STORYMIRROR

ashwini ranade

Abstract

2  

ashwini ranade

Abstract

रम्य ते बालपण

रम्य ते बालपण

3 mins
15

मध्यंतरी माहेरी गेले होते अंगणातला प्राजक्त घमघमला तसं मला फुलं वेचणारी माझ्यातली परकरी पोर आठवत राहिली. मन थेट भूतकाळात जाऊन पोचलं . काय सुंदर दिवस होते ते!! ना कुठली चिंता ना दडपण...फक्त हुंदडायंच मनसोक्त. पुन्हा एकदा ते क्षण त्या निमित्ताने मनातच अनुभवले. आम्ही तिघी बहिणी. मी सगळ्यात धाकटी. तिसरी मुलगी असूनही भरपूर लाड झाले माझे. चाळवजा बिल्डिंग आहे आईची. कॉमन गॅलरी. भरपूर मैत्रीणी होत्या खेळायला. सकाळी शाळा झाली की दुपारी अभ्यास पूर्ण करून टाकायचा की संध्याकाळी थेट खेळायला पळायचो. डब्बा ऐसपैस, खोखो, लपाछूपी खेळायचो. एकावर राज्य आलं की ते दोन दोन दिवस चालायच. घरामागे एक गॅरेज होत. तिथून टायर आणायचो. काठीने पळवात रहायचो. आता सारख्या व्यायाम शाळा लगायच्याच नाहीत. एवढा व्यायाम खूप होत असे. जोड साखळी, सोनसाखळी सगळेच खेळ भारी. कट्टी बट्टी कितीदा होत असे पण त्यातही गंमत होती. राग धरून ठेवणं परावडायचच नाही खेळणार कुणाशी? पुढच्या रस्त्याला एक कासाराच दुकान होतं तिथून तुटक्या काचा आणायचो. काच कमळ करायचो. त्या रंगबेरंगी काचांना एकमेकात गुंफताना भान हरपून जायचं. सुट्टी लागली की दिवसभर पत्ते, कॅरम, सापशिडी चालूच रहातं असे.


भातुकली तर खूप खेळली आहे. चिक्कण मातीची भांडी बनवायचो. बाहुला बाहुलीच लग्न अगदी मंगलाष्टकासहीत असायचं. प्रत्येकीचा खाऊ वेगळा. धम्माल यायची. आपली बाहुली सासरी जाताना मन भरून यायचं. मग दोन दिवसात ती परत माहेरी आणायची सगळं लुटूपुटूच खेळणं.


दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, गणपती सगळे सण उत्साहात व्यायचे. गणपतीला खास आरास असे ताई, मोठी ताई सुंदर आरास करत. आरत्या प्रत्येक घरी म्हणायच्या आवाज अगदी टिपेला पोचला पाहिजे. दसऱ्याला आम्ही मैत्रिणी नटून-थटून सोनं द्यायचो.दिवाळीत फराळाच ताट प्रत्येक घरी जायचं. आकाशकंदील बनवायला ताई शिकवायची. सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचो. चैत्र गौर सजवताना नुसती धांदल असायची. दिवाळीत किल्ला करायचो. दगड, विटा, माती, बाटल्या जे मिळेल ते जमवायचो. किल्ला उभा राहिला की आम्ही मावळे असल्याचा फील येत असे. संघटनेचे महत्त्व इथूनच कुठेतरी मनात रुजलं असावं.


घरी आजी , आजोबा, आई , बाबा आम्ही तिघी बहिणींनी भरलेलं घर. आजी आजोबांनी छोट्या छोट्या गोष्टीतून शिकवताना आयुष्यभरासाठी शिदोरी दिली आहे. आईनी नाती जपायला शिकवली.सतत घरी नातेवाईक,सगे सोयरे यांचा सतत राबता असायचा. आई बाबा सगळ्यांचं हसतमुखाने करायचे. 'अतिथी देवो भव' हे वेगळं शिकायची गरजच पडली नाही. रात्री सगळे एकत्र जेवायला बसायचो. दिवसभराच्या गप्पा रंगायच्या. शाळेत मधल्या सुट्टीत आई गरमगरम डबा घेऊन यायची. तिची किती लगबग होत असेल ते आता जाणवत. बाबा दर रविवारी मला सायकल वर मला डबल सीट न्यायचे. माझ्यासाठी ती मर्सिडीज असायची. येताना मला विचारायचे काय हवं खाऊ की पुस्तक मी पुस्तक मागायची. ते ऐकताना बाबांना खूप आनंद व्हायचा. बाबा सुट्टीत लायब्ररी लावायचे. माझ्यात वाचनाची गोडी त्यांनीच रुजवली. माझ्या दोघी बहिणी माझ्यासाठी आदर्श. त्यांचच बोट धरून खूप काही मिळवलं आहे. निखळ आणि निरागस बालपण अनुभवलं. आयुष्यात हेच संस्कार प्रत्येक वळणावर साथ देत राहतात. अजूनही अधून मधून माझ्यातल दडलेल मुलं बाहेर येत राहतं कितीदा तरी आणि मग पुन्हा एकदा आईच्या कुशीत शिरावस वाटत. कुठेही फुललेला प्राजक्त पाहिलं की पुन्हा एकदा फुलं ओंजळीत घ्यावीशी वाटतात, भोंडला पाहिलं की पुन्हा एकदा भुलाबाईची गाणी ओठावर येतात, दिवाळीतल्या रांगोळ्या पाहताना पुन्हा ते रंग लुटवेसे वाटतात, पहिल्या पावसात भिजताना आईनी केलेली गरम गरम भजी आठवत राहतात. मग माझ्या लेकरांना सांगत रहाते अगदी भरभरून ओंजळ भरून घ्या ह्या निरागस क्षणांची एकदा संपलं की पून्हा परतून नाही यायचं हे बालपण ... मन भरून येतं आणि मग ओठावर शब्द येतात


मन माझे झोके घेई

झुला उंच उंच जाई

किती सावरू मनाला

बालपण जागे होई


पुन्हा वाटे मांडू डाव

नाचू गाऊ सख्यांसंगे

माहेरच्या अंगणात

सोंगट्यांचा डाव रंगे


नाही ओझे नाही चिंता

लहानपण देगा देवा

जीवापाड मनी जपू

असा आनंदाचा ठेवा


किती मोठे झालो तरी

संपू नये बालपण

निरागस हसू जपा

त्याची ठेवा आठवण


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract