"राजूचा राग "
"राजूचा राग "
राजूला आज शाळेत जायचे नव्हते. झोपेतून उठल्यापासूनच त्याची किरकिर सुरू झाली होती. निमित्त होते नागपंचमीचे. सण होता पण शाळेला सुट्टी नव्हती. घरीच राहून मित्रांसोबत मस्तपैकी झोके खेळत हुंदडायचे असा त्याचा बेत होता. पण आई ऐकायला तयार नव्हती. "शाळेत जा" असा तिचा हट्ट. मग काय झाली सुरू आदळआपट.
राजूचा ब्रश करून झाल्यानंतर आईने दुधाचा ग्लास त्याच्यापुढे ठेवला. बाळराजांचा संताप टिपेला पोचलेला होता. ग्लासला एक हात मारला. दुधाचा पूर्ण भरलेला ग्लास पालथा. आता आईही चिडली. ''तेवढेच होते दूध. आता कुठून आणू?'' ती ओरडली. राजू उठून टीव्ही च्या खोलीत गेला. आई त्याचा डबा बनवू लागली. ''अंघोळीचं पाणी तापेपर्यंत टीव्ही बघ हवा तर.'' राजूचा पारा उतरावा म्हणून आई म्हणाली. पण परिणाम उलटाच झाला. ''मला नाही बघायचा.'' असं ओरडून राजूने रिमोट भिरकावला. छत्तीस तुकडे झाले रिमोटचे. खरे तर राजूचा हा असा राग नेहमीचाच होता. आईबाबा खूप समजावयाचे. पण ऐकेल तो राजू कसला. आईने आज कसाबसा शाळेला पाठवलाच.
त्याचे बाबा आज जरा लवकरच कामावरून परतले. ते येताच आईने राजूबद्दल त्यांना सांगितले. त्यांनी खूप शांतपणे सगळे ऐकून घेतले. शाळा सुटल्यावर राजू घरी आला. अगदी हसतच. खूप खूश दिसत होता. धावतच बाबांकडे गेला. "बाबा, शाळेत आज चित्रकला स्पर्धा झाली. मी काढलेल्या झोक्याच्या चित्राला फर्स्ट प्राईज मिळालं. मला हा कलरसेट बक्षीस मिळाला." राजूने सांगताच बाबांनी त्याला जवळ घेतले. मिठी मारली. कौतुक केले. "वा! व्हेरी गुड. पण तुम्हाला तर आज शाळेत जायचे नव्हते ना?" राजू काहीच बोलला नाही.
"बघ बेटा, रागामुळे आज तुझं किती मोठं नुकसान झालं असतं. तू शाळेत गेला नसता, चित्र काढता आलं नसतं अन् बक्षीसही मिळालं नसतं." राजू मान खाली घालून ऐकतोय हे पाहून बाबा आणखी समजावू लागले, "रागाच्या भरात तू सकाळी दूध सांडलेस. सांग बरं कुणाचं नुकसान झालं? तुझंच ना? रिमोट तोडलंस. आता टीव्ही कुणाला बघायला मिळणार नाही? तुलाच ना? थोड्या वेळासाठी आपल्याला राग येतो आणि आपणच आपलं मोठं नुकसान करून घेतो. हो की नाही? म्हणून विनाकारण राग-राग करू नये. डोकं शांत ठेवावं आणि मोठी माणसं काय सांगतात ते ऐकावं! कळलं का?"
बाबांचे बोलणे राजूने खूपच लक्षपूर्वक ऐकले. सगळं लक्षात ठेवून म्हणाला, "बाबा, मी आता रागावणार नाही!" आणि राजू गोड हसला. बाबांनी त्याला घट्ट मिठी मारली.