शहाणी मुलं
शहाणी मुलं


आज रविवार. पहिलीत शिकणारी पोरं शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळत होती. राजू, बंटी, शाम, आतिफ. सगळेच होते. बंटी बॅटिंग करत होता. गोलूने फेकलेल्या एका चेंडूला त्याने जोरदार फटका मारला. बॉल उडून शाळेच्या कंपाऊंड बाहेरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जाऊन पडला. शाम बॉल आणायला गेला. बराच वेळ झाला तरी शाम आला नाही म्हणून सगळेच बॉल शोधण्यासाठी शाळेच्या कंपाऊंड बाहेर आले. बघतात तर काय तिथे पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरचे काही कागद शाम जमा करत होता. ते बघून सगळ्यांनाच हसायला आले. "काय करायला रे शाम?" राजू ओरडला. आणि मुले पुढे गेली. शाम जवळ जाताच सगळीच मुलं थबकली. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसली. बंटीने तर कचऱ्यातच डोके टेकवले.
"अरे, हे तर आपले शिवाजी महाराज." आतिफने एक कागद उचलला आणि डोक्यावर घेतला. उन्हाळ्यात झालेल्या लग्नांच्या लग्नपत्रिका होत्या त्या. कव्हर वर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा थोर महापुरुषांच्या प्रतिमा छापलेल्या होत्या. काही पत्रिकांवर महादेव, गणपती, श्रीकृष्ण इत्यादी देवी देवतांचे फोटो छापलेले.
मुलांनी सगळ्या पत्रिका उचलल्या. प्रत्येकाने दोन-तीन पत्रिका घेतल्या. आणि त्यावरचे फोटो डोक्यावर घेतले. त्यांचा क्रिकेट चा खेळ बाजूलाच राहीला. चिमुरडी मुलं काहीतरी वेगळेच करत होती.
'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय', 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जय', 'गणपती बाप्पा मोरया' अशा सर्व प्रकारच्या घोषणा देत, डोक्यावर महापुरुषांच्या प्रतिमा आणि तोंडाने त्यांच्या नावाचा जयजयकार करत पोरांची मिरवणूक गावाच्या दिशेने निघाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या मंडळींना लक्षात येत नव्हते ही पाच सहा वर्षांची कार्टी काय करत आहेत ते. ते नुसतेच बघत राहिले. काहींनी मुलांना डिवचले, काहीजण या मुलांना हसले. पण काही जणांच्या माना मात्र झुकलेल्या होत्या.
ही मिरवणूक गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिराच्या पायाजवळ पोहोचली. तिथे बसलेल्या एका जाणत्या माणसाने मुलांना थांबवले. पाच सात मुलांनी काढलेली ही शोभायात्रा बघत पन्नास साठ माणसे तिथे उभी होती. जाणत्या माणसाने मुलांना जवळ बोलावले. आणि तो बघ्यांच्या गर्दीला उद्देशून बोलला, "काही कळतंय का लेकरांच्या वागण्यातून? ज्या महापुरूषांना डोक्यावर घ्यायचे त्यांचा इथे तिथे टाकून अपमान करतोय आपण. थोर पुरूषांच्या प्रतिमा लग्नपत्रिकांवर छापल्याच पाहिजेत. पण त्यांचा अवमान होणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे."
सर्व माणसे मान खाली घालून ऐकत होती. जाणता माणूस क्षणभर थांबला. मुलांकडे वळून म्हणाला, "बाळांनो, तुम्ही या पत्रिका सन्मानाने आणल्यात खऱ्या, पण आता यांचे काय करणार आहात?"
मुलांनी क्षणभरही विचार केला नाही. शाम म्हणाला, "थांबा सांगतो!" आणि तो धावतच घरी गेला. सोबत बंटी आणि राजूही गेला. सर्वांनी आपापल्या वह्या आणल्या. बंटीने गोंद आणि शामने कात्री आणली. मंदिराच्या पारावर बसूनच त्यांची कलाकुसर सुरू झाली. त्यांनी पत्रिकांवरील महापुरुषांचे फोटो व्यवस्थित कट करून घेतले. त्यांना गोंद लावला आणि आपापल्या वह्यांमध्ये व्यवस्थित चिकटवून घेतले. सगळ्याच मुलांनी महापुरुषांच्या प्रतिमांचा सुंदर संग्रह तयार केलेला होता. मुलांची ही कृती पाहून गावकऱ्यांचे चेहरे अभिमानाने फुलून गेले. सर्वांनीच लेकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. खूप वेळेपर्यंत गावात टाळ्यांचा कडकडाट घुमत राहिला.