रेगे..रेगे..समंदर...
रेगे..रेगे..समंदर...
"आजही आठवतय..साडेपाच वाजून गेले होते..मी आतल्या खोलीत कपाटाला एक कान लावुन बेसुर्या तालात हाताचा ढोल बडवत होतो..भयानक टुकार..बाहेर एक रिक्षा येऊन थांबली..माझे बाबा उतरले.. मला हाक मारली..मी वेगाने पोहोचलो तर त्यांच्या सोबत होते एक सफेद कुत्रे..पामोरियन जातीचे..ते फारसे मोठे नव्हते.. तेवढे लहानही नव्हते..मी अचानक सामोरा गेल्याने ते बिचारे गांगरले...काहीसे अंगावर आले माझ्या दिशेने...मी रस्त्यापलिकडील विटांच्या खेपेवर चढुन बसलो..आमचा तो किल्ला होता..त्याच्या वर चिंचेच्या झाडाची सावली दिवसभर असायची..आम्ही त्याच्या चौथ्या ऒळीच्या तिसर्या विटेखाली ठेवायचो खनिजे..जसे की गाभळलेल्या चिंचा,दहा रुपये वाला खुप उंच उडी घेणारा छोटासा चेंडु, चिंचेची कोवळी पाने रगडुन बनवलेला विचित्र पदार्थ...किल्ल्यावर मी उजेड ऒसरेपर्यंत बसलो.. माझे पाय थरथरत होते..दुसरीत शिकणाऱ्या मुलाची कुत्र्याशी झालेली पहिली ऒळख..असा कुत्रा जो राहणार होता त्याच्या घरी कायमचा.. आणि बनणार होता घराची शान..
अंधारात मी शिरलो अबदार घरात.. एकेक पाऊल दोनदा मोजत..रुबीला केव्हाच गच्चीवरच्या पाठीमागील कोपऱ्यात ठेवले होते..हे बाबांनीच ठेवलेलं नाव..दुसर्या दिवशी मी रुबीकडे गेलो..लांबूनच नजर फेकली..ते झेपा घेत होते.. आणि त्याचे पाय फारच आखुड होते..कापसाच्या गोळ्यात फळीचे चार तुकडे खुपसावेत तसे..त्याचे डोळे ऩेमके कसे होते मला नाही आठवत आता..पण देखणेच असावेत..सगळेजण कुत्र्याच्या त्या जातीला इंग्लिश कुत्रे म्हणायचे..
ते खूप गोंडस होते..बाबांबरोबर खुप खेळकर व्हायचे..आम्ही भावंडं मात्र नेहमी टरकुनच असायचो.. का कोणास ठाऊक..त्यात शाळेतील जोडीदार कुत्रे चावल्यानंतर चौदा इंजेक्शन कसे देतात हे मेंदूत ऒतून द्यायचे..मग मी अजुनच पळ काढायचो..नाही म्हणायला त्याला अंघोळ घालताना बाबा आम्हांला सोबतीला घ्यायचे..मी दुरुनच बदाबदा पाणी ऒतुन पसार व्हायचो..पण त्याच्या साबणाचा सुगंध मला लैच आवडायचा..त्या वेष्टणावरील कुत्र्याचे चित्र मी पाटीवर काढत बसायचो..
लाख प्रयत्न झाले.. पण मला ते माझे वाटलेच नाही..ते अतोनात भुंकायचे..विशेषत: स्वयंपाकघरात जर मटण वगैरे शिजत असेल तर त्याचा जीव परेशान व्हायचा.. त्याच्या समोरच्या वाटक्यात जोपर्यंत पोहोच होत नाही तोपर्यंत त्याची गाडी चालुच असायची.. मग थोडावेळ ते झोपी जायचे..त्याच्या वाटक्यावर फुलांची नक्षी होती..ते आजही आमच्याकडे आहे..रुबीला पाणी आणि जेवण द्यायची जबाबदारी माझ्याकडे यायची कधीतरी.. मी लांबुनच ढकलुन खाली बोंबलत जायचो..दोनेक वेळा मी गल्लीत फिरवायला घेऊन गेलो तर दुसर्या कुत्र्यांवर चाल करण्याच्या नादात त्याने मला पाडले.. लोळवले.. सगळे फिदीफिदी हसले.. मला अपमान वाटला..नंतर कधीच नाही..बाबा मात्र त्याला फिरवायचे.. दररोज.. न चुकता.. कार्यालयातून आल्यानंतर..तेव्हा ते फारच आज्ञाधारक बालक बनायचे..मलाही आग्रह असायचा.. पण विटाच्या खेपेवरील किल्ला, त्यावरील अनमोल जडीबुटी, फुलपाखरे मारत फिरणे, मित्राच्या घरावरील संडासावर चढुन बसणे, लाल पेरु हुडकत बसणे..आम्ही ह्यातच मश्गुल..कारकीर्द दांडगी भरात आलेली..बाकी सगळं किरकोळ वाटायचं..
सहा महिने असचं चाललं..मग बाबांची बदली झाली..काही महिन्यांसाठी..रुबीची काळजी घेण्याबद्दल विचारलं गेलं.. पण नाहीच..आम्ही रंगलेलो दुसर्याच दुनियेत.. आमच्या काखा वर..आमच्या घरी खुपच माणसे असायची..त्यामुळं बिचार्या आईला सतत राबावं लागायचं..तीला कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जायला नाही जमायचं..आठ दिवस उलटले..एकाच ठिकाणी बांधुन असल्यामुळे त्या संपुर्ण दिवशी रुबी बेफाम भुंकले.. इतके की शेजाऱ्याने येऊन भांडणच काढले..
आमचा दूधवाला होता एक..मी दहावीला जाईपर्यंत तो आमच्यात दूध घालायचा..जवळच्या वाडीचाच होता.. अफलातुन प्रामाणिक..दुध जर रात्रीचे असेल.. अथवा पाणी मिसळलेले असेल तर तसे मोकळेपणाने सांगून टाके.. तो एका पतसंस्थेत शिपाई होता..त्याने माझ्या एका वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी मला एक भारीतली कंपास पेटी भेट दिली.. ज्यामध्ये होते एक भिंग आणि डिंकाची छोटीशी बुधली.. आणि कर्कटकाच्या टोकाला टोचु नये म्हणुन सुरक्षित आवरण..अख्ख्या वर्गात फक्त दोघांकडे तसले साधन..मला वाटला प्रचंड अभिमान..
त्याला होती कुत्र्यांची आवड..हाल होऊ नयेत म्हणुन बाबांनी जड आतड्याने सर्व काही समजावून त्याला रुबीला त्याच्या घरी न्यायला सांगितले..तो लगेच तयार झाला..त्याने भावाची रिक्षा बोलवली..आणि घेऊन निघाला..आई रडत होती आणि मी महामुर्ख पापी माणूस किल्ल्यावर बसून चिंचेची टरफले रगडुन तंबाखू बनवण्याचा डाव रंगात आणला होता.. मी पापी आत्मा..आई रडतेय.. रुबी कावराबावरा होऊन जीभ बाहेर काढून बघतोय..मी निवांत..माझा व्यापार संपल्यानंतर मी गच्चीवर गेलो..आमचे पाळीव कुत्रे ज्या ठिकाणी बांधलेले असायचे त्या जागेवर बैठक मांडली..काही केस पडले होते ते केरसुणीने साफ करुन टाकले..पुढे-पुढे तर चिंचेचा व्यापार मी त्या जागी चालवला..गोष्ट इथेच संपत नाही..जत्रेला दुधवाल्याच्या घरी गेलो तेव्हाही लाडकायला आलेल्या आमच्या पूर्वाश्रमीच्या पाळीव कुत्र्याला मी जराही ऒळख दाखवली नाही...धुडकावुन लावले..ठरलं होतं..बाबांची बदली पूर्वीच्या ठिकाणी झाल्यावर रुबीला घरी परत आणायचे.. मी अर्थातच नाखुश होतो.. पण हे असं घडलच नाही..एका रात्री गावठी कुत्र्यांनी त्याला खुप चावे घेतले आणि पुढे चार-दोन दिवसांनी दवाखान्यात मरुन गेले.. सगळे सुन्न झाले.. मी मात्र निष्ठुरच होतो..पाषाण साला..बाबांनी नंतर ते असेपर्यंत कुत्रा हा विषय कधीच काढला नाही...मी तसाच वाढत गेलो...बाबांनी आजोबा गेल्यानंतर वीटेचा व्यवसाय बंद करत नोकरीवरच लक्ष केंद्रित करत शांततेच्या आयुष्याला प्राधान्य दिले..मग आमचा किल्लाही संपुन गेला..फुलपाखरे सापडायची त्या मोकळ्या जागेला कुंपण आले..चिंचेचे झाड कापले गेले...मग बाबाही निघुन गेले...
मी सत्य लिहायचं ठरवलय..मी आहे पापी.. एका मुक्या जीवाचा मी तिरस्कार केला.. पण मी आता तसा नाहीये.. चारेक वर्षापासून मला कुत्र्यांचा खुपच लळा लागला..हे अचानकच..मग मला रुबी आठवायचा..तुम्हाला खोटं वाटेल पण माझा दररोजचा नाष्टा रुबीच्या त्याच वाटक्यात असतो, ज्याला मी नफरत करायचो..एकही कुत्रं माझ्या दारातुन उपाशी जात नाही..मी पिल्लांचे मुके घेतो.. कुत्र्याच्या दिशेने मी दगड भिरकावत नाही..जे भिरकावतील त्यांच्यासाठी ऒठी शिव्या येतात..नवीन कुत्र पाळायला मला अजुनही परवानगी नाही मिळालेली.. पण मी काहीसा कमी पापी बनलोय..रानात एक आहे कुत्रं..गेलो की मला चाटत बसते..मी चपातीचे बारीक तुकडे करुन टाकतो.. कारण कुत्र्याला हाताने चपाती नाही तोडता येत..
आईच्या मते मी जर राजा वगैरे झालो तर राज्यातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना पक्की घरं बांधुन देईन..हे तितकसं खोट नाहीये..हे खरचं खरं आहे... ....
(क्रमश:) ...
निखिल (रेगे रेगे समंदर.. )
