बात में कोई तो राज हैं
बात में कोई तो राज हैं


लोकसभा निवडणुका जवळ आल्याने पक्ष आपले जाहिरनामे, टॅगलाईन प्रसिद्ध करत आहेत. परंतू काही राजकीय लोक परस्परावरती आरोप प्रत्यारोप करत आहेत. तेव्हा त्यांच्या आरोपात काहीतरी राज नक्कीय दडलय का ? हा प्रश्न पण म्हत्वाचा वाटतोच.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने टॅगलाईन आणि प्रचार करण्यासाठी ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही टॅगलाईन व थीम साँग भाजपाने प्रसिद्ध केले आहे. तसेच ‘काम करणारे सरकार’, ‘प्रामाणिक सरकार’, 'मोठे निर्णय घेणारे सरकार’ या तीन संकल्पनेंवर भाजप निवडणूक लढवत आहे.
सत्तेवर आलेल्या सरकारला 5 वर्ष पुर्ण होत आली परंतू 5 वर्षांपूर्वी आम्हाला सांगण्यात आले की, सगळे काँग्रेसचे नेते भ्रष्टाचारी आहेत, तर मग 5 वर्षात किती नेते जेलमध्ये गेले, त्यांच्या जप्त्या झाल्या ? परंतू त्याचे उत्तर काहीच नाही. ना वाड्रा जेलमध्ये गेला, ना राममंदिर झालं, ना 15 लाख मिळाले, ना काळे धन परत आले, ना दाऊद ना माल्यास परत आणले, ना दोन कोटी रोजगार मिळाले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवर अत्याचार थांबले, ना स्मार्ट सिटी झाल्या, ना बुलेट ट्रेन धावली, ना दहशतवाद थांबला, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वस्त झालं, ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला, ना स्टार्टअप इंडिया झाला, ना मेक इन ना स्किल इंडिया ना डिजिटल इंडिया झाला, ना अच्छे दिन आले, ना चीन घाबरला, ना डॉलर घसरला, ना मराठा, धनगर, मुस्लिम,जाट आरक्षण मिळाले, ना शिवस्मारक ,ना बाबासाहेब यांचे स्मारक तयार झाले. तरीपण हे लोक आज परत एकदा जाती - धर्माचे मुद्दे घेऊन मतांचा जोगवा मागत फिरत आहेत.
आता ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेलं भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाचं उत्तम उदाहरण आहे. एखाद्या राजकीय पक्षाकडून आणि त्या पक्षाच्या नेत्यांकडून असाच प्रकारच्या भाषणाची अपेक्षा असते. राज यांच्या भाषणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या भाषणांची आणि त्यांनी डंका वाजवलेल्या कामाची पोलखोल करणं हे हल्लीच्या राजकारणात बहुदा पहिल्यांदा घडत असेल. देशाच्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जितका महत्त्वाचा असतो तितकाच विरोधी पक्ष महत्त्वाचा असणं गरजेचे असते. सरकारच्या योजनेची, नरेंद्र मोदींच्या भाषणाचे व्हिडिओ पुरावे देऊन राज ठाकरे यांनी सरकारवर आणि भाजपावर जोरदार ताशेरे ओढले. खरंतर देशातील सगळ्याचं राजकीय पक्षांनी भाषण करताना एकमेकांचे मुद्दे खोडून काढले पाहिजेत. मात्र लोकांच्या भावनांशी खेळून अनेक पक्ष आणि नेते स्वतःची राजकीय पोळी भाजतात. राज ठाकरे यांच्या भाषणाची शैलीत ताशेरे ओढताना त्याचे पुरावे, कागदपत्रांचे दाखले, व्हिडिओ दाखवून लोकांशी संवाद साधला. त्यामुळे देशाच्या बदलत्या राजकारणामध्ये ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यामुळे म्हणावे वाटते की, राज की 'बात में कोई तो राज हैं !'. त्यामुळे राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत हीच अपेक्षा सत्ताधा-यांकडून आहे.
आज पत्रकार भाजपला विरोध करताहेत ?, 600 अभिनेते कलाकारांनी भाजप विरोधात भूमिका घेतली आहे ? देश वाचवायचा असेल तर भारत देशाच्या संविधानाने आपल्याला अनेक मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यापैकीच एक आहे बोलण्याचे स्वातंत्र्य आज पर्यंत आपण सर्व खुले आमपणे मागील सरकार विरुद्ध बोलत होतो पण हे सरकार काय करतेय याकडे लक्ष द्या सरकारविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचे खटले भरले जात आहेत. माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. त्यांना सरकारविरुद्ध जास्त बोलू दिले जात नाही. त्यामुळे संविधानाच्या महत्त्वाच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. जो सरकार विरुद्ध बोलेल त्याला देशद्रोही ठरवले जात आहे परंतू भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे प्रचार सभेतील भाषणात भारतीय सैनिकांना दोनदा अतिरेकी बोलले...! तर मग हा देशद्रोह नाही का ? त्यामुळे ही लढाई कुठल्या पक्षाविरुद्ध नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी भाजप आणि आरएसएस यांच्या विचारसरणी विरुद्ध आहे.
आजतरी आपण सावध होणे गरजेचे आहे. भाजपचे खासदार तर म्हणतात की, यावेळी निवडून आलो तर परत निवडणुकाच होणार नाहित. म्हणजेच उद्या आम्ही सरकार कार्यपध्दतीवर प्रश्न निर्माण केले तर लगेच देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले जाऊ शकते. याविषयी अनेक पत्रकार भीती व्यक्त करीत आहेत. ही निवडणूक म्हणजे तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. म्हणून विशेषतः तरुणांनी याकडे विशेष लक्ष दिले पाहीजे.
आज न्यायव्यवस्थेवरही त्यांनी घाला घातला आहे. पाच वर्षात भाजपच्या अनेक लोकांनी भ्रष्टाचार केला, काही नेत्यांनी बलात्कार केले, लोकांचा छळ केला कुणालाही अटक झाली का ?. आज न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे, त्यामुळे लक्ष द्या कारण उद्या वेळ तुमच्यावर ही येऊ शकते.
सत्य बोलणाऱ्या पत्रकारांनाही न्यूज चैनल मधून काढले जात आहे, संपादकांना भाजप विरोधी लिखाण करू नये यासाठी दबाव आणला जात आहे तर मग आपले प्रश्न मांडणार कोण ? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांच्या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज ठाकरे यांनी मोदींच्या अनेक धोरणांची पोलखोल केली त्यातील काही मुद्यांमुळे पंतप्रधान – पक्षाध्यक्ष यांची झोप उडली आहे हे मात्र नक्की.
देशाला पंतप्रधानांपासून धोका आहे त्यासाठी पंतप्रधानांना हटवा असे म्हटले त्यावेळी अनेक लोक म्हणतात दुसरा पर्याय काय ? पण देशाच्या स्वातंत्र्यापासून आपल्यासमोर कधीचं पर्याय नव्हता. महात्मा गांधींनी ठरविले म्हणून नेहरू पंतप्रधान झाले. पुढे जेवढे पंतप्रधान झाले त्यांच्याशिवाय लोकांना पर्याय होता का ?, नोटबंदी संपूर्णपणे फसली आहे, ९९.३% पैसा बँकेत परत आला, नोटबंदी जाहीर करतेवेळी मोदी म्हणाले होते, ५० दिवसांत सगळे सुरळीत नाही झाले तर मला कोणत्याही चौकात हवी ती शिक्षा द्या. हिटलर आपल्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवायचा, पंतप्रधान देखील हिटलरची कॉपी करत आहेत, नमामि गंगेसाठी २० हजार कोटी खर्च करू म्हणाले, गंगा साफ झाली नाही पण पैसे कुठे गेले हे कळलं नाही. जी.डी. अग्रवाल गंगा स्वच्छ व्हावी म्हणून उपोषणाला बसले होते. पण त्यांना एकदाही भेटायला पंतप्रधान गेले नाहीत. शेवटी १११ दिवस उपोषण करून ते मरण पावले परंतू पंतप्रधांना वेळ भेटला नाही. त्यांनी सत्तेत आल्यावर आधार कार्डचं जोरदार समर्थन केलं पण तेच गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणत होते की आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकेल, घुसखोरांच फावेल, माझ्या नागरिकांना मिळणारे फायदे स्वतः लुबाडतील. त्यावेळी एवढा विरोध होता मग पंतप्रधानांनी आधार कार्ड योजना का राबवली ? पाकिस्तानचं विमान पाडलं असं नरेंद्र मोदींनी पुलवामा हल्ल्यांनंतर सांगितलं. पण ज्या अमेरिकेने f १६ विमानं पाकिस्तानला पुरवली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाकिस्तानचं एकही विमान पाडलं गेलं नाही.
काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावं बदलून भाजपने सरकारने स्वतःच्या योजना म्हणून घोषित केल्या. तर नोटबंदीमुळे ४ कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकं रांगेत मृत्यमुखी पडली, पण माध्यमांवर दबाव टाकून त्यांना ह्या सगळ्या बातम्या दडपायला लावल्या ही भीषण परिस्थिती आहे. आपला जवान अत्यंत खडतर परिस्थितीत देशाच्या सीमा राखत आहे, पण त्यांच्यासाठी काही कराण्याचं गेल्या ५ वर्षात सुचलं नाही.
पंतप्रधान नवाज शरीफांना केक भरवायला गेले, आणि त्यानंतर लगेच पठाणकोट, उरी हल्ला झाला होता. अमित शाह नी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केलं की आम्ही २५० माणसं मारली मग प्रश्न पडतो की, पक्षाध्यक्ष गेले होते का पायलट म्हणून ? एअर चीफ मार्शल म्हणतात की आम्हाला किती माणसं मारली गेली याचा आकडा देता येणार नाही, मग भाजपने कुठून मृत्यूंची संख्या मोजली ? पंतप्रधान म्हणाले होते की बीफ एक्स्पोर्ट करणारे माझे अनेक जैन मित्र आहेत. भाजपशासित राज्यांमध्ये गायी पोषक अन्न मिळालं नाही म्हणून मेल्या. हे बघा भाजपचं गो प्रेम. तरीही गोबंदीच्या नावाखाली अनेक माणसांना मारलं गेलं. हा उन्माद देशभर असताना पंतप्रधान शांत होते. म्हणून अनेक पत्रकार भाजपच्या विरोधात भूमिका घेत आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणात काही तरी राज आहे हे मात्र नक्की समजते.
उद्या खुलेआम हे भाजपचे लोक आपल्यावर अत्याचार करतील आणि आपण काहीही करू शकणार नाही कारण तो अधिकारच आपल्याला शिल्लक राहू देणार नाहीत म्हणून स्वतः विचार करा आणि ठरवा अजूनही वेळ गेली नाही, ही निवडणूक पाहिजे एवढी सोपी नाही याचा विचार करा आणि लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी परिवर्तनात सहभागी होऊन आपल्यासमोर कोण कोणत्या जातीचा धर्माचा उमेदवार आहे हा विचार करू नका. जो बुध्द, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे जे उमेदवार आहेत, त्यांना आपले अमुल्य मत द्या.
"वक्त बहुत कम है; जितना दम है लगा दो !
कुछ लोगों को मैं जगाता हूं; कुछ लोगों को तुम जगा दो !!"