध्दी खुप छान आहे त्याला शिकू द्या.
गुरुजींच बोलणे ऐकून बाबानी त्याला परवानगी दिली. तीन वर्षात चांगला अभ्यास करून तो दहावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये पास झाला. सुरेशचे गुणपत्रक पाहून गुरुजींच्या डोळ्यात अश्रु उभे राहिले. चांगल्या मार्कामुळे सुरेशला डी-एडला सहज प्रवेश मिळाला. दोन वर्षात तो ही अभ्यासक्रम पास झाला.
सुरेश आपल्या गावी परत आला. असेच उन्हाळ्याचे दिवस होते. सर्वत्र उन्हाचा पारा चढला होता. सुरेशचे घर शोधत पोस्टमन घरी आला. त्याच्या हातात कसले तरी पत्र देऊन त्याची सही घेऊन निघुन गेला. त्याने तो लिफाफा फोडला. पत्र वाचताना त्याच्या डोळ्यातुन अश्रू गळू लागले. शेजारी त्याची आजी होती. आजी घाबरून गेली. अरे सुरेश काय झालं ? का रडतो ? वास्तविक ते दुःखाचे नसून सुखाचे अश्रू होते कारण त्याला शाळेत शिक्षक म्हणून नोकरी लागली होती. त्याचा तो आदेश होता.
तो आजीच्या गळ्याला पडून नाचू लागला. आजीला आणि घरातील सर्वाना कळले की सुरेशला गुरुजींची नोकरी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेशने थेट गुरुजींचे घर गाठले. त्यांच्या पाया पडला आणि ते पत्र दाखवले. गुरुजींना देखील अपार आनंद झाला. सुरेशने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल असे त्यांना वाटल. शिक्षणाने लवालेली त्या एका ज्योतींने आज घरातील सर्वच जण सुखा समाधानाने जीवन जगत आहेत. शिक्षण हे जीवन विकासाचे साधन आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama