इंग्रजीची अवास्तव भीती
इंग्रजीची अवास्तव भीती
शाळेतील मुलांना दोन विषयाची खूप भीती वाटते. एक म्हणजे गणित आणि दुसरे म्हणजे इंग्रजी. पालकाना देखील या विषयाच्या बाबतीत काळजी लागलेली असते. कसेही करून या विषयात आपल्या मुलांनी प्रावीण्य मिळवावे, म्हणून जीवाचा आटापिटा करताना पालक दिसून येतात. मुळात या विषयाची एक प्रकारे धसकीच घेतलेली असते. वास्तविक इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. जगातल्या लोकांचा एकमेकाशी संपर्क व्हावा आणि त्यांचा संवाद व्हावा या उद्देश्याने याचा स्विकार केला गेला. तसे इंग्रजीने प्रत्येक देशात शिरकाव केलेला आहे. असे एक ही देश शोधून ही सापडणार नाही जेथे इंग्रजी भाषा बोलली जात नाही. भारतात सुध्दा इंग्रजी ही भाषा बोलली जाते. त्यास तृतीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मातृभाषेला प्रथम तर हिंदी भाषेला द्वितीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. भारत देशात कुठे गेल्यावर संवाद करण्याची समस्या येऊ नये यासाठी मातृभाषेनंतर हिंदी आणि इंग्रजी ही भाषा वापरली जाते. समाजात वावरत असताना बोलण्याच्या बाबतीत समस्या येऊ नये यासाठी भाषेचा वापर केला जातो. सांकेतिक खुणाच्या आधारावर संवादाची प्रक्रिया पूर्ण होणे कठिण आहे. याबाबीचा जर विचार केला तर आपण इंग्रजीला अवास्तव महत्त्व देत नाही काय ? किंवा नको तितकी काळजी करून मनात भीती निर्माण करून घेत नाही काय ? अशी शंका मनात निर्माण होते. आज राज्यातील प्राथमिक शिक्षणाकडे एक वार नजर फिरविली तर लक्षात येते की, आपली मातृभाषा मराठी आणि जेथे मराठीतून अध्यापन केले जाते अश्या शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना भविष्यात इंग्रजी चांगली यावी म्हणून इंग्रजी शाळेत प्रवेश करीत आहेत. 10-15 वर्षापूर्वी फक्त शहरा पुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळेचे पेव ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. खेड्यातील शेती काम करून आपले घर चालविणारे शेतकरी मंडळी आपल्या पोटाला चिमटा देऊन त्या इंग्रजी शाळेत प्रवेश देत आहेत. आपल्या मुलांना कोणत्या शाळेत शिकवावे असा प्रश्न आपल्या समोर पडला असेल आणि त्याच वेळी कुणी तरी सांगतो खुप हुशार आहे मुलगा टाक त्यास इंग्रजी शाळेत. दुसऱ्यांचे ऐकून आणि पाहून ही मंडळी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देतात. दोन-तीन वर्षानंतर डोळे उघडतात आणि त्या मुलांना मराठी माध्यमात प्रवेश देतात. मात्र या परिस्थितीमध्ये मुलांची काय स्थिती होते याचा कोणी ही विचार करीत नाही. पण एकंदरीत इंग्रजी आणि मातृभाषा याचा विचार केल्यास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी कोणत्या भाषेतून शिक्षण घ्यावे? हा मोठा प्रश्न आहे. अनेक विचारवंत आणि तज्ञ मंडळी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, मुलांना आपल्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे. कारण समजणाऱ्या भाषेत घेतलेले ज्ञान लवकर लक्षात येते आणि त्याचे आकलनही होते. याउलट दुसऱ्या भाषेत शिक्षण घेतांना अनेक शब्द ओळखीचे नसतात त्यामुळे भाषा समजणे अवघड जाते तर संवाद करताना देखील अनंत अडचणी येतात.
वास्तविक पाहता विषयाचे ज्ञान एकदा कळाले तर त्याला कोणत्याही भाषेत व्यक्त करता येते. म्हणजेच बुध्दीचा विकास हे खुप महत्वाचे आहे आणि ते मातृभाषेतून शक्य आहे. इंग्रजी भाषेतून शिक्षण म्हणजे सर्कसमधील रिंगमास्टर ज्याप्रकारे प्राण्याला धडे शिकवितो अगदी त्याच प्रकारे ही मुले वागतात. स्वतःचे डोके किंवा कल्पकता याचा वापर करीत नाहीत. ही मुले हुशार असतीलही परंतु जी नवनिर्मिती करायला हवी, ती करत नाहीत. म्हणजे त्यांचे ज्ञान फक्त परिक्षेपुरते मर्यादित असते. कोणत्या भागाला किती गुण आहेत? यावर त्यांचा अभ्यास चालत असतो; तेंव्हा भविष्यात ही मुले यशस्वी होतील असे वाटते काय? संस्कार नावाची वस्तू शालेय शिक्षणातून मिळावी अशी अपेक्षा ठेवणे रास्त आहे. पूर्वीच्या शिक्षणातून तसे संस्कार जाणीवपूर्वक होत असत मग आज समाजातील नैतिकता रसातळाला का गेली आहे? आजची संस्कृती कुठे चालली आहे? याचे उत्तर कोठे मिळेल. अर्थातच आजच्या शिक्षण पध्दतीकडे पाहिल्यावर तेथेच याचे उत्तर मिळते. पूर्वीसारखे शिक्षण आणि पूर्वीसारख्या पध्दती आज आस्तित्वात नाहीत. शिक्षणाचे झालेले बाजारीकरण हे ही एक कारण असू शकते. मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी थोडे तरी त्यांच्यावर संस्कार केलेले दिसून येतील मात्र इंग्रजी भाषेत शिकणारी मुले त्यांना संस्कृतीची ओळख होत नाही. त्यांच्यावर वेगळ्याप्रकारचे संस्कार टाकले जातात हे ही एक महत्वाची बाब आहे. परंतु आजपर्यंत या बाबीकडे कुणी गंभीर्याने पाहिले नाही. जे आपल्या मराठी शाळेत चालते ते त्या शाळेत चालत नाही. अश्या फार कमी शाळा आहेत जेथे आपल्या संस्कृती नुसार शिक्षण दिल्या जाते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणची भाषा आहे हे मान्य परंतु त्या अगोदर आपल्या समाजात आपल्या लोकांशी जो व्यवहार करायचे आहे ते आपल्याच भाषेत करावे लागेल हे मात्र खरे आहे. घरात मुलाने काही प्रश्न विचारले तर आपणास त्याचे उत्तर देता येत नाही. उद्या तुझ्या गुरुजींना विचार असे आपले उत्तर असते. त्यासाठी इंग्रजी भाषेचे जे अवास्तव महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि त्याची भीती देखील त्याविषयी पालकानी जागरूक होऊन विचार करणे आवश्यक आहे, असे वाटते.