रिटर्न गिफ्ट
रिटर्न गिफ्ट
सायली मोठ्या उत्साहाने बसमध्ये बसली. तिला असे अचानक आलेले बघून आईला किती आनंद होईल! उद्या आईचा वाढदिवस! तिला सरप्राईज देऊन तिच्या चेहर्यावरचा आनंद बघायचा होता सायलीला. आईसाठी तिने सुंदर पैठणी घेतली होती.. तीही तिच्या कमाईतून! किती समाधान वाटत होतं तिला! शिक्षण झाल्यावर लगेच लग्न ठरलं.... आईसाठी काहीतरी करायचं मनातच राहून गेलं...
"लग्न झाल्यावर माझे पहिले सर्व सण आईने किती उत्साहात केले... दरवेळी माझ्यासाठी सुंदर-सुंदर साड्या आणल्या....तिची साड्यांची चॉईस तर अशी, की सगळे त्या साड्यांचे कौतुक करताना थकत नाहीत! साड्यांची चांगली पारख असणारी आई स्वतःसाठी मात्र कधीच साड्या घेत नाही. लग्नाकार्यात आलेल्या साड्याच ती नेहमी नेसते... माझ्या लग्न बस्त्याच्या वेळी, बाबांच्या आग्रहामुळे साडी खरेदीला ती तयार झाली. एक साडी तिला आवडली, मोरपंखी रंगाची... सोनेरी काठाची, भरजरी पदर असणारी! पण किंमत बघताच तिने लगेच ती साडी खाली ठेवली, दुसरी त्याच रंगाची स्वस्तातली साडी घेतली. किती वाईट वाटलं मला! तेव्हाच ठरवलं आईसाठी अशीच साडी घ्यायची. नवरा नाही म्हणाला नसता, पण मला माझ्या कमाईतूनच घ्यायची होती..... आता कुठे नोकरी लागली... एक वर्षाने का होईना आईसाठी सुंदर साडी घ्यायचे स्वप्न पूर्ण झाले."
विचारांच्या धुंदीत, गाव कधी आले कळलेच नाही. ती लगबगीने घरी पोहोचली. आपल्या लाडक्या लेकीला असे अचानक बघून आईच्या चेहर्यावर आनंद मावेना . सायलीने आपले सरप्राईज बॅगेतच ठेवले.."उद्याच देऊ आईला साडी!" दुपारची जेवणे झाल्यावर मायलेकींच्या गप्पा रंगल्या... संध्याकाळ कधी झाली ते दोघींनाही समजलेच नाही. तेव्हड्यात आईच्या लक्षात आले, " सायली, मला एके ठिकाणी पूजेला जायचे आहे... मी लगेच येईल... पटकन एक साडी काढून आण ना माझ्या ट्रंकेतून!"
आई आत आवरायला गेली, सायलीने ट्रंक उघडली..... आणि तिची नजर आईच्या साड्यांवर पडली. अनेक आठवणी गोळा झाल्या.... आईच्या हाकेने ती भानावर आली, एक साडी उचलून आईला दिली. आई गेल्यावर परत त्या ट्रंकेजवळ आली... आईचा साड्यांचा खजिना! उण्यापुऱ्या चार-पाच जरीच्या साड्या.... तेही दोन आईच्याच लग्नातल्या! आईने स्वतःसाठी कधी जरीच्या साड्या घेतल्याच नाही.... लग्न झाल्यावर बाबांनी तिला एक साडी आणली होती आणि एक मामाने दिलेली भाऊबीजेची! हाच तिचा मोलाचा खजिना! नेहमी लग्नाकार्याला ती याच साड्या आलटून-पालटून नेसायची. मोठ कुटुंब, दीर, नणंदांचं करताना बाबांची होणारी दमछाक ती बघायची.... त्यामुळे दिवाळीला सुद्धा ती अगदी स्वस्तातली साडी घ्यायची. पण येणार्या पाहुण्यांना आणि आत्यांना कधी साडी नेसवल्याशिवाय पाठवायची नाही.
शाळेत आणि नंतर कॉलेज मध्येही माझा नाच असेल किंवा नाटक, मोठ्या हौसेने तिच्या याच जरीच्या साड्या मला आई नेसवून द्यायची! मैत्रीण एकदा म्हणाली, " तू नेहमी-नेहमी त्याच साड्या काय गं नेसते, तुझ्या आईकडे दुसर्या साड्या नाही का?" किती वाईट वाटलं होतं मला. आईला हे बोलल्यावर ती म्हणाली होती, " अगं, या साड्यांसारख्या साड्या आता शोधून तरी मिळतील का? आताच्या साड्यांवर अशी जर आणि असे बारीक काम असते का? मला नाही बाई आवडत आजकालच्या साड्या..... तू बघ कशी उठून दिसते ह्या साडीत. "
मला त्यावेळी पटायचे ते... पण हळू हळू कळलं मलाही, तू मला हे का सांगायची! मला अजूनही आठवत तू नेहमी मला तुझ्या साड्यांचे फ्रॉक शिवायची....बाकीच्या मुलींच्या रेडीमेड कपड्यांपुढे मला या फ्रॉकची लाज वाटायची. पण सगळे जेव्हा म्हणायचे," सायली तुझा फ्रॉक किती छान आहे.. बाजारात सुद्धा मिळतात नाही असा! " तेव्हा मला किती छान वाटायचं सांगू. कॉलेजला गेले तेव्हा एका कार्यक्रमासाठी मला लेहंगा हवा होता.... पण त्याची किंमत आपल्याला न परवडणारी होती.... मग तू तुझ्या एका सुंदर जरीच्या साडीचा लेहंगा शिवून दिला... आणि माझी हौस भागवली .....तुझ्या आधीच मोजक्या असलेल्या साड्यांमधून अजून एक साडी त्यामुळे कमी झाली. पण तुला दुःख नव्हतं.... आपल्या मुलांना काही कमी पडता कामा नये यासाठी किती त्याग केलास गं!
माझे शिक्षण व्यवस्थित करून दिले... चांगले स्थळ आले म्हणुन ऐपतीपेक्षा जास्त खर्च करून थाटात लग्न लावून दिले.... माझ्या लग्नात मला सर्व खरेदी माझ्या मनासारखी करू दिली.....मला कधी काही कमी पडू दिले नाही. आणि आई मात्र अजूनही तशीच काटकसरीतच जगते आहे.... त्याच मोजक्या साड्यांमध्ये स्वर्गसुख मानते आहे. सायलीला जाणवले... तिने आईसाठी आणलेली साडी या सगळ्या साड्यांपुढे फिकी आहे. आईची प्रत्येक साडी म्हणजे अनंत आठवणींचा खजिना आहे. त्या साड्यांच्या धाग्यामध्ये अनेक प्रसंगांचे मोती गुंफले आहेत, आयुष्याच्या अनेक कडू गोड घटनांनी त्या पदरावरच्या नक्षीला अजूनच खुलवले आहे..... आईने आयुष्यात गोळा केलेल्या अनेक क्षणांनी प्रत्येक साडीमध्ये आपले ठसे उमटवले आहेत ... प्रत्येक साडी आज झिरझिरीत झाली आहे.... घडीवर विरू लागली आहे..... पण आईच्या साडीवर तिच्या आणि आमच्या आयुष्यातील एकेक प्रसंग रेशमाच्या धाग्यांनी चितारले गेले आहेत. तो अनमोल खजिना कधीही न रिता होणारा आहे.
आईचा वाढदिवस सायलीने सुंदर प्रकारे साजरा केला. तिला मोरपंखी रंगांची पैठणी भेट दिली..... आईच्या चेहर्यावरचे समाधान आणि कौतुक पाहून तिला भरून पावले. जाताना आई तिची ओटी भरत होती.... आईने आताही सायली साठीनवी साडी आणली...
" आई मला द्यायचीच असेल तर तुझ्या ट्रंकेतली एक साडी दे....."
" अगं, जुनी साडी कशी देऊ? ..."
" तुझ्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट समजून दे. मला ती साडी कायम आठवण करून देईल तुझ्या त्यागाची, तुझ्यातल्या समाधानी वृत्तीची, आणि तुझ्या मायेच्या उबेची!"
सायली मोठ्या समाधानाने निघाली.... आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि सायलीच्या अंगावर जगातली सर्वात मौल्यवान साडी..... आईच्या कधीही न संपणाऱ्या प्रेमाचे प्रतिक असणारी आईची साडी !
