सामाजिक बांधिलकी
सामाजिक बांधिलकी
मी मोखाड्याच्या हॉस्पिटलमध्ये 1990 साली होते. बहुसंख्य समाज आदिवासी. पावसाळ्यामध्ये मुख्यत: रुग्ण असायचे ते उलट्या जुलाब आणि सर्पदंश यांचे.
एकदा माझ्या ड्युटी मध्ये एका आदिवासी महिला झोळी मध्ये घालून मोठ्या एका लाकडी बांबूला लटकवून तिला दवाखान्यात आणले. पेशंट लूज मोशन ची होती, उलट्या पण होत होत्या, अगदी निपचीत पडली होती. आम्ही डॉक्टर येण्याआधीच दोन्ही हाताला सलाइन आणि इंजेक्शन वगैरे चालू करत असू. साधारण तासाभराने रुग्ण थोडी कव्हर झाली
मग तिच्या नवऱ्याला सांगितले आता तुझी बायको बरी आहे तू जाऊन जेवण करून ये . माझी ड्युटी संपली, मी हॉस्पिटलच्या आवारातच एका कुडाच्या झोपडीमध्ये राहत होते.
त्यानंतर दोन दिवस झाले बघते हा माणूस दोन तीन पोरं घेऊन सतत बाई जवळच बसलेला. बाहेर कोठे जातच नव्हता. शेवटी माझ्याने राहवेना मी त्याला विचारले दोन दिवस झाले तू इथेच बसला आहेस . तुझ्या पोरांना, बायकोला, काही खायला घातलं की नाही.
त्यावर त्याने उत्तर दिले माझ्याकडे एक पैसा पण नाही मी कुठून खायला आणू? त्यावेळी हॉस्पिटलला रुग्णांना जेवण वगैरे देण्याची सोय नव्हती.
आता आदिवासी भागांमध्ये रुग्णा बरोबर एका नातेवाईकाला देखील जेवण मिळते. त्याचे उत्तर ऐकून माझ्या पोटात गलबलून आलं तडक घरी गेले. माझ्या बरोबर आई होती.
आईला म्हटले, आई! आई पटकन काय जेवण बनवता येईल? आईने भाताचा कुकर लावला आणि पिठलं बनवलं तो तसाच भाताचा कुकर , पिठल्याच पातेल आणि एक मोठी ताटली त्याला नेऊन दिली. बाबा रे तू खा, पोरांना भरव बायकोला दे.
सुदैवाने त्याची बायको चांगली झाली आणि घरी जाताना तो मला भेटायला माझ्या खोलीवर आला. माझी खोली अगदी दवाखान्याच्या समोरच होती. एवढी एवढी प्रामाणिक माणसं,ज्या झोळी मध्ये बायकोला घालून आणलं होतं तो बांबू शिसवी लाकडाचा होता किंवा सागवानी होता तो बांबू मला भेट म्हणून तो देऊ लागला बाई तू जेवायला घातला, हा बांबू ठेव. मी म्हटलं बाबा मला काय करायचा. म्हणाला याच स्टूल बनव. मी काय तो घेत नव्हते, तो काय ऐकत नव्हता, शेवटी आमचा शिपाई म्हणाला बाई ठेवून घ्या, मी घेऊन जाईन . अशा रीतीने मी दाखवलेल्या एवढ्याश्या सामाजिक बांधिलकी ला तो उतराई होऊन गेला.
