Navanath Repe

Others

3  

Navanath Repe

Others

राजर्षी शाहु महाराज

राजर्षी शाहु महाराज

4 mins
1.3K


'बहुजन समाज शिकुन शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाही', असे सांगणारे राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले होते. त्यांचा बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर विवाह झाला आणि त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुले आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या होत्या. शाहू महाराजांनी विद्यार्थीदशेत इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला होता.


राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार केला एवढेच नाही तर ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या आणि जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली होती. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन करून खेड्यापाड्यातील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जाती-जमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञाही काढली व अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. शाहू महाराजांनी जातीभेद दूर करण्यासाठी आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता देऊन विवाहाला मान्यता देणारा तसा कायदा पारित केला होता आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून देऊन त्यांनी त्यांच्या संस्थानात १०० मराठा - धनगर विवाह घडवून आणले होते. अशा अनेक कार्यांच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला. तसेच कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळापासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी १९१७ साली पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली आणि देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली होती.


कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने राजर्षी शाहू महाराजांना क्षत्रियत्व नाकारून त्यांना शुद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. राजर्षी शाहू महाराजांनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली होती. मग ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली होती. वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णीयांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहू महाराजांची धारणा झाली होती. वेदोक्त संघर्ष हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एक वादळच होते. मग ते महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यामुळेच ही चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने फुलेंचीच परंपरा पुढे चालवून प्रत्यक्ष सहकार्य केले होते. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल'ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू' हे पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणाची नेमणूक करणे म्हणजे हा धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत एक अभिनव प्रयोग होता.


राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. त्यामुळे राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. म्हणून तर राजर्षी शाहू महाराजांना 'आरक्षणाचे जनक' म्हणून ओळखले जाते.


शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले होते परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली होती. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला होता. त्यामुळेच डॉ. भिमराव रामजी आंबेडकर म्हणत की, 'दिवाळीच साजरी करायची असेल तर राजर्षी शाहू महाराजांची जयंती ही दिवाळीप्रमाणे साजरी करा.' तसेच राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करताना त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती.


राजर्षी शाहू महाराजांनी शेतीच्या आधुनिकीकरणासाठी संशोधनाला पाठिंबा देऊन त्या काळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले होते.


राजर्षी शाहू महाराजांनी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकांनी त्यांना ठार मारण्याचेही प्रयत्न केले होते. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँबफेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. तसेच शाहू महाराजांना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले होते. ज्यांच्या पूर्वजांनी राजर्षी शाहू महाराजांना त्रास दिला आज त्यांचेच वंशज इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत.

 

राजर्षी शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्या दिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात तसेच कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो.


Rate this content
Log in