Amar Misal

Drama

3  

Amar Misal

Drama

शामी - भाग - ५

शामी - भाग - ५

6 mins
232


आप्पा आणि माईने अगदी सोयीस्कररीत्या शामीची बाजू घेतली पण शामीच्या अशा वागण्याने काही अघटित घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने भीमाला चिंता लागून राहीली होती. इकडे दिवसेंदिवस शामीच्या कुरापती वाढत चालल्या होत्या. आप्पा, माई आणि भीमा सोडले तर सर्व जग जणू तिच्यासाठी अगदी परके झाले होते. शामी कधी शांत तर कधी अचानक समोरच्या व्यक्तीच्या अंगावर धावून जाई. कधी तळ्यात तासनतास मनसोक्त विहार करत बसे. भीमा बिचारा तीला बाहेर काढण्याची शर्थ करी पण शामी त्याला चकवा देत इकडून तिकडे तिकडून इकडे असे हेलपाटे मारीत राही. शेवटी भीमा कंटाळून घराच्या दिशेनी जाताना पाहून मग हळूच पाण्यातून बाहेर निघून त्याच्या मागेमागे चालत राही. कधी एकटीच धावत शेताच्या दिशेनी दूरवर जाऊन उभी राही. मग त्या वाटेने ये-जा करणाऱ्यांना मुठीत जीव घेऊन तीची नजर चुकवत स्वतःची सुटका करून घ्यावी लागे. अशी थोडी लहरीबाज झाली होती ती.


सायंकाळचे साधारण सहा वाजले होते. आकाश भ्रमंती केलेला सुर्य हळूहळू लुप्त होऊन अंधाराचं साम्राज्य उदयास येत होतं. दिवसभर शेतात काम करून थकलेले जीव लगबगीनं आपापल्या घरी चालले होते. काही बैलजोड्या एकामागोमाग एक बैलगाडी ओढत गळ्यातल्या घुंगरांचा खळखळ आवाज करत दिमाखदार चाल करत निघाल्या होत्या. मागोमाग, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या छोट्या झाडांचे शेंडे खुरडत शेळ्या न त्यांची पिल्ले एखाद्या पहारेकऱ्यासारखी सावध चाल करत चालत होते. त्यांच्या जोडीला एखादा कुत्रा कधी गाडीच्या मागे कधी पुढे करत एकसारखा धावत राही. गाडीत बसलेल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर गाडीत बसल्याचं वेगळंच अप्रूप होतं. त्यांच्या तो आनंद पाहून गाडीमागून चालत येणाऱ्या त्यांच्या आयांचा उर समाधानाने भरून येई.


जागोजागी कापसाचे ढीग रचून ठेवल्यासारखे पांढरे शुभ्र ढग उंचच उंच आकाशात हळुवार स्थिरावल्यासारखे दिसत होते. त्यांना बगल देत निळ्याभोर छताखाली जणू धावण्याची स्पर्धा लागल्याने आपल्या पंख रुपी पायांना गती देत पांढऱ्या बगळ्यांचे थवेच्या थवे आपापल्या घरी परतत होते. चार पाच पोपटांचं टोळकं डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोचं दूरवर दिसेनासं व्हायचं. अधून मधून कानी पडणारी कोकीळ पक्षाची मधूर तान मनाला तृप्त करी. कधी उगाच कावकाव करणारा कावळा आपल्या कर्णकर्कश आवाजाने त्यात अवरोध उत्पन्न करी. तर कधी तळ्याच्या काठाला ओबडधोबड खडकावर बसलेली टिटवी टिव टीव आवाज करत जीव घाबरवून सोडी. इकडे खंड्या पक्षी मात्र आपलं सावज टिपण्यात गुंग राही. तळ्यातल्या पाण्याच्या पृष्ठभागापासून काही अंतर अगदी वर आपले तपकिरी -निळ्या रंगाचे पंख एकसारखे फडफडवत एकाच जागी स्तब्ध राहून आपले सावज टिपण्याची योग्य संधी शोधी. मग पुढच्याच क्षणी धनुष्यातून सुटलेल्या बाणाच्या गतीने पाण्यात झेप घेत चोचीत वळवळ करणारी मासळी घेऊन उडत दूरवर झाडाच्या शाखेवर जाऊन यथेच्छ ताव मारी. त्याचं ते कौशल पाहून खुपचं नवल वाटे. 


अंधार पडायला सुरुवात होण्याची चिन्हे जाणवू लागल्यानं ऐन रंगात आलेला डाव काही वेळातचं थांबवावा लागणार होता. त्यामुळे गावंदरीत खेळणाऱ्या मुलांचा पुरता हिरमोड झाला. इकडे भीमा शामीला घेऊन तळ्यावर आला होता. नेहमीपेक्षा आज थोड्या उशिराने आल्याने तळं आणि काठावर कोणाचीही चाहूल नव्हती. त्यामुळे एरव्ही जनावरांच्या हालचालींनी गढूळ असणारं तळ्याचं पात्र आज स्वच्छ, निर्मळ वाटत होतं. शामी पाण्यात उतरून मनसोक्त डुंबण्यात रमली आणि भीमा काठावर शांत बसून तळ्याचं विविधतेने नटलेलं पात्र न्याहाळत होता. तळ्याच्या पाण्यात काही छोट्या माशांची एकसारखी चुळबुळ चालू होती. अधून मधून पाण्यातून डोके बाहेर काढून वळवळ करणारे साप आता काठावर दगडांच्या फटीत असलेल्या बिळात शिरताना दिसत होते. दूरवर पाण्यात बदकांचं एक जोडपं संथ गतीने चौफेर भ्रमण करत होतं. आपली सतत लवलवणारी मान आणि सावध पाऊले टाकीत एक काळा पांढरा बगळा अजूनही तळ्याच्या पाण्यात आपले भक्ष असलेल्या मासळ्यांना चोचीने टिपण्यात व्यस्त होता. पल्ल्याडच्या काठावर काही उनाड भटकी कुत्री आपली तहान भागविण्यासाठी तळ्याच्या पात्रात उतरलेली दिसत होती. मुळातचं पशुपक्षांना, जलजीवांना बारकाईने न्याहाळत बसण्याची आवड असलेल्या भीमासाठी आजचं हे दृश्य म्हणजे सुखाची नांदीच होती. 


इकडे शामी पाण्यात जलक्रीडेचा मनसोक्त आनंद घेत होती. कधी आपले दोन पाय वर करत पाण्यात एका कुशीवर पालती होई तर कधी बराच वेळ नाक पाण्यात कोंडून ठेवी व कोंडण्याची क्षमता संपली की एखाद्या कारंजातून पाणी चौफेर उधळावे तसे आपल्या नाकातून उंचच उंच उधळी. कधी पाण्याच्या तळाशी दिसेनाशी होऊन भीमाचा जीव घाबरवून सोडी. कधी क्षणात पोहता पोहता खोलवर आत जाऊन परत माघारी येई. शामीच्या या लीला भीमा अगदी कुतुहलाने पाहत राहायचा. आजही भीमा तसाच बसून सर्व न्याहाळत होता. तितक्यात मागे कोणीतरी असल्याची जाणीव होऊन त्याने मागे वळून पाहिलं. एक छोटा मुलगा तळ्याच्या कठड्यावर हात ठेवून अलगद तळ्यात डोकावत होता. साधारण पाच वर्षांचा असावा तो. इतका लहान मुलगा एकटाच तळ्याच्या काठावरून असा डोकवत असल्याचं पाहून भीमाला थोडं नवल वाटलं. कोणीच कसं नव्हतं त्याच्या सोबत. असं डोकावून पाहताना चुकून तोल गेला तर होत्याचं नव्हतं होईल असं वाटून भीमा त्याला सुरक्षित आपल्या ठिकाणी घेऊन यावं या विचाराने उठला. तोचं मागून त्या लहान मुलाला कोणीतरी आवाज देत असल्याचं जानवल्यानं भीमा जागीच थांबला. मुलासोबत कोणी असल्याची जाणीव होऊन त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि तसाच पुन्हा पाठमोरा खाली बसला. 


आवाजाची तीव्रता आता पहिल्यापेक्षा अधिक जाणवू लागली होती. कोणीतरी तळ्याच्या दिशेनी त्या मुलाला आवाज देत पुढे पुढे चालत येत असल्याचं जाणवत होतं. आवाजामध्ये एकप्रकारचा गोडवा, हळुवारपणा होता. पंचेंद्रियांना मंत्रमुग्ध करणारा तो मधुर आवाज वाऱ्याच्या धुंद लहरींवर स्वार होऊन भीमाच्या हृदयाचा एकसारखा ठाव घेत होता. वसंत ऋतूच्या संबंधात झाडांच्या फांद्यास अकस्मात पालवी कशी फुटते हे अनाकलनीय आहे. ज्याप्रमाणे ते पालवी फुटणे थांबून ठेवणे हे झाडाच्याही स्वाधीन नसते त्याप्रमाणे येणाऱ्या आवाजाकडे आकर्षित होण्यापासून स्वतःला थांबून ठेवणेही भीमाला अशक्य होतं. आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसतसं भीमाचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. मागे वळून पाहण्याचंही धाडस त्याच्याने होत नव्हतं. काय करावं या एकाच विवंचनेत भीमा सापडला होता. तोचं मागून येणारा तो आवाज अचानक थांबला. क्षणार्धात, आपलं काहीतरी हरवल्याची, आपल्यापासून दूर गेल्याची भावना त्याच्या मनी दाटून आली आणि त्याला खुप वाईट वाटलं. कदाचित ते दोघे गेले असावेत. एकदा वळून मागे पाहिलं असतं तर मनाला वेड लावणाऱ्या त्या आवाजा मागचं रहस्य उलघडलं असतं. हे वाटून त्याला खुप अपराधी वाटत होतं. शेवटी भीमाने निराश चेहऱ्याने मागे वळून पाहिलं आणि त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. काही क्षणांपूर्वीचे निराशेचे मळभ दूर झाले होते. मनातली ती प्रेमळ चाहूल पुन्हा एकदा पल्लवित झाली होती. ज्याप्रमाणे वर्षा ऋतु आला की आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब्ध होऊन जाते किंवा वसंत ऋतु आला की वनाची शोभा दुपटीने वाढते त्याप्रमाणे " तिच्या " असण्याने तळ्याच्या काठाचं सौंदर्य अधिकच वाढलं होतं.


दिसायला अगदी साधी सिम्पल पाहताच क्षणी आवडेल अशी. स्मित चेहरा, समुद्राच्या खोल आणि नितळ पाण्यासारखे मृगनयनी डोळे, काळेभोर लांबलचक केस, वाऱ्याच्या झोक्यासरशी हळुवार झुलणारी तिची ओढणी. पाहतंचं राहावं अशी. कदाचित शहरात राहणारी असल्यामुळे गाव आणि गावाकडच्या अनेक गोष्टींबद्दल मनात अनामिक कुतूहल असणारी काहीशी. आज पहिल्यांदाच तळ्यावर दिसली होती ती. भीमाला तीचा तो साधेपणाचं खुप भावला होता. कदाचित तीलाही नितळ, शांत असं तळ्याचं पात्र खुप प्रसन्न वाटलं असावं म्हणून ती तिथेच कट्ट्यावर बसून चौफेर नजर फिरवत होती. काही वेळातच तीची नजर पाण्यात डुंबणाऱ्या शामी अनं काठावर बसलेल्या भीमाकडे गेली. ती, शामी अनं आपल्याकडेचं पाहत असल्याची चाहूल लागून भीमा मात्र थोडासा अवघडल्यासारखा झाला. ती थांबल्यामुळे तीला पाहता येण्याचा आनंद होताचं पण छातीत उगाच होणारी धडधड भीमाचं मन घाबरवून सोडी. काय करावं भीमाला सुचत नव्हतं. तेवढ्यात शामी पाण्यातून बाहेर येऊन घराच्या वाटेला लागली. भीमाही मग थांबण्याची इच्छा असतानाही शामीच्या मागे मागे चालू लागला. इकडे शामीचं ते भरदार व देखणं रूप पाहून " तीची " नजर दूरदूर जात असलेल्या शामीच्या पाठमोऱ्या छबीवरचं खिळून राहीली. 


आता भीमा रोज शामीला सायंकाळी थोडं वेळ करूनचं तळ्यावर घेऊन येऊ लागला. ती आजही येईल, तिला पुन्हा पाहता येईल या एकाच आशेने तळ्याच्या त्या कट्ट्याकडे एकटक पाहत राहायचा. वासरू तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटते. एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार असाच आहे. त्या प्रेमाच्या योगाने आपल्या आवडत्या व्यक्तीला एकदा पाहिलेले असले तरी पुन्हा पुन्हा डोळे भरून पाहावेसे वाटते. ज्याप्रमाणे आवडत्या विषयाचे एकदा रसग्रहण केले तरी रसग्रहणा विषयीची इच्छा दुपटीने वाढतच जाते. त्याप्रमाणे भीमाची तीला पाहण्याची इच्छा प्रबळ होत चालली होती. तीही मग न चुकता शामीला पाहण्यासाठी तळ्यावर येऊ लागली. शामीला पाहण्याच्या बहाण्याने ती आता हळूहळू भिमाकडेही आकर्षित होऊ लागली होती. कधी तळ्याच्या कट्ट्यावर, कधी काठावर बसलेल्या भीमाच्या अगदी मागून चालत तळ्याच्या पल्याड असलेल्या खडकावर बसून पाण्यात पाय झुलवत भीमकडे पाहत राही. भीमाही पुरता तिच्यामध्ये हरवून गेला होता...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama