STORYMIRROR

Amar Misal

Drama

3  

Amar Misal

Drama

शामी - भाग २

शामी - भाग २

5 mins
184

शामीच्या येण्यानं भीमाला छान सोबत झाली होती. आप्पा आणि माई देखील शामीला अगदी आपल्या मुलासारखं जपायला लागले होते. छमाबाईच्या अशा अचानक जाण्याचं दुःख होतंचं पण शामीच्या रूपाने तीच्या अनेक सुखद आठवणी सदैव जीवंत राहणार होत्या. म्हणूनच आप्पा आणी माईने शामीला तीच्या आईची कमी भासू न देण्याचं मनोमनी ठरवलं. भीमाही मग आप्पा आणि माईचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हातभार लावू लागला. तो दिवस दिवसभर छोट्या शामीचे लाड करत बसायचा. तिच्या डोक्यावरून, अंगावरून मायेने हात फिरवायचा. सकाळी आणि संध्याकाळी तिला बाटलीतून दूध पाजायचा. सुरवातीला लहान असल्यामुळे उभं राहताना शामी धडपडायची तेव्हा भीमा तीला आधार द्यायचा. ती धावायला लागली तेव्हा तिच्यासोबत लहान होऊन स्वतःही धावायचा. तीला दोन दिवसातून एकदा गरम पाण्याने अंघोळ घालून अंग पुसून काढायचा. तीच्या विश्रांतीसाठी भीमाने विशेष प्रबंध केलेला होता. शामीला शांत झोप लागावी म्हणून पिंजराची मऊमऊ गादी करून त्यावर गोणपाट अंथरून ठेवायचा ज्यामुळे तीला थंडीही लागणार न्हवती. रात्रीच्या वेळी शामी गोट्यात एकटीच असल्याने तीला भीती वाटू नये म्हणून भीमा तीच्या शेजारी बसून राहायचा. काही वेळात मग शामी झोपली की हळूच चोरपावलांनी गोट्याचं दार बंद करून झोपायला जायचा. असा भीमाचा नित्यक्रम चाले. भीमा जणू शामीची खरीखुरी आईच झाला होता. भीमाची शामीसाठीची माया पाहून माईला त्याचा खुप हेवा वाटे. भीमा असल्यानं आप्पा आणि माई निर्धास्त होऊन आपापल्या कामात व्यग्र असायचे. 


बालपणीची शामी दिसायला खुपचं गोंडस आणि तितकीच खोडकरही होती. सकाळच्या उन्हात बाहेर सोडलं की, बेलगाम उधळलेल्या घोड्यांसारखी अगदी जिकडे रस्ता दिसेल तिकडे चौफेर धावत सुटायची. एका रस्त्यावरून धावता धावता अचानक वळण घेत भलतीकडेच जाऊन मग वाट हरवल्यासारखी टकामका पाहत स्तब्ध उभी रहायची. काही वेळाने मग दुरून चालत येणाऱ्या भीमाला पाहिलं की तीचा जीव भांड्यात पडायचा आणि मग पुन्हा आनंदाने अजूनचं पुढे धावत सुटायची. भीमाची मात्र तीच्या मागे धावता धावता पुरती धांदल उडून जात असे. पण मग तीला असं आनंदाने नाचताना, बागडताना पाहिलं की तोही मग सर्व थकवा क्षणार्धात विसरून तीच्या आनंदात सामील होऊन दोघंही पुन्हा पाठशीवणीचा खेळ सुरू ठेवायचे. एक दिवस तर भीमाची फजीती करायची ठरवून शामीने वेगळीच शक्कल लढवली. मुद्दाम राहत्या घराच्या एका अरुंद कोपऱ्यात गुपचूप जाऊन लपून बसली आणि मग तिथेच घटकाभर झोपी गेली. पण इकडे शामी कुठंच दिसत नसल्यानं भीमाच्या जीवाची नुसती घालमेल चालू होती. घरचा गोठा, शेजारचा परीसर, गावातली गल्ली नं गल्ली धुंडाळून काढली तरी तीचा काहीच पत्ता न्हवता. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांकडे सुद्धा तीच्याबद्दल चौकशी केली पण काही उपयोग झाला नाही. शेवटी शामीचा कुठेच, काहीच पत्ता न लागल्याने रडवेल्या चेहऱ्याने भीमाने घरची वाट धरली. घरी आल्यावर पाहतो तर काय....!! महाराणीसाहेब चक्क राहत्या घरात या सोप्यातून त्या सोप्यात, त्या सोप्यातून या सोप्यात चकरा मारत होत्या. जणू काही... भीमाचं हरवला होता आणी कुठेच शोध लागत नसल्यानं आता करायचं तरी काय या विवंचनेत असलेल्या शामीबाई... हा..हा..हा...... अंघोळ घालतानाही शामी स्वस्थ बसायची नाही. काही ना काही शक्कल लढवत भीमाची फजीती ठरलेली असायची. शामी कधी दुरचं पळून जाई तर कधी पाण्याने भरलेली बादली तोंडाने उलटून टाकी. कधी कधी तर अंघोळ होईपर्यंत शांत उभी राहायची आणि पुढच्याचं क्षणी जोरजोराने अंग हलवीत भीमालाचं भिजवून टाकायची. भीमालाही शामीचं असं खट्याळ, खोडकर बालपण खुप हवंहवंसं वाटायचं आणि तिच्या त्या करामतींचा तो मनसोक्त आनंदही घ्यायचा. बघता बघता दिवस भरभर निघून जात होते. शामी आणि भीमाही दिवसेंदिवस मोठे होत होते. 


शामीच्या बालपणाची दोन वर्षे आता बघता बघता मागे लोटली होती. बालपणी नानाविध खोड्या करून भीमाची फजीती करणारी शामी आता मोठी, समजूतदार, सुरवातीपेक्षा अजूनच आकर्षक आणि सुंदर दिसू लागल्यानं शामी सर्वांचीच लाडकी झाली होती. गावातील अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाचं शामीचं खुप कौतुक होतं. रंग पांढरा, घारे पाणीदार डोळे, कपाळावर काळ्या रंगाचे रुंद गोलाकार तेजस्वी वलय, छोटी पण तीक्ष्ण शिंगे, रेखीव कान, नाक व पायाचे चारी खुर काळ्या रंगाचे, गोंडस चेहरा, सदृढ शरीरयष्टी, शेपटीचा तितकाच भरदार पांढराशुभ्र गोंडा. रात्रीच्या निरभ्र काळ्याभोर आकाशात चांदण्यांची चमचम खुलून दिसते त्याप्रमाणे तिच्या शरीरावरील काळ्या पांढऱ्या रंगांचं रेखीव गोंदण विधात्याने अगदी कौशल्यपूर्वक कोरलं होतं. जातिवंत राजेशाही घोड्यालाही मागे टाकेल असं तिचं ते भरदार रूप, ऐटबाज चाल पाहून तिच्यावरचं नजर खिळून राहायची. 

              *************


भीमाही आता शामी सोबत मोठा होतं होता. इयत्ता बारावी ची परीक्षा संपल्याने कॉलेज ला सुट्टी लागली होती. कॉलेज मुळे भीमाला आप्पा आणि माई ला कामात हातभार लावायला वेळ मिळाला न्हवता. पण सुट्टी पडल्यानं भीमानं त्या दोघांना थोडा आराम द्यायचं ठरवलं. घरातील, शेतातील शक्य ती कामं आता भीमा करू लागला होता. त्याची ती तळमळ पाहून दोघांना खुप समाधान वाटायचं पण आप्पा आणि माईची भीमासाठीची स्वप्न खुप मोठी होती. त्याला शिकून खुप मोठं झालेलं त्यांना याची देही याची डोळा पाहायचं होतं. भीमाही खुप हुशार होता. इतक्या लहान वयातही एक मुलगा म्हणून त्याची सर्व कर्तव्ये पार पाडण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करायचा. मार्च महिना लागला होता. शेतीची कामे अजून चालू झाली नसल्यानं आप्पांनी भीमाला एक नवीन काम द्यायचं ठरवलं. 

आप्पा:- " भीमा.....ये रं भीमा......इकडं ये जरा ".

भीमा:- " हो आप्पा....हे काय आलोच...... " असं 

       म्हणत भीमा हातातलं काम बाजूला 

       ठेवून अगदी लगबगीनं आप्पांपुढं उभा 

       ठाकला.

आप्पा:- " सुट्टी कधी पतोर हाय तुला                   अजून....????"

भीमा:- " आहे आप्पा..... दीड, दोन महिने  

       तरी नक्कीच आहे....." 

आप्पा:- " ठीक हाय......आता तू रोच्याला              सकाळी शामीला रानात चरायला घेऊन        जायचं. जमंल न्हवं....?? आणि हो           जाताना चोकभर भाकरी न भाजी            कापडात गुंडाळून न्हेत जा..... 

       उन्हातानातनं भूक लागली तर दोन घास       पोटाला लावायला मिळंल....."

भीमा:- " होय आप्पा......जमेल की....उद्यापासून 

       जाईन शामीला घेऊन......"

आप्पा:- " ठीकय तर....लाग आता तुझ्या  

        कामाला....आणि हो....सांभाळून जायचं 

        अन सांभाळून यायचं.."

भीमा:- " होय आप्पा...." अस म्हणून भीमा            राहिलेलं काम करायला निघून गेला

आप्पांनी सोपवलेलं हे काम भीमाला खूपच आवडलं. आता भीमा रोज शामीला रानात चरायला घेऊन जाई. सोबत माईने कपड्यात गुंडाळुन दिलेली भाकरी, भाजी, लाल सुखी चटणी, कागदात बांधून दिलेलं मीठ ( भाजीत कमी वाटल्यास वरून घ्यायला) आणि पाण्याची बाटली असायची. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रानात काजू, आंबे, करवंद, पेरू मुबलक मिळत. भीमाला आंबे, काजू खुपचं आवडायचे. त्यातही पिकलेल्या आंब्यांपेक्षा कच्या आंब्याची करम भीमाला खुप आवडायची.

    

       ( "करम म्हणजे कच्च्या आंब्याच्या बारीक उभ्या फोडी करून त्यावर सुखी तिखट चटणी आणि योग्य प्रमाणात मीठ टाकून बनवलेलं मिश्रण ") 

भीमा, शामीला रानात चरायला सोडी आणि स्वतः रानमेवा आणायला जाई. मग आकरा, साडे आकरा च्या दरम्यान रानात दाट सावली असलेल्या झाडाखाली बसून भीमाचं वनभोजन सुरू व्हायचं. रानातून आणलेला आंबा दगडाने ठेचायचा. एका हातात भाकरी, त्यावर भाजी, चटणी, मीठ आणि कच्चा ठेचलेला आंबा. व्वा.........!! गर्द सावलीत वाऱ्याच्या मंद मंद झुळुकांसोबत वनभोजन म्हणजे स्वर्गसुखच. पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासाची चवचं न्यारी.....!! हा अनुभव ज्यांच्या वाट्याला आला ते खरंच भाग्यवान... मला तर हे लिहितानाही तोंडाला पाणी सुटलंय. हा.....हा..... इकंदरीत भीमाचा हा नित्याचा दिनक्रम चाले. कधी आंबे तर कधी पेरू, काजू, करवंदे काहीना काही मिळून जायचं. 


इकडे शामी रानात पोटभर चरून तृप्त होऊन जायची. चरता चरता मग भीमाजवळ येऊन मायेने त्याच्या हातांना, गालाला, पायांना जिभेने चाटी, कधी खोडकरपणे अचानक अंगावर धावून जाई, तर कधी भीमाच्या शेजारी येऊन स्वतःच विश्रांती घेई अशा नानाविध लीला ती रचत असे. ते पाहून भीमालाही तिचं खूप कौतुक वाटायचं...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama