SHRIKANT PATIL

Tragedy Others

3  

SHRIKANT PATIL

Tragedy Others

रुक्माचा संसार

रुक्माचा संसार

3 mins
856


 जुलै महिन्यातील दिवस होते .पावसाने आपला जोर वाढवला होता. देशमुख गुरूजी नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचले.पावसामुळे विजेचा लपंडाव चालूच होता . त्या दिवशी शाळेत वीज नव्हती. शाळेत दररोजचंच काम चालू होत. इतक्यात शाळे शेजारच्या श्रीमती पानसे बाईनी देशमुख गुरुजींना बोलावणे पाठवले. गुरूजी त्यांच्या घरी पोहोचले.तिथे लोकांची गर्दी होती . बहुतेक अशा महिलाच जमा झाल्या होत्या. दारात पायातील जाड चपला काढतच पानसे बाईना देशमुख गुरूजी म्हणाले, "बाई, आज कोणता कार्यक्रम तुमच्याकडे आहे का? 

"हो ,महिलांच्या बचत गटाचा कार्यक्रम आहे." 

" काय कार्यक्रम आहे बरं?" देशमुख गुरूजी म्हणाले. लगेच पानसे बाईनी आपल्या तोंडाचा पट्टा सुरु केला. सर्व कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती लगबगीने त्यानी दिली. आज पंतप्रधान साहेब महिला बचत गटांना काही माहिती सांगणार आहेत. त्यांचा संदेश ऐकण्यासाठी या महिला सर्व जमल्या आहेत . आमचा टी.वी.तेवढा सुरु करुन द्या. "

बहुदा वीज गेल्याने दूरदर्शन संच बंद पडला होता.

त्या ठिकाणी 'भरारी' नावाचा बचत गटाचा फलक लावला होता. गटातील बऱ्यापैकी महिला सदस्य तिथे जमा झाल्या होत्या. दूरदर्शनवर हा कार्यक्रम सुरू होणार होता. टीव्हीचा संच व्यवस्थित जोडला आहे की नाही हे त्यानी पाहिले व तो चालू करून दिला .आपले काम आटोपून तिथून देशमुख गुरूजी त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी निघाले.


   दुपारची जेवणाची सुट्टी झाली होती .देशमुख गुरूजी आणि त्यांचे सहकारी कार्यालयातच बसले होते .सहकाऱ्यांशी गप्पा चालू होत्या. इतक्यात कार्यालयाच्या दारात रम्याची आई रुक्माबाई आल्या. तिच्याबरोबर दोन-चार महिलाही होत्या. पहिलीतल रम्या आपल्या आईला बघून लाजत लाजत हसू लागलं. त्याच्या आईकडं बघत  देशमुख गुरूजीनी त्या सर्व महिलांना कार्यालयात बोलावलं .


"अहो ताई, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे काय?"

देशमुख गुरूजी म्हणाले.


" नाही ,आम्ही तुमच्याकडेच आलो होतो."


" काय काम आहे का ?"गुरुजीनी विचारलं.


"होय गुरूजी."असं चेहरा पाडूनच रम्याची आई म्हणाली.


रम्याच्या आईच्या चेहर्‍यावर जरा टेन्शनच दिसत होतं देशमुख गुरुजींनी त्यांना पहिल्यांदा खुर्चीत बसायला सांगितलं आणि विचारलं," अहो गेले काही दिवस तुमचा रमेश शाळेत नियमित येत नाही.का बरं?"


 "होय गुरूजी." आपला रडवेला चेहरा करत त्या पुढे म्हणाल्या . "गेले काही दिवस आमच्या रम्याचा घरात अभ्यास होत नाही. घरात रम्याच्या बापाचा नुसता धुडगूस असतोया. रम्याचा बाप म्हणजे काय कामाचा नाही. दिवसभर कोणाकडे तरी पैसे मागून घेतो आणि दारू पिऊन घरात भांडण करत बसतो. अहो मोठी पोरगी शांता आता दहावीच्या वर्षात गेली. तीचा अभ्यास भरपूर असतो. पण हा घरात काय तिला अभ्यास करू देत नाही. नुसत्या शिव्या हासडत बसतो. रम्या तर गपगार होतं.आणि कोपऱ्यात जाऊन रडत बसतो. मला तर या संसाराचा वीट आलाय."

  असा आपल्या संसाराचा तक्रार पाढा ती सांगत आपल्या डोळ्यातील आसवांची निघालेली धार पदराने पुसू लागली. 


गुरुजीनी तिला शांत राहायला सांगितले. खरंतर तिला आपल्या त्या लेकरांच्या शिक्षणाची काळजी होती पण घरात चांगलं शिक्षणाचं वातावरण नसल्याने ती हुशार मुलं अभ्यासात पाठीमागे पडत होती. बारकं रम्या तर फारच गांगरुन गेलं होतं. त्यामुळे ते कधीतरी शाळेत यायचं. 

  सोबत आलेल्या तिघी -चौघी महिलाही तिला होत असलेल्या त्रासाबद्दल अधिकच सांगू लागल्या. 

रम्याच्या घरा शेजारी रहात असलेल्या  

गौरी मावशी म्हणाली, " या राजा पवारचा लईच त्रास असतो या पोराबाळाना. सारखं रुक्मी बरोबर वाद घालतो व मारतोय .तिचा हा राजा लईच शेफारलाय. कोणी भांडण सोडवायला गेलं तर त्यांनाच शिव्या हासडतो.आता तुम्हीच काय तो उपाय सांगा ."


त्यावर देशमुख गुरूजी त्या सर्व महिलांना उद्देशून म्हणाले,


"तूम्ही सर्व महिला सक्षम आहात. स्वतःचं काम स्वतः करून संसाराचा गाडा चालवू शकता. पण अशा नवऱ्यांच्या मुळे तुम्ही शरमेनं मान खाली घालून कसा संसाराचा गाडा चालावणार? मनावर काहीतरी दडपण घेऊन तुमच्या मुलांचं कल्याण होणार नाही. रम्या सारख्या पोराचं रम्य असे बालपण आज व्यसनी बाबांन हिरावून घेतलं आहे. शांती सारख्या पोरीच्या शांत मनाला बाबाच प्रेम कधीच मिळाले नाही. दहावीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या मुलीचं शिक्षण या विळख्यात अडकलं आहे.खरोखरच तुम्हाला एकजूट होऊन काम करायला हवं. तुम्ही महिला केवळ 'मन की बात' ऐकून पुढे जाणार नाही. तर तुमच्या मनातील गोष्टी व्यक्त करायला हव्यात. महिला मंडळा मार्फत तंटामुक्त समितीकडे किंवा पोलिस चौकीला तक्रार दाखल करायला हवी.आणि तुमच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडायला हवी. कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार अशांची दखल घेऊन पोलिस अशा तांडव करणाऱ्या बेडर बेवड्या नवऱ्याना चांगलीच अद्दल घडवतील. गुरूजींचे म्हणणे या सर्व महिला ऐकत होत्या. 


  भरारी बचत गटातील त्या महिलांनी रुक्मीला समजावून सांगितलं व त्या रुक्मिला म्हणाल्या,"दोन दिवसातच पोलीस स्टेशनला जाऊ व तुझ्या मुलांना पण सोबत घेऊन ये .तुझी व्यथा त्यांना दाखवू ."


  ठरल्याप्रमाणे दोन दिवसानंतर या सर्व महिला रुकमीला आणि तिच्या पोराला घेऊन पोलीस स्टेशनात दाखल झाल्या त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी राजा पवारच्या घरी त्याचदिवशी संध्याकाळी गाडी वळवली. राजा नेहमीप्रमाणे दारू पिऊन धुंद झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं . "आता तुला बिन भाड्याच्या घराची हवाच कशी असते ती दाखवतो."असे म्हणत पोलिसांनी त्याला घेऊन नेलं.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy