तिचं पत्र
तिचं पत्र
प्रिय , अभिनव
Hi अभिनव कसा आहेस तु ? मस्त ना , कुठे असतोस आणि काय करतोस सध्या ? लग्न वैगरे झालं की नाही ? हूं... अरे ! असा काय एकटक बघतोय पत्राकडे. कोणी पाठवलं असेल याचाचं विचार करतोय का ? त्याचाच विचार करतोय बहुतेक बरोबर ना !
सगळ्यात अगोदर सॉरी हं प्रश्नांच्या सरबत्तीसाठी ते कसंय ना आता तब्बल दहा वर्षांनी तुझ्याशी बोलतेय ना म्हणून......ओळखलस का मला ? नाही ना बरोबर माझा अंदाज अगदी अचूक होता बघ , नाही ओळखू शकला मला तू. म्हणूनच काही हिंट सुध्दा लिहिल्यात त्यावरून नक्कीच ओळखशील ना ? अम्म्म काय हिंट देउ तुला.... अम्म्म अम्म्म ? हम्म चल आठवलं. मी .. मी तुझ्याच क्लास मधली सेकेंड इअर नवीन ऍडमिशन , अबोल मनाची मनकावडी, तुझ्या मार्गात अडथळा आणणारी, मी तीच जिच्यावर तू नेहमीच चिडचास कोणत्यानं कोणत्या कारणाने , मी तीच जिचा तुला बघताक्षणी राग यायचा हो ना. तुझं माझ्याशी काही पूर्वायुष्यातलं वैर होत का ? हे माझ्यासाठी अजूनही न सोडवू शकलेलं कोडंच आहे. असुदे चल , ओळखलंस का आता ? की अजून ही नाही ? काय यार तू पण विसरभोळा झाला वाटत एवढ्या हिंट देऊन पण नाही ओळखू शकला मला ? इट्स ओके चल , मीच आता तुझ्या लेखी माझी ओळख सांगते चालेल ना ? मी तीच मिस चष्मीश , तुझ्याच कलासमधल्या तुझ्याच बाजूच्या डेस्कवर बसणारी सस्पिशिअस आणि वेंधळी मुलगी 'अस्मिता' आता बहुतेक डोक्यात चित्रछटा उमटली असणार बरोबर ना अगदी बरोबर ! अशीच होते मी प्रत्येकच्या आठवणींच्या कप्प्यात खोलवर कुठेतरी दडलेली चष्म्याचा एका वैगुण्यमुळे. शरीराचं वैगुण्य नष्ट करण्यासाठी जगण्यासाठीच्या काही गोष्टी मी टाळू शकत नव्हते ना आणि चष्म्यामुळे वळून बघणाऱ्या नजरही टाळू शकत नव्हते! मी काही कुणाच्या जास्त प्रकाशझोता मध्ये नव्हते पण , का कुणास ठाऊक तुझ्या प्रकाशझोता मध्ये तर कायमच राहायला होते . प्रत्येक वेळेस तुझी अन् माझी कोणत्यानं कोणत्या कारणावरून तरी नजरानजर व्हायची आणि तु जेव्हा माझ्या समोर यायचास नेमकं तेव्हाच मी गडबडून जायचे , माझ्या शरीरात एक अनामिक भीती दाटून यायची , आणि मग माझी धांदल उडायची माझं हृदय धडधडायला लागायचं आणि माझा असा वेंधळेपणा बघून बहुतेकदा तु चिडायचा, मला तुझा ओरडा पडायचा आणि मन अधिकच भरून यायचं अन डोळ्यांत काही काळासाठी पाणी तरळायचं . कदाचित माझीच चूक आहे तुझ्या समोर येण्याची अस मनाला समजवायची आणि मनाला आवर घालायची. तेव्हा मनाचं असं वाहवत जाणं समजायचं नाही परंतु आता मनाची ती घालमेल आता कळती आहे आणि अजूनही त्या भावनांनी पल्लवित होऊ पाहणार माझं मन कधी कधी वेदनांचा कचरा घेऊन डोळ्यातल्या अश्रूंनी वाहत आहेत. पण ..जाऊदे तू ठीक आहेस ना ?
आज ना आमच्या कडे मस्त पाऊस चालू आहे. संपूर्ण आसमंत पावसाने धुवून निघाला आहे , झाडे पावसात न्हाऊन निघत आहेत , अन वाऱ्याच्या झोतांन हलणारी झाडे पावसाचे स्वागत करत असल्यासारखे वाटत आहेत , त्यात पावसाच्या सरी तर इतक्या लक्षवेधक आहे की माझ्या या कोमल मनाचा अचूक ठाव घेत आहे माझ्या मनाची विचलता जाणून आहेत. वाऱ्याने आणि पावसाच्या या थंड थेंबानी अंगाला बोचनारा उल्हासित करणारा गार वारा वातावरणात पसरवला आहे सगळीकडे नुसता पावसाचा धो धो आवाज सुरु आहे अस वाटतंय कित्येक वर्षांच साठलेल दुःख तो पावसाची थेंबाच्या रूपात रडत असल्याचं मला भासतंय अगदी माझ्यासारखंच. पण त्याचं असं रडणं काहींसाठी प्रसन्न असल्याचं चिन्ह असावं अगदी त्या समोरच्या गार्डन मधल्या प्रेमी युगलं सारखं ! याच पावसात माझ्या गॅलरीतून दिसणाऱ्या समोरच्या गार्डन मध्ये दोन प्रेमी युगल मनसोक्त हुंडताना दिसताय , कश्याचंही भान नसलेलं हे प्रेमी युगल आज मला तुझी आठवण करून देताहेत. तुझ्या सोबत असल्याचं भासवताहेत माझ्याही नकळत. या अशा बेधुंद पावसात तू सोबत असता तर किती मस्त झालं असत ना हा विचारही किती आनंददायी आहे ! मला तर हे सर्व खूप भारी वाटतय आणि न विसरण्याजोगही , गॅलरीत उभं राहून डोळे बंद करून पावसाचे ते अगणित तुषार अंगावर घेत तू सोबत असल्याचं आभासी वलय निर्माण झाल्यासारख वाटतंय. वॉव ! सच अ ओसम रेन यार...एक नवीन अनुभव आणि तोही तुझ्या सोबत हाहह! अश्या या प्रसन्न वेळ तुझ्या सोबत च्या त्या अविस्मरणीय आठवणी नव्याने मला आठवू पाहताहेत.
खरंच यार पण तु ना माझ्या भूतकाळातील आठवणीतील एक सुखद दुखद सोबती होतास अगदी तुझ्याही नकळत. जो प्रत्यक्ष सोबत नसतानाही माझ्या आयुष्याचा अविभाज्य बनला भाग होता. माझा मनाचा पहिला विचार नेहमी तुझाकडे डोलूपाहणारा असायचा. आणि याच माझ्या आयुष्यातील अविभाज्य भागाची आज कडकडून आठवण येत आहे. आज मनात साठलेला त्या दहा वर्षापूर्वीच्या जुन्या स्वप्नांना आज ब्रेक लावावासा वाटतोय अश्या कटू आठवनी घेऊन जगण्यापेक्षा. आज नक्कीच माझ्या त्या भावना मांडण्यासाठी साठी वेळ झाला आहे परंतु आता मला त्या खूपच असहनीय झाल्या आहेत काही भूतकाळातल्या चुकांमुळे. पण आज त्या व्यक्त कराव्याशा वाटतातहेत. मनाची ती घुसमट आज पत्राच्या या कोऱ्या कागदावर अक्षरांच्या स्वरूप लिहीत आहे. अव्यक्त स्वभावाची मी नेहमीच शिकार राहिले आहे. त्यावेळी बोलण्यासाठी लागणार धाडस माझ्यात नव्हतं म्हणून आज असं पत्रातून व्यक्त व्हावंसं वाटतय. मी आज तुला तेच सांगायला हे पत्र लिहीत आहे अस नाही की मला आठवण आली म्हणून लिहीत आहे तर तुझ्या सोबतच्या आठवणींना परत उजाळा म्हणून हा प्रयत्न करत आहे. तु जेव्हा माझ्या समोर असायचास ना मला खूप मस्त वाटायचं. मन तुझ्या समोर असण्याने मला वेगळीच ऊर्जा मिळायची..माझा चेहरा खुललेला असायचा... तुला पहिल्यांदा पाहताच मी तुझ्या प्रेमात पडले होते पण ते अर्थातच एकतर्फी प्रेम होतं. मला तू तेव्हाच मनापासून आवडला होता आणि नंतर जसा जसा तू अजून उलगडत गेला तसं तसं मी अजूनच मी तुझ्या प्रेमात पडत गेले. तू ज्यापण ऍक्टिविटीत लीड करायचा त्यात आपसूकच माझा सहभाग असायचा. तुझा इतर वेळेस धीरगंभीर असणारा आवाज आणि नेतृत्व करतानांचा तो मृदु आवाज मला खूप आवडायचा. त्याच आवाज नेहमीची श्रोते राहिली होती. मला तो आवाज नेहमीच खुणावत असायचा त्यासाठी तुझ्या ग्रुप मध्ये यायचा प्रयत्न करायचे. तुझी ती एक्सलेंन करायची मेथड मला खूप आवडायची मी नकळत तुझ्यात गुंतत होते , तुझ्याकडे ओढली जात होते आजही तेवढंच प्रेम करते तुझ्यावर फक्त बदल एवढाच की तेव्हा तुला पाहून अजून प्रेम व्हायचं आणि आज तुझ्या आठवणी तुझ्या प्रेमात पडायला भाग पडतात.
आज पुन्हा त्या आठवणींना उजाळा देऊन तुला आठवत आहे. कळत नकळत तुझ्या सोबत जगलेले क्षण चित्रपटप्रमाणे अगदी सिरीयलवार माझ्या डोळ्यासमोर तरळतात. तुझा तो ' ओय मिस चष्मीश ' म्हणून आवाज देणं आजही आठवून आनंद होतो तसं तर मला कोणी चष्मीश म्हणणं मला आवडत नाही पण , तुझ्या त्या मृदु आवाजात ते चष्मीश म्हणणं अजूनच गोड वाटायचं. कधी कधी तू माझ्याशी खूपच रुडली वागायचं मला त्याचा रागही यायचा पण तुझ्यावर रागवायला मन तयार नसायचं आणि मग मन आणि बुद्धी यांच्यात द्ंवदव सुरू व्हायचं आणि म्हणतात ना आपल्या माणसावर रागावता येत नाही तसचं माझही व्हायचं.
आज अशा अनेक आठवणी आठवून मनातील दुःख आसवांचा स्वरूपात डोळ्यात दाटून येतात ...कदाचित तेव्हा थोडी हिम्मत केली असती तर , आज हा पाऊस तुझ्या सोबत अनुभवायला मिळाला असता पण ते फक्त स्वप्न राहील ...मी तेव्हा इतकी सुंदर नक्कीच नव्हते की , तू माझ्या कडे पहावं अशी मी इच्छा बाळगावी पण वेडया मनाची वेडी आशा. माझं तुझ्यावरच प्रेम तुला माझ्या डोळ्यात दिसावं , बऱ्याच वेळेस मी तुझ्या समोर आलेही पण तुला ते कदाचित दिसलं नसावं... तुला प्रत्येक गोष्टीत गम्मंत वाटत होती , प्रत्येक क्षणाला तु गंमतीवर घेत होतास , तु कधीच कोणत्या गोष्टीत गंभीर नव्हताच कदाचित तुझ्या याच स्वभावामुळे मी तुला माझ्या मनातल्या भावना सांगू कधीच शकले नाही. त्यांची तू अशीच खिल्ली उडवली असती तर याची मला भीती वाटायची. कदाचित तुझ्या मनात तसं काही नसेलही परंतु तुझ्या वागण्या बोलण्यातून तू इतरांना तुझ्या कडे आकर्षित करायचा , तुझी बॉडिलांग्वेज , तुझी ती नेहमीची स्माईल नेहमीच इतरांना खेळवून ठेवायची , अगदी मलाही ! त्या स्माईल मुळे मला तुझ्या आयुष्याचा हेवा वाटायचा कितीही टेंशन असलेतरी " चिल रे " हा शब्द तोंडातून आपोआप उद्गारला जायचा आणि तुझा तो चार्मिंग फेस मला नेहमीच प्रफुल्लित करायचा. तुझा तो बास्केटबॉल ग्राउंड वरचा पावसातला डांस मला खूपच आवडला होता. कदाचित मी पहिल्यांदाच पाहत होते म्हणून , तू एवढ्या भर पावसात सर्व काही विसरून , आपल्याच विश्वात असल्यासारखा डांस करत होता आणि मी बघ्याची भूमिका घेऊन पावसातल्या पाण्याचं मला सर्दीचं वरदान असूनही तुझ्या डांस बघण्यात मी मशगुल झाले होते. तुझ्या प्रत्येक गोष्टीत मला आनंद वाटायचा. आज हा पाऊस बघून तुझा तो डान्स पुन्हा डोळ्यासमोर येतोय. तुला आठवत एकदा कलास मध्ये असताना मला कोणाचा तरी कॉल आला आणि मी फोनवर बोलण्यासाठी पटकन डेस्क वरून उठून बाहेर पडणारच होते की ,माझी ओढणी डेस्कच्या कोपऱ्याला अडकली म्हणून मी मागे बघितलं तर तू अडकलेली ओढणी काढून देत होतास . तेव्हा पहिल्यांदा तु मला अस्मिता म्हंटला होता. मी फोनवरच बोलणं थांबवून क्षणभर तुझ्याकडेचं बघत बसले या प्रसंगानंतर माझ्या मनात तुझ्याबद्दल अजूनच आदर आणि प्रेम वाढत गेल.
तुला माहीत आहे अभिनव एकदा इकॉनॉमिक्सच लेक्चर चालू होतं आणि तु ते ऐकण्यात मग्न होता. त्या ब्लॅक शर्टमध्ये तु खूपच हॅन्डसम दिसत होता मला तुला पाहण्याचा मोह आवरलाच नाही आणि तुझा ब्लॅकबोर्डकडे बघत असतानांच चोरून फोटो काढला होतो. मला जेव्हा पण तू आठवायचस ना तेव्हा मी तोच पाहत बसायचे आजही मोबाईलच्या हाइड फोल्डर मध्ये सेव्ह केलेला तो फोटो बघत बसते अजूनही एक आठवण म्हणून मी हा फोटो जपून ठेवला आहे. आजही आठवणींचा उजाळा घेताना मन क्षण क्षण तुला आठवत असतं आणि त्या आठवणी मध्ये रमु पाहत. पण वेळ पुन्हा वास्तवात परतायला लावते आणि भूतकाळाला विसरायला लावत , डोळ्यांनाही भिजवतं अनिश्चित काळासाठी. असुदे चल , आता काही जास्त सेंटी होत नाही , आणि झाले तरी त्याला अर्थ नाही . सो 'चिल' अम्म्म बरोबर ना. तू माझं पहिलं प्रेम होतास आणि कायमच राहशील पण हृदयाच्या त्या छोट्याश्या कप्प्यात अनंतकाळासाठी. आता फक्त एकदा मला तुला प्रत्यक्ष भेटाचंय आणि ते चिल म्हणतांनाच स्माईल बघायचंय, भेटशील ना आशा करते. विसरू नकोस , चल बाय...
तुझीच एक चाहती ,
अस्मिता
समाप्त
