महासम्राट बळीराजा
महासम्राट बळीराजा
आजही बळीराजा म्हटलं की आपलं काहीतरी आहे असं वाटतं. बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता म्हणून तर आजपासून तीन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका अत्यंत गुणी राजाचं स्मरण आजही होतेय हे आपण बघतच आहोत त्यामध्ये बहीण भावाला ओवाळताना भावाला शुभेच्छा देण्याच्या हेतूनं ती म्हणते की, 'इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो'. भावाला ओवाळताना बहीणीनं केललं बळीराजाचं स्मरण हे एक प्रकारच्या उत्स्फूर्त कृतज्ञतेचं उदाहरण म्हटलं पाहीजे असे डाॅ. आ.ह.साळूखे म्हणतात.
बळीराजाविषयीच्या कृतज्ञतेचं आणखी एक हृदयस्पर्शी उदाहरण केरळमधील 'ओणम्' या सणामागे असलेल्या एका पुराणकथेत आढळतं. या पुराणकथेप्रमाणे बळीराजा पाताळात राहतो. त्याला वर्षातून फक्त एक दिवस पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेला भेटण्याची परवानगी असते. आपला लाडका बळीराजा वर्षातून एक दिवस आपल्याला भेटायला येणार आणि आपण दु:खी आहोत असं त्याला कळलं तर तो पुन्हा वर्षभर आपली काळजी करत राहणार; असं होऊ नये म्हणून आपण एक दिवस तरी सुखी असल्याचे नाटक करू असं लोक ठरवतात. मग त्या दिवशी जो सण साजरा करतात तोच 'ओणम्' होय. बळीराजा त्या दिवशी वर येतो आणि पाहतो तर काय ? माझा शेतकरी सुखा समाधानाने राहतोय, अंगाला उटणे लावून स्थान करतोय, फटाके फोडतोय, गोडधोड खातोय हे पाहील्यानंतर बळीराजा समाधानी होतो. बळीराजाला आपल दुःख समजलं नाही म्हणून प्रजाही नि:श्वास टाकते. या कथेत ऐतिहासिक सत्य आणि काल्पनिक अंश याच मिश्रण झालेलं आहे, तो अंश अलग करणं हा संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे असं डाॅ.आ.साळूंखे म्हणतात. पण भारतीय लोकांच्या अंत:करणात बळीराजाविषयी किती जिव्हाळ्याची भावना आहे हे या कथेवरुन स्पष्ट होतं. प्रजेच्या दु:खाने दु:खी तर सुखानं सुखी होणारा बळीराजा हा त्याच्या स्वत:च्या काळात गोरगरीब लोकांना आधार वाटत असला पाहीजे आणि आजही त्याच्या आठवणीनं सर्वसामान्य माणसांचा ऊर कृतज्ञतेनं भरून येतो. बळीराजा प्रजेच्या सुखदुःखात स्वत:च सुखदुःख पाहण्याइतका महाण होता म्हणून आजही लोकांच्या अंतर्मनात, जणू काही ह्रदयाच्याही ह्रदयात, विराजमान झालेला आहे. भारतीय संस्कृतीच्या उष:काली होऊन गेलेल्या बळीराजाचा वारसा आजही आपल्या अस्तित्वाला गंधित करीत आहे, ही आपल्या दृष्टीनं किती आनंदाची व गौरवाची बाब आहे असे चिंतन : बळीराजा ते रवींद्रनाथ या पुस्तकात डाॅ.आ.ह.साळूंखे लिहतात.
हिराण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यपू हा महान बुद्धीप्रामाण्यवादी होता. हिरण्यकश्यपू म्हणजे सोन्याचे पर्व असलेला काळ. हिरण्यकश्यपूच्या राज्यात शेतकरी-कष्टकरी-कामगार हे सुखी समाधानी होते. संत नामदेव महाराज हिरण्यकश्यपूला थोर, महाबळीवंत आणि विख्यात म्हणून संबोधतात. अशा थोर, महाबळीवंत, विख्यात हिरण्यकश्यपूचा ब्राम्हणांनी वेशांतर करून खून केला. पण सांगण्यात आले काय ? विष्णूने नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूला मारले. याविषयी संत नामदेव महाराज हे त्यांच्या अभंगात सांगतात की, "दैत्यराजा थोर महाबळीवंत !
जगी तो विख्यात हिरण्यकश्यपू !!"
हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद होता. प्रल्हादाला दोन मुलं होती एक विरोचन आणि दुसरा कपील त्यातील विरोचनाच्या विचारातून जैन दर्शन तर कपीलाच्या विचारातून बौद्ध दर्शन विकसित झालेले आहे. विरोचनचा मुलगा बळी होता. या बळीच्या राज्यात सर्व प्रजा व शेतकरी सुखी समाधानी होता. प्रजाहितदक्ष म्हणून बळीराजाची ख्याती होती. तसेच बळीच्या राज्यात ब्राम्हणांचे लाड तसेच मुर्तीपूजा केली जात नव्हती. त्यामुळेच बळीराज्यात ब्
राम्हणांचे वर्चस्व व वर्णव्यवस्था धोक्यात आली; तर ब्राम्हणांनी धर्मग्लानी झाली म्हणून ओरड केली. बळीराजा हा समताप्रिय होता. आजही समताप्रिय माणसाला धर्मांध लोक शत्रू समजतात म्हणून तर डाॅ. नरेंद्र दाभोळकर, काॅ.गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्या होताना दिसतात. बळीराजाविषयी ब्राम्हणांचे मत काय होते हे संत नामदेव महाराज त्यांच्या अभंगात लिहतात की,
'बळीराजा दैत्य बहुत मातला !
संपत्ति हरिल्या देवांचिया !!'
बळीराजाने ब्राम्हणांची एकाधिकारशाही संपुष्टात आणली होती म्हणून तर ब्राम्हण बळीराजाला मातला असे म्हणतात. तसेच बळीराजाला मारण्याचे षडयंत्र करून देवाने वामन अवतार घेऊन बळी पाताळी घातला असे म्हणतात. बळीराजा पाताळात घातला म्हणजेच बळीवंशाची विचारधारा आणि तत्त्वज्ञान नष्ट केले. पण संत नामदेव महाराज म्हणतात की,
'अपराधाविना बळी पाताळी घातला !'
तसेच संत कबीर म्हणतात की, देवाने अवतार घेऊन बळीला पाताळात घातले हे चूक आहे. त्याविषयी ते म्हणतात की,
'बामन होय नहीं बली छलिया !'
तर संत तुकोबाराय म्हणतात की, बळीराजा सर्वस्वी उदार होता, सर्वांसाठी मदतीचा त्याचा हात वर असायचा. बळीच्या राज्यात धर्मग्लानी झाली नव्हती मग बळीला पाताळात घालण्याचे कारण काय ? म्हणून संत तुकोबाराय त्यांच्या अभंगात लिहतात की,
'बळी सर्वस्वी उदार ! त्याने उभारीला कर !
क्रोधित कहार ! तो पाताळी घातला !!'
मग वामनाने बळीराजाला पाताळात का घातले असा प्रश्न महात्मा फुले ब्राम्हणांना विचारतात की,
'वामन का घाली बळी रसातळी !
प्रश्न जोतिमाळी ! करितसे !'
तसेच वामनाने बळीला साडेतीन पाऊले जमिन मागितली तेव्हा वामनाने एक पाऊल जमिनीवर एक पाऊल आकाशात तर उरलेले पाऊल बळीराज्याच्या डोक्यावर ठेऊन बळीराजाला पाताळात घातले असे सांगतात परंतू महात्मा जोतिबा फुले म्हणाले की, एक पाऊल आकाशात अन् एक पाऊल जमीनीवर ठेवले तेव्हा वामन्याची फाटली कशी नाही हा प्रश्न निर्माण करून ब्राम्हणवाद्यांना सळो की पळो करून सोडले होते.
म्हणजेच ब्राम्हण आणि ब्राम्हणी धर्म जेव्हा जेव्हा संकटात येतोय असे जेव्हा ब्राम्हणांना वाटते तेव्हा तेव्हा ते अवतार म्हणून सांगतात आणि बहुजनांतील महापुरुषांना कपटाने मारतात हे काही नवीन नाही. तरीही आमचे बहुजनांतील घराघरातील शिकली सावरलेली लोक आजही आवतारावर विश्वास ठेवतात तेव्हा खरेच ते एक मानसिक गुलाम आहेत हे खरे पटते.
दरवर्षी आणि दरवेळी बहीण भावाला ओवाळताना बळीचे राज्य यावं म्हणून मागणी घातले परंतू आजचे भाऊ दरवर्षी आणि दरवेळी वामनांच्या वंशजांना मतदान करून बळीराज्याची अपेक्षा करणा-या बहीणीच्या स्वप्नाचं पाणी पाणी करतात तेव्हा त्या भावाच्या बुद्धीची कीव येते. म्हणून भावांनो तुम्ही खरच एकदा तरी महासम्राट बळीराजा, महात्मा फुलेंनी लिहलेला गुलामगिरी, शेतक-यांचा आसूड हे ग्रंथ वाचा आणि मग तुम्हीच या वामनी विचारांच्या वारसदारावर महात्मा फुलेंनी सांगितलेला शेतक-यांचा आसूड उगारून बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर यांच्या रक्ताच्या वारसदारांना मतदान करण्याऐवजी विचारांच्या वासरदारांना मतदान करताल तेव्हा नक्कीच तुम्हाला तुमच्या बहिणीला बळीचं राज्य तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे 'याची देही याची डोळा' दिसल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.
'सत्या सत्यासी मन केले ग्वाही
जुमानिले नाही बहुमता !'