marathi katha

Classics

1.0  

marathi katha

Classics

शबरी

शबरी

21 mins
13K


थोर ऋषींपैकी मतंग ऋषी हे एक होते. पंपासरोवराच्याजवळ त्यांचा आश्रम होता. आजूबाजूला रमणीय व विशाल वनराजी होती. मतंग ऋषींची पत्नी ही अत्यंत साध्वी व पतिपरायण होती. आश्रमाच्या आसमंतातले वातावरण अतिशय प्रसन्न व पावन असे ती ठेवीत असे. आश्रमात हरिणमयूरादी सुंदर पशुपक्षी पाळलेले होते. सकाळच्या वेळी पाखरांना अंगणात नीवार धान्य टाकताना व हरणांना हिरवा चारा घालताना ऋषिपत्नीस मोठा आनंद होत असे, कारण तीच तिची लडिवाळ मुलेबाळे होती.

मतंग ऋषी फार थोर मनाचे होते. प्रातःकाळी नदीवर स्नान करुन नंतर ते संध्या, ईश्वरपूजा व ध्यानधारणा करीत. तदनंतर आश्रमाच्या भोवती जे कोणी रहिवाशी येतील, त्यांना खुणांनी मोडक्या तोडक्या भाषेत सुरेख गोष्टी सांगत. हळूहळू ते त्यांची भाषा शिकू लागले आणि आपले उन्नत व उदात्त विचार त्यांना सांगू लागले. जरी त्या रानटी लोकांना प्रथम प्रथम विशेष समजत नसे, तरी त्या पावन वातावरणाचा, ऋषींच्या व्यक्त्तिमाहात्म्याचा त्यांच्या मनावर संस्कार झाल्याशिवाय राहत नसे. पावित्र्य हे न बोलता बोलते, न शिकविता शिकविते. दिव्याची ज्योत निःस्तब्धपणे अंधार हरण करीत असते. थोर लोकांचे नामोच्चारणही जर मनास उन्नत करते, तर त्यांचे प्रत्यक्ष दर्शन किती प्रभावशाली असेल बरे!

मतंग ऋषींच्या आश्रमापासून काही कोसांच्या अंतरावर एका भिल्ल राजाचे राज्य होते. राज्य लहानसेच होते. भिल्लांचा राजा जरी रानटी होता, तरी तोही ऋषींच्या आचरणाने व उपदेशाने थोडा सुधारला होता. या भिल्ल राजास एक पाचसहा वर्षांची मुलगी होती. मुलगी काळीसावळीच होती; पण तिचा चेहरा तरतरीत होता. रानातील हरिणीच्या डोळ्यांसारखेच तिचे डोळे खेळकर व पाणीदार असून ती हरिणीप्रमाणेच चपळही होती. घरात बसून राहणे तिला कधीच आवडत नसे; घडीची म्हणून तिला उसंत माहीत नसे. भिल्ल राजाचीच ती मुलगी. लहानपणी तीही लहानसे धनुष्य घेऊन हरणांच्या पाठीमागे लागे. आपल्या मुलीचे कोडकौतुक राजा-राणी कितीतरी करीत. मनुष्य रानटी असो वा सुधारलेला असो; मनुष्यस्वभाव हा सर्वत्र सारखाच आहे. रानटी मनुष्यालाही प्रेम समजते, त्याला मुलेबाळे आवडतात. रानटी मनुष्यही आनंदाने हसतो व दुःखाने रडतो.

आईबापांच्या प्रेमळ सहवासात लहानगी शबरी वाढत होती. एक दिवस भिल्ल राजा आपल्या राणीला म्हणाला, "आपल्या या मुलीला मतंग ऋषींच्या आश्रमात ठेवले तर? मी याविषयी त्यांना विचारले, तेव्हा त्यांच्या पत्नीने मोठ्या आनंदाने संमती दिली. ऋषिपत्नीलाही मूलबाळ नाही. ऋषिपत्नी मला म्हणाली, 'खरंच, तुमची मुलगी आश्रमात ठेवा; मी तिला शिकवीनसवरीन; पोटच्या मुलीप्रमाणे तिच्यावर प्रेम करीन.' मग बोल, तुझे म्हणणे काय आहे ते. मुलीस तिथे पाठविण्यास तुझी संमती आहे ना? ती तुझ्यासारखीच अडाणी राहावी, असे तुला वाटते का?"

राणी म्हणाली, "मी आपल्या इच्छेविरुद्ध नाही. मनाला कसेसेच वाटते हे खरे; तरी पण मुलीचे कल्याण होईल, तेच केले पाहिजे. आपल्या लहानपणी आपणांस नाही असे ऋषी भेटले; परंतु आपल्या मुलीच्या भाग्याने भेटले आहेत, तर ती तरी चांगली होवो."

उभयता मातापितरांनी मुलीला आश्रमात पाठविण्याचा निश्चय केला. शुभ दिवशी त्या भिल्ल राजाने शबरीस बरोबर घेतले, तिला पालखीत बसविले आणि मतंग ऋषींच्या आश्रमात आणून सोडिले. कन्येस ऋषींच्या स्वाधीन करुन राजा म्हणाला, "महाराज, ही माझी मुलगी आपल्या स्वाधीन करीत आहे. ही सर्वस्वी आपलीच समजा व तिला नीट वळण लावा."

ऋषिपत्नी म्हणाली, "राजा, निश्चिंत ऐस. ही माझीच मुलगी मी समजेन. मी तिला मजजवळ घेऊन निजेन, तिची वेणीफणी करीन. ती येथील हरिणांमोरांबरोबर खेळेल-खिदळेल व त्यांच्याजवळ शिकेल. काही काळजी करु नकोस बरं!"

राजाने मुलीसाठी तांबड्या रंगाची वल्कले केली होती, ती तिला दिली. मुलीला पोटाशी धरुन नंतर राजा निघून गेला.

शबरी आश्रमात वाढू लागली. ऋषिपत्नी तिचे कितीतरी कोडकौतुक करी. आश्रमात गाई होत्या. गाईंच्या वासरांबरोबर शबरी खेळे, उड्या मारी. तिने गाईंना नदीवर न्यावे, त्यांस पाणी पाजावे. गाईचे धारोष्ण दूध शबरीला फार आवडे. प्राचीन कालीन आर्यांचे गाय हेच धन असे. 'गोधन' हा शब्द प्रसिद्ध आहे.

शबरी सकाळी लवकर उठे. ऋषिपत्नीने तिचे दात आधी नीट घासावेत, मग तिची वेणीफणी करावी. शबरीचे केस नीट विंचरुन कोणीही आजपर्यंत बांधले नव्हते. ऋषिपत्नी शबरीच्या केसांत सुंदर फुले घाली. शबरी म्हणजे राणीच शोभे. मग शबरीने स्नान करावे, देवपूजेसाठी सुरेख फुले गोळा करुन आणावीत. दूर्वांकुरांनी गुंफून तिने हार करावेत व आश्रमाच्या दारांवर त्यांची तोरणे करुन लावावीत.

ऋषींची पूजा वगैरे झाली म्हणजे शबरीला जवळ घेऊन ते तिला सुंदर स्तोत्रे शिकवीत, सूर्याच्या उपासनेचे मंत्र अर्थासह तिला म्हणावयास सांगत. उषादेवीची सुंदर गाणी ते तिजकडून म्हणवीत. उषादेवीचे एक गाणे मतंग ऋषींना फार आवड. त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे होता- 'ती पहा, अमृताची जणू काय ध्वजाच, अमर जीवनाची जणू पताकाच अशी उषा येत आहे. ही उषा लवकर उठणाऱ्याला संपत्ती देते. ही आकाशदेवतेची मुलगी आहे. सुंदर दवबिंदूंचे हार घालून आपल्या झगझगीत रथात बसून ती येते. ती आपल्या भक्तांना काही उणे पडू देत नाही. ही उषादेवी किती सुंदर, पवित्र व धन्यतम अशी आहे!'

अशा प्रकारच्या गोड कविता शबरीला मतंग ऋषी शिकवीत असत. ऋषींच्या तोंडून त्या सुंदर कवितांचे विवरण ऐकताना लहानग्या शबरीचेही हृदय भरुन येई.

एक दिवस रात्रीची वेळ झाली होती. मतंग ऋषींची सायंसंध्या केव्हाच आटपली होती. गाईगुरे बांधली होती. हरिणपाडसे शिंगे अंगात खुपसून निजली होती. ऋषी व त्यांची पत्नी बाहेर अंगणात बसली होती. फलाहार झाला होता. नभोमंडलात दंडकारण्याची शोभा पाहण्यासाठी एकेक तारका येत होती.

शबरी आकाशाकडे पाहून म्हणाली, "तात, हे तारे कोठून येतात? काय करतात? रोज रोज आकाशात येण्याचा व थंडीत कुडकुडण्याचा त्यांना त्रास नसेल का होत?"

ऋषी म्हणाले, "बाळ, तू अजून लहान आहेस. मनुष्य कसा वागतो, शबरी कशी वागते, हे सारे पाहण्यासाठी हे वरुणदेवाचे हेर आहेत, हे तारे वरुणदेवतेचे दूत आहेत. डोळ्यांत तेल घालून मनुष्याची कृत्ये ते पाहत असतात व माणसांची वाईट कृत्ये पाहून ते तारे रडतात. त्यांचे जे अश्रू त्यांनाच तू दवबिंदू म्हणतेस. झाडामाडांच्या पानांवर ते दवबिंदू टपटप पडताना तू नाही का ऐकलेस? सकाळी पानांफुलांवर, दूर्वांकुरांवर ते अश्रू कसे मोत्यांसारखे चमकतात!"

शबरी म्हणाली, "तात, मी आज त्या हरिणपाडसास बाणाने टोचले, ते त्यांना दिसले असेल का?"

ऋषी म्हणाले, "होय. दिवसा लोकांकडे लक्ष ठेवण्याचे काम सूर्य करतो; रात्री ते काम चंद्र व तारे करतात."

शबरीचे ते प्रेमळ व निष्कपट डोळे पाण्याने डबडबून आले व ती म्हणाली, "तात, मघा त्या मोराच्या पिसाऱ्यातील पीस उपटण्यास मी गेले, ते पाहून तारे आज रडतील का? मोर कसा निजला होता!"

ऋषी म्हणाले, "होय. परंतु हे काय? वत्से शबरी, अशी रडू नकोस. पूस, डोळे पूस आधी. तू त्या ताऱ्यांची प्रार्थना कर व म्हण, आजपासून हरणांना, मोरांना मी दुखविणार नाही."

शबरीने हात जोडले व आकाशाकडे तोंड करुन ती म्हणाली, "हे देवदूतांनो, हे तारकांनो, या मुलीला क्षमा करा. माझ्यासाठी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी आजपासून बाणाच्या टोकाने हरणांस टोचणार नाही, पक्ष्यांची पिसे उपटणार नाही. मला क्षमा करा."

ऋषीने शबरीचे वात्सल्याने अवघ्राण केले. व ऋषिपत्नीने तिला प्रेमभराने हृदयाशी धरिले.

ऋषिपत्नी म्हणाली, "शबरी, तू फार गुणी आहेस."

शबरीच्या गंगायमुना थांबल्या व ऋषिपत्नीच्या मांडीवर डोके ठेवून ती झोपी गेली.

शबरी हळूहळू वयाने वाढत होती, मनाने वाढत होती. सत्य, दया, परोपकार यांचे ती धडे घेत होती. तिचे मन आता फुलासारखे हळुवार झाले होते. झाडांच्या फांदीलासुद्धा धक्का लावताना तिला आता वाईट वाटे.

एक दिवस मतंग ऋषी तिला म्हणाले, "शबरी, परमेश्वरास वाहण्यासाठी दोनचार फुले फार तर आणावीत. फुले हे वृक्षांचे सौंदर्य आहे. वृक्षांचे सौंदर्य आपण नष्ट करु नये. फूल घरी आणले तर किती लवकर कोमेजते; परंतु झाडावर ते बराच वेळ टवटवीत दिसते. आपण त्या फुलाला त्याच्या आईच्या मांडीवरुन ओढून लवकर मारतो. सकाळच्या वेळी फुलांचे हृदय, शबरी, भीतीने कापत असते. आपली मान मुरगळण्यास कोण खाटीक येतो, इकडे त्यांचे लक्ष असते. शबरी, आपण दुष्ट आहोत. मनुष्यप्राण्याला आपल्या प्रियजनांच्या संगतीत मरणे आवडते; या फुलांनाही तसेच नसेल का वाटत? शबरी, हे फूल तुझ्यासारखेच आहे. तेही हसते व कोमजते; त्यालाही जीव आहे. झाडामांडाकडे, फुलपाखरांकडे सुद्धा प्रेमाने पाहावयास शिकणे म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणे होय."

शबरी म्हणाली, "तात, लहानपणी मी तर शिकार करीत असे! माझे बाबा हरणे मारुन आणीत; शेळ्या, मेंढ्या आमच्याकडे मारल्या जायच्या."

ऋषी म्हणाले, "शबरी, ते तू आता विसरुन जा. आता निराळे आचरण ठेवावयास तू शिक. उगीच कोणाला दुखवू नकोस, कोणाची हिंसा करु नकोस. शेतीभाती करावी, वृक्षांची फळे खावीत, कंदमुळे भक्षावीत, अशी राहणी चांगली नाही का? शबरी, तुला चिमटा घेतला तर कसे वाटेल?"

इतक्यात ऋषिपत्नी बाहेर आली व म्हणाली, "मी तुम्हाला सांगू का कालची गंमत? त्या अशोकाच्या झाडावरील फुलांचा तुरा तोडून घेण्याची शबरीला अतिशय इच्छा झाली होती. तिने तीनतीनदा हात पुढे करावेत व आखडते घ्यावेत. शेवटी तिच्या डोळ्यांत पाणी आले व तिने त्या फुलांना चुंबून त्यांच्याकडे कारुण्याने पाहिले आणि ती निघून गेली. शबरी, मी सारे पाहत होते बरं का!" शबरी लाजली व ऋषीला कृतार्थता वाटली. हे रानफूल सात्त्विक सौंदर्याने, गुणगंधाने नटताना पाहून त्याला का धन्य वाटणार नाही? शबरी आता वयात आली, ती यौवनपूर्ण झाली. एक दिवस मतंग ऋषी तिला म्हणाले, "शबरी, तू शिकली सावरलीस, सद्गुणी झालीस. आता तू मोठी झाली आहेस. घरी जा. ब्रह्मचर्याश्रम सोडून गृहस्थाश्रमात तू आता प्रवेश कर; विवाह करुन सुखाने नांद." शबरी म्हणाली, "तात, मला हे पाय सोडून दूर जाववत नाही; मी इथेच तुमची सेवा करुन राहीन." त्या वेळेस ऋषी आणखी काही बोलले नाहीत. त्यांनी परभारे भिल्ल राजाला निरोप पाठविला, 'तुझी मुलगी आता उपवर झाली आहे; तरी तिला घेऊन घरी जा व तिचा विवाह कर.' निरोपाप्रमाणे राजाने दुसऱ्या एका भिल्ल राजाच्या मुलाची वर म्हणून योजना केली व शबरीला नेण्यासाठी तो आश्रमात आला. ऋषीने राजाचे स्वागत केले व त्याला फलाहार दिला. शबरीला पित्याच्या स्वाधीन करताना त्याने तिला शेवटचा उपदेश केला- "शबरी, सुखाने नांद प्राणिमात्रांवर प्रेम कर. सत्याने वाग. रवी, शशी, तारे आपल्या वर्तनाकडे पाहत आहेत, हे लक्षात धर. वत्से, जा. देव तुझे मंगल करो व तुला सत्पथावर ठेवो!" शबरी सद्गदित झाली होती. ऋषिपत्नीने तिला पोटाशी धरिले व म्हटले, "बाळे शबरी, अधूनमधून येत जा हो आश्रमात. आम्हाला आता हे घर खायला येईल. चुकल्याचुकल्यासारखे होईल. पूस हो डोळे. जाताना डोळ्यास अश्रू आणू नयेत. आता तुझा विवाह होईल. पती हाच देव मान. नीट जपून पावले टाक. तू शहाणी आहेस." मोठ्या कष्टाने शबरी निघाली. ऋषी व ऋषिपत्नी काही अंतरापर्यंत, गोदेच्या प्रवाहापर्यंत पोचवीत गेली. एक हरिणशावक शबरीने बरोबर नेलेच. शबरी गेली व जड पावलाने ऋषी व ऋषिपत्नी आश्रमात परत आली. त्या दिवशी त्यांस चैन पडले नाही. शबरीची पदोपदी त्यांना आठवण येई. आज दहा वर्षांनी शबरी राजवाड्यात परत आली होती. ती गेली त्या वेळी लहान होती, आज ती नवयौवनसंपन्न झाली होती. गेली तेव्हा अविकसित मनाने गेली; आज विकसित मनाने- सत्य, दया, हिंसा, परोपकार, प्रेम इत्यादी सद्गुणांनी फुललेल्या मनाने ती आली होती. शबरी लगेच आईला भेटली. सर्वांना आनंद झाला. दुपारची वेळ झाली होती व शबरी माडीवर दरवाजात उभी राहून आजूबाजूस पाहत होती, तो तिच्या दृष्टीस कोणते दृश्य पडले? एका आवारात चारपाचशे शेळ्यामेंढ्या बांधलेल्या होत्या. बाहेर कडक ऊन पडले होते. त्या मुक्या प्राण्यांना पाणी पाजले नव्हते, खाण्यास घातले नव्हते व त्यांजवर छाया नव्हती. उन्हात ते प्राणी तडफडत होते! शबरीचे कोमल मन कळवळले आणि ती तीरासारखी खाली गेली व आईला म्हणाली, "आई, ती मेंढरे कोकरे तिकडे का ग डांबून ठेविली आहेत? ना तेथे छाया, ना जल, ना चारा; जलविणे कशी माशाप्रमाणे तडफडत आहेत! आई, का गं असे?" आई म्हणाली, "बाळ, त्यांची पीडा, त्यांचे क्लेश उद्या संपतील. उद्या तुझा योजलेला पती येईल. तो श्रीमंत आहे. शेकडो लोक त्यांचेबरोबर येतील. त्यांना मेजवानी देण्यासाठी उद्या ह्या साऱ्यांची चटणी होईल. जा, तिकडे खेळ, मला काम आहे." शबरीच्या पोटात धस्स झाले! ती कावरीबावरी झाली. भिल्लांच्या हिंसामय जीवनाचा आजवर तिला विसर पडला होता. तिच्या मनात शेकडो विचार आले- 'उद्या माझ्या विवाहाचा मंगल दिवस! सुखदु:खाचा वाटेकरी, जन्माचा सहकारी उद्या मला लाभणार! माझ्या आयुष्यात उद्याचा केवढा भाग्याचा दिवस! उद्या आईबाप, आप्तेष्ट आनंदित होतील; परंतु या मुक्या प्राण्यांना तो मरण्याचा दिवस होणार! माझ्या विवाहसमारंभासाठी यांना मरावे लागणार! आणि मला पती मिळणार तोही असाच हिंसामय वृत्तीचा असणार! मी पुनश्च त्या हिंसामय जीवनात पडणार! छेः! कसे माझे मन कासावीस होत आहे! माझे विचार मी कोणास सांगू? माझे कोण ऐकणार येथे! नको, हा विवाहच नको. हा मंगल प्रसंग नसून अमंगल आहे! माझ्या जीवनाच्या सोन्याची पुन्हा राख होणार अं? आपण येथून तत्काळ निघून जावे. रानावनात तपश्चर्येत काळ घालवावा." शबरीचे डोळे भरुन आले. ती आता रात्रीची वाट पाहत बसली. वाड्यात सर्वत्र लग्नघाई चाललीच होती. शबरी फाटकी वल्कले अंगावर घालून विरक्तपणे रात्री निघून गेली! कोणालाही ते माहीत नव्हते, फक्त अंधकाराला माहीत होते. मतंग ऋषी आश्रमात ब्रह्मध्यानात मग्न होते. सकाळचे काम करण्यात ऋषिपत्नी गढून गेली होती. इतक्यात शबरी तेथे आली. शबरीला पाहताच मोर नाचू लागले, हरणे उड्या मारु लागली, गाईंची वासरे हंबरु लागली. ऋषींनी डोळे उघडले. मुखकळा म्लान झालेली, दृष्टी अश्रूंनी डवरलेली अशी शबरी पाहून, ते आश्चर्यचकित झाले. शबरीच्या मुखेंदूवरील अश्रूंचे पटल पाहून ऋषींचे अंतःकरण विरघळले. शबरीने येऊन वंदन केले व एखाद्या अपराधिनीप्रमाणे ती जरा दूर उभी राहिली.

मतंग ऋषी म्हणाले, "शबरी, आज तर तुझ्या विवाहाचा मंगल दिवस. तू आज येथे रडत परत का आलीस? तुला कोणी रागे का भरले? आईबापांशी भांडण का झाले? शबरी, आईबापांसारखे अन्य दैवत नाही. बोल, अशी मुकी का तू?" ऋषी कोणाजवळ बोलत आहेत, हे पाहण्यासाठी ऋषिपत्नी बाहेर आली व पाहते, तो काल परत गेलेली शबरी! ती उद्गारली, "शबरी, अगं इकडे ये ना अशी. तू का कोणी परकी आहेस? अशी रडू नकोस. रडूनरडून डोळे लाल झाले! प्रेमळ पोर! ये अशी इकडे व सांग काय झाले ते." ते प्रेमळ शब्द ऐकून शबरी जवळ आली. सहानुभूतीच्या व प्रेमाच्या शब्दांनी बंद ओठ उघडतात, बंद हृदये उघडी होतात. ऋषिपत्नीच्या खांद्यावर मान ठेवून शबरी ओक्साबोक्शी रडू लागली. ऋषिपत्नी म्हणाली, "शबरी, अशी किती वेळ रडत बसणार तू? उगी नाही का राहत? काय झाले ते सारे सांग तर. या रडण्याने आम्ही काय बरे समजावे?" शबरीने डोळे पुसले आणि ती हात जोडून म्हणाली, "आई, तात, मला येथेच आश्रमात राहू द्या. मला आजपर्यंत आपण आधार दिलात, तसाच यापुढे द्या. मला नाही म्हणू नका. मी माझे आयुष्य आनंदाने येथे कंठीन, आश्रमाची झाडलोट करीन, गाईगुरे सांभाळीन, सडासंमार्जन करीन, आपले चरण चुरीन, तुमचे अमोल बोल ऐकेन." ऋषी म्हणाले, "शबरी, तू तर विवाहासाठी गेली होतीस. तू आता यौवनसंपन्न झाली आहेस. आश्रमात तरुण मुलीला ठेवणे आम्हालाही जरा संकटच वाटते. शिवाय, येथे दक्षिणेकडील राक्षासांचा कधीमधी हल्ला येईल. तू पतीसह संसार करावास, हे योग्य. वेल ही वृक्षावर चढल्यानेच शोभते. शबरी, असा वेडेपणा करु नकोस. जा, घरी माघारी जा. सुखाचा नेटका संसार कर." शबरीला हुंदका आला, तो तिला आवरेना. ती स्फुंदस्फुंदू झाली. पुनरपि धीर करुन सद्गदित स्वराने ती म्हणाली, "तात, असे कठोर नका होऊ. मला मग आजपर्यंत शिकवलेत तरी कशासाठी? सत्य, दया, हिंसा, परोपकार, प्रेम इत्यादी गुण आपण शिकवलेत. मी घरी गेले तर माझ्या विवाहासाठी शेकडो मुक्या प्राण्यांचा संहार होणार! ती मेंढरे कशी तडफडत होती! तात, भिल्लांचे जीवन हिंसामय आहे. मला मिळेल तो पती व सारी सासरची मंडळी हिंसामय जीवनात आनंद मानणार; येथे मी कशी सुखाने राहू? मला इकडे आड, तिकडे विहीर असे झाले आहे. 'बाप खाऊ घालीना, आई भीक मागू देईना' अशी स्थिती माझी झाली. गंगा आसऱ्यासाठी समुद्राकडे गेली व समुद्राने तिला झिडकारले, तर तिने जावे कोठे? नदी जलचरांवर रागावली तर त्यांनी कोठे जावे? महाराज, माझ्याबद्दल आपल्या मनात संशय येऊ देऊ नका. मी तरुण असले, तरी आपल्या पवित्र सान्निध्यात असल्यावर माझे पाऊल वेडेवाकडे पडणार नाही. आपले संरक्षण असले, आपली कृपादृष्टी असली, आपला आशीर्वाद असला, म्हणजे माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाही दुष्टाची छाती नाही. मला नाही म्हणू नका. मी तुमची मुलगी. तुम्ही वाढविलीत, तुम्ही पदरात घ्या. नका पायाने लोटू तात, कृपा करा. आई, कृपा कर!" ते करुणरसाने थबथबलेले शब्द ऐकून ऋषींचे दयामय अंतःकरण वितळले. ऋषी शबरीला म्हणाले, "मुली, तू मनाने फार थोर झाली आहेस. राहा, माझ्या आश्रमात तू राहा." शबरीच्या अंगावर एकदम मूठभर मांस चढल्यासारखे झाले. रडणारे डोळे हसू लागले, प्रेममय व शांत झाले. लगेच शबरी घरच्याप्रमाणे वागू लागली, कामधंदा करु लागली, पंपासरोवराचे पाणी भरुन घट आणू लागली. शबरीच्या जीवनात पावित्र्य, समाधान, आनंद, सरलता यांचे झरे वाहू लागले. शबरीचा पिता आला; परंतु मतंग ऋषींनी त्याला सर्व समजावून सांगितले. पिता न संतापता पुनरपि माघारी गेला. शबरीचे जीवन संथपणे वाहू लागले. शबरी आता तपस्विनी झाली, योगिनी झाली. तिच्या चर्येत, चालचलणुकीत पंपासरोवराची गंभीरता व पवित्रता होती. तेथील वनराजीची भव्यता व स्निग्धता, सुरभिता व सौम्यता तिच्या हृदयात होती. मतंग ऋषींजवळ सुखसंवाद करण्यात तिचे दिवस आनंदाने निघून जात. एक दिवस मतंग ऋषी म्हणाले, "शबरी, परमेश्वर जरी सर्व चराचरांत भरुन राहिला असला, तरी काही वस्तूंत परमेश्वराचे वैभव जास्त स्पष्टपणे प्रतीत होते व आपले मन तेथे विनम्र होते. उदाहरणार्थ, हा वटवृक्ष पहा. सर्व वृक्ष-वनस्पतींत ईश्वरी अंश भरलेला आहेच; परंतु गगनाला आपल्या फांद्यांनी उचलून धरणारा, आजूबाजूस आपले प्रेमळ पल्लवित हात पसरुन विश्वाला कवटाळू पाहणारा, हजारो पाखरांस आश्रय देणारा, पांथस्थांस शीतल व धनदाट छाया वितरणारा हा वटवृक्ष पाहिला, म्हणजे याच्या ठिकाणी असलेले परमेश्वरी वैभव जास्त स्पष्टपणे प्रकट झालेले दिसते आणि आपले मन वटवृक्षाबद्दल भक्तिभावाने भरुन येते. आपण त्याची पूजा करतो. शबरी, सर्व प्रवाहांच्या ठिकाणी परमेश्वर आहेच; परंतु हजारो कोस जमीन सुपीक करणारी, शेकडो शहरांना वाढवून त्यांना वैभवाने नटविणारी एखादी मोठी नदी, तिला आपण अधिक पवित्र मानतो. शबरी, सर्व फुलांच्या ठायी सौंदर्य, सुगंध, कोमलता आहे, पण कमलपुष्पाच्या ठायी हे गुण विशेष प्रतीत होतात; म्हणून त्याला आपण जास्त मान देतो. सर्वत्र असेच आहे. जे जे थोर आहे, उदात्त आहे, रमणीय आहे, विशाल आहे, त्याबद्दल साहजिकच आदर, भक्ती, प्रेम ही आपल्या हृदयात उत्पन्न होतात. शबरी, मनुष्यजातीतही असेच आहे. आपणा सर्वांच्या ठायी परमेश्वरी तत्त्व आहे. परंतु तुझ्या जातीतील लोकांपेक्षा तुझ्यामधील ईश्वरी तत्त्व जास्त स्पष्टपणे दिसून येते. म्हणून तुझ्याबद्दल आदर वाटतो. आकाशाचे प्रतिबिंब सर्वत्र पाण्यात पडलेले असते, परंतु निर्मळ पाण्यात ते स्पष्ट दिसते; त्याप्रमाणे परमेश्वराचे प्रतिबिंब निर्मळ पाण्यात स्पष्ट दिसते; त्याप्रमाणे परमेश्वराचे प्रतिबिंब निर्मळ हृदयात स्वच्छ पडलेले दिसून येते. शबरी, आपले मन आपण घासून घासून इतके स्वच्छ करावे की, परमेश्वराचे पवित्र प्रतिबिंब येथे पडावे व त्याचे तेज आपल्या डोळ्यांवाटे, वाणीवाटे, आपल्या प्रत्येक हालचालीत बाहेर पडावे. आपण आपले मन व बुद्धी ही घासून स्वच्छ करीत असतानाच इतरांच्याही हृदयाला स्वच्छ करण्याचा आपण प्रयत्न करावा. शबरी, तू तपस्विनी आहेस, तू आपले हृदय पवित्र केले आहेस. तू तुझ्या जातीतील स्त्री-पुरुषांची मनेही निर्मळ व प्रेमळ व्हावीत म्हणून प्रयत्न केले पाहिजेस. स्वतःचे खरे हित साधून परहितार्थ म्हणून सततोद्योग करीत राहणे, हे विचारशील मानवाचे जीवितकार्य आहे." मुनींची ती गंगौघाप्रमाणे वाहणारी पवित्र वाणी शबरी ऐकत होती. ते शब्द आपल्या हृदयात ती साठवीत होती. हात जोडून खाली ऋषींच्या पदकमांलकडे पाहत शबरी म्हणाली, "गुरुराया, ही शबरी अजून वेडीबावरी आहे. ती दुसऱ्याला काय शिकविणार? महाराज, सदैव मला तुमच्या चरणांजवळ ठेवा म्हणजे झाले!" अशा प्रकारचे प्रसंग, असे विचारसंलाप कितीदा तरी होत असत. शबरी आनंदाने जीवन कंठीत होती. वर्षांमागून वर्षे चालली. शबरी प्रेममय व भक्तिमय बनत चालली. तिला पाहून पशुपक्षी जवळ येत. तिच्या डोळ्यांतील प्रेममंदाकिनीने क्रूर पशूही आपले क्रौर्य विसरुन जात. तिच्या हातातून पाखरांनी दाणे घ्यावेत, तिच्या मांडीवर बसून भक्तिभावाने सद्गदित झाल्यामुळे तिच्या डोळ्यांतून घळघळ गळणारे अश्रू मोत्यांप्रमाणे पाखरांनी गिळावेत! शबरी - भिल्लाची पोर शबरी - प्रेमस्नेहाची देवता बनली होती. कधी कधी मतंग ऋषींच्या बरोबर शबरी इतर थोर ऋषींच्या आश्रमातही जात असे. शबरीची जीवनकथा, तिचे वैराग्य, तिचे ज्ञान व तिची शांत मुद्रा, हे पाहून ऋषी विस्मित होत व ते तिच्याबद्दल पूज्य भाव व्यक्त करीत. ऋषिपत्नींजवळ शबरी चराचरात भरलेल्या प्रेममय परमेश्वरांसंबंधी बोलू लागली म्हणजे ऋषिपत्नी चकित होत व शबरीच्या पायाला त्यांचे हात जोडले जात! मतंग ऋषी आता वृद्ध झाले व त्यांची पत्नीही वृद्ध झाली; दोघेही पिकली पाने झाली होती. आता सर्व कामधाम शबरीच करी. सेवा हाच तिचा आनंद होता. रात्रीच्या वेळी ऋषींचे सुरकुतलेले अस्थिचर्ममय पाय चेपताना, कधीकधी तिच्या पोटात धस्स होई. 'हे पाय लवकरच आपणास अंतरणार का?' असा विचार तिच्या मनात येऊन डोळ्यांत अश्रू जमत. झोप न लागणाऱ्या गुरुलाही झोप लागावी; परंतु मृत्यू लवकरच गुरुला नेणार का, या विचाराने शबरीस मात्र झोप लागू नये!

ऋषींच्या उपदेशाच्या गोष्टी ऐकताना तिच्या मनात विचार येई की, 'असे अमोल बोल आता किती दिवस ऐकावयास मिळणार? ही पवित्र गंगोत्री लवकरच बंद होईल का? ऋषींचे शब्द सतत ऐकत बसावेत,' असेच तिला वाटे.

एक दिवस मतंग ऋषी तिला म्हणाले, "शबरी, मरण हे कोणाला टळले आहे? केलेली वस्तू मोडते, गुंफलेला हार कोमेजतो. जे जन्मले ते मरणार, उगवले ते सुकणार, सृष्टीचा हा नियमच आहे. शबरी, एक दिवस तुला, मला हा मृण्मय देह सोडून जावे लागणार, फूल कोमेजले तरी त्याचा रंग, त्याचा सुगंध आपल्या लक्षात राहतो. त्याप्रमाणे माणूस गेले तरी त्याचा चांगुलपणा विसरला जात नाही." मतंग ऋषी असे बोलू लागले की शबरीला वाटे, ही निरवानिरवीची भाषा गुरुदेव का बोलत आहेत? हे शेवटचे का सांगणे आहे? आज मतंग ऋषी स्नानसंध्या करीत होते. एकाएकी त्यांना भोवळ आली. शबरी तीराप्रमाणे तेथे धावत आली आणि पल्लवांनी वारा घालू लागली. ऋषिपत्नीही आली व तिने पतीचे मस्तक मांडीवर घेतले. ऋषींनी डोळे उघडले. ते म्हणाले, "आता हा देह राहत नाही. तुळशीपत्र आणा, पंपासरोवराचे पाणी आणून मला दोन थेंब द्या. शबरी, जीवन अनंत आहे. मरण म्हणजे आनंद आहे."

शबरीने पाणी देऊन तुळशीपत्र तोंडावर ठेविले. 'ओम् ओम्' म्हणत मतंग ऋषी परब्रह्मात विलीन झाले! ऋषींचे प्राणोत्क्रमण होताच जिच्या मांडीवर त्यांचे मस्तक होते, ती त्यांची प्रेमळ पत्नीही एकाएकी प्राण सोडती झाली व तीही तेथे निश्चेष्ट पडली. पतिपत्नी ऐहिक जीवन सोडून चिरंतन जीवनात समरस झाली. परंतु शबरी-बिचारी शबरी-पोरकी झाली. तिला आता कोण पुसणार? तिला ज्ञान कोण देणार? रोज नवीन विचारांची नूतन सृष्टी तिला कोण दाखविणार? "शबरी, आज तू काहीच खाल्ले नाहीस. ही दोन फळे तरी खाच." असे तिला प्रेमाग्रहाने आता कोण म्हणणार? शबरीचा आधार तुटला. मूळ तुटलेल्या वेलीप्रमाणे तीही पडली; परंतु सावध झाली. तिने चिता रचली आणि गुरुचा व गुरुपत्नीचा देह तिने अग्निस्वाधीन केला.

मृत्युदेव आला व शबरीची ज्ञान देणारी मातापितरे तो घेऊन गेला. मृत्यू ही प्राणीमात्राची आई आहे. मृत्यू हा तरी कठोर नाही. मृत्यू नसता तर या जगात प्रेम व स्नेह ही दिसतो ना! मृत्यूमुळे जगाला रमणीयता आहे. हे मृत्यो, तुला कठोर म्हणतात ते वेडे आहेत. तू जगाची जननी आहेस. सायंकाळ झाली म्हणजे अंगणात खेळणारी मुलेबाळे दमली असतील, त्यांना आता निजवावे, म्हणजे पुन्हा ती सकाळी ताजीतवानी होऊन उठतील, या विचाराने आई त्यांना हळूच मागून जाऊन घरात घेऊन येते; त्याप्रमाणे या जगदंगणात मुले खेळून दमली असे पाहून आयुष्याच्या सायंकाळी, ही मृत्युमाता हळूच मागून येते व आपल्या बाळांना निजविते आणि पुन्हा नवीन जीवनाचा रस देऊन त्यांना खेळण्यासाठी पाठवून देते. अमरजीवनाच्या सागरात नेऊन सोडणारी मृत्युगंगा पवित्र आहे.

शबरीच्या मनात मृत्यूसंबंधी असेच विचार येत होते का? त्या आश्रमात ती आता एकटीच बसे. परंतु मनुष्य कितीही विचारी असला तरी त्याला पूर्वीच्या अनेक प्रेमळ स्मृती शेकडो सुखदुःखाचे प्रसंग आठवतात आणि त्याचे हृदय भरुन येते, नव्हे, येणारच. शबरीचे असेच होई. ती सकाळी गोदावरीचे पाणी आणी. तथापि गोदेच्या तीरावर पाणी भरण्याऐवजी तिचा भरलेला हृदयकलश नयनद्वारा गोदेच्या पात्रात रिता होई. परंतु मोरांच्या केकांना ती सावध होई व जड पावलांनी आश्रमात परत येई.

शबरीचे लक्ष आता कशातही लागेना. आश्रमातील हरणे, मोर यांना तिने इतर आश्रमांत पाठवून दिले व आपण एकटीच रानावनांत आता ती विचरत राही. झाडेमाडे हे तिचे मित्र, पशु-पक्षी हेच सखे-सवंगडी. ती कधी सुंदर गाणी गाई, स्तोत्रे म्हणे. कधी आकाशाकडे पाहत बसे, कधी हसे, तर कधी रडे. शबरी एक प्रकारे शून्यमस्तक झाली होती.

एक दिवस शबरी भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेली होती. तेथे पुष्कळ ऋषिमंडळी जमली होती. बोलता बोलता भारद्वाज ऋषी म्हणाले, "ऐकलेत का? अयोध्येच्या दशरथाचा प्रतापी पुत्र रामचंद्र, पित्याच्या वचनपालनार्थ राज्यवैभव सोडून बारा वर्षे वनवासात घालविण्यासाठी निघाला आहे. त्याची पत्नी सीता व बंधू लक्ष्मण हीही त्याच्याबरोबर आहेत. केवढे हे धीरोदात्त व त्यागमय वर्तन!" दुसरे ऋषी म्हणाले, "हेच परमेश्वराचे अवतार होत. परमेश्वराचे स्वरुप अशाच थोर विभूतींच्या द्वारा प्रकट होत असते. केवढी सत्यभक्ती! केवढा त्याग!" शबरी ऐकत होती ती म्हणाली, "खरेच, पूर्वी गुरुदेवांनी मला असेच सांगितले होते, 'जेथे जेथे विभूतिमत्व दिसेल तेथे तेथे परमेश्वर आहे, असे समज.' असे ते म्हणत. हा प्रभू रामचंद्र. त्याची पत्नी व त्याचा भाऊ सर्व वनवास पत्करतात, खरोखरच देवांचेच हे अवतार! मला केव्हा बरे त्यांचे दर्शन होईल? खरेच केव्हा बरे दर्शन होईल?"

शबरीचे डोळे तेजाने चमकत होते. तपश्चर्येने, शोकाने व वयाने ती आता वृद्ध दिसू लागली होती. तिचे शब्द ऐकून ऋषी मोहित झाले; परंतु एकाएकी शबरी तेथून, 'कधी बरे रामचंद्र पाहीन? कधी ती मूर्ती पाहीन?' असे म्हणत वेड्यासारखी पळत सुटली व बावरलेल्या हरिणीप्रमाणे रानात निघून गेली!

"राम, राम. केव्हा बरे तो नयनाभिराम राम मी डोळ्यांनी पाहीन व त्याचे पाय माझ्या आसवांनी भिजवीन? काय रे वृक्षांनो, श्रीरामचंद्राच्या येण्याची वार्ता तुमचा मित्र जो वायू, त्याने तुम्हांस कानात सांगितली आहे का? सांगा ना! केव्हा येईल तो रामचंद्र? केव्हा दिसेल ती सीतादेवी?"

शबरी वेडी झाली होती. तिने रोज ताजी फुले जमवावीत, त्यांचे सुंदर हार दिवसभर करावेत आणि मग आज रामचंद्र आला नाही, नाही आला, असे म्हणून ते हार नदीच्या पाण्यावर सोडून द्यावेत. रोज तिने गोड गोड फळे रामचंद्रासाठी गोळा करुन आणावीत आणि- "नाही आला माझा राम, नाही पुरले माझे काम, नाही आला मेघश्याम, नाही संपले माझे काम." असे म्हणत ती फळे वानरांपुढे टाकावीत.

कधी कधी पाखरांचे शब्द ऐकून शबरी म्हणे, 'ही पाखरे माझ्या रामाला साद घालीत आहेत का? पाखरांनो, तुम्हाला उडता येते; मग तुम्हालाही जर अजून रामचंद्र आलेला दिसत नाही तर मला कसा दिसणार?' वाऱ्याचे सळसळणे ऐकून, 'राम येत नाही म्हणून का वारा रडतो आहे?' असे तिने म्हणावे. रात्री काळवंडलेला चंद्र पाहून 'राम दिसत नाही म्हणून का चंद्र काळवंडला आहे?' असे तिने उद्गारावे. शबरीला एकच ध्यास, एकच भास, एकच तिला वेड, एकच तिचा विचार. शबरी रामचंद्रासाठी अधीर झाली होती!

रामचंद्र, सीतादेवी, लक्ष्मण दंडकारण्यात आली. एक दिवस भारद्वाज ऋषींकडे ती राहिली. तेथे अनेक ऋषी आले होते. रामचंद्रांचा विनय, धीरोदात्तता, तेज, पावित्र्य हे पाहून ऋषिजनांचे हृदय भरुन आले. वैराग्यमूर्ती, त्यागदेवता सीता पाहून त्यांचे हृदय विरघळले. सीता म्हणाली, "इकडील प्रेमळ सहवासात मला काटे फुलांसारखे वाटतात व दगडांची कोवळी पाने होतात. प्रभूंच्या संगतीत मला सर्व स्वर्गच आहे." रामचंद्रांना शबरीची गोष्ट ऋषींकडून कळली व ही वेडी शबरी कोठे भेटेल, असे त्यांनाही झाले.

तिघंजण वनवासार्थ पुढे निघाली. ऋषींच्या आश्रमात स्वागतसत्कार घेत ती फार दिवस राहत नसत. कारण ती सुखोपभोगासाठी आली नव्हती, वनात वैराग्यवृत्तीने व स्वावलंबनाने राहण्यास ती आली होती. त्रिवर्ग पुढे चालले व शबरीच्याच कथा त्यांच्या चालल्या होत्या एक साधी भिल्लकन्या, परंतु सत्संगतीने संस्काराने ती किती उदात्त विचारांची व थोर आचाराची झाली होती, ते ऐकून त्यांना विस्मय वाटला. खरेच, पडीत जमिनीत खते घालून, तिची नीट मशागत करुन जसे उत्कृष्ट पीक काढता येते; जेथे दगडधोंडे काटेकुटे आहेत, तेथेही प्रयत्न केले, तर फुलाफलांनी, सस्यांकुरांनी नटलेली सुंदर सृष्टी जशी शोभू लागते, तसेच मानवी मनाचेही आहे. या जगात प्रयत्न हा परीस आहे, प्रयत्नाने नरकाचे नंदनवन होते, कोळशाची माणके होतात. आपण शेताभातांची निगा राखून पीक काढतो; परंतु मानवी मनाची अमोल शेती आपण करीत नाही! या जगात, आपल्या हिंदुस्थानात कितीतरी ओसाड मनोभूमिका पडल्या आहेत. कोट्यावधी लोकांच्या मनोभूमिका आपणावर सद्विचारांचा, सत्संस्कारांचा पाऊस कधी कोसळेल म्हणून वाट पाहत आहेत; आपला उद्धार कधी होईल, अशी रात्रंदिवस त्या ओसाड मनोभागांना चिंता लागली आहे. फ्रेंच इंजिनियर सहारा वाळवंटात पाणी सोडून त्याचा समुद्र बनविणार होते. हिंदुस्थानातील लाखो मानवी हृदयांची वाळवंटे! तेथे ज्ञानमेघ आणून कोण ओली करणार? तेथे सद्गुणांचे पीक कोण घेणार? धैर्य, साहस, स्वार्थत्याग, सद्धर्म, दया, प्रेम, परोपकार, सदाचार, सहानुभूती, सहकार्य, माणुसकी, बंधुभाव, स्वच्छता या सद्गुणांचे पीक या शेकडो पडीत मनोभूमीतून कोण काढणार? देवाघरच्या या दैवी शेतीवर काम करणारे कष्टाळू मजूर आपणांत किती आहेत? भिल्ल, कातकरी, गोंड, अस्पृश्य अशा जाती- या सर्वांना ज्ञानाची शिदोरी कोण नेऊन देणार? ही भगवंताची मानसशेती करावयास, तिच्यावर खपण्यासाठी हजारो प्रामाणिक मजूर पाहिजे आहेत, हजारो मतंग मुनी हवे आहेत! शबरीलाही सत्संस्कारांनी पुण्यतमा करणारे मतंग मुनी कोठे, आणि 'तुम्ही अस्पृश्य, शिवू नका, तुम्हाला वेदाचा अधिकार नाही!' असली वाक्ये तोंडाने उच्चारणारे हल्लीचे हे शाब्दिक धर्ममार्तंड कोठे? पुनरपि या श्रीरामचंद्रांच्या भूमीत हजारो मतंग ऋषी झाल्याशिवाय देशोद्धार कसा होणार?

रामचंद्र, सीता, लक्ष्मण हा त्रिवर्ग वनमार्ग आक्रमीत होता, तो एका वृक्षाच्या खाली 'ही फळे रामचंद्राला आवडतील का? किती गोड आहेत! माझ्या दातांनी त्याची चव मी घेतली आहे; पण केव्हा येणार रामचंद्र? केव्हा येणार? केव्हा भेटणार? आजही हे गुंफलेले हार कोमेजून जाणार का?' असे शबरी स्वतःशी खिन्नपणे, प्रेमळपणे म्हणत होती. एकाएकी रामचंद्र, सीता, लक्ष्मण ही तिच्यासमोर उभी राहिली. शबरी चमकली. तिचे डोळे अश्रूंनी चमकले. ती उठून म्हणाली, "तुम्हीच ते; मला जरी माहीत नाही, तरी तुम्हीच ते. तुम्हीच रामचंद्र, होय ना? तुमचे प्रसन्न मुखच सांगत आहे. सीतामाई व प्रेमळ बंधू लक्ष्मण. तुम्हीच ते. किती तुमची वाट पाहत होते! तुमच्यासाठी दररोज फळे गोळा करावीत, हार गुंफावेत! लबाड वारा सांगेना, पाखरे सांगेनात, तुम्ही कधी येणार ते. बरे झाले, आलात तुम्ही! मला दर्शन दिलेत. मी कृतार्थ झाले. माझे गुरुदेव म्हणत, 'ज्याच्या ठिकाणी अनंत सद्गुण दिसतील, तो परमेश्वर समजावा.' तुम्ही निर्दोष, निष्कलंक आहात. तुम्हीच माझे परमेश्वर आहात. या, बसा. मी तुमची पूजा करते हां." असे म्हणून तिने तिघांना पल्लवांवर बसविले. तिने त्यांचे पाय धुतले व अश्रूंचे कढत पाणीही मधूनमधून त्यावर घातले. नंतर तिने त्यांच्या गळ्यांत घवघवीत हार घातले व ती मधुर फळे त्यांच्या पुढे ठेविली. रामचंद्र, सीता व लक्ष्मण या सर्वांचे अंतःकरण भरुन आले! त्यांना ती फळे खाववेत ना!

शबरी म्हणाली, "देवा, मी मूळची भिल्लीण म्हणून का फळे खात नाही? परंतु मी निर्मळ व प्रेमळ आहे. प्रेमाला, भक्ताला विटाळ नसतो. ही बोरे मुद्दाम मी चाखून पाहिली. चांगली गोड फळे पाहिजेत ना माझ्या रामाला? हं, रामा, घ्या ना! सीतामाई, घ्या ना!" सर्वांनी फळे घेतली. पालाशद्रोणातील पाणी तिने त्यांच्या हातावर घातले. नंतर शबरी उभी राहिली व हात जोडून म्हणाली, "देवा रामचंद्रा, जलदश्यामा रामा, सार्थ झाले! तुजला बघुनी देवा, मम डोळे धाले! उत्कंठा जी धरुनी हे होते प्राण, झाली देवा तृप्त आता नुरला काम! हे भगवंता, गुणसागरा, हे रघुनाथा, चरणी तुझिया ठेवितसे माथा! झाले दैवा, झाले मम जीवन धन्य, मागायचे नाही रे तुजला अन्य! जन्मोजन्मी देई भक्ती, मज सीतापति म्हणजे झाले दुसरे मनि काही नुरले! जलश्यामा!

शबरीने गाणे म्हणले व 'मला पदरात घ्या' असे म्हणून रामचंद्रांच्या पायांवर तिने मस्तक ठेविले, परंतु रामचंद्रांच्या पायी शबरी पडली, ती पुन्हा उठलीच नाही! विश्वव्यापी परमात्म्यात तिचे चित्तत्त्व मिळून गेले! ते देहपुष्प मात्र रामचरणी कोमेजून पडले!

तिघांना गहिवर आला. शबरीला त्यांनी अग्नी दिला व तिचे गुणवर्णन करीत ती तिघे गेली. शबरी देहाने गेली, परंतु कीर्तिरुपाने सदैव अमर आहे. जोपर्यंत भारतवर्ष आहे, रामायण आहे, राम-सीता यांची आठवण आहे, जोपर्यंत जगात भक्ती आहे, हृदय आहे, तोपर्यंत शबरीही आहे.

शबरी अमर आहे!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics