शामी - भाग ४
शामी - भाग ४
भीमाने घडलेली सर्व हकीकत माई आणि आप्पांना सांगितली. ते ऐकून दोघंही अगदी निशब्द झाले. माईचे डोळे पाण्यानं भरून आले. शामीने आपला जीव धोक्यात घालून माईचा जीव असणाऱ्या भीमाला पुनर्जन्म दिला होता. आज शामी नसती तर तीचा लाडका भीमा कुठेच दिसणार नव्हता. सर्वांपासून कायमचा दूर कधी ही न संपणाऱ्या प्रवासात काळाच्या पडद्याआड झाला असता या नुसत्या विचारानेच माईच्या डोळ्यांच्या कडा ओसंडून वाहायला लागल्या. आप्पा आणि भीमाने मग तीला सावरलं.
शामी तर सर्वांची आधीपासूनच लाडकी होती. त्यात तीने भीमासाठी जे केलं होतं त्याची परतफेड करणं कधीच शक्य नव्हतं. माई, आप्पा, भीमा शामीला खुप जपायचे. शामी दिवसेंदिवस मोठी होऊ लागली. ती आता पाच वर्षांची झाली होती. सरणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक शामीच्या अंगी विलक्षण बळ येत होतं. तीचं रूप पहिल्यापेक्षाही मनमोहक दिसत होतं. पण वाढत्या जोशाबरोबरच एकेकाळी शांत, संयमी, सर्वांचा लळा असणारी शामी आता आपले - परके असा भेदभाव करू लागली होती. भीमाच्या कॉलेजमुळे मध्यंतरीची काही वर्षे भीमाचं शामीकडे थोडं दुर्लक्ष झालं. माई आणि आप्पांची लाडकी असल्यामुळे शामीच्या वाढलेल्या कुरापतींकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं.
आज भीमा बऱ्याच दिवसांनी शामीला रानात घेऊन जायला घरातून निघाला. नेहमीप्रमाणे भीमा पुढे आणि शामी त्याच्या मागोमाग चालत होती. अचानक मागून कोणीतरी घाबरून ओरडण्याचा आवाज आला आणि भीमाने दचकून मागे पाहिलं. एरव्ही मायेने कुरवाळून घेणारी शामी आज चक्क घरासमोर खेळणाऱ्या छोट्या पिंटू च्या अंगावर धावून गेली होती. ते पाहून घाबरलेली त्याची आई जोरात ओरडतंच त्याला वाचवण्यासाठी धावली पण शामी पुन्हा तिच्यावरही धावून जाण्याच्या तयारीत होती तोचं भीमाने शामीला रोखलं. नशीब बलवत्तर म्हणून पिंटूला काही इजा झाली न्हवती. पण शामीचं असं बदललेलं रूप पाहून काही क्षणांसाठी भीमा आ वासून शामीकडे पाहतंच राहीला. मग भानावर येत घाबरलेला पिंटू आणि त्याच्या आईला धीर देत त्यांची माफी मागून भीमा शामीला घेऊन पुढे निघाला. शामी या आधी कधीच असं वागली नव्हती. मग आजच का वागली असेल असं?? पिंटूने काही केलं असेल का ? पण तो इवडुसा पोरगा..तो काय करणार शामीला?? असे एक ना अनेक प्रश्न क्षणार्धात भीमाच्या डोक्यात तरळून गेले.
विचारांच्या गर्तेत पायातला रस्ता कधी मागे सरला भीमाला कळलंच नाही. भीमा आणि शामी रानात येऊन पोहोचले. नेहमीप्रमाणे शामी चरण्यात दंग आणि भीमा झाडाच्या गर्द सावलीला विसावा घेत होता. आज आडावाच्या रामूनेही त्याच्या गुरांना पलीकडल्या रानात चारायला सोडली होती. चौफेर हिरवागार चारा असल्याने गुरंही चरण्यात इतकी गुंग होऊन जायची की, खाली मान घालून चरता चरता आपण कुठे येऊन पोहोचलो त्यांचं त्यांनाच कळायचं नाही. काही वेळाने मग मान वर केली की कदाचित आपण खुप दुर आलो याची जाणीव होऊन त्यांच्या नजरा आपल्या मालकाला शोधत राहायच्या. पण एकदा का मालक दिसला की पुन्हा मान खाली घालून त्यांचं चरनं चालू होई. असंच काहीसं आज झालं होतं. आडावाच्या रामूची म्हैस चरता चरता शामी असलेल्या रानात येऊन पोहोचली. भीमाचं लक्ष गेलं पण दोघीही अगदी शांतपणे चरण्यात दंग आणि या आधीही बऱ्याचदा रानात चरताना एकमेकींना सोबत होती त्यांची त्यामुळे भीमा बिनधास्त होऊन स्वतःच्या विचारातच गुंग होता. पण मध्यंतरीच्या काळात शामीच्या वागण्यात बराच बदल झाला होता याबद्दल त्याला मुळीच कल्पना नव्हती.
चरता चरता शामीला तीच्या आजूबाजूला कोणी असल्याची चाहूल लागल्यानं तिनं मागे वळून पाहिलं. भीमाचीही नजर शामीकडे गेली. शामीचं वागणं भीमाला थोडं विचित्र वाटलं. शामी वर मान करून एकटक तिच्याकडे पाहत काही वेळ स्तब्ध उभी होती. रामूची म्हैस मात्र मान खाली घालून चरण्यात गुंग होती. काही वेळाने शामी मंद मंद पावले टाकीत तीच्या जवळ जावू लागली. तिनेही चाहूल लागून मग एक कटाक्ष शामीवर टाकला आणि पुन्हा खाली मान घालून चरायला सुरवात केली. काही क्षणात विचित्र प्रकार घडला. शामी तिच्यावर अचानक धावून गेली. तिनेही मग स्वरक्षणार्थ शामीला रोखण्याची शर्थ केली. दोघींची मस्तके एकमेकांना भिडली. जणू बरसण्या आधी मेघांनी एकमेकांना टक्कर दिल्यासारखं जाणवलं. दोघींनीही अंगी असणारं बळ एकवटून हल्ला-प्रतिहल्ला चालू ठेवला. त्यांच्या या झटापटीत त्यांना इजा होण्याची शक्यता जाणवल्याने भीमा आणि रामू धावतंच येवून त्यांचं भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण शामीला जोर चढला होता.
शामी अगदी बेभान होऊन तिच्यावर चाल करून जात होती. तीही स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. भीमा आणि रामू दोघींना एकमेकीपासून दूर करण्याचा एकसारखा प्रयत्न करत होते पण यश येत नव्हतं. शेवटी शामीच्या शक्तीपूढे निभाव लागणं शक्य नसल्याने रामूची म्हैस कशीबशी सुटका करून घेत काही अंतरावर जाऊन धापा टाकत उभी राहिली. पण शामी अजूनही त्याच त्वेषात होती. तीने आपलं लक्ष क्षणार्धात बदलून बाजूला उभ्या असलेल्या रामूच्या अंगावर धाव घेतली. आपल्या मस्तकाने रामूवर जोरदार हल्लाबोल केला. रामू बिचारा बेसावध स्थितीत झालेल्या हल्ल्यामुळे काही कळायच्या आतंच सखलातल्या वावरात बांधावरून फरफटत खाली फेकला गेला. शामीचं हे रौद्ररूप पाहून भीमाला धक्काच बसला. भीमाने पुढे येत शामीला दूर लोटलं आणि खाली पडलेल्या रामूकडे धावत गेला. रामूच्या हातापायाला खुप खरचटलं होतं. गुडघ्याच्या खरचटलेल्या भागातून एकसारखं रक्त ओघळत होतं. अंगावरचे कपडे मातीमुळे मलीन झाले होते. जखमांमधून आग बाहेर पडल्यासारखं वाटून तो एकसारखा विव्हळत होता. भीमाने त्याला उठवत एका झाडाखाली बसवले. बाटलीतील पाणी प्यायला दिले. हातापायाच्या जखमा पाण्याने स्वच्छ करून बांधावर असणारा टिक्कीचा पाला दगडाने चेचून त्याचा लेप लावला. रामूला थोडं झोंबल मग काही वेळाने थंडगार वाटू लागलं. झालेल्या सर्व प्रकारामुळे भीमा निःशब्द होवून शामीसह परतीच्या मार्गाला लागला.
घडलेला सर्व प्रकार भीमाने माई आणि आप्पांच्या कानावर घातला. त्यावर त्या दोघांनी शामीची बाजू घेत सोयीस्कररीत्या तीच्या चुकांवर नेहमीप्रमाणे पांघरूण घातलं होतं. पण शामीचं हे रूप भीमाला थोडं काळजीत टाकणारं वाटलं. आज जे पाहिलं होतं त्याची भीमाने स्वप्नातदेखील कल्पना केली नव्हती. यावर काहीतरी उपाय लवकरच शोधावं लागेल असं मनाशी ठरवून भीमा तूर्तास शांत राहीला.
(क्रमशः)
