पाऊस, तो आणि ती
पाऊस, तो आणि ती
"काय हे ! पावसाने अगदी उच्छाद मांडलाय. थांबायचं म्हणून नावंच घेत नाहीये. कशी पोचणार मी वेळेत घरी? " स्वतःशीच बडबडत ती ऑफिस मधून लगबगीनं बाहेर पडली. किती लवकर आवरायचं ठरवलं तरी उशीर झालाच. तिनं घाईघाईने छत्री उघडली. तिच्या लक्षात आलं एक काडी तुटली आहे. त्यातून थेंब थेंब ओघळत राहिला. ती तशीच बस स्टॉप वर आली. बराच वेळ बसच आली नाही. काळे ढग अजूनही गर्दी करून होते. काय करावं ? तिनं छत्री, ओढणी अशी कसरत सांभाळत मोबाईल काढला फोन लावणार इतक्यात समोरून तिला कोणीतरी हाक मारली. एवढ्या पावसात इथे मला ओळखणारं कोण आहे? तिने कुतूहलाने वर पाहिलं तर गौतम!! तिला एकदम आश्चर्य वाटलं. "अरे , तू इथे कसा? तसं तो म्हणाला, " अग, इथेच जवळ कामासाठी आलो होतो. तू समोर दिसलीस. असा कोसळणारा पाऊस आणि समोर तू बसच्या रांगेत वैतागलेली. मनात म्हटलं बघुया जुने दिवस आठवताहेत का तुला ? तुला आठवतंय का गं?आपण इथेच कोपऱ्यावर असणाऱ्या हॉटेल मधे कॉफी प्यायचो. तासनतास गप्पा आणि जोडीला गुलजारची एकसे एक गाणी वाजत असायची. अजूनही असा कोसळणारा पाऊस पहिला की हटकून मन गात राहतं दिलं धुंडता है फिर वही.... " तो जो सुरू झाला थांबेचना. तिनं बावरून आजुबाजूला पाहिलं कोणी ऐकत नाही नं? हळूच डोळ्याच्या कोनातून त्याच्याकडे दटावून पाहिलं. त्याला गप्प करत ती म्हणाली, " काय हे! शोभतं का तुला? जुन्या झाल्या त्या आठवणी. अरे आता कसली फुरसत शोधतो आहेस? मी ती जुनी गौरी नाही आणि तू तो गौतम राहिला नाहीस. जरा भानावर ये. तू अजूनही तसंच भरभरून बोलतोस. अरे बाबा सध्यातरी घरी कसं वेळेत पोहोचावं ? हा खरा पेच आहे. ही बस पण बघ ना येतच नाही" तसं तिच्याकडे पाहत तो म्हणाला, "अग हो हो ..पण नाहीतरी बस येतच नाहीये तर चल ना कॉफी पिऊ त्याच हॉटेल मध्ये. काय हरकत आहे?" ती काही उत्तर देणार इतक्यात तिचा मोबाईल वाजला. घरून फोन होता सासूबाईंचा ,' उगीच धडपडून येण्याची घाई करू नकोस सगळं बंद आहे. उगीच अडकशील. सरळ ऑफिस मध्ये थांब. आमचीही काळजी करू नकोस. आम्ही घरात सुरक्षित आहोत." घरचा फोन झाल्यावर तिला जरा हायसं वाटलं. तिनं वर पहिलं तर तो गालातल्या गालात हसत होता. तो म्हणाला," बघ मी तेच तर सांगत होतो.चल की थोडावेळ. तसही सगळं ठप्प आहे. येतेस ना बरोबर?" तिला त्याचं मन मोडवेना. उलट ह्या क्षणी त्या मुसळधार पावसात तो बरोबर होता त्यामुळे तिची काळजी कमी झाली. रस्त्यातही वर्दळ अगदी तुरळक होती. तिला त्याचा जरा आधार वाटला. दोघं चालत चालत त्याचं होटेलपाशी थांबले. पावसामुळे ते हॉटेल पण एव्हाना बंद झालं होतं. जवळच एक चहाची टपरी उघडी दिसली. दोघंही त्या टपरीमध्ये बसले. काही वेळ निरव शांतता आणि फक्त पावसाचा आवाज. दोघं काहीच बोलले नाहीत. चहाचा घोट आणि मुसळधार पाऊस फार भारी वाटत होतं. तिला जाणवलं आपण किती तरी दिवसांत असं काहीच न करता निवांत बसलोच नाही एका जागी. रोजचं तेच ते कंटाळवाण रूटीन. तेच ऑफिस, तेच स्वयंपाक घर, आणि तिच कंटाळवाणी कामं.... एका छोट्याशा चहाच्या घोटाबरोबर ती काही क्षण सगळं विसरून गेली.
तिला आठवत राहिले पूर्वीचे दिवस. पाऊस कोसळला आणि ते घरी बसलेत असं कधी झालच नाही. धुंद वातावरण , हिरवागार निसर्ग आणि गौतमचा हातात हात काय भारी वाटायचं. ह्या अशाच पावसानं वेड लावलं होतं. चक्क कविता सुचायच्या. स्वप्नावर प्रेम करण्याचे ते दिवस. तो ही भलताच मूड मध्ये असायचा. त्याचं खूप प्रेम तिच्यावर. त्याच्या मिठीत ती पुरती विरघळून जायची. तिच्या बटेवरून ओघळणारे थेंब तो हलकेच टिपत रहायचा. त्या पावसात दोघं अगदी चिंब चिंब व्हायचे. तो प्रेमाचा ओलावा झिरपत रहायचा मनात अगदी खोलवर. मन हरखून जायचं. ते वयच तसं असतं नाही तिला वाटून गेलं. लग्न झालं आणि हे असे सारे क्षण पाऊलही न वाजवता हळूहळू निघून गेले. आठवणी तेवढ्या मागे राहिल्या.....
"काही बोलणार नाहीस का?" त्याच्या बोलण्याने ती भानावर आली. "आता तरी गाड्या सुरू झाल्या असतील का रे?" तिला खरं तर त्या सुरू होऊच नये असं वाटतं होतं पण तिच्यातल्या जागरूक जाणिवा तिला घर दाखवत म्हणाल्या. तसं त्या चहावाल्यानेच उत्तर दिलं, " अहो नाही हो मॅडम.अजून चार पाच तास तरी हा पाऊस थांबायचा नाही" त्याने हसुन पहिलं तसं तिही हसली. दोघं चालत चालत निघाले. मरीन लाइन्स काय भारी वाटत होत आज!! ती रोज तिथे ऑफिसला जायची पण हा अनुभव काही अनोखा होता. पाण्याच्या लाटा उंचच उंच उसळत होत्या. पाण्याचे तुषार झेलताना मन चिंब होत होतं. जागोजागी पाणी साठल होतं. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन.....तिला भरून आलं. तिचं अत्यंत आवडतं गाणं ह्या क्षणी तर ते पारंच भिडलं. त्याने फोन उचललाच नाही तसं ते काही क्षण वाजत राहिलं. त्या क्षणी तिलाही खट्याळ मौसमी सारखं अमिताभच्या हातात हात घालून मुक्त, निरर्थक भटकावसं वाटलं. तो शांतपणे वातावरण अनुभवत होता. तिनं आता शिस्तीत छत्री बंद केली. अंगभर पाऊस झेलताना ती आनंदून गेली. तिच्यातलं लहान मूल आज बाहेर पडून बागडत होतं. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला तशी ती बावरली. तिनं आजूबाजूला पहिलं तर प्रत्येक जण आपल्याच नादात होता. तिनं हळूच हात सोडवून घेतला. तो फक्त हसत राहिला गालातल्या गालात. तो काही बोलणार इतक्यात दुरून ट्रेनचा आवाज ऐकू आला. तिला जाणवलं स्टेशन आलं सुद्धा. चालत चालत ते चर्चगेटला कधी पोहोचले कळलंच नाही.आता निघायची वेळ झाली. ते गाडीत चढले. 'परतीचा प्रवास नेहेमीच कंटाळवाणा असतो' तो म्हणायचा ते तिला आठवलं.पुन्हा त्या रोजच्या जगात जावसंच वाटेना.दोघंही स्टेशनवर उतरले.
घरचा जीना चढताना तिनं घड्याळ पाहिलं. अजून थोडे लवकर पोहोचू शकलो असतो तिच्या मनात आलं. सासूबाईंनी दार उघडलं तसं त्या म्हणाल्या," हे काय तुम्ही दोघं एकत्र?..हा कुठे भेटला तुला. गौतम तू काही बोलला नाहीस." तसं तो म्हणाला,"अग मुद्दामच नाही सांगितलं. पूर्वी नाही का हिला भेटायला जाताना तुम्हाला सांगायचो नाही ना अगदी तसं ! त्यावर सासरे म्हणाले, "मग पाऊस भेटला का पूर्वीचा?" तशी ती लाजून आत पळाली.

