साठीतल्या आठवणी
साठीतल्या आठवणी
संध्याकाळचे पाच वाजलेत सूर्य आकाशाची साथ सोडू पाहतोय. आजपर्यंतच्या आयुष्यात माझ्या मनाला प्रसन्न वाटणारी ही संध्याकाळ आता मात्र आयुष्य अंधाराकडे वाटचाल करत असल्याचं जाणीव करून देत आहे असं वाटतंय. सूर्य आपली कला कुशलता दाखवत माझं मन त्याच्याकडे वळवू पाहत आहे. सूर्य मावळतांनाही आपल्या निरोपातूनही काहीतरी संदेश देऊ पाहतोय. आकाशात आपल्या आजच्या दिवसाच्या निरोपाची ती लाल तांबूस छटा सोडून माझा लक्ष्यभेदक नजरेचा अंत पाहत असल्याचं मला जाणवतंय. कदाचित माझ्या सारखंच तुमचही झालंय अस त्याच म्हणणं असावं. अगदी त्याच्या सारखाच आमचं आयुष्यही आता आम्हाला निरोप देऊ पाहताय. शेवटच्या काही क्षणांना मनमुराद जगण्याचं आव्हान देत असावं अस वाटतंय. सूर्यास्ताच्या याच छटा पाहण्यास आणि नजरेत साठवण्यासाठी कधी काळी वेडा असलेलो मी आज मात्र त्याच्याकडे तिरस्कारी नजरेने बघतोय. माणूस तोच आहे पण नजर मात्र लोप पावत चालली आहे कदाचित मानवी स्वभाव असावा आणि हे खरंच आहे काळानरुप बदलणं वैश्विक सत्य आहे नाहीतर जीवंत असून पण मेल्याचा अनुभव मिळत असतो. आज हा मावळता सूर्यसुद्धा मला त्याची जाणिव करून देतोय त्यामुळेच मला त्याचा तिटकारा वाटत असावा.
मी आज सुर्याच्या या रुपाला बघून माझ्या आयुष्याच्या शेवटच्या काळाचं म्हणा किंवा आतापर्यंतच्या अस्तित्वाचं तथ्य समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. हाच सूर्यास्त पाहण्यासाठी मी माझ्या पूर्वायुष्यात रविवारच्या दिवसातले काही तास राखीव केले होते. त्याला पाहण्यासाठी कितीतरी गोष्टींना मी आतापर्यंत मी टाळलं होत आणि त्याच दिवसाकाठी पूर्णत्वाचं हे रूप अनादिकाळासाठी डोळ्यात कैद करून अनुभवलं पण आहे ,पण आता जेव्हा मी स्वत: याला टाळू पाहतोय तर हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्यासारखं वागतोय. माझ्याचं घराच्या मागच्या अंगणात त्याने पण स्थान पक्क केलंय. घराच्या मागच्या अंगणात त्या दोन उचंचउंच नारळाच्या झाडातून तो आमच्याकडे डोकावून पाहत असतो त्याच ते मावळत रूप घेऊन कदाचित त्याच ते शेवटचं ठिकाण असावं असं वाटतं. तिथं स्थिर होऊन नदीच्या त्या संथ पाण्यात आपल्या अगणित छटा तो उंटवतो आणि पाण्याची रंगहिनता नष्ट करतो. आम्हाला मात्र त्याच्या या कलेच आताही फार कौतुक वाटत. आम्हाला म्हणजे मला आणि अनुला. अनु माझी बायको आणि माझ्या दररोजच्या संध्याकाळी सोबत करणारी सोबतीनं. आमचा आता हे रोजचंच झालंय संध्याकाळचे चार वाजले की घराच्या मागच्या अंगणात येऊन मस्त शांत आणि प्रसन्न वातावरणात गप्पा मारत बसणं. पक्षांचे आपल्या घराकडे जाणारे थवे पाहत ते सुखद क्षण अनुभवणं एकमेकांच्या सोबतीनं. वार्धक्याकडे हळूहळू पावलं टाकतांना आयुष्याच्या काही शेवटच्या क्षणांना आणि आठवणींची साठवण करतो आहोत. प्रत्येक क्षणाला आनंदाच्या नवीन परिसीमा भेदण्याचा निष्फळ प्रयत्न करतोय. अनुच्या सोबतीत घालवलेले तीस -चाळीस वर्षाच्या काळ पुन्हा नव्याने जगण्याचा प्रयत्न करतोय. पस्तीस वर्षापूर्वी लग्न करून घरात आलेली अनु आजही तशीच असल्यासारखी वाटतेय. फक्त आता वयानुरुप शरीरावरच्या त्वचेच्या सुंदरतेची जागा आता सुरकुत्यांच्या जाळ्यांनी घेतली आहे. दोन ओंठामधली ती दंतपंक्ती मात्र अजूनही तग धरून आहे आणि ते दोन बदामाच्या आकाराचे डोळे थोडे खोल गेलेत पण चष्म्याच्या आधाराने आपल काम मात्र आधुनिक सीसीटीव्हीसारखं चोख बजावतात आणि ते काळे भोर केस ज्यांच्या मी काही वर्षापूर्वी प्रेमात पडलो होतो ते आज रेशीमच्या पांढऱ्या शुभ्र धाग्यासारखे दिसतात , पण त्या गोल चेहऱ्यासमोर येणाऱ्या त्या दोन पांढऱ्या बटा मनाला अजूनही रुंझी घालतात. माझ्या समोरच्या झोपाळ्यावर बसलेली ती आजही त्या मावळत्या सूर्योकडे बघून त्याला काहीतरी विचारतेय असं वाटतं. झोपाळ्याच्या मर्यादित आंदोलन कक्षेप्रमाणे तिच्या जीवनाच्या कक्षाही तिला मर्यादित असल्यासारख्या वाटत असाव्यात. तिची ती सूर्याकडे बघणारी एकटक नजर काहीतरी शोधू पाहतेय का ? मला त्या चष्म्याच्या अधून त्या दोन डोळ्यात पाणी तरळताना दिसतंय, काय कारण असावं ? सुर्याकडे एकटक बघितल्यामुले का मनातल्या अपेक्षा मनात दाबून ठेवाव्या लागताहेत म्हणून ? कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा ठेवायची नाही हे आमचं आयुष्याच्या वृद्ध अवस्थेकडे वळतांनाच ठरलं होतं. कारण अपेक्षा ठेवली म्हणजे ती पूर्ण होईलच अस काही ठरलेलं नसतं. अपेक्षभंगाच दुःख आम्ही या उतारवयात पेलू शकलू नसतो म्हणून त्याकडे बघनच बँड केलं. बुद्धी स्थिर असते परंतु मन मात्र पुन्हा त्याच वळणांवर येण्यासाठी बुद्धीच्या विरुद्ध चालण्यास प्रवृत्त करत आणि बुद्धी आणि मन यांच्यातल्या संघर्षातून मनाची विचलता वास्तवाच्या पिंजऱ्यात कैद कराव्या लागत नाहीतर मनाची भोळीभाबडी समजूत काढणेही कठीण होऊन बसतं सरतेशेवटी मनुष्यप्राणी आयुष्यभर आशा , अपेक्षा आणि आकांक्षांवरचं जगतो.
आमची दोन्ही मुलं म्हणजे मुलगी दिल्लीला तिच्या कुटुंबासोबत राहते आणि मुलगा बंगळुरूच्या नामांकित कंपनीत कामाला लागला आणि कायमचा तिकडचाच रहिवाशी झाला. आमच्यामुळे त्याच्या कुटुंबाची प्रायव्हसी अडचणीत नको यायला म्हणून आम्ही स्वतःच आमच्या या नाशकातल्या फार्म हाऊस वर राहतो. एकमेकांना एकमेकांचा आधार बनून.
आयुष्याची तीस- चाळीस वर्षे मुलांच्या संगोपनात , संसारात आणि भविष्याच्या सुखासाठी पूर्वनियोजन करण्यात घालवली. आता या वर्षात राहून गेलेलं पुन्हा एकदा अनुभवायचय. आता मुल मोठी झालीत त्यांच्या निर्णयात समाधान मानणं आम्हाला क्रमप्राप्तचं आहे. पिढीतील अंतर आणि विचारांच्या तफावतीमुळे विचारांची कुचंबणा होऊन काही वेगळाच परिणाम होऊ नये याची भीती आता मनाला कायम लागून राहते. आता फक्त हो ला "हो" आणि नाहीला "नाही" म्हणाव लागतं. माझ्याही गुडघ्यांनी पण आता पायांची साथ सोडलीय आणि मधुमेह पण मागे लागून राहिलाय. डोक्यावरचा अर्ध चंद्र आता पूर्ण झालाय. हातचं थरथरनही काही प्रमाणात वाढलाय कधी एखादी वस्तू उचलून ठेवताना पडलीच तर अनुच डाफरणं सहन करावाच लागतं. आता बोटांत पेन धरून नीट लिहिताही येत नाही म्हणून अनुन लॅपटॉपवर लिहिण्याचा पर्याय सुचवलाय तसं बऱ्याच सुखकर आहे. माझ्या प्रत्येक गोष्टींवर अनुच अगदी बारीक सारीक लक्ष असत. सकाळी उठण्यापासून तर रात्री डायबेटीसच्या गोळ्या घेण्यापर्यंत. आयुष्याच्या साठ वर्षापैकी लग्न होईस्तोवरच्या पंचवीस वर्षात मला एकदाही अलार्म शिवाय जाग येत नव्हती पण लग्न झाल्यापासूनतर आतापर्यंत अनुच्याच्या त्या धीरगंभीर आवाजाने मला आजही सकाळी वाकिंग साठी उठवाच लागत आणि तिच्या सोबत चालत जावंच लागत. तिला तशी याची गरज नाही पण माझ्या या गुडघे दुखीच्या त्रासमुळे ती मला सोबत येते. या वाकिंगच्या मधल्या वेळात आसपासच्या एरियातल्या बऱ्याच नवीन गोष्टी कळतात , विचार विनिमय होतो. सकाळी प्रभात प्रहरी ह्याच सूर्याची कोवळी किरण अनुभवत आम्ही दोघं घरच्या पुढच्या अंगणात खुर्च्यांत बसून आणि टीपॉय वर ठेवलेला तिने केलेला चहापीत मी पेपर वाचत आणि स्वयंपाक साठी लागणाऱ्या भाजी निवडण्याची तयारी चालू असते. या अंगणात बसून अंगणातल्या त्या सुगंधी फुलांना न्याहाळन चालूच असतं , नवीन झाड लावण्याबातत , लावलेल्या झाडांना पाणी देण या विषयी चर्चा चालू असते. मी म्हणत असतांनाही स्वयंपाकसाठी बाई आणि झाडांची देखभाल करण्यासाठी एखाद्या माळी ठेवावा म्हणून तर तिच्या त्याला स्पष्ट नकार असतो तर ती म्हणते " आपण कशासाठी आहोत , आपल्या काय काम आहे दिवसभर तर मोकळेच असतो आणि वेळ घालवण्यासाठी संधी सापडत बसण्याची गरज काय करायचीत की ही काम आनंदाने." आजही तिची ही उमेद आम्हाला जगणं सोपं करते. स्वयंपाक करताना कधी चष्मा लावायची विसरली तर खिचडीत कधी तांदूलपेक्षा खड्याची मात्राच जास्त जाणवते आणि एखाद्या दिवशी खिचडीत एकही खडा नसेल तर " आज माझ्या दातंच अस्तिव चेक करण्यासाठी टाकवायचा खडा टाकायचा राहिला वाटत" असं विचारलं की चष्म्यातून लटक्या रागाचा भडिमार करणारे डोळे बाहेर येऊ पाहतात. सकाळी कधी प्राणायाम करतांना किंवा योगासनं करताना माझ्या एखाद्या हाताला किंवा पायाला वात येऊन तो पूर्वस्थितीत येऊस्तर तेव्हा दोघचीही घाबरगुंडी होऊन जाते. अश्यावेळी वाटत कोणी जवळ असावं आपलंसं करणार , काळजी करणारं. अश्या स्थितीत कोण आजारी आहे आणि कोण कोणाची काळजी घेतंय हेच समजत नाही... आणि पुन्हा वास्तवात परतावं लागतं.
कधी सणावाराला मुलांचं आमच्याकडं येण झालंच तर त्यांच्या त्या लहानग्या चिल्यापिल्यांच्या निमित्ताने की होईना मलाही अनुच्या हातचा घरी तयार केलेला केक खायला भेटतो पण तो ही अणूंची नजर चुकवून. कधी कोणत्या कारट्याने मला खाताना पहिलाच तर मग मला अनु समोर जायची हिम्मतच होत नाही. पण माझ्या मुलीची ती लहान चिऊ मला थोडा केक आजीची नजर चुकवून घेऊनच येते तेव्हा खूप बरं वाटतं. या काळात मुलांचा घरभर होणारा दंगा घर असल्याची जाणीव करून देत नाहीतर महिनोन्महिने इथं चिरंतन शांतता नांदते. वस्तूंचा अबोल गुण माणसाची उपस्थिती दर्शवते आणि याच लहानग्या मध्ये आम्ही आमच्या मुलांची छटा पहातो त्यांना जवळ घेऊन कुरवाळत बसतो. रात्री झोपण्याअगोदर मी पुस्तक वाचत बसतो आणि अनु , ती तीच महिन्याकाठी प्रकाशित होणाऱ्या मासिकासाठी आणि पेपरांतील पुरवण्यांसाठी लेखन करते. दिवस भराचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी आमच्यासाठी हाच एक मात्र मार्ग आहे. दिवसभराच्या विचारांना रात्री अंथरुणावर पडल्यावरच पूर्ण विराम लागतो. आणि उद्याच्या दिवसाची एक नवीन सुरुवात करण्यासाठी मनाची तयारी करावी लागते. आयुष्याच्या साठीत सुरू झालेल हे क्रमबद्द जगणं कधी संपणार याची वाट बघत घालवणंच फक्त आता हातात उरलंय. घरातल्या याच निर्जीव वस्तूंशी हितगुज करून दिवसाची सुरुवात आणि सांगता होते. शरीर थकलंय पण जीव मात्र अजूनही बाह्य गोष्टींना बघून मनाला पल्लवीत करण्याचं प्रयत्न करततोय आयुष्याच्या शेवटाला विखरू पाहणार जीवनाचं हे सत्र आता झगडत , आपुलकीच्या दोन शब्दांनी विनू पाहतोय. आयुष्याच्या उत्तरार्धात साठीपर्यंतच्या आयुष्याचा क्रमपट डोळ्यासमोरून पिंजून काढतोय. अनिश्चित आयुष्याला कवेत घेण्याचा असफल पर्याय शोधतो आहे. डोळे मिटूस्तोवर....
