नासा येवतीकर

Inspirational

4.5  

नासा येवतीकर

Inspirational

रेल्वेतील शाळा

रेल्वेतील शाळा

5 mins
1.7K


सकाळची वेळ होती आणि प्रत्येकजण आपापल्या घाईत होते. लहान मुलांची खेळणी घेऊन एक लहान मुलगा लोकल रेल्वेमध्ये घुसला. पाहता पाहता ती रेल्वे माणसांनी फुल्ल झाली. त्याच गर्दीचा फायदा घेण्यासाठी हा लहान मुलगा आपल्या विविध खेळणीसह आला होता. " दस मे एक, कौनसा भी लो दस मे एक " असं ओरडत तो डबाभर फिरत होता. डब्यातील लहान मुले त्याच्या खेळणीकडे पाहून आपल्या आई-बाबांकडे मागणी करीत होती. त्याच्या काही खेळणी विकल्या गेली. त्याच डब्यात तात्या गुरुजी प्रवास करीत होते. त्यांची शाळा रेल्वे मार्गावर 50-60 किमी अंतरावर वडगाव येथे होती. तात्या गुरुजी रोज सकाळी याच रेल्वेने प्रवास करीत असत. खेळणी विकणारा तो मुलगा देखील रोज याच रेल्वेत खेळणी विकायचा. पण त्यांची कधी भेट झाली नव्हती. कित्येक दिवसांनी त्यांची दोघांची गाठभेट झाली होती. एक खेळणी विकत घेण्याचा निमित्ताने तात्या गुरुजींनी त्याला जवळ बोलाविले. त्याचे कपडे मळके होते, गेल्या कित्येक दिवसात त्याने कदाचित अंघोळ देखील केले नसेल असे वाटत होते. आपल्या अंगाचा वास येतो किंवा आपण घाण दिसतो त्याला त्याचे काही देणे घेणे नव्हते. गुरुजींनी त्याला जवळ बोलावून घेऊन विचारपूस केली आणि त्याला बोलतं केले. 

" तुझं नाव काय आणि राहतोस कुठं ?"

" माझं नाव सुरेश आहे आणि मी वडगावला स्टेशनच्या बाजूला राहतो" 

वडगावचं नाव एकूण तात्या गुरुजी थोडंसे दचकले कारण त्यांच्या शाळेचे गाव देखील तेच होते. मनात थोडं विचार करून गुरुजी पुढे म्हणाले, " तुझ्यासोबत कोण कोण आहेत ? " यावर त्याने उत्तर दिलं, " माझी आई, बाबा आणि तीन बहिणी आहेत, ते सर्व माझ्या पेक्षा लहान आहेत. 

" आई बाबा काय काम करतात ? "

" ते सुद्धा माझ्यासारखे खेळणी विकतात पण दुसऱ्या गावात, ते रेल्वे मध्ये खेळणी विकत नाहीत." 

" तुझं गाव वडगाव आहे तर तू येथून रामपूरहुन कसे काय चढला आहेस ? "

" वडगाव माझं गाव आहे मात्र आत्ता तिथं कोणीच नाही, आम्ही सर्वजण इथं रामपूर मध्ये स्टेशनच्या बाजूला राहतोत."

" शाळेला जातोस काय ? "

" नाही, फक्त एक दिवस शाळेत गेलो त्यानंतर कधीच गेलो नाही."

" तुला शाळेत जायला आवडेल का ?"

" होय आवडते, मला कागदावर लिहायला आवडतं, चित्रं काढायला आवडतं, पण बाबा शाळेला जाऊ नको असे म्हणतात."

" रोज किती रुपयांची खेळणी विकली जाते ? "

" शंभर एक रुपयांची विकली जाते, माझ्याजवळ कोणीच घेत नाही." हे ऐकून गुरुजी त्याला म्हणतात की

" उद्या काय कर तू अंघोळ कर, स्वच्छ कपडे टाक आणि खेळणी विकायला ये, बघ काय कमाल होईल ते."

गुरुजींचे बोलणे ऐकून सुरेश दुसऱ्या दिवशी अंघोळ करून स्वच्छ कपडे टाकून खेळणी घेऊन रेल्वेत चढला. तो आता चांगला दिसू लागला होता. नेहमीप्रमाणे लहान मुले खेळणीची मागणी करू लागले आणि पाहता पाहता त्याच्या जवळील सर्व खेळणी विकली गेली. त्याचं त्याला विश्वास बसत नव्हता. हे सर्व त्या गुरुजीची कृपा आहे, असे त्याला वाटू लागले. त्यांना भेटले पाहिजे म्हणून त्याच्या नजरा गुरुजींच्या शोधात इकडे तिकडे फिरत होते. सर्वत्र शोधाशोध केल्यावर गुरुजी एके ठिकाणी खिडकीला बसलेले व बाहेरचे निसर्ग सौदर्य पाहण्यात मग्न असलेले त्याला दिसले. त्याचक्षणी तो धावत गुरुजी जवळ गेला आणि त्यांचे पाय धरले. गुरुजींनी खिडकीच्या बाहेरील लक्ष आपल्या पायाला धरलेल्या मुलांकडे वेधले. गुरुजींने सुद्धा त्याला ओळखले नाही एवढा तो स्वच्छ आणि सुंदर दिसत होता. सुरेशने आज त्याच्यासोबत घडलेली सारी कहाणी सांगितली आणि गुरुजीना धन्यवाद देऊ लागला. गुरुजींनी लगेच त्याला शाळा शिकण्याविषयी बोलले. पण त्याला आपल्या बापाची भीती वाटत होती. त्याच्या आत्मा त्याला सांगत होता की शाळा शिकावं पण .....

यावर गुरुजी म्हणाले, " तुझे सर्व खेळणी विकून झाले तर तू माझ्याजवळ येऊन बस, मी रेल्वेतच तुला शिकवतो. म्हणजे कोणालाही कळणार नाही. " 

" मग चालेल काही हरकत नाही." सुरेशने आनंदाने होकार दिला. गुरुजी आपल्या पिशवीत पाटी-कलम आणि पुस्तक ठेवू लागले. गुरुजींनी त्याला येता जाता अक्षर आणि अंकाची ओळख करून दिली. त्याची बुद्धिमत्ता अफाट होती. अगदी थोड्याच दिवसात त्याला वाचन आणि लेखन येऊ लागले. तो रोजच पैशाचे व्यवहार करीत असल्यामुळे गणित शिकायला त्याला वेळ लागला नाही. तो गुरुजींच्या सहवासात छान रमला आणि त्याला शाळा शिकावी असं वाटत होतं म्हणून त्याने गुरुजींना म्हणाला, " गुरुजी, माझ्या घरी या एकदा आणि माझ्या बाबाला समजावून सांगा ना ! मला शाळा शिकायचं, मला खूप काही लिहायचं" लगेच गुरुजींनी होकार दिला. एका रविवारी सकाळी सकाळी सुरेशच्या घरी गुरुजी गेले. गुरुजींना पाहताच सुरेशला खूप आनंद झाला. त्याच्या घरी बसायला ना खुर्ची होती ना पलंग, गुरुजी उभेच राहिले. तेवढ्यात सुरेशचे वडील आले. गुरुजींनी वाचण्यासाठी सुरेशला एक कागद दिला, सुरेश तो कागद खडखड वाचून दाखविला तेव्हा त्यांच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. लगेच त्याने सुरेशला आपल्या गळ्याला धरून घेतला आणि म्हणाला, " सूऱ्या, किती छान वाचतोस रे, कधी शिकला रं एवढं " गुरुजींनी त्याच्या वडिलांना सुरेशची सारी कहाणी सांगितली आणि म्हणाले " सुरेशला शाळेला जाऊ द्या. त्याचा आत्मा शाळा शिकण्यास आतुर आहे. तुम्ही जर त्याला शाळेत पाठविलं नाही तर त्याचा आत्मा तुम्हाला शाप पण देऊ शकते. " वडिलांनी लगेच विचार करून होकारार्थी मान हलविली. गुरुजींनी सुरेशचे नाव आपल्याच शाळेत वयानुरूप चौथ्या वर्गात घातले. ते दोघे रोज शाळेत रेल्वेने जात होते. सुरेश खेळणी विक्री करून वडगावाच्या शाळेत शिकू लागला. शाळा सुटल्यावर परत खेळणी विकत घरी परत येऊ लागला. शाळेतून त्याला पुस्तक, गणवेष आणि जेवण तर शासन देत होतेच. तात्या गुरुजी त्याला दप्तर, वह्या, पेन, चप्पल देऊन दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. दहावीचा निकाल लागला आणि सुरेश चांगले 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण देखील झाला. त्याला शिक्षणाचे महत्व कळाल्यामुळे त्याने आपल्या तीनही बहिणीला शिक्षणासाठी गावातल्या शाळेत पाठविला. दिवसामागून दिवस सरत होते. काही वर्षानंतर तात्या गुरुजी सेवानिवृत्त झाले. रामपूर गावात त्यांचे घर, बंगला, सर्व काही होते. मात्र मुलगा मुंबईत नोकरी करत असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून ते मुंबईला जाऊन राहिले होते. इकडे सुरेश रेल्वेच्या बाजूला राहून रेल्वेतल्या कर्मचाऱ्याशी दोस्ती केली होती. रेल्वेतील लहानसहान कामे करून तेथील अधिकाऱ्यांना तो खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा प्रामाणिकपणा आणि काम करण्याची वृत्ती पाहून रेल्वेच्या त्या अधिकाऱ्यांनी सुरेशला रेल्वेत नोकरी लावून दिली. तो रामपूरच्या रेल्वेस्टेशनमध्येच काम करू लागला. दिवाळीच्या सुट्ट्यात तात्या गुरुजी रामपूरला आले होते. ते वडगावला जाण्यासाठी सकाळी सकाळी रामपूर स्टेशनवर आले. रेल्वेला यायला अवकाश होता म्हणून ते एका खुर्चीवर बसले. त्यांच्या हातात पेपर होता. त्यात त्यांनी आपले डोळे खुपसले आणि वाचन करीत बसले. काही समजण्याच्या आत कोणी तरी त्यांचे पाय धरले होते, पाहतात तर काय तो सुरेश होता. गुरुजी पेपर वाचत आहेत हे सुरेशने दुरून पाहिले आणि त्यांना ओळखले म्हणूनच सरळ तो धावत जाऊन त्यांचे पाय धरले. सुरेशला पाहताच गुरुजींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, " अरे, सुरेश कसा आहेस ? कुठं राहतोस ? काय करतोस ? " एका दमात त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले. सर्व प्रश्नांची उत्तरे देताना सुरेशला देखील खूप आनंद होत होता. सुरेशला रेल्वेत नोकरी लागली असल्याची बातमी त्यांच्या तोंडून ऐकतांना गुरुजीला खूप आनंद झाला तर सुरेश मनातल्या मनात म्हणू लागला माझ्या जीवनात तात्या गुरुजी आले नसते तर कदाचित आज मी जे काही आहे, ते राहिलो नसतो. असे म्हणत त्याने तात्या गुरुजींचे आशीर्वाद घेतले. एका शाळाबाह्य मुलांचे जीवन सुधारू शकलो याचे गुरुजींना मनोमन समाधान वाटत होते. रेल्वेमध्ये फावल्या वेळात सुरेशला दिलेले शिक्षणाचे धडे खूप मोठे कार्य करून गेले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational