चुका आणि शिका
चुका आणि शिका
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परिक्षेमध्ये जास्तीत जास्त वेळा अपयश दिसून येते. ज्यानी वर्षभर अभ्यास केले त्यांना यश मिळणारच यात शंका नाही. मात्र आपण कुठे तरी चुका करतो ज्यामुळे परीक्षेत यश मिळत नाही. त्यामुळे खचून न जाता आपले काय चुकले याचा शोध लाऊन जे चुकांमध्ये सुधारणा करतात ते जीवनात यशस्वी होतात. त्यासाठी चुकांमधून काही तरी शिकण्याची तयारी असणे आवश्यक आहे. आपल्याकडे असे बोलले जाते की, जो चुकतो तो काही ना काही शिकतो, जो चुकतच नाही तो काही करतच नाही आणि जीवनात काही शिकतपण नाही. जो स्वस्थ बसून राहतो तो मुळात काही करत नाही त्यामुळे चुकण्याचा प्रश्न नाही, मात्र त्याचसोबत प्रगती देखील होत नाही. पण आपण असे समज करून घेतो की, जेथे माझे हात लागतील तेथे यश मिळालेच पाहिजे. त्याठिकाणी अपयश मिळाले की आपण नाराज होतो, उदास होतो आणि काहीजण तर फार कठोर पाऊल उचलून आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. काल परवा या संदर्भात एक बातमी वाचण्यास मिळाली की, परीक्षेत नापास झाल्याने एका मुलीने आत्महत्या केली. यावर पालकानी विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. पालक मुलांवर अपेक्षेचे ओझे ठेवतात आणि मुलांकडून ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर ती मुले निरुत्साही होतात आणि असे कठोर पाऊल उचलतात.
केलेल्या कामात यश मिळाले नाही तर त्यात इतके वाइट वाटून घेण्यात काही अर्थ नसतो. पण जेंव्हा स्वतः च्या इज्जती चा प्रश्न मनात निर्माण होतो तेंव्हा त्यांचे मन कुठे तरी दुखावले जाते. म्हणून इतर लोकांच्या मनाचा विचार न करता, आपले जीवन कसे सुंदर करता येईल? याचा फक्
त विचार करावा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असे नाही त्यामुळे चुका झाल्या तरी चालेल पण त्याच चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घेणारा व्यक्ती यशस्वी होऊ शकतो.
बरेच पालक मुलांच्या चुकांवर त्यांना एवढे बोलतात की पुढे भविष्यात काही करताना; करू की नको अश्या परिस्थिती मधे मुलें असतात. चुकांवर वारंवार बोट ठेवल्यास, प्रयत्न करणारे देखील प्रयत्न करणे सोडून देतात. वास्तविक पाहता मुलांच्या चुका प्रेमाने दाखविल्या तर त्यांच्यात सुधारणा होऊ शकेल. शाळेतील मुले वाचन आणि लेखन करताना असंख्य चुका करतात, त्यावेळी शिक्षकांनी मुलांना चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले तर मुलांची प्रगती होते. जर मुलांच्या चुकांकडे कानाडोळा केल्यास तीच चूक वारंवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून चुकांकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही. परीक्षेत खूप मार्क मिळावे म्हणून जो अभ्यास करतो तो जीवनातील परीक्षेत मार्क मिळवू शकत नाही. त्यामुळे पुस्तकाच्या ज्ञानातून जीवन जगण्याचे ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी मन लावून अभ्यास करणे हेच आपल्या हाती आहे. फळाची अपेक्षा न करता अविरत कार्य करणारे कधी ही असफल होत नाहीत. कुठे न कुठे काही अंशी तरी यश मिळत राहते आणि तेच यश त्यांना बळ देते. आपल्या चुकांविषयी मनात नैराश्य येवू देवू नये. यदा कदाचित नैराश्य आले तर आपल्या आवडत्या कामात आपले मन रमवावे, मित्रां सोबत काही वेळ घालावावे, एकटे राहू नये म्हणजे दुसरे कोणते विचार मनात येणार नाही. आपले जीवन अनमोल तर आहे शिवाय सुंदर देखील आहे.