Amar Misal

Drama

4.3  

Amar Misal

Drama

शामी भाग-१

शामी भाग-१

4 mins
383


वर्तमानकाळ :


"हो शामी... शामीच म्हणायचे सर्व तिला..."


("शामी या कथेतील मुख्य पात्र आहे. या पात्राबद्दल तूर्तास मी जास्त काही बोलू इच्छित नाही. तुम्ही कथा जसजशी वाचत जाल तसतसं हे पात्र तुम्हाला आपोआपचं उमगत जाईल.")


ती जन्मली तेव्हा आप्पानी प्रेमानी तिचं नाव "शामी" ठेवलं होतं. 

(आप्पा म्हणजे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती.आप्पांच्या आज्ञेने घरातली सर्व सूत्रे हालत असतं. वरून सक्त पण आतून तितकेच मृदु स्वभावाचे होते आप्पा.)


घरात सर्वांची अगदी लाडाची असल्यामुळे शामीची विशेष काळजी घेतली जायची. तिच्या खाण्या पिण्याची वेळेवर सर्व सोय केलेली असायची. तिलाही सर्वांचा खुप लळा लागला होता. जन्मतःच आईच्या मायेचं छत्र हरवलेल्या शामीनं आप्पा, माई आणि भीमा यांनाच आपलं कुटुंब मानलं होतं. शामीला एक हाक मारावी आणि पुढच्या क्षणी शामी हजर. आजही फक्त नाव जरी काढलं तरी तिच्या आठवणीने डोळ्यात नकळत पाणी दाटून येई. तिचं ते खोडकर बालपण, लोभस, प्रेमळ आणि निरागस चेहरा अगदी आजही दृष्टिपटलावर अलगद तरळून जायचा. कधी कधी मग ती नसल्याचं खूप दुःख होऊन भीमाला अपराध्यासारखं वाटे.

                

(भीमा हे या कथेतील दुसरं महत्वाचं पात्र आहे. कथेतील बराच भाग शामी आणि भीमा यांच्यावरच असणार आहे. भीमा हा आप्पांचा मुलगा. सावळा रंग, पिळदार शरीरयष्टी, गोल चेहरा, कुरळे केस, हातात कडा. गावाकडच्या मातीत लहानाचा मोठा झालेला असल्यानं गावरान भाषेतला गोडवा आणि रांगडेपणा स्पष्ट जाणवत असे.)


पण मग आज शामी का नव्हती????.... कुठे होती ती????.....सगळं इतकं सुरळीत चालू असताना असं काय झालं होतं की ज्यामुळे शामी आज तिच्या घरी नव्हती. तिच्या जीवाचं काही बरंवाईट तर झालं नव्हतं ना ????..... की मग ती स्वतःहून तिचं घर, तिची मायेची लोकं सोडून गेली असावी ????..... सर्वांनी कीती जीव लावला होता तिला पण मग आपल्या अगदी जिवाभावाच्या माणसांना असं पोरकं करून अचानक निघून जाताना तिला काहीचं वाटलं नसेल????..... इतक्या कठीण हृदयाची झाली असेल का ती????..... पडले ना प्रश्न तुम्हालाही, पण इथे सत्य काही वेगळंच होतं. काही क्षणांसाठी हृदय अगदी पिळवटून टाकणारं. ते सत्य म्हणजे, शामी स्वतःहून कोणालाही सोडून गेली नव्हती....!!  तिच्याच लोकांनी तिला स्वतःपासून दूर केलं होतं आणि तेही कायमचं. इतकं दूर की पुन्हा कधीच भेट होणं शक्य नव्हतं. कदाचित तिलाही त्याची जाणीव झाली असावी म्हणून शेवटच्या क्षणी चाललेली तिची घालमेल, डोळ्यातून एकसारखे ओघळणारे अश्रु आणि घाबरीगुबरी होऊन भीमाकडे आशेने पाहणारा तिचा तो केविलवाणा चेहरा आजही भीमाच्या हृदयाचा ठाव घेतो. विचारतो खडसावून एकच प्रश्न त्याला की, का?? ही कोणती शिक्षा आणि का देण्यात आली होती मला?? असा कोणता अपराध घडला होता माझ्या हातून म्हणून सर्वांच्या आयुष्यातून अगदी बेदखल करण्यात आलं होतं मला?? शेवटच्या क्षणी प्रश्न अनेक होते पण सर्व अनुत्तरीतच.


*************


भूतकाळ :

आजही शामीचं बालपण आठवलं की, मन अगदी द्वाड होवून खोडसाळपणे त्या जुन्या आठवणींच्या भोवती फेर धरून पिंगा घालायला सुरुवात करतं. सायंकाळची वेळ होती ती. आप्पा, माई नुकतेच शेतावरून येऊन चहा घेऊन बसले होते.

(माई म्हणजे आप्पांची बायको आणि भीमाची आई. मायेचा जीवंत वाहता झराचं जणू. अगदी लहान मुलांपासून ते जनावरांवर सारखीच माया करायची माई.)


काही वेळाने आप्पा उठले आणि घरातल्या गोठ्याच्या दिशेनी निघून गेले. भीमानेही मग पटकन चहा घेतला आणि आप्पांच्या मागोमाग घरामध्ये असलेल्या गोठ्यात अगदी लगबगीने गेला. आप्पा गोठ्याची सफाई करत होते. सफाई करता करता आप्पा छमाबाईला बारकाईने न्याहाळत होते.

(छमाबाई म्हणजे आप्पांच्या गोठ्यातील म्हैस. छमाबाई अगदी दोन वर्षांची होती तेव्हा आप्पांनी तिला खाटक्याकडून विकत आणली आणि तिला जीवदान दिले होते. छमाबाईनेही मग मोठी झाल्यावर घरात दूधदुभत्याची काही कमी पडू दिलेली नव्हती.)


छमाबाई आता वयस्कर झाली होती. त्यातच गेले काही दिवस प्रकृती स्थिर नसल्याने ती खुप थकल्यासारखी जाणवत होती. डॉक्टरांनीही विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं आप्पांना निक्षून सांगितलं होतं. तशी काजळीही घेतली जात होती पण छमाबाईची प्रकृती काही केल्या सुधारत नव्हती. त्यात पोटात बाळ असल्याने व कोणत्याही क्षणी बाळ जन्माला येईल अशी अवस्था असल्याने आप्पांना तिची खुप काळजी लागून राहिली होती. आज का कोणास ठाऊक पण छमाबाई खुपचं चलबिचल वाटत होती. सतत इकडून तिकडे, तिकडून इकडे अशी तिची एकसारखी घालमेल चालू होती. चेहऱ्यावर वेगळीच उदासीनता जाणवत होती. छमाबाईला काहीतरी त्रास होतोय याची हलकी चाहूल आप्पांना लागली असावी म्हणून त्यांनी जोरातच माईला आवाज दिला.. 


"अगं ऐकतेस का?? ये बिगिबिगी गोठ्याकडं"....!!

माईने मग दचकूनच उत्तर दिलं.. 

"हो आलो..ओरडायला काय झालं एकाएकी "...!! 


क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. छमाबाई धाडकन जमिनीवर कोसळली. तोंडासमोर असलेल्या दाव्यावर मान टाकून पाय लांब पसरून निपचित पडून राहिली. अचानक तोंडाकडून फेस यायला सुरुवात झाली. आप्पांची बोलतीच बंद झाली. नेमकं काय झालंय हे न कळल्यानं भीमाही पुरता गोंधळून गेला होता. तेवढ्यात माई लगबगीनं गोठ्यात आली. छमाबाईकडे पाहताक्षणी माईच्या काळजात चर्र झालं. माईला कळून चुकलं होतं की आता छमाबाईचं काही खरं वाटत नाही. निदान पोटातले बाळ तरी वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे याची जाणीव होऊन माईने लगबगीने भीमाला घराशेजारी असलेल्या गवताच्या व्हळीतुन डाल भरून पिंजार आणायला सांगितलं. भीमानेही मग होकारार्थी मान हालवत धावतचं जाऊन डाल भरून पिंजार आणलं. एव्हाना सर्व प्रकार भीमाच्या ध्यानात आला होता. छमाबाई थोड्याच वेळात एका बाळाला जन्म देणार होती. भीमाच्या कुटूंबात एक नवीन सदस्य येणार होता. अखेरीस ती वेळ आली आणि छमाबाईने एका गोंडस बाळाला जन्म दिला परंतु स्वतः मात्र आपल्या जीवन प्रवासाला शेवटचा विराम देऊन सर्वांचा निरोप घेत देवाघरी निघून गेली. आप्पा, माई आणि भीमाला छमाबाईच्या अशा अचानक जाण्यानं खुपचं दुःख झालं. काही दिवसांनी मग आप्पांनी नवजात बाळाचं "शामी" असं नामकरण केलं. तिचं होती सर्वांची लाडकी शामी..


शामीच्या खोडकर बालपणातील गमतीजमती, भीमा तिची घेत असलेली काळजी आणि त्या दोघांची जमलेली गट्टी याबद्दल सविस्तर कथा शामी - भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत.. त्याचबरोबर शामीचं पुढे काय झालं याबद्दलची हृदयद्रावक कथाही आपण पुढील काही भागामध्ये जाणून घेणार आहोत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama