STORYMIRROR

Amar Misal

Fantasy Inspirational

2  

Amar Misal

Fantasy Inspirational

एक आठवण....

एक आठवण....

6 mins
143

आजही लख्ख आठवतात ते दिवस....नवी स्वप्ने, नवी उमेद घेऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुंबई ते कोल्हापूर असा रात्रभर प्रवास करून सकाळी 8 वाजता कोल्हापूर CBS ला हातात बॅगा घेऊन अवघडलेला मी. (माझं मूळ गाव कोल्हापूर मधील एक खेडेगाव असल्यानं मी तिकडे प्रिफर केलं होतं) मला पाहताच एक ऑटोवाला धावतच रोड क्रॉस करून माझ्याजवळ आला. हातातली एक बॅग घेऊन....


ऑटो ड्रायवर: " बोला साहेब...कुठे जायचंय ?? "

मी : " काका....अरुण नरके फौंडेशन??" 

ऑटो ड्रायवर: " या बसा....सोडतो तुम्हाला. नवीन आहात वाटतं..?? " 

मी: " हातातली बॅग नीट ठेवत... हो काका. जस्ट मुंबई वरून उतरलोय. शहरात नवीनंच. "

ऑटो ड्रायवर: " मुंबई वरून कोल्हापूर...?? "

मी : " हो.... स्पर्धापरीक्षा अभ्यासासाठी नरके फौंडेशन जॉईन केलंय."

ऑटो ड्रायवर: " अरे वा.... छान. तुम्हाला यश मिळो हीच सदिच्छा. "

मी : "थँक्स काका..."

मग बोलता बोलता फौंडेशन आलं आणि बॅगा खाली उतरवत मी विचारलं.

मी : काका किती झाले....??

ऑटो ड्रायवर: " फक्त दोनशे. "

मी : दोनशे रुपये...?? एवढे कसे. हे जरा जास्तच सांगताय तुम्ही??

ऑटो ड्रायवर: अहो साहेब.... तितके होतातचं.

मी : " अहो काका.... मुंबईहून इथे आठ नऊ तास प्रवास करून ट्रॅव्हल ने पाचशे मध्ये पोहोचलो. तुम्ही वीस मिनिटांच्या प्रवासाला दोनशे सांगताय "

टॅक्सी ड्रायवर: " अहो साहेब मुंबईचं वेगळं इथे वेगळं.... असो दीडशे द्या.."


टॅक्सीमध्ये बसण्याआधी किती होतील हे नं विचारल्यामुळे आणि बोलण्याच्या ओघात माझा बऱ्यापैकी परिचय दिल्याने माझी फसगत झाली होती हे मला कळून चुकलं. मुकाट्याने दीडशे दिले आणि फौंडेशन चौकशी कक्षात पुढची विचारपूस केली. काही वेळाने राहण्याची सोय केलेल्या नव्या घरी निघालो. घराच्या मालकीण बाई दारात उभ्या माझी वाट पाहत होत्या. भेट झाली. प्रवासाबद्दल विचारणा झाली. मग कळलं CBS पासून बस ने अवघ्या दहा रुपयात पोहोचता आलं असतं. स्वतःवर खुप हसायला आलं.....


घराच्या owner ताईंनी माझी रूम दाखवली आणि शेअरिंग रूम असल्याने 1100 रुपये महिन्याचे भाडे असेल सांगून बॅगा ठेवायला सांगितल्या. मी होकारार्थी मान हालवत हातातल्या बॅगा रूम मध्ये ठेवून फ्रेश व्हायला गेलो. काही वेळात ताईंचा आवाज आला अनं चाय पे चर्चा झाल्या. दोन वेळच्या जेवणासाठी इथेच पुढच्या गल्लीत घरगुती खानावळ असल्याचे सांगून त्यांचा नंबर दिला. टॉयलेट, बाथरूम, कपडे धुवायचे असतील तर ती जागा, सुकवत टाकायची जागा असे एकंदरीत राहण्यासाठी आवश्यक सर्व नियम सांगण्यात आले. संपूर्ण घरात पाच रूम भाड्याने देण्यासाठी अगदी मोकळ्या होत्या. पण माझ्या व्यतिरिक्त तिथे कोणीही भाडेकरू अद्याप राहायला नव्हता. घरी ताई आणि त्यांच्या आई म्हणजे दोघीही ladies.... सर्व समजून घेऊन मी थोडं आराम करण्यासाठी दुसऱ्या फ्लोर वर असलेल्या माझ्या रूम मध्ये गेलो. रूम बऱ्यापैकी होती पण सोबत कोणीच नव्हतं. बाजूला असलेली रुमही खाली होती. 


नव्या जागेत अगदी एकट्याने राहण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. त्यात बोलायला घरातल्या दोन ladies सोडल्या तर कोणचं नव्हतं. पहिला दिवस असल्याने ताईंकडे कामानिमित्त फक्त एकदा जाणं झालं. झोपण्याचा प्रयत्न केला पण दुपारच्या उन्हाचा रणका खुप असल्याने काही केल्या झोप येईना. त्यात रूम मध्ये असलेला पंखा हायस्पीड वर देखील जीव नसल्यासारखा अगदी संथ गतीने फिरत होता. मुंबई मध्ये चोवीस तास गरगर फिरणाऱ्या पंख्याची सवय असल्याने गरमीने जीव पुरता नको झाला. घरच्यांची, मित्रांची खुप आठवण येऊन सर्वांना फोन झाले. रखरखीत उन्हाची दुपार ओसरून संध्याकाळ व्हायला चालू झाली. ताईंनी वर येत चहासाठी बोलावलं. मग चहा झाला आणि थोड्या गप्पाही. बघता बघता नऊ वाजले. ताईंनी दिलेल्या नंबर वर दुपारी फोन करून डबा द्यायला सांगितला असल्याने खानावळीतून माझ्यासाठी डबा आला ( महिन्याचे 1200 रुपये). डबा घेऊन वर रूम मध्ये गेलो. डबा खोलला अनं डब्यात नावडती भाजी पाहून जेवणाची इच्छाच गेली. आईच्या हाताच्या गरमागरम पिटलं अनं भाकरीची आठवण आली. आई असती तर असा विचार येऊन डोळ्यात पाणी तरळलं. गालावरून ओघळणारं पाणी पुसत रात्रभर तग धरून राहण्यासाठी कशीबशी एक चपाती आणि थोडा राईस खाल्ला. आईचा फोन आला. 


आई : जेवलास का....?? कसं होतं जेवण.... पोटभर खाल्लस ना....??

मी : हो अगं.... पोटभर जेवलो आणि जेवणही खुप छान आहे. तु नको माझी काळजी करू असं म्हणत विषय बदलला. इतर गप्पा करून फोन ठेवला.


रात्रीचे दहा वाजले. डोळ्यात झोप खुप होती पण जीवघेणा एकांत स्वस्थ पडू देत नव्हता. मुंबईच्या सतत धावपळीच्या जीवनाची सवय झालेला मी, कुठल्यातरी भयाण गुहेत एकटाच अडकल्या सारखं सतत वाटू लागलं. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर नुसती घालमेल चालू होती. 


सकाळ झाली. फौंडेशन क्लास दोन दिवसांनी चालू होणार होते. त्यात बोलायला कोणीच नव्हते. काही केल्या वेळ जात नव्हती. एक एक मिनिट मनावर दडपण आणत होता. आई, बाबा, दादा, मित्रांची एकसारखी आठवण येत होती. काय करावं काही सुचेना. कोल्हापूर ला उगाच आलो. नसतो आलो तर बरं झालं असत असं उगाच वाटून जीव रडकुंडीला आला. इथे काही आपला टिकाव लागणार नाही. उद्याच मुंबईला परत जावं अस सतत वाटू लागलं. पण मग आई, बाबा, दादा यांनी माझ्यासाठी पाहिलेली स्वप्ने....त्यांचा माझ्यावरचा विश्वास त्यांचं काय... असे अनेक विचार सतत मनात घोळत होते. शेवटी सर्व असह्य झालं आणि दादाला फोन केला. बोलता बोलता गहिवरून आलं अनं हुंदके देत रडणाऱ्या लहान मुलासारखा मीही रडायला लागलो. काही क्षण दादा गोंधळाला. नेमकं काय झालंय सतत विचारू लागला. मग थोडं शांत होत मनात उठलेल्या विचारांच्या, एकटेपणाच्या असह्य कोंडलेल्या वादळाला दिशा मिळाली. दादाला सर्व प्रकार समजला. एकट्याने राहण्याची पहिलीच वेळ असल्याने हे सर्व होत असल्याचं जाणून त्याने माझी समजूत घातली. तरीही राहायची इच्छा नसल्यास उद्या सकाळी मुंबईला परत ये.... आपण इकडे दुसरा क्लास पाहू अशी त्याने माझी समजूत काढली तेव्हा कुठे माझ्या मनाला थोडी उभारी मिळाली. मग फोन ठेवून मी थोडा शांतपणे विचार करत बसलो.


सायंकाळचे पाच वाजले आणि ताई वर आल्या. माझ्या रूमला लागून असलेल्या रुमचे कुलूप उघडून आत बॅगा ठेवण्याबद्दल कोणालातरी सूचना देताना दिसल्या. एकटेपणाला कंटाळलेला मीही मग लगबगीने जाऊन कोण आलंय ते पाहू लागलो. तीन चार मुलं मिल्ट्रीच्या लेखी परीक्षेसाठी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आली होती. त्यांना पाहून ती रात्र घालवण्यासाठी थोडा आधार मिळाला. मग रात्री त्यांच्याशी खुप गप्पा आणि छान मैत्रीही झाली. रात्री त्यांच्यासोबत त्याच रूममध्ये मीही झोपलो. इतकी गाढ झोप लागली की उठायला दहा वाजले. डोळे मिचमीचत पाहिलं तर बाकीची मंडळी आपापल्या अभ्यासात दंग होती. तोवर एकजण बोलला... अमर अरे तुझ्या रूममध्ये रहायला कोणीतरी आलं आहे. ते ऐकून मी पटकन उठून डोळे चोळतंच माझ्या रूममध्ये आलो. एक माझ्याच वयाचा मुलगा आपल्या बॅगेतून त्याला हवं असलेलं साहित्य बाहेर काढत होता. मी त्याची चौकशी केली. त्याच नाव अभिजित.माझ्यासारखा मराठी मुलगा. साधा, सिम्पल, बोलायलाही मनमोकळा. अगदी माझ्या मुंबईच्या मित्रांसारखा. त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे तोही नरके फौंडेशनमध्ये बँकिंग च्या क्लास ला आला होता. मग काय एकचं क्लास, एकच खानावळ, एकत्र अभ्यास चालू झाला.


मुंबईला परतण्याचा विचार क्लास संपेपर्यंत पुन्हा एकदाही आला नाही. सकाळी लवकर उठून अंघोळी. मग नाक्यावर नाश्ता करून क्लास ला निघायचो. एक वाजता क्लास संपला की मग घरी येऊन जेवण आणि दोन एक तास थोडी झोप. मग दोन तास स्टडी. सायंकाळी पुन्हा नाक्यावर फिरत टपरीवरचा चहा. घरी येऊन पुन्हा स्टडी.


आजही आठवतात ते दिवस अभी आणि मी रात्री जेवल्यावर चालत चालत लक्ष्मी मातेच्या मंदिराकडे जायचो. वाटेत रस्त्याच्या कडेला म्हैशीचं अगदी ताजं, कच्च दूध प्यायला धमाल यायची. लक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी असणारी भली मोठ्ठी रांग पाहून डोळ्यांचे पारणे फिटायचे. नवरात्रीला नवलाईने उजळून निघालेलं कोल्हापूर पाहता पाहता मन थक्क व्हायचं. कोल्हापूरची फेमस मिसळ, दावनगीरी लोणी डोसा हे आमचे आवडते पदार्थ आम्ही चवीने खायचो. बघता बघता क्लास चे नऊ महिने कधी संपले कळलं नाही.... मग पुन्हा हुंदका आला तो म्हणजे कोल्हापूर सोडून परत मुंबईला जाताना. ताई, काकू, अभी, क्लास मधले जिवाभावाचे मित्र....इच्छा नव्हती पण पर्यायही नव्हता. भरलेल्या डोळ्यांनी सर्वांचा निरोप घेतला अन् मुंबईला निघून आलो. सात वर्षे झाली पण आठवणी अजूनही ताज्या आहेत अगदी काल घडलेल्या घटनांसारख्या....


खूप सारी धम्माल आहे पण तूर्तास इथेच थांबतो...😊😊


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy