Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Suresh Kulkarni

Romance


1.0  

Suresh Kulkarni

Romance


शाप !

शाप !

10 mins 3.3K 10 mins 3.3K

करू का हिला प्रपोज ?

आणि ,

मी मनाचा हिय्या करून तो गाढवपणा केलाच .

"थोबाड पाहिलास का आरशात ? अरे प्रपोज करायच्या आधी क्षणभर तरी विचार करायच्या ! आला तोंडवर करून ' लव्ह यु !' म्हणत ! बेअक्कल ! काय एक एक फुल असतात . कुरूप चेहरा घेऊन जन्माला येतात ,अन वर माझ्या सारख्या 'ब्युटीला ' प्रपोज करायचं धाडस दाखवतात ! अरे तुझ्या पेक्षा एखाद्या माकडाशी मी लग्न करीन पण तुझ्याशी नाही ! कारण तो सुद्धा तुझ्या पेक्षा ज्यास्त 'क्युट ' दिसेल ! स्टुपिड ! मसनात जा ! "

ती फणकाऱ्यात माझा चार चौघात कचरा करू निघून गेली .

०००

पुन्हा ,पुन्हा हे असच घडतंय ! मी फारसा आकर्षक चेहरा घेऊन नाही जन्माला आलो . यात माझा काय दोष ? मी कुरूप म्हणून काय मला प्रेम करण्याचा अधिकार नाही का ? या तारुण्यात मलाही कोणाचा तरी हात हाती घेऊन सूर्यास्त पाहावा वाटतो ! मलाही कोणावर तरी जीवापाड प्रेम करावं वाटत ! कोणाच्या तरी सुखदुःखात सहभागी व्हावं वाटत ! कोणाला तरी आपल्या मनातलं सांगावं वाटत ! कोणाशी तरी संसार थाटावा वाटतो !आपणही कोणाच्या तरी स्वप्नातला 'राजपुत्र ' असावं असं वाटत ! (राजपुत्र थोडा दिसायला 'डावा 'असेलतर चालतो का हो ?) पण हे सार माझ्या नशिबी नाही , हेच खरं आहे !

आजच्या अपमान तर मी उध्वस्त झालोय . गेले वर्षभर ती माझ्या सोबत होती . माझ्या तुटपुंज्या कमाईचा मोठा लचका मीच तोडून तिच्या एका स्माईल साठी बहाल करायचो . तिला सुख पाहिजे होत ,पण नातं नको होत .

पण आज सगळंच संपलय ! अश्या मानहानी पेक्षा मेलेलं बर !खरच या कुरूप जगण्याला मी विटलोय !

०००

ते एक आडबाजुच गेट नसलेले रेल्वे क्रॉसिंग होते . समोरून एक रेल्वे सापासारखी सळसळत येताना दिसली . वेगाने ! काही क्षणांचाच प्रश्न होतो . मी ह्या कुरूप देहाचं अस्तित्व सम्पवणार होतो ! दोन्ही हात पसरून मी रुळाच्या मध्यभागी ताठ उभा राहिलो ! समोरून येणाऱ्या सळसळत्या ' मृत्यू ' ला कवेत घेण्यासाठी !

पण ऐन वेळी माझ्यागचांडीला धरून कोणीतरी मागे खेचले !

तो एक पांढरे धोतर ,पांढरी बंडी घातलेला म्हातारा खेडूत होता . त्याची दाढी आणि केस पण पांढरेच होते .

"मायला ,जवानीत मराया काय झालाय ?" फाडकन माझ्या मुस्काडात मारून त्याने विचारले .

"मला नाही हे असल जगण जगायचं ! "

" का ?काय रोग राई हाय ? उपाशी मरतुस काय ? लुळा पांगळा हैस ?काय धाड भरलिया तुला ?"

बोलता बोलता त्याने मला जवळच्या पिंपळाच्या झाडा खाली नेवून बसवले . पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतला पाण्याच्या गुटका पाजवला . मला थोड बरे वाटले .

"हा , आता बोल . का मरायचं होत ?"

माहित नाही मी कसा अन कितीवेळ मी त्या म्हाताऱ्या जवळ माझे मन मोकळे करत होतो . आणि तोही शांतपणे माझी व्यथा एकून घेत होता .

"खर सांगू . तू एक गलती करतुयास . डोकस्यान करायचा इचार ,काळजान करतुयास ! रंग -रूप देव देतु , आपुन माणस तेला चांगल -वंगाळ करतो ! "

"तुम्हाला नाही माहित क्षणा -क्षणाला मला हे जग झिडकारतय , अपमान करतय , जिंदगी हराम झालीय माझी ! " मी अजूनही वैतागलेलोच होतो .

"हा ,हा लई वैतागू नगस ! काय कि तुला देन्या जोगा एक 'वरदान ' हाय मज्या जवळ ! बोल देवू का तुला ?" म्हाताऱ्याने थोड्या खालच्या आवाजात विचारले .

"वरदान ?"

" हा ! बोल तुला काय पायजे ?"

" मला ' सुंदर ' करा ! "

"तुज्या रंगा -रुपात बदल म्हंजी देवाची बेअदबी हुईल ! दुसर कायतर माग ! "

"मग मला असा ' वर ' द्या कि मी पहाणाऱ्या पोरींना मी 'सुंदर ' दिसावा ! "

" अर, हे आक्रीत मागन हाय ! काय पैसा अडका ,जमील -जुमला मागून घे !"

"बघा म्हातरबाबा , देणार असाल तर ' बघणाऱ्यातरुणीना मी सुंदर दिसावा ' हा वर द्या . नसता तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा अन मला माझा ! " मी हि हटून बसलो .

"मंजी पुन्ना मुडदा पाडून घेनार ? तसलं काय करू नगस ! पर ------"म्हातारा जरा अडखळला .

" पर ! पर काय ?"

"तुला कळना तू काय मागतुयास ? पर तुला हेच पायजेल आसन तर तसच खर !पर तेला कायी ठराव हैत !"

"ठराव ? कसले ठराव ?"

"एक तर तू जसा हाइस तसाच तुला तू आरशामंदी दिसशील !हाय मंजूर ?

"हा मंजूर !"

"दुसर तू बाकीचायना, मंजे जवान पोरीना मातर 'सुंदर ' दिसशील ! तेनला तुज असली रूप दिसणार नाय !हाय मंजूर ?"

" हो !हो ! हेच तर मला पाहिजे ! मंजूर !मंजूर!!"

"मंग ,काय म्हणत्यात ते 'ततास्तु '! जावा आत्ता ! आनंदा मदी रहावा !"

म्हातारा बघता बघता समोरच्या रस्त्याला लागला , आणि झपाझपा पावल उचलत नजरेआड झाला , तरी मी बराच वेळ तो गेलेल्या दिशेला पहात राहिलो

खरच तो मला हवा असलेला 'वर ' देवून गेलाय ?

000

"हाय ,जानु !"

समोर एक अल्ट्रा मॉडर्न 'मॉडेल ' उभं होत ! आयटम !

"कोण ? मी ? "

"हा तूच ! मी अमृता ! अन तू ?"

" स स सुरेश , पण आपण कधी भेटलो नाहीत , आपली ओळख पण ----"

"आत्ता पर्यंत भेटलो नाहीत . पण या पुढे भेटत रहाणार आहोत ! "

"म्हणजे ?"

" अबे ,फार भाव खाऊ नकोस ! इतके दिवस कुठे होतास ? तुझ्या सारखा 'पार्टनर ' मी झायगोट मध्ये होते तेव्हा पासून शोधतीय !"

"झायगोट ?"

"म्हणजे 'अंड्यात '!"

याsssहु ! म्हणजे हिला मी इतका 'सुंदर 'दिसतोय तर ! म्हणजे म्हातरबाबा खरच वरदान देवून गेलाय ! जिओ यार !

"अमृता !क्युट ! तू काय करतेस ?"

"मी माय -बापाचा पैसा उडवते ! त्यातला एक मार्ग म्हणून कॉलेजला जाते ! रात्री डेटिंगला येणार ?पब मध्ये जावू !"

हे जरा अति होणार . पहिल्याच भेटीत डेटिंग !

"सॉरी यार , मी एकदम कडका आहे ! नो मनी , नो जॉब ! सो तू कर एन्जोय !"

" अबे ,बेकुफ ! मी ,हि 'अमृता ' तुला इन्व्हाईट करतीय ! तू फक्त ये ! अन हे तुझे भिकार कपडे काढून टाक !"

" बापरे ! म्हणजे तू मला 'तसाच ' नेणार ?"

" फनी ! तू न इंटरेस्टिंग वाटायला लागलास ! चार दोन 'ली 'च्या जीन्स आणि टी -शर्ट घेवून टाकू !"

मग काय ? शॉपिंग , पब, पार्टी झाली ! खूप चंगळ झाली ! तेव्हा पासून माझे दिवस(आणि रात्री सुद्धा ) पालटले !

000

खरच माझे दिवस पालटले आहेत .पार्टी ,पब ,डेटिंग सगळे चालूच आहे . तसा मी मजेतच आहे . पण आनंदात नाही ! सुंदर पोरींच्या गराड्यात असतो , पण हल्ली मला आतून पोकळ असल्याच्या भास होतोय ! माझं म्हणावं असं काहीतरी मी गमावून बसलोय ! माझं माझं एक निवांत जग होत. ते कुठं गेलाय ? तेव्हा मी उदास जरूर असायचो पण मनात पोकळी कधीच जाणवली नाही . तलावाकाठी बासरी वाजवताना स्वतःला विसरायला व्हायचं , आत्ता तस होत नाहीय . परवा असाच बासरी वाजवत बसलो तर ती धूण धुणारी बाई ,धूण सोडून माझ्या आसपास उगाच घुटमळू लागली ! माझ जग माझ राहीलच नाही . इतरच त्यात ज्यास्त लुडबुड करताहेत !बस स्टोपवर उभारलो तर, एखादी 'स्कुटी 'लिफ्ट देते ! कोणी फ्लाइंग कीस भिरकावत ! कोणी हळूच डोळा मारत ! कोणी -----जावू द्या . तो म्हातारा 'तुला कळना तू काय मागतुयास ' , का म्हणाला हे आता कळतय !

हे 'सुंदर दिसण ' वरदान नसून एक शापच ठरतोय ! मीच मागून घेतलेला शाप !मी प्रत्येकाला सुंदर दिसतोय . समजा एखाद्याला लांब ,रेशमी केस आवडत असतील तर मी त्याला तसा दिसेन ! समजा एखाद्याला निळे डोळे प्रिय असतील तर त्याला माझे डोळे राजकपूर सारखे निळे दिसणार !मी माझ पार ' खेळण ' करून घेतलय !हा पोरींचा गराडा खरा नाही , कारण तो माझ्यासाठी नाहीचय ! मी त्यांची फक्त एक कल्पना झालोय ! त्याचं प्रेम , किवा आकर्षण -जे काय असेल ते खोट आहे अस मुळीच नाही ! त्या त्यांच्या कल्पनेवरच जीव ओवाळून टाकत आहेत . माझ्यावर नाही ! मी त्यांच्या स्वप्नातला 'राजकुमार 'नाही ,तर माझ्यात तो त्यांना दिसतोय ! उलट मीच त्यांना फसवतोय , अस गिल्टी फिलिंग येतंय ! मी काय गमावलय हे आता माझ्या लक्षात येतंय !

मी करू तरी काय ? अहो , चार वेळा त्या रेल्वे क्रासिंगला जावून आलोय , पण तो म्हातारा बाबा काही दिसला नाही . त्यालाच विचारले असते कि यातून बाहेर कसा पडू ?

000

या ' सुंदर ' दिसण्याला वैतागून हल्ली मी हुडी वापरतोय ! त्याची कॅप नाकापर्यंत ओढून मगच बाहेर पडतो . माझ्या घरा पासून जवळच एक छान तळ आहे . त्याच्यात काही बदक फिरत असतात . चार -सहा पांढरी कमळ पण आहेत . तळ्याकाठी विरळ झाडी आहे . दूर दूर दोन झाडांन मध्ये काही सिमेंटची बाकडी टाकली आहेत . सकाळ -संध्याकाळ बरेचजण तेथे येवून बसतात . मीही बरेचदा येथे तीन चार कप कॉफी थर्मास मध्ये घेवून येतो . कॉफी सोबत रात्र पडे पर्यंत एखादे बाकडे अडवून बसतो . आजही असाच आलोय .

थर्मास बाकड्यावर शेजारी ठेवला . त्यातून अर्धा कप कॉफी काढून घेतली आणि बदकांच्या समुहाचा 'वाटर -स्पोर्ट्स 'पाहत कॉफीचे गुटके घेत निवांत बसलो होतो .

मंद सुगंध जाणवला . समोर एक 'हटके ' तरुणी ट्रायपॉडला ड्रोइंग बोर्ड लावत होती . ती चित्रकार असावी . 'हटके ' यासाठी कि ती चार - चौघी सारखी नव्हती . तिच्या उंच सडसडीत बांध्याला ,तिने घातलेला खादीचा तो नेहरुशर्ट शोभून दिसत होता . खाली जीनची पॅन्ट आणि पांढरे कॅनवास शूज . हातात घड्याळ आणि कानात कुड्या , बाकी इतर दागिना नव्हता . पाठीवर एक सॅक होती . त्यात बहुदा चित्रकलेचे साहित्य असावे . रेखीव चेहरा .किंचित जाड भुवया तिच्या मूळच्या निरागस लूक मध्ये भरच घालत होत्या . केसांची पोनी टेल . ओंजळभर गार पाण्याच्या हबक्या शिवाय तिने कुठही मेकप केला नसावा . ती तल्लीन होवून पेंटिंग करत होती . या क्षणी ती खूप सुंदर दिसत होती . इतके नैसर्गिक सौंदर्य मी आजच पहात होतो . तिने तिचे ते पेंटिंग संपवले . सगळे सहित्य आवरून इकडे तिकडे नजर टाकली . माझ्या बाकड्यावरच्या रिकामी जागा बघून तडक माझ्या दिशेने आली .

"एस्कुज मी , में आई सीट हेअर ?" तिच्या आवाजाचा हेल कानडी होता .

"एस ,प्लीज ! "

"थान्क्स !"

आपल समान पायाशी ठेवत ती माझ्या शेजारी बसत म्हणाली .

"आर यु आरटीस्ट ?"

" या , आय डू लांन्दस्केप्स आन पोत्रेतस "

" इट्स ग्रेट !विल यु लाईक तू ह्याव सम कॉफी ?"

" कॉफी ?हेयर ?आट थिस मोमेंट ?" तिच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हते .

मी कॉफीचा कप तिला दिला .

"डू यु नो मराठी ?"

"ना "

"हिंदी ?"

"थोडा ,थोडा . "

"आप साउथ से है ?"

" या . फ्राम्म माय्सुर .माय सेल्फ द्रोणावळी . "

द्रोणावळी ! तिच्या सारखेच तिचे नाव पण 'हटके ' होते .

तिने ती कॉफी चवीने पिली .

"थान्क्स ए लॉट ,मिस्टर ----?"

"सुरेश "

"सुरेश , आय वाज ब्याडली इन नीड ऑफ कॉफी ! कॉफी बहुत सुंदर था ! "

ती रिकामा कप परत करताना म्हणाली . क्षणभर तिने मला तिच्या 'कलावंत 'नजरेने निहाळले . माझे लक्ष तिच्या कानातील कुडीच्या टपोऱ्या आकाशी फिरोजखड्यावर होते . सावळ्या कांतीवर तो खुलून दिसत होता .

"मय आपका स्केच बनाना चाहती हु !"

आता हि बया माझ्या सारख्या विद्रुपाचा स्केच का करतीयय ?अरे हो , हिला पण मी छानच दिसणारकि !

"हा ,ठीक है . बना दिजीये . " मी सावरून बसलो .

"आपका ओ सरपेका हूड हाटा दो . सुरज कि ओर देखिये , का के फेस पे लाईट आये . "

साधारण पंधरा वीस मिनिटे ती तिच्या छोट्या pad वर पेन्सिलने स्केच करत होती . पुन्हा काय झाले माहित नाही . तिने कॅनवास फ्रेम काढली . माझ्या समोर ती तिने ट्रायपॉडवर लावली . सरासरा एक्रेलिक ट्यूब मधले कलर्स पॅलेट मध्ये पिळून घेतले . तास भर एकाग्र चित्ताने ती माझे पोट्रेट बनवत होती .

"सुरेश ,आईए प्लिज ,देखिये आप कैसे दिखाते है. "

मी उठून तिच्या कॅनवास पर्यंत गेलो आणि तिने काढलेला माझा 'अवतार ' पहिला .

मी डोळे फाडून पहातच राहिलो .

कारण ----

तिने माझे पोर्टेट हुबेहूब माझ्या सारखेच म्हणजे ,आरशात मला माझे प्रतिबिंब दिसते तसेच काढले होते !

मी हिला असाच दिसतोय ? हिच्या ' सौंदर्याची ' कल्पना -----

"क्या मै आपको ऐसा दिखता हू ?"मी स्वतःला सावरत विचारले .

"नही ! आप इस पोट्रेटसे भी ज्यादा हँडसम है ! "

" आर यू जोकिंग ?"

" नो ! आप मिरर मे देख लिजिए ! "

"क्या मै आपको बदसुरत नाही लगता ?"

"बदसुरत ?"

"अग्ली !"

" नही ! हा आपके बाल थोडे बढादिजे ,जैसे मैने पोट्रेट मे दिखाये है . आपके फेसको सूट करेंगे ! बाकी अच्छा है .और हा एक बात ध्यान में रखे . "

" कोन सी बात ?"

" नथिंग इज अग्ली !डोन्ट सर्च इट !"

तोवर तिने काढलेले माझे पोर्ट्रेट पाहण्या साठी बरेच जण आजूबाजूला जमले होते . कोणीतरी कचकन फोटोचा फ्लॅश मारला . मी त्याच्या कडे पहिले . पांढरा शर्ट ,पांढरी पॅन्ट घातलेला तो एखाद्या टुरिस्ट सारखा दिसणारा माणूस मला थम्सप करून शुभेच्छा देत होता !कोण असावा ? आणि अंगठा दाखवून सलगी करण्याइतपत तोंडओळखीचा आहे का ? पण याला कोठे तरी पहिल्या सारखं वाटतंय . अरे हा हा तर तो रेल्वे क्रॉसिंग वाला म्हातारं बाबा , याचे पण केस अन दाढी पंढरीच आहे ! मी मान वर करून आवाज देई पर्यंत तो लोकांच्या गर्दीत हरवून गेला !

" थँक्स , सुरेश . अब मै चालती हू . बाय ! "

मी तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बराच वेळ पहात होतो .

'नथिंग इज अग्ली !' हे तिचे वाक्य कानात घुमत होते !

ती बसलेल्या रिकाम्या जागेकडे माझी नजर गेली . तेथे तिचे व्हिजिटिंग कार्ड होते !

मी मैसूरला जाण्याचा विचार पक्का केला .


Rate this content
Log in

More marathi story from Suresh Kulkarni

Similar marathi story from Romance