गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
भगवान शिवशंकर पृथ्वीप्रदक्षिणेसाठी गेलेले होते. माता पार्वती एकटीच. मग वेळ घालवण्यासाठी म्हणून पार्वती कधी शिवाचे ध्यान करायची, कधी सारीपाट खेळायची, कधी मातीचे बाहुले तयार करायची.
असेच एकदा सकाळी स्नान करताना पार्वती अंग घासू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की आपल्या अंगाचा खूप मळ निघतोय. मग तिने तो निघालेला मळ बाथरूमच्या एका कोपऱ्यात जमा करून ठेवला. पार्वतीचे बाथरूम जणू एसी प्रयोगशाळाच. बाहेर हिमाच्छादित हिमालय. तरी आत उबदार. आता दररोजच असा अंगावरचा मळ घासून काढण्याचा छंदच तिला लागला. हा केवळ तिचा मळ नव्हता तर खूप घासल्याने तिच्या रक्ताचा आणि त्वचेचाही काही भाग त्यात आला होता. त्यात पार्वतीच्या डीएनए चे अंश होते.
एके दिवशी तिने जमा झालेल्या मळाचा एक सुंदर असा बाहुला तयार केला. ती दररोज त्या बाहुल्याशी बोलायची, खेळायची, त्याला घेऊन फिरायची. अकस्मात एके दिनी त्या बाहूल्याने हालचाल केली. आजच्या युगात ज्याला क्लोन तंत्र म्हटले जाते. त्या तंत्राचा आविष्कार त्या काळी पार्वतीने करून एका बालकाला जन्म दिला. ते बालक म्हणजे श्रीगणेश.
एकदा श्रीगणेशाला दाराशी बसवून पार्वती घरात अंघोळीला गेली. अन् सृष्टीच्या दौऱ्यावर गेलेले महादेव परत आले. आपल्या महालाच्या दाराशी बसलेला बालक बघून ते चकित झाले. महालात जाण्याचा प्रयत्न करताना त्या बालकाने अडवल्यावर तर शिवशंभूंना धक्काच बसला. ते संतापले. त्रिशूळाचा एकच वार केला अन् बालकाचे मस्तक उडवले. त्या बाळाची करूण किंकाळी ऐकून पार्वती धावतच बाहेर आली. समोरचा प्रकार बघून तिने टाहो फोडला. "माझ्या लेकराचा तुम्ही जीव घेतलात!" असे म्हणत महादेवाच्या छातीवर डोके आदळू लागली.
रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा शंकरांना पश्चाताप झाला. त्यांनी त्यावेळचे एम. डी., एम. एस. असणारे डॉक्टर अश्विनीकुमारांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी सांगितले "चोवीस तासांच्या आत हेड ट्रांसप्लांट सर्जरी करावी लागेल." म्हणजे या धडावर दुसरे जिवंत डोके जोडावे लागेल. आणि शोध सुरू झाला. सर्वात प्रथम जो प्राणी मिळेल त्याचे डोके त्या बाळाच्या धडावर जोडायचे. एक हत्तीचे पिल्लू भेटले. त्याचे मस्तक कापून आणले गेले. आजकाल हृदय, फुफ्फुस, किडनी ट्रांसप्लांट च्या जशा शस्त्रक्रिया केल्या जातात तशी अतिशय कौशल्यपूणर्ण शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या धडावर हत्तीचे डोके बसवले गेले. आणि श्री गजानन-गणपतींचा पुनर्जन्म झाला. श्रीगणेशांच्या या जन्मकथेत डीएनए पासून क्लोन जीव आणि अवयव प्रत्यारोपण या दोन आधुनिक वैद्यक क्षेत्रातील क्रांतिकारक संशोधनाचे मूळ सापडते. विज्ञान सर्वत्र आहे. फक्त त्याचा शोध घेत राहीले पाहिजे.