भारत हा कृषीप्रधान देश आहे , असे म्हटले जात असले तरी शेतक-यांची आवस्था लपून राहीलेली नाही. चेह-यावर स्मितहस्य असलेला शेतकरी केवळ राजकीय पक्षांच्या जाहीरातीतच दिसतो. एरवी शेती आणि शेतक-यांची आवस्था काय आहे , हे सांगण्याची गरज नाही.
शेतक-यांनो शेती करणे म्हणजेच जहर पिणे असे म्हणावे लागेल. दररोज पाच - दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत; याची कुणालाही काही दुःख अथवा वेदना होताना दिसत नाही. आपले आपल्या जातीपातीचे म्हणुन निवडूण दिलेले राजकीय शेतकरी प्रतिनिधी हे स्वतः शेती करणारे नाहीत, म्हणुन तर सरकार कोणत्या पक्षाचे आहे , यावर शेतक-यांचे शोषण अवलंबुन नसून सर्वच पक्षाचे राजकीय वा आर्थिक धोरणे ही शेतीविरोधीच आहेत. दुष्काळाने जनता होरपळत असली तरी राजकारणी लोकांचा (सत्ताधीस व विरोधक) हा खेळ चालूच आसतो. याविषयी वामनदादा म्हणतात
"तुम्हीच करता गुन्हा लबाड लुच्चा लुटणाराला निवडूण देता पुन्हा...!"
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतक-यांना कर भरण्याची सक्ती नव्हती, कर्ज परतफेडीची सक्ती नव्हती, तसेच शेतक-यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असा आदेश देऊन शिवराय शेतक-यांचा मानसन्मान करत होते.
आता शेतक-यांची परिस्थिती काय आहे, धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची जमिन औष्णिक वीज प्रकल्पात संपादीत केली होती. त्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या न्याय हक्कासाठी त्यांनी मंत्रालयातच विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. त्यांचे पार्थिव चार दिवस रुग्णालयातच पडून होते तरी सरकारने दखल घेतली नाही तर त्याच पाटलांची पत्नी वय वर्ष ८० व मुलगा यांना पोलिस प्रशासनाने मुख्यमंत्री यांच्या सभेस अडथळा निर्माण होईल म्हणुन त्यांना जेलबंद केले किती ही शोकांतिका म्हणावी लागेल.
दिवाळीत यावर्षी घडलेली घटना चार वर्षापासून सततची नापिकी , दुष्काळी परिस्थिती यामुळे उमरी तालुक्यातील तुरटी गावातील एका शेतक-याने शेतात स्वतः सरण रचुन पेटवून घेऊन जीवनयांत्रा संपवली. तर अनेक अभ्यासानुसार ५८ टक्क्यापेक्षा अधिक शेतकरी रोज रात्री उपाशी पोटी झोपतात. देशवाशीयांसाठी अन्न पिकवणारा शेतकरी रोज रात्री उपाशी झोपतो , ही कसली विडंबना आहे ? याबद्दल वामनदादा म्हणतात
" घाम शेतात आमचा गळं चोर ऐतच घेऊन पळं !
लोणी सारं तिकडं पळं इथे भुकेनं जीव हा जळं !! "
अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे.
शेतकरी बांधव अज्ञान , भावना , गरज नाईलाज वा इतर कोणत्याही कारणास्तव केवळ व केवळ एकमेव उत्पादन तसेच उत्पन्नाचे साधन म्हणून काळ्या मातीशीच नाळ जोडून भावनातिरेक करत आहेत; त्यांना अपवाद वगळता मृत्यूशिवाय दुसरा पर्याय वर्तमानात तरी आज दिसत नाही.
आज जगभरातील शेतकरी , शास्त्रज्ञ , चंद्र, मंगळावर जात आहेत मात्र भारतातील शेतकरी आजही देऊळ , देव , देवस्की , बुवा , बाबा , बापु , नवस - सायास फेडण्यातच गुंतला गेला आहे.
शेतक-यांना पुढे करून अथवा त्यांचा वापर करुन झालेले पुढारी अथवा संशोधक यांना भारतरत्न किंवा पद्म वा इतर राष्ट्रीय , आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे ठरले मात्र ज्या आमच्या शेतक-यांनी हरितक्रांती घडवली त्यांच्या शेतीमालाला योग्य भावही मिळाला नाही ही फार मोठी शोकांतीका आहे. या लोकांनी फक्त शेतक-यांचा वापर करून घेतला. त्याबद्दल वामनदादा म्हणतात
"तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय
समाजाच काय आता समाजाच काय ? "
शेतकरी जेव्हा परंपरागत शेती करत होता. तेव्हा त्याला अडाणचोट ठरवत होते , आज तो रासायनिक व अद्यावत यांत्रिकी अँटोमाईज्ड शेती करत असताना त्याला मागासलेले ठरविले जात आहे.
भारतीय हवामान खात्याकडून दरवर्षीच्या मान्सून आणि मान्सून परतीच्या पावसाचे तसेच दररोज हवामानाचे अंदाज सांगितले जातात त्यावर शेतक-यांचा विश्वास राहीलेला नाही. त्यामुळे बीडच्या शेतकरी संघर्ष समितीने पोलीस ठाण्यात हवामान खात्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच पुणे येथिल भारतीय हवामान खात्याच्या वेधशाळेला टाळे ठोकणार असे पत्र देखिल शेतकरी संघर्ष समितीने हवामान खाते पुणे - बीड जिल्हाधिका-यांना पाठविल्याचे समजते; जी आश्चर्य करणारी बाब आहे. या हवामान खात्यावर दरवर्षी कोट्यावधी रूपये खर्च होत असतात. पण तरीही पावसाचे अंदाज चुकतात का ? या चुकीच्या अंदाजामुळे आज शेतकरी संकटात आहे.
महाराष्ट्र व मध्यप्रदेश शेतक-यांनी शहरी भागात जाणारा भाजीपाला व दुध पुरवठा रोखून धरला त्यामुळे पोलीसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतक-यांना जीव गमवावा लागला. स्वतःच्या शेतमालाला भाव मिळवण्यासाठी जर जीव द्यावा लागत असेल तर किती दुःखाची गोष्ट आहे.
निवडणुक काळात सर्वच राजकीय पक्ष शेतक-यांना त्यांच्या सर्व मागण्या पुर्ण होतील , असे आश्वासन देतात, मात्र निकाल हाती येताच शेतक-यांकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करतात. ज्या दिवशी शेतकरी जाती , धर्म , राजकीय विचारधारा यातुन बाहेर पडेल आणि फक्त मी शेतकरी म्हणुन या सरकारशी लढा देईल त्या दिवशी चित्र बदलले असेल हे नक्की.
सरकारला दुःखाची जाणिव करून देण हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी करत आहे , त्यासाठी द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायच का नाही सरकार... शेपुट हलवून हलवून म्हैस दमते मात्र पाठीवरचा कावळा उठत नाही , तसा आत्महत्येचा विचार शेतक-यांची पाठ सोडत नाही. कोरडे आभाळावाणी कपाळ असणा-या बायका , बिन बापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावरं हे सार गावाला नजर लागली म्हणुन होत नाही तर गावाकडे कोणाचीच नजर येत नाही म्हणुन होत आहे. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो, अन्यायाची जाणिवच झाली नसती, देवाचा कोप समजून बसलो असतो अंधारात , तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचीडासारखे चिटकून बसलेत सातबा-याला सावकार अन् बुजगावण्यासारखं उभय सरकार. आभाळ वाटतय सावत्र आईवाणी , दुष्काळाच कुरूप ठणकत चाललय अन् शेतक-यांसाठी कोंडवाडे बांधायच ठरवून सरकार शांत झोपी गेलय , देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी . खिचडीसाठी शाळेत जाणा-या पोरानं आणलेल्या खिचडीचे चोरूण दोन घास खाताना त्यांच्या बापाला अभिमान वाटावा आपल्या पोराचा कि स्वतःच्या जगण्याची लाज. अजून अंत पाहु नका सरकार , शेताचा मसणवाठा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभ पिक जाळतो आम्ही , त्यादिवशी सरकार तुमच्या नावान सुतकच पाळतो आम्ही.
आतातरी विचार करा सरकार नाहीतर ' एक किलो गव्हासाठी एक दिवस देश गहाण ठेवलेला असेल '.
" सुपीक सारे शेत शिवारी आम्हीच करणारे,
कष्टाने कोठार धन्याचे आम्हीच भरणारे,
दाम मागतो काम खुशीने
खुला करा साठा आमचा वाटा द्या वाटा "