Amar Misal

Drama

3  

Amar Misal

Drama

शामी - भाग ३

शामी - भाग ३

11 mins
251


भीमा, आप्पांनी सोपवलेली नवीन जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडत होता. तो दररोज शामीला रानात घेऊन जाई. रानात जवळूनचं एक मोठी नदी अगदी उन्हाळ्यातही दुथडी भरून वाहत असल्यामुळे आजूबाजूच्या जमिनीतं पाण्याचा मुर तग धरून होता. सहसा उन्हाळ्याच्या दिवसात नद्या, नाले पाणी नसल्याने अगदी कोरडे आणि भकास वाटतात. एखाद्या पर्णहीन झाडासारखे. परंतु या नदीची खासीयत म्हणजे, ही नदी बाराही महिने अगदी ओसंडुन वाहत असायची त्यामुळे हिरव्यागार चाऱ्याला कमी नव्हती. आजूबाजूचा परीसरही हिरवळीने अगदी सुजलाम सुफलाम दिसत होता. 

नदीच्या पात्रात हरतऱ्हेचे पक्षी, छोटे मोठे प्राणी आपली तृष्णा शांत करायला यायचे. काही प्राणी उन्हाच्या कडाक्याने तावून निघाल्याने नदीपात्रात मनसोक्त विहार करण्याचा आनंद लुटायचे. पक्षीही आपले पंख फडफडवत पाण्याच्या लाटांमध्ये हळुवार डुंबण्याचा आनंद घेत आणि एकामागोमाग एक भुर्रर्रकन उडुन जात. नदीपात्रात जल जीवांचाही आश्रय होताचं. In fact असायलाचं हवा नाहीतर ज्यांचं घर आहे तेच बेघर झाल्यासारखे वाटलं असतं... नाही का ????😅😅😅........!! नदीपात्रात पाण्याच्या तळाशी निरनिराळ्या आकाराचे काळ्या, नारंगी रंगाचे मासे काहीतरी हरवल्यासारखे सतत इकडून तिकडे तिकडून इकडे एकसारखे फेऱ्या मारायचे, मग कधी मधेच स्तब्ध व्हायचे तर दुसऱ्याच क्षणाला इवलीशी शेपटी हलवत धुम ठोकायचे.

मोठमोठाल्या नांग्यासोबतच चपटे, आडवे आणि अंडाकृती शरीररचना असणारी खेकडी बिळातून हळूच बाहेर येऊन उन्हं खात बसलेली दिसायची पण जराही हालचालींची चाहूल लागली की पटकन बिळात लपुन बसतं. नदीपात्रात अगदी छोटे मोठे काळ्या, हिरवट रंगाचे सापही अधूनमधून पाहायला मिळत. पांढऱ्या शुभ्र रंगाचे आणि डौलदार मान असलेले बगळे मोठंमोठाल्या थव्यानी नदीकाठी फिरताना दिसायचे. पण मग आजूबाजूला विचित्र हालचालींचा जराही सुगावा लागला की मोठमोठ्याने पंख फडफडवत दूरवर दिसेनासे व्हायचे. शांत, संयमी चालीचे बदक पक्षीही पाण्याच्या पृष्ठभागावर अगदी संथपणे विहार करताना दिसून यायचे. पात्राच्या दुतर्फा विविध वृक्ष, वेलींची हिरवळ मनाला भुरळ पडणारी होती. पळस, चिंच, साग, हिरडा, बेहडा, ऐन, आंबा अशी नानाविध उंचच उंच आणि दूरवर पसरलेली झाडं होती. नदीच्या किनारी असणाऱ्या या अजस्त्र झाडांवर वेडाराघू, बुलबुल, कवडे, पारवे, रानटी कावळे, चिमण्या, सुगरण पक्षी, कोकिळा असे नानाविध रंगाचे आकर्षक पक्षी एकसारखे या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून या झाडावर करायचे. त्यांच्या चिवचिवाटाने वातावरण प्रसन्न आणि हसतं राही. याच झाडांवर मग अतिशय सुंदररीत्या गुंफलेले सुगरणीचे खोपे (घरटी) पाहायला मिळत. काही झाडांवर चिमणी, टिटवी, कावळे यांचे छोटे घरकुल पाहायला मिळे. एकंदरीत वन्यजीव - जलजीव, वृक्ष वेलींनी परिपूर्ण असं नदीपात्र होत ते. 


भीमा शामीला याचं नदी पात्राकाठी असलेल्या रानात चरायला सोडी. स्वतः मग कधी विरंगुळा म्हणून हातातल्या काठीने दगडं मारत बसे, कधी रानमेवा आणायला जाई. कधी कधी नदीपात्रात येणाऱ्या पक्षांचं, प्राण्यांचं बारकाईने निरक्षण करी. कधी पाण्याच्या तळाशी छोट्या मोठ्या माशांची एकसारखी चालणारी चुळबुळ न्याहळत बसे, कधी खेकड्यांच्या सावध चालींचा मागोवा घेत ते कुठे जातात ते पाही. कधी कधी तर नदीकाठी एखाद्या झाडाखाली हाताची उशी करून त्या उंचच उंच, हिरव्यागार, प्रचंड शाखांनी सुसज्जीत अशा झाडांकडे एकटक पाहत राहायचा. भीमाला अनेकदा प्रश्न पडायचे, ही झाडंही मला पाहत असतील का???? मधूनचं सळसळ आवाज करणाऱ्या पानांना माझ्याशी काही बोलायचं असेल का आणि म्हणून त्यांची एकसारखी हालचाल चालू असेल??? अनेक वर्षे अगदी एखाद्या स्थितप्रज्ञ योग्यासारखे एकाच जागेवर स्तब्ध उभं राहून पाय अवघडले असतील का यांचे???? त्यांनाही वाटत असेलचं की माझ्यासारखं थोडं पडावं क्षणभर??? की मग ते आपल्या उंचच उंच माना वर करून निळ्याभोर आकाशाला स्पर्श करण्यासाठी स्पर्धा करत असावेत?? असे एक ना अनेक प्रश्न भीमाच्या डोक्यात क्षणार्धात भिरभिरून जायचे. मग विचार करता करता त्याचा डोळा कधी लागायचा त्यालाच कळायचं नाही.

                ************


भीमाने नेहमीप्रमाणे माईने कापडात गुंडाळून दिलेली भाजी भाकरी खाऊन घेतली. शामी जवळच चरण्यात दंग असल्याने भीमाने थोडी विश्रांती घेण्याचं ठरवून भीमा नदीकाठच्या पळसाच्या गर्द सावलीला आडवा झाला. साधारण बारा साडेबाराची वेळ असावी. सुर्य डोक्यावर आल्याने उन्हाच्या झळा अधिकच तीव्र जाणवू लागल्या होत्या. पण अधून मधून येणारी वाऱ्याची झुळूक मनाला सुखावून जायची. बघता बघता भीमाचा डोळा लागला. शामीनेही एव्हाना पोटभर चारा खाल्ला होता आणि उन्हाच्या झळांनी अंग अगदी पोळून निघाल्याने थोडा विसावा घेण्यासाठी सवई प्रमाणे मंद मंद चालत भीमाकडे येवू लागली. शामी आता भीमापासून अगदी काही हातचं दूर होती. चालता चालता तिचं लक्ष भीमा झोपलेल्या ठिकाणी गेलं. पुढच्याच क्षणी शामीचे पाय अडखळले. जागच्या जागी थांबले. भीमा पासून अगदी हाताच्या अंतरावर काहीतरी असल्याचं तीला जाणवलं. पण त्याचं तोंड भीमाकडे असल्यानं आणि वाऱ्याच्या झोक्याने सतत मधे येत असलेल्या एका झाडाच्या शाखेमुळे नेमकं काय होतं ते दुरून नीट दिसत न्हवतं. पण भीमाच्या जीवावर बेतणारं काही असेल तर भीमाचं रक्षण करायला हवं. त्यासाठी पुढे जाऊन पाहणंच योग्य आहे असं ठरवून मग शामी अगदी सावध चाल करत काही अंतर जवळ गेली. काही वेळापूर्वी अस्पष्ट असणारं दृश्य आता स्पष्ट दिसू लागलं होतं. ते भयानक दृश्य पाहून शामी दचकली, घाबरून चार पाऊले माघारी गेली. तीला काय करावं काही सुचत न्हवतं. 


भीमाच्या समोर जणू काळचं भीमाला कायमचं दुर घेऊन जायला आला होता. भीमाकडून अगदी झोपेत एक चुकी आणि तो आपल्या प्राणाला मुकणार होता. शामी भीतीने अगदी सुन्न झाली होती. भीमा मात्र गाढ झोपेत होता. आपला काळ आपल्यापासून हाकेच्या अंतरावर असून आपले प्राण टिपण्यास आतुर असल्याची पुसटशी जाणीवही त्याला न्हवती. शामी मात्र दुहेरी विवंचनेत सापडली होती. शामीला आपल्या मालकाचा म्हणजे भीमाचा जीव वाचवायचा होता त्याचं बरोबर स्वतःच्याही जीवाची काळजी घ्यायची होती. एका अर्थाने भीमाचा जीव वाचवणं म्हणजे स्वतःहून आपला जीव धोक्यात घालणं होतं. पण शामीला स्वतःपेक्षा भीमाचा जीव वाचवणं खुप महत्वाचं वाटतं होतं. भीमाने आणि कुटुंबाने आजवर केलेल्या अनंत उपकरांची परतफेड करण्याची योग्य वेळ आता आली असल्याचं ठरवून शामीने आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता भीमाचा जीव वाचवण्याचं पक्कं केलं. पण प्रश्न हा होता की, रक्षण करायचं कसं.....???? शामीला ताबडतोब काहीतरी हालचाल करावी लागणार होती अन्यथा खुप मोठा अनर्थ ओढवणार हे नक्की होतं. 


हो.....हो......कळतंय मला......!! हे वाचताना तुम्हालाही एकाचं गोष्टीची हुरहुर लागुन राहिलीये ती म्हणजे असं नेमकं काय होतं भीमाच्या जवळ की ज्यामुळे भीमाचा जीव धोक्यात आला होता आणि शामीही इतकी घाबरली होती.....???? त्यात शामी तर एक जनावर मग ती कशी काय भीमाचा जीव वाचवणार होती.....?? असंच काहीसे प्रश्न तुमच्यापैकी काहींना पडले असतील. हो ना....???? आपण नेहमी म्हणतो की, देवाने फक्त माणसाला विचार करण्याची, आपली बुद्धी वापरण्याची अक्कल दिलीये. पण गावाकडची अनुभवी आणि जुनी जाणती माणसं सांगतात, सगळ्यात शहाणं कोण असेल तर ते जनावर. अगदी माणसापेक्षाही. तुम्ही त्याला जितकी माया कराल, जितका तुमचा लळा लावालं त्याच्या कैकपटीनं जास्त माया आणि लळा ते तुमच्यावर लावतं. वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला जीवदान देतं. इथेही तसंच काहीसं होणार होतं.

भीमाला अजून जाग आली न्हवती. गर्द सावलीला अगदी डाराडूर होऊन झोपला होता तो. भीमाचा काळ म्हणजेचं एक विषारी नाग आपला फणा उभारून

भीमापासून अगदी हाताच्या अंतरावर तोंडाकडच्या बाजूला जणू त्याला दंश करण्याची योग्य संधी शोधत त्याच्याकडेच एकटक पाहत आपल्या जाडजूड शरीराचे वर्तुळाकार वलय बनवून बसला होता. वरच्या बाजूने काळ्या तर गळ्याकडून पिवळसर रंगाचा, उभारलेला फणा पाहून भल्याभल्यांना धडकी भरवेल असा साधारण सहा ते सात फुट लांबझोड अस्सल नाग होता तो. सहसा नागसाप माणसाच्या इतक्या जवळ आणि तेही अशाप्रकारे घात घालून बसत नाहीत. पण जर नकळत कधी तो दुखावला गेला असेल तर मात्र तो सुड घेतल्याशिवाय शांत बसत नाही. कदाचित भीमाकडून तो दुखावला गेला असावा पण भीमा झोपेत असल्यानं काहीच स्पष्ट होत नव्हतं. शामी आता अधिक धीटाईने भीमाचा जीव वाचवण्याकरीता नाग सापाशी दोन हात करायला सज्ज झाली होती. कोणत्याही क्षणी भीमाकडून न कळत हालचाल होण्याची शक्यता असल्याने सर्वप्रथम नागसापाचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेण्याचं शामीने ठरवलं. ज्यामुळे नागसापाचं काही वेळासाठी का होईना भीमाकडे दुर्लक्ष होण्यास मदत झाली असती आणि मग हळूहळू त्याला भिमापासून दुर घेऊन जाणं शक्य झालं असतं.


शामीने धाडस करून मग नाग सापापासून काही अंतरावर राहून मागच्या बाजूने पाय जमिनीवर आपटत आवाज करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. नागसापाने आवाजाच्या दिशेने हलकेच मान वळवली आणि दुसऱ्याच क्षणी पुन्हा भीमाकडे. शामीची ही कल्पना विफल ठरली. शामीकडे वेळ खुप कमी होता. त्या घात लावून बसलेल्या नागसापला भीमापासून दूर करण्याचा आता एकचं आणि शेवटचा पर्याय शामीला दिसत होता. तो म्हणजे नागसापला स्वतः डीवचनं. हे असं करणं शामीला कदाचीत जीवावर बेतणारं ठरलं असतं पण त्या क्षणी भीमाचा जीव वाचवण्यासाठी तिला तोच एकमेव उपाय दिसत होता. मग शामीने समोर पडलेला एक दगड आपल्या पुढच्या पायांच्या खुराने नागसापाच्या अंगावर भिरकावून दिला. दगडाचा फटका बसताचं तंद्री लागलेला नागसाप दुखावला गेला, होणाऱ्या वेदनांमुळे सस्सस्सsssss सस्सस्सssssss आवाज करत आपला फणा आणखीनच मोठा करून त्वेषाने मागे वळून शामीला रोखू लागला. त्याच ते भयंकर रूप पाहून शामी अजूनच घाबरली पण तीला आता घाबरून न जाता त्याच्याशी दोन हात करायचे होते. नागसापाच्या तीक्ष्ण नजरेमध्ये शामीची छबी उमटली होती. पुढच्याच क्षणी नागसाप अगदी त्वेषाने शामीवर चाल करून आला. शामीनेही नागसापला भीमापासून थोडं दुर नेण्यासाठी तिथून पळ काढला आणि काही अंतरावर जाऊन उभी राहीली. दुखावलेला नागसापही बदल्याच्या भावनेने अगदी चपळाईने शामीच्या मागे मागे तीथे जाऊन पोहोचला. शामीचा उद्देश साध्य झाला पण तीचा स्वतःचा जीव संकटात आला होता. त्यात भीमाही अजून झोपेत असल्यानं त्याला जाग येईपर्यंत त्या नागसापला रोखून ठेवणं हे शामीसाठी खुपचं मोठं आव्हान होतं. 


शामी आणि नागसापामध्ये आता युद्ध जुंपल होतं. नागसाप आपला फणा फुलवून फुत्कार सोडतचं शामीच्या अंगावर दंश करण्यासाठी धावून जायचा पण शामीही अगदी चतुराईने आणि सावधगिरीने त्याचा वार चुकवायची. कधी स्वतःच नागसापावर धावून गेल्यासारखी भासवून त्यालाही शह द्यायची. मग तोही घाबरून काही अंतर मागे जाई. पण नागसाप अत्यंत चपळ, चालाक असल्याने क्षणात समोर तर क्षणात मागे असा चौफेर राहून शामीला दंश करण्याचा एकसारखा प्रयत्न करत होता. शामीही तितकीच चतुर होती. तीही मग तितक्याच लगबगीने त्याने केलेला दंश चुकवण्यात यशस्वी ठरली होती. साधारण अर्धा तास अविरत चाललेल्या या मृत्यू तांडावामुळे दोघेही थकून गेले होते. सुरवातीचा तो चलाखपणा ती चपळाई आता सौम्य जाणवत होती. पण एकानेही आपली हार कबुल केली न्हवती. शामीला आता कळून चुकलं होतं, आता जास्त काळ आपण या नागसापाच्या माऱ्यापासून वाचू शकणार नाही पण ही लढाई अशी अर्ध्यावर सोडणंही तीला मंजुर न्हवतं. भीमाला जाग येईपर्यंत तीला ही तीची एकाकी झुंज अविरत चालूच ठेवायची होती. परीणाम स्पष्ट होते, एकतर नागसाप दंश करण्यात सफल होऊन शामीला जीव गमवावा लागणार होता किंवा भीमाला जाग येऊन तो नागसापाच्या तावडीतून तीची सुखरूप सुटका करणार होता. शामीला आता परीणामांची तमा राहीली न्हवती, तीला फक्त भीमाला जाग येईपर्यंत या युद्धात आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं होतं. नागसापही खुप थकल्यासारखा जाणवत होता. सुरवातीचा जोश, त्वेषाने फणा फुलवून त्याचं ते धावून जाणं आता अगदी विरून गेल्यासारखं जाणवत होतं. पण तोही शामीसारखा हट्टी होता. शामीपुढे आपली हार त्याला मान्य नव्हती शेवटी नागसाप तो. एकदा आपल्या शत्रूची छबी डोळ्यात कोरली की त्याला दंश केल्याशिवाय तो स्वस्थ बसत नसे. 


अखेर शामीला नशीबाने साथ दिली. जाता जाता छमाबाईने आपल्या बाळाला दिलेला आशीर्वाद आज कामी आला होता. भीमाची मंद मंद हालचाल चालू असलेली पाहून शामीच्या जीवात जीव आला. भीमा झोपेतून जागा झाला होता. आपण खुप वेळ निद्राधीन होतो याची जाणीव होऊन त्याची नजर शामीला पाहण्यासाठी चौफेर भिरभिरली. दूरवर शामी स्वतःभोवतीचं फेर धरल्यासारखी, घाबरल्यासारखी भीमाला दिसली. तीचं आजचं वागणं जरा विचित्र वाटून भीमा लगबगीने शामीकडे जाऊ लागला. काही वेळातच शामीची नागसापाशी चाललेली झुंज पाहून भीमा आश्चर्यचकीत झाला. जाडजुड, लांबच्या लांब, फणा उभारून फुत्कार सोडणारा नागसाप पाहून भीमा घाबरून गेला. काही क्षण काय करावं हेच भीमाला कळत न्हवतं. तो नागसापला न्याहाळत होता. एकाएकी भीमाचे हातपाय थरथरायला लागले, सर्वांगाला दरदरून घाम सुटला. त्याची तुटलेली शेपटी, डोळ्यातील तीच आक्रमकता, फणा उभारून त्याचं ते फुत्कार सोडणं हे आधी अनुभवल्यासारखं वाटलं त्याला. अखेर भीमाला त्या नागसापाची ओळख पटली. हा तोच नाग साप होता......काही दिवसांपूर्वी शेतात बांधावरील झुडूप तोडताना त्यामध्ये बसलेला नागसाप न दिसल्याने धारधार विळ्याचा भीमाकडून त्याच्यावर वार झाला होता. शेपटाकडील बोटभर भाग तत्क्षणी तुटून जमिनीवर पडला. असीम वेदनेने विव्हळत त्याच आक्रमकतेने आणि आपला फणा उभारून त्याने फुत्कार सोडत भीमावर हल्ला केला होता पण सुदैवाने भीमा बचावला. वेदना सहन न झाल्याने तळमळत रक्ताने माखलेले आपले शरीर घेऊन घाबरून दूरवर नाहीसा झाला होता. पण दुर्दैवाने तो नाग साप असल्याने भीमाची छबी टिपून त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा सुड घ्यायला आज तो परत आला होता. 


भीमाकडून जे झालं ते नकळत झालं होतं. पण त्याचे परिणाम इतके भयानक असतील याची जाणीव भीमाला न्हवती. त्या नागसापला पूर्वीसारख्याच त्वेषाने शामीवर धावून जाताना पाहून त्याला सर्व चित्र स्पष्ट झालं होतं. तो नागसाप शामीला इजा करण्याच्या उद्देशाने आला नसून मला दंश करून माझ्या हातून नकळत झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याकरीता आला होता याची लख्ख जाणीव भीमाला झाली. आता कोणीतरी एक जीवंत राहणार होतं. भीमा किंवा साप.....


भीमाने मनाशी पक्कं केलं. मनात नसतानाही त्या नागसापला संपवावे लागणार होतं. तसं न केल्यास तो भीमाला संपावणार होता. लागलीच भीमाने बाजूला पडलेल्या मेसीचा दणकट बांबू घेतला आणि नागसापला मारायला धावला. मागून धोक्याची जाणीव झाल्याने सापाने आपला फणा क्षणात मागे वळवला. त्याची ती आक्रमकता, उभारलेला फणा पाहून भीमाचे हात कापू लागले. हातातला बांबू हातातच राहीला. आपल्याकडे तोंड करून त्वेषाने फुत्कारणाऱ्या सापावर बांबूने वार करण्याचे धाडस करणे म्हणजे स्वतःहून मरण ओढवून घेणं. भीमाचे पाय थरथरत होते. भीमाला आपला काळ दिसत होता. घाबरून त्याचे पाय लटके पडले. त्याला आता नीट चालताही जमत न्हवतं. नागसापाने तेवढीच संधी साधली व तो भीमावर चालून गेला. साप भीमाला दंश करणार तोच शामीने मागून त्याच्या शेपटावर जोराने पाय दिला. पायाच्या मजबूत खुरांमुळे इजा होऊन पुन्हा एकदा नाग साप असह्य वेदनांनी तडफडू लागला. शामीच्या पायाचा चावा घेण्याकरीता पुन्हा मागे धावला तोचं शामीने पटकन आपला पाय काढून घेतला. नागसापाचा हा वारही शामीने चतुराईने चुकवला आणि भीमाचा जीवही वाचवला. एकीकडून शामी, दुसऱ्या बाजूने भीमा त्यात होणाऱ्या असह्य वेदनांमुळे नागसाप थोडा धास्तावल्यासारखा वाटत होता. पण तरीही त्याने मैदान सोडलं न्हवतं.


त्याला आता कळून चुकलं होतं की आपण भीमाचा काळ बनून आलो पण आपलाच बळी जाण्याची वेळ जवळ आली आहे. त्याला झालेल्या इजांमुळे त्याची चाललेली तडफड पाहून भीमाला खुप वाईट वाटलं. पण अशा अवस्थेतही भीमा आणि शामीला दंश करण्यासाठी चाललेली तडफड पाहून अजूनही त्याची धास्ती जाणवत होती. पण अखेरीस माघार घेण्याखेरीज नागसापाकडे पर्याय नसल्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अगदी चपळाईने तो जवळच्या एका बिळात शीरला आणि लपुन बसला. ते पाहून भीमा आणि शामीच्या जीवात जीव आला. भीमाला नागसापला मारायचं नव्हतं पण स्वरक्षणार्थ व शामीचा जीव वाचविण्यासाठी त्याला हे पाऊल उचलावं लागणार होतं. दोघांनीही नागसापला दुखावलं असल्याने त्याला यावेळी असंच सोडून दिलं तर आज जो प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती निश्चित होती. यावेळी धोका अगदी शामीलाही होता. शामीचा जीव धोक्यात येणं भीमाला अजीबात मान्य न्हवतं. भीमाने नागसापला संपवायचं ठरवून हातातील बांबूने बीळ फोडायला सुरवात केली तसा नागसाप अतिशय त्वेषाने पुन्हा एकदा भीमावर धावून आला. पण यावेळी भीमाने कोणतीही चुक केली न्हवती. अंगावर धावून येणाऱ्या सापाच्या मानेच्या मागच्या बाजूला हातातील मजबूत बांबूने जोरदार फटका मारला तसा नागसाप जागीचं पडुन वेदनेने तळमळू लागला. मानेचे मणी मोडल्याने फणा काढणे तर दूर त्याला जागेवरून हलताही येत न्हवते. मग मात्र वेळ न दवडता भीमाने नागसापाची जीवनयात्रा संपवली. भीमा आणि शामी दोघंही अगदी मृत्यूच्या दारातून परतले होते. भेदरलेल्या मनांनीचं मग अगदी शांतपणे त्यांनी घरची वाट धरली......!!

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama