Navanath Repe

Others

3  

Navanath Repe

Others

मंदिराचा वाडा, गुंडांचा आखाडा!

मंदिराचा वाडा, गुंडांचा आखाडा!

5 mins
1.4K



जगाच्या तुलनेत विचार केल्यास भारताला मंदीराचा देश म्हणून ओळखतात. कारणही तसेच विविध प्रकारच्या मंदिरांची आधीच गर्दी झाली असतानाही, चढत्या आलेखाने, मंदिरे बांधण्यात येत आहेत. मानवी वसाहतीत श्रध्दा या शब्दाने आणि संकल्पनेने समाजातील प्रत्येक माणूस मानसिकदृष्ट्या चेपल्याचे दिसून येते. शहामृग जसा वाळुचा उपयोग करतो तसा धार्मिक माणूस श्रध्देचा. श्रध्दा हा शब्द मानवी मेंदूला इतका भेदून गेला, की विचार करणा-या मज्जातंतूच्या ग्रंथींना ड्रिल करीत आरपार छेद करून गेला ! या मेंदुच्या छिद्रातून श्रध्दा सतत हवेप्रमाणे वाहत असते. मग शिक्षित असो की अशिक्षित असो ! आई - वडील कुटुंबात जनमलेल्या आपल्या मुलाबाळांना त्यांना समज आली असेल तेव्हापासून श्रध्देचं ड्रिलिंग त्यांच्या मेंदूवर करीत असतात. श्रध्देचे पालन नाही केलेतर आपले फार मोठे अहित होणार, आपल्यावर संकटे ओढवणार, आपत्ती येणार, कुटुंबावर आणि आपल्यावर दुर्दशेचा प्रसंग येणार, आणि भिकारी होणार, श्रध्देने मंदिरात दान केले नाहीतर आपले पाप धुतल्या जाणार नाही, श्रध्देने डोकं टेकवून देवाच्या पाया पडलो नाहीतर देव रागावणार ! आपली मनोकामना पुर्ण होणार नाही. आपण नरकात जाऊ ! पापाचे वाटेकरी होऊ ! दारावर आलेल्या फकीराला दान दिले नाहीतर तो आपल्याला शाप देईल, कोणी भिक्षुकांनी पैशाकरीता हात आपल्याकडे धरला तर त्याला काहीतरी श्रध्देने द्यावेच, आशा कितीतरी वैचारीक विकृती या श्रध्देने आपल्या मनात घुसवून दिल्यात. त्या निघता निघत नाहीत ! आणि निघणारही नाहीत !. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात -
"मंदिरे , क्षेत्रे दुकाने झाली ! पूजा; कमाई करू लागली !
दक्षिणा पात्रे पुढे आली ! पोटासाठी !!"
दक्षिणेतलं शबरीमला मंदिर सध्या वादाच्या केंद्रस्थानी असून सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निकाल मानण्याबाबत आज गंभीर पडसाद उमटत आहेत. महिलांना मंदिर प्रवेश नाकारण हे घटनाबाह्य असून त्यांना प्रवेश नाकारता येत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच न्यायालयानं दिला आहे.
न्यायालयाचा निर्णय म्हणजे दक्षिणेतल्या कर्मठ व सनातनी प्रवृत्तीला आळा बसवणा-या त्या निकालाचे स्वागतच केले पाहीजे. हा निकाल देताना सरन्यायाधीस दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केल होत की, श्रध्देच्या नावावर कुणाशीही लिंगभेद केला जाऊ शकत नाही. सर्वाना समानतेनं वागणूक देणं हे कायदा आणि समाजाच काम आहे. तर न्यायाधीश इंदू मल्होत्रा या म्हणाल्या की, या निर्णयाचा दूरगामी परिणाम होईल. धार्मिक परंपरामध्ये कोर्टानं हस्तक्षेप करू नये. एखाद्याच्या एखाद्या धार्मिक प्रथेवर विश्वास असेल तर त्याचा सन्मान व्हावा; या प्रथांना संविधानाचं संरक्षण आहे. समानतेच्या अधिकाराकडे धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारासोबत पाहिलं पाहिजे प्रथा रद्द करणे हे कोर्टाचं काम नाही. एका महिला न्यायाधिशानं असं मतं नोंदवावं, यावरून अजूनही महिलांवर धार्मिक परंपराचा किती पगडा आहे हे स्पष्ट होत. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात -
"संतमहंतांनी कथन केले ! परि ते पुढे विपर्यस्त झाले !
मानवा - मानवात खंड पाडले ! पाखंड्यानी !!
एक युवती श्रध्देनं देवाच्या दर्शनासाठी येते आणि तिच्या तिथं जाण्याने मंदिरात विटाळ होतो, म्हणून ते मंदीर दुधांन धुतलं जातं. दूध देणारी गाय, म्हैस ही मादी आहे, मग तिच्याच दुधानं ते मंदिर पवित्र होतं, तर माणसांच्या स्पर्शान अपवित्र कसं ? कुणी केल्या असल्या खुळचट कल्पना ?
या असल्या खुळचट कल्पनांच्या नादी न लागता आमच्या तरूणींनी व महिलांनी आता प्रबोधनकारांनी सांगितले त्याप्रमाणे "शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी ३३ कोटी देवांनी फलटण बाद होते". मग कधी समजणार हे आमच्या महिलांना. आपले महामानव व महाषुरूषांना समजून घेतले व त्यांचे नाव जरी उच्चारले तर सर्व देवळांतील देव बाद होत असतील तर मग मंदिरात जायचेच कशाला . ज्याठिकाणी न्यायालयाने निर्णय देऊन पण महिलांना प्रवेश व समानतेची वागणूक मिळत नसेल तर मग त्यासाठी एवढा खटाटोप का करायचा हे आता सर्व महिलांनी व त्यांच्या कुटुंबातील तरुणींनी व तरूणांनी समजून त्या मंदिर व मंदिरप्रवेशाकडे कानाडोळा करून आपले शिक्षण , व्यवसायाच्या माध्यमातून प्रगतीच्या शिखरावर जाणे योग्यच ठरेल. याविषयी डाँ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात " स्त्रीयांच्या प्रगातीवरच समाजाची प्रगती अवलंबून आहे.
मात्र महिलांना वाटते की देवाची श्रध्दा, पुजा करावी पण श्रध्देचे स्वरूप केवळ ईश्वर अगर देव समर्पित होऊन गेले. याचे कारण काय ! तर देव आम्हाला सर्व काही देतो, आमच्या मनोकामना पुर्ण करतो. देव पावतो अशी समज ! ही पक्की मनोकामना होऊन गेली.
याविषयी तुकाराम महाराज म्हणतात -
"जे का रंजले गांजले ! त्यासिच म्हणे जो आपुले !
तोचि साधू ओळखावा ! देव तेथेचि जाणावा !! "
मात्र आमची श्रध्दा याविषयी भावना ही कोळीच्या जाळ्यात अडकल्यासारखी स्थिती होऊन जाते.
"सावित्रीच्या लेकी खुप खुप शिकल्या !
नोकरीला लागल्या, पण परंपरा सोडवत नाही,
चतुर्थीच्या दिवशी चंद्र उगवल्याशिवाय जेवत नाही !!"
याविषयी सुप्रसिध्द विचारवंत बट्रारड रसेल म्हणतात "देव , धर्म व्रतवैकल्य हे स्त्रीमुक्तीच्या मार्गातील अडथळे आहेत."
अशावेळी निश्चितच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहलेल्या वास्तववादी भजनांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात " मंदिर मंदिर क्या घुमता है , पहिले सेवा कर गरीबोकीं ", त्यापुढेही जाऊन राष्ट्रसंत म्हणतात " मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी ".
श्रध्दा हा आमच्या अतिशयोक्ती कृत्यामुळे ती अंधश्रध्दा होऊ शकते आणि प्रर्यायाने आत्मघातकी निश्चितच ठरू शकते. सध्या मंदिरात प्रवेश मिळावा या श्रध्दपोटी होत असलेले देखावे याचेच प्रतिक दिसतात.
श्रध्दा व अंधश्रध्दा यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "परि बाप शंभर कोसांवरि मेला ! मुलगा सुतक पाळी मुंबईला. !!" अशाच कारणास्तव भारत धार्मिक आणि श्रध्दावंताचा देश झाला आणि विज्ञानवादी संशोधनात्मक विकसनशीलतेच्या शर्यतीत इतर देशांच्या तुलनेत मागे पडला ! याच देवांच्या देवळांसाठी व देवासाठी काही लोक भिकारी झाले तर काही करोडपती झाले. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात -
"काही सोनियाचे देव करिती ! वेळ पडल्या विकोणी खाती !
ऐसी आहे देवाची फजीती ! पूजकांमागे !!."
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्र्यंबकेश्वर , शनी मंदिर आणि हाजी अली दर्गा यामध्ये महीलांना मंदिरात प्रवेश मिळावा हा चांगला निर्णय आहे त्याचे स्वागतच करायला हवे मात्र मंदिरप्रवेशांने महिलांचे सर्वच प्रश्न मार्गि लागणार आहेत का ?
स्त्रियांना शिक्षणघेण्याचा अधिकार हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिला, तो कुठल्याही देवी देवतांनी नाही. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात -
"महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास ! करील ऐसे शिक्षण खास !
जरी दिले जाईल त्यास ! तरीच भावी जग पालटे !!
मात्र आज बहुजनांच्या घरातील महिलांची शिक्षणामुळे होणारी प्रगती पाहवत नसल्या कारणांमुळे काही सनातनी विचारसरणीच्या लोकांचा एक गट समानतेच्या नावाखाली बहुजन समाजातील महिलांना मंदिराकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यातील एक गट मंदिरप्रवेशास विरोध करत आहे. याचाच अर्थ आमच्या बहुजन महिलांची व समाजाची दिशाभूल करून गुंत्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आजच्या महिलांनी तथागत बुध्दांपासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या साखळीतील एक जरी महाषुरूष पुर्णपणे समजून घेतला तर आमच्या घरातील महीला देवळांतील देवांच्या व काही विक्रूत विचारसरणी असलेल्या व्यक्तीच्या नादी लागणारच नाहीत. तुकडोजी माहारज म्हणत "तुझ गावचं नाही का तिर्थ तु रिकामा कशाला फिरतं"
तर संत तुकाराम महाराज म्हणतात -
"मंदिराचा भव्य वाडा ! झाला गुंडाचा आखाडा !! तसेच
"मायबापे केवळ काशी ! ते न जावे तीर्थासी !!"
केव्हा समजून घेणार आहेत महापुरुषांना आमच्या घरातील महीला हाच प्रश्न पडतो.


"तुका म्हणे सत्य सांगो , येवोत रागे येतील ते ! "



Rate this content
Log in