रेल्वे आणि ती - भाग १
रेल्वे आणि ती - भाग १
"शुभदा!!! अगं शुभदा, कुठे गेली ही पोरगी. कसं होणार हीचं कोणास ठाऊक? लग्न होऊन सासरी जायची वेळ आली तरी हीचा पोरकटपणा काही जात नाही." शुभदाची आई तिला खूप वेळापासून शोधत होती.
आणि शुभदा नेहमीप्रमाणे गच्चीवर होती.
"काय गं आई? इथेच तर होते गच्चीवर."
"परत गच्चीवर, किती वेळा सांगितलं बस झाला हा बालिशपणा उद्या सासरी गेल्यावर पण असंच करणार का ?"
"तुला माहिती आहे ना गं आई, मला रेल्वे किती आवडते ती."
शुभदाला रेल्वे खूप आवडायची अगदी लहानपणापासून. तिच्या घराच्या पाठीमागेच काही अंतरावर रेल्वे ट्रॅक होता. गच्चीवर उभा राहिलं की येणा-जाणारी रेल्वे स्पष्ट दिसायची. चार-पाच वर्षाची असल्यापासून रेल्वेचा आवाज ऐकला की ती गच्चीवर धावत सुटायची. रेल्वे नजरेआड होईपर्यंत तिथेच तिला एकटक पाहात उभी राहायची. तिला रेल्वेविषयी एक आकर्षण जाणवायचं. रेल्वे तिला जिवाभावाची, जवळची भासायची.
दोन महिन्यावर तिचं लग्न येऊन ठेपलं होतं. सागर तिचा होणारा नवरा आर्मीमध्ये कार्यरत होता. सध्या त्याची पोस्टिंग पठाणकोट येथे होती. लग्नापूर्वीची ती अनामिक हुरहुर, एकमेकांबद्दलची ओढ, फोनवर एकमेकांशी तासनतास गप्पा मारणे, सुखी संसाराची गोड स्वप्न पाहणे, सोबत लग्नाची तयारी, खरेदी, या सगळ्यात दोन महिने कसे निघून गेले समजलेच नाही.
मोठ्या थाटामाटात, धुमधडाक्यात शुभदाचं लग्न पार पडलं आणि ती सासरी आली. ती खूप खुश होती. सासु-सासरे लेकीसारखा जीव लावायचे. सागर एक महिन्याची रजा घेऊन आला होता. लग्न, पूजा, हनीमून या सगळ्यात एक महिना पंख लागल्यासारखा उडून गेला आणि सागरच्या पोस्टिंगच्या ठिकाणी जाण्याचा दिवस उजाडला. सागर जाणार म्हणून दोन दिवस आधीपासूनच ती थोडी उदास होती.
"सागर, तुम्ही लगेच चाललात. नका ना जाऊ इतक्या लवकर, आता कुठे आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे आणि तुम्ही लगेच निघालात." शुभदा काकुळतीला येऊन त्याला बोलत होती.
"अगं मला तरी कुठे जाऊ वाटतंय पण माझाही नाईलाज आहे. जावं तर लागणार ना. मी पुढच्या वेळेस नक्की लवकर येण्याचा प्रयत्न करेन आणि काळजी कशाला करतेस. तुझी जिवाभावाची मैत्रीण आहे की माझ्यासोबत माझी काळजी घ्यायला. ती मला परत घेऊन येईल
की तुझ्याकडे." ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.
"अगं!!! अशी काय पाहतेस, तुझी सखी रेल्वे, आवडते ना तुला," म्हणत तो हसू लागला.
शुभदाने तिचं रेल्वे प्रेम सागरला सांगितलेलं होतं पण आज पहिल्यांदा तिच्या मनात खोल कुठेतरी रेल्वेबद्दल रागाच्या भावनेनं घर केलं होतं, कारण तिची जिवाभावाची रेल्वे आज तिच्या सागरला तिच्यापासून दूर नेणार होती.
पुढच्या वेळेस सुट्टीवर आल्यानंतर जाताना तिलाही सोबत घेऊन जाण्याचं वचन त्याने तिला दिलं आणि ती सुखावली. तिलाही सागरमुळे रेल्वेचा प्रवास करायला भेटणार होता. तिचे सगळे नातेवाईक जवळपासच्याच गावात राहात असल्यामुळे लांब जाण्याचा कधी प्रश्नच नव्हता. त्यामुळे तिच्या आवडत्या रेल्वेचा प्रवास तिला कधी घडलाच नव्हता.
लवकर परतण्याचं वचन देऊन सागर पठाणकोटला निघून गेला. शुभदाला इकडे सागरविना करमत नव्हतं. नवीन लग्न, नवी नाती, त्यात सागरचं सोबत नसणं तिला खूप त्रास व्हायचा. त्याच्या आठवणीत तिला एक-एक क्षण युगासारखा वाटत होता. सासू-सासरे तिला अगदी मुलीसारखे सांभाळून घेत होते. जपत होते. हळुहळु तीही तिथे रमू लागली. सगळी जबाबदारी ती व्यवस्थित पार पाडत होती. फोनवर सागरची ख्यालीखुशाली समजत होती.
सहा महिन्यानंतर सागर एक महिन्याच्या सुट्टीवर परतला होता. शुभदा खूप आनंदी होती कारण या वेळेस सागर तिला त्याच्यासोबत पठाणकोटला नेणार होता. त्याने आई-बाबांची परवानगी घेतली. त्याला गव्हर्नमेंट क्वार्टर मिळाली होती. पठाणकोटला जाण्याआधी दोघे मिळून तिच्या माहेरी तिच्या आई-बाबांना भेटण्यासाठी गेले.
रेल्वेचा आवाज ऐकताच शुभदा धावतच गच्चीवर गेली. आणि एकटक तिच्याकडे पाहात तिच्याशी बोलू लागली.
"मी येतेय तुला भेटायला, माझ्यासोबत माझा सागरही असणार आहे, हं!!! आपण तिघे मिळून मस्त गप्पा मारू. तुला तर माहीतच आहे तू मला किती आवडतेस. पण मला आजकाल तुझा कधी-कधी राग ही येतो हं, कारण तू माझ्या सागरला माझ्यापासून दूर नेतेस ना... चल मग भेटू आपण..."
"शुभदा!!! अगं, शुभदा परत गच्चीवर, कधी सुधारणार ही पोरगी कोणास ठाऊक?" शुभदाची आई तिला जेवणासाठी बोलावत होती.
क्रमशः