साक्षात्कार
साक्षात्कार


रामू एक शेतकरी होता. तो आपले म्हातारे आईबाप, बायको व दोन मुलां बरोबर एका गावात राहत होता. त्याला त्याच्या वडिलांनी शेतीची कामे खूप चांगल्या प्रकारे शिकवली होती. त्याचे शिक्षण फक्त चौथी पर्यन्त झाले होते. स्वतः जास्त शिकला नाही पण मुलांना मात्र खूप शिकवायची त्याची इच्छा होती. नाही म्हटले तरी आता गावात दहावी पर्यन्त शाळा होत्या. कॉलेज करता मात्र तालुक्याला जावे लागायचे.
आता तो आणि त्याची बायको दोघंच शेतीची कामे करायची. आई वडील म्हातारे झाले होते. त्यांना काम झेपत नव्हते. त्यात एकदा वडील तापामुळे आजारी पडले व त्यातच त्यांचे निधन झाले. मरतेवेळी त्याला वडिलांनी 'आपल्या वाडवडिलांची शेत जमीन सांभाळ रे' असे त्याला सांगितले. वडिलांनी सांगितल्या प्रमाणे तो शेतीतली कामे करत होता व आपला संसार चालवत होता.
गावात एक मोठा बिल्डर आला आणि तो शेतकऱ्यांच्या जमिनीचा सौदा करू लागला. अचानक एवढा पैसा मिळणार हे बघितल्यावर बऱ्याच जणांनी आपल्या जमिनीचा सौदा केला. राम मात्र याला तयार झाला नाही. त्याला वडिलांच्या वचनाची आठवण झाली. पण त्याचे सगळे मित्र व त्याची बायको मुलं ही मागे लागली. शेवटी म्हातारी आई ही बोलली "तुझं भलं होतं तर विक बाबा". मग त्याने ही मनावर दगड ठेऊन जमीन विकायचा निर्णय घेतला. पैसे घेऊन उराशी मोठ मोठी स्वप्नने घेऊन तो सरळ मुंबईत आला.
मुंबईत पगडी देऊन त्याने भाड्याचे घर घेतले. मुलांना शाळा कॉलेजात घातले. गावातले व शहरातले जीवन यात जमीन आस्मानाचा फरक होता. इथे सगळ्या गोष्टींना पैसा लागत होता. शिक्षण जास्त नसल्यामुळे व शेती शिवाय काहीच काम येत नसल्याने त्याला कामधंदा मिळेना. म्हातारी ही पुन्हा पुन्हा आजारी पडू लागली. तिच्या औषध पाण्याचा ही खर्च वाढला. काही दिवसांनी ती ही देवाघरी गेली.
राम रोजनदारीवर काही काम करायचा पण तेवढ्यात निभावणे कठीण होऊ लागले. गावी परत जाऊन काय करणार? तिथे शेती नाही आणि दोन चार वर्षात घराची डागडुजी न केल्याने ते ही मोडकळीला आले होते. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली हाती. थोडा तरी जमिनीचा तुकडा स्वतः साठी शिल्लक ठेवला असता तर आज पर्वा केली नसती. झाडे कापल्याने पाऊस कमी यायचा, पण त्यावेळी त्याच्या शेतातली विहीर किती कामाला यायची हे सगळे आठवून तो रडू लागला. चुकलच माझं. बाबांचे वचन पाळायला हवे होते. आता पोरांचे तरी शिक्षण कसे पूरे होणार या विचाराने तो हतबल झाला.
एवढ्यात त्याचा मुलगा आला आणि त्याने सांगितले, "बाबा माझे शेवटचे वर्ष आहे. मी शिक्षण घेत असताना नोकरी ही करेन. मला ती मिळाली सुध्दा आहे. तुम्ही गावी चला. हे शहर आमच्या सारख्या सामान्य लोकांचे नाही. रामू आणि त्याच्या बायकोला मुलाचे म्हणणे पटले. मुलीला घेऊन ते गावी परतले.
आपल्या हक्काचा जमीन जुमला मोहाच्या बळी पडून विकू नका. तसेच वाडवडिलांचे म्हणणे, उपदेश लक्षात ठेऊन वागा.